12 July 2020

News Flash

समाजमाध्यमे : संधींचा खजिना

वेगवेगळी समाजमाध्यमं ही आज प्रत्येकाच्याच जगण्याचा अपरिहार्य भाग झाली आहेत.

समाजमाध्यमांनी आजवर कधीच पाहायला मिळाल्या नाहीत अशा अर्थार्जनाच्या संधी दिल्या आहेत.

प्रशांत ननावरे – response.lokprabha@expressindia.com

काळानुरूप रोजगाराचं स्वरूप बदलत जातं. वेगवेगळी समाजमाध्यमं ही आज प्रत्येकाच्याच जगण्याचा अपरिहार्य भाग झाली आहेत. त्यांच्याशी संबंधित रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

समाजमाध्यमं आता लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा महत्त्वाचा भाग झालेली आहेत. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यूटय़ूब, व्हॉट्सअ‍ॅप, टिकटॉक, वीचॅट, टंबलर, स्नॅपचॅट, गुगल प्लस, स्काईप, वायबर, िपटरेस्ट, िलकडिन, टेलिग्राम, रेडिट, फ्लिकर ही जगभरासह भारतात सर्वाधिक वापरली जाणारी समाजमाध्यमं आहेत. या माध्यमांनी कामाची पारंपरिक चौकट मोडली आहे.  कल्पकतेला वाव दिला आहे. आजवर कधीच पाहायला मिळाल्या नाहीत अशा अर्थार्जनाच्या संधी दिल्या आहेत. त्याला वय, भाषा, शिक्षण, िलग, प्रदेश, रंग, रूप, जात, धर्म असं कुठलंच बंधन नाही.

आजघडीला ‘आशय’ (कंटेन्ट) हा राजा आहे. हा आशय कुठल्याही प्रकारचा असू शकतो आणि तो मिळवण्याचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे समाजमाध्यमं. समाजमाध्यमांची व्यासपीठं लोकांना थेट रोजगार देत नसली तरी या व्यासपीठांमुळेच रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारतात २०१४ सालची लोकसभा निवडणूक समाजमाध्यमांच्या आधारे लढली गेली. २०१९ च्या निवडणुकीत मोबाइलचा सर्वात जास्त वापर झाला. तो करताना या नवमाध्यमांची जाण असलेल्या लोकांची मोठय़ा प्रमाणात आवश्यकता भासते. त्यामध्ये डेटा जमा करणं, त्याचं वर्गीकरण करणं, विशिष्ट वर्गाच्या लोकांना प्रभावित करण्यासाठी पोस्ट तयार करणं आणि त्यांचा वेगवेगळ्या व्यासपीठांच्या माध्यमातून वेळोवेळी मारा करणं या सगळ्याचा समावेश होतो. त्यातील प्रत्येक फिचर हाताळण्यासाठी आणि त्यामध्ये बदल घडविण्यासाठी कुशल माणसांची आवश्यकता असते. पुढील काळात संबंधित विषयांतील पदवी, कामाचा अनुभव, वेगळा विचार करण्याची क्षमता आणि भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हेच पात्रतेचे निकष असतील.

समाजमाध्यमांतील जाणकारांना सध्या मोठी मागणी आहे. एखाद्या व्यासपीठाची माहिती असणं म्हणजे केवळ पोस्ट बनवून टाकणं एवढंच नव्हे, तर त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. या क्षेत्रातील व्यक्तीला या विषयाशी संबंधित संज्ञा, मार्केट, लोकांची आवड-निवड, तंत्रज्ञान, फायदे-तोटे, प्रतिस्पर्धी, जाहिरात व्यवस्थापन, व्यासपीठाचे नियम, त्याचे वेगवेगेळे फिचर्स या आणि अशा अनेक गोष्टींचा अभ्यास असणं आवश्यक आहे. एखाद्या वस्तूची, व्यक्तीची किंवा कार्यक्रमाची प्रसिद्धी करताना केवळ मजकूर, छायाचित्र किंवा व्हिडीओ टाकून चालत नाही. त्यासाठी आराखडा तयार करावा लागतो. कोणता ‘कंटेन्ट’ कधी आणि कोणत्या व्यासपीठावरून जाणार याची आखणी करावी लागते. प्रत्येक कंपनीमध्ये, मग ती खासगी असो वा सरकारी, समाजमाध्यमांसाठी वेगळं पद तयार करणं ही काळाची गरज झाली आहे. त्यासाठी समाजमाध्यम व्यवस्थापक, समाजमाध्यम विशेष अधिकारी, समाजमाध्यम समन्वयक ही नवीन पदं उदयाला आली आहेत. समाजमाध्यमांवरील प्रसिद्धीसाठी पूर्वीप्रमाणेच आताही चांगल्या मजकुराची निर्मिती करणारे, छायाचित्र काढणारे, डिझायनर यांची आवश्यकता आहे. चौकटीबाहेरचा विचार करणाऱ्या नव्या दमाच्या तरुण मंडळींची सध्या खूप मोठी गरज आहे.

ही मागणी लक्षात घेता डिजिटल आणि समाजमाध्यमांचं मार्केटिंग, समाजमाध्यमांचं व्यवस्थापन, बॅचलर ऑफ आर्ट इन कम्युनिकेशन स्टडीज : इंटरनेट आणि सोशल मीडिया, मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट, मास कम्युनिकेशन विथ कॉन्सन्ट्रेशन ऑन सोशल मीडिया यांसारखे पूर्णवेळ अभ्यासक्रम जगातील नामवंत विद्यापीठांमध्ये सुरू झाले आहेत. त्याशिवाय ही सर्व ऑनलाइन व्यासपीठं असल्याने खासगी संस्थांचे ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रमही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत.

समाजमाध्यमांची सुरुवात झाली तेव्हा लिखित मजकूर एवढाच त्याचा आवाका होता. हळूहळू त्यामध्ये छायाचित्रे, व्हिडीओ आणि ऑडिओ अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध झाली. व्हिडीओ सुविधा उपलब्ध झाली तेव्हा मात्र व्हिडीओ निर्मिती करणाऱ्यांची गरज भासू लागली. कारण हे तंत्रज्ञान वेगळं होतं. चित्रीकरण करणं आणि ते लोकांना पाहावंसं वाटेल अशा पद्धतीने  करून पोस्ट करणं ही या व्यासपीठांची नवीन गरज झाली. त्यावरही अनेक व्यासपीठांनी व्हिडीओसाठी फिचर्स तयार केली, फिल्टर आणले आणि लोकांचं काम अधिक सोपं केलं.

आता लाईव्ह स्ट्रीिमगचं तंत्रज्ञान माहीत असलेल्या लोकांना सध्या सर्वात जास्त मागणी आहे. समाजमाध्यमं हाताळताना एखाद्या व्यक्तीकडे कोणते गुण असावेत, याचा विचार करता त्या व्यक्तीकडे चौकस बुद्धी, गोष्टींकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याची नजर, नवीन गोष्टी शिकण्याची तयारी, कल्पकता, हजरजबाबीपणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सहनशीलता असणं अतिशय आवश्यक आहे. या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर तुम्हाला फक्त एकच गोष्ट येत असेल किंवा ठरवून दिलेलं कामच करण्याची सवय असेल, तर चालणार नाही. हे २४ तास करावं लागणारं काम आहे.

परदेशात प्रत्येक कंपनीचं समाजमाध्यमांबाबतचं धोरण असणं बंधनकारक आहे. त्याविषयी कायदे असून त्यांची अंमलबजावणीही तितक्याच काटेकोरपणे केली जाते. हे इथे नमूद करण्याचा उद्देश म्हणजे, समाजमाध्यमांशी संबंधित धोरणं, कायदे तयार करणाऱ्यांचीही आवश्यकता आता मोठय़ा प्रमाणावर आहे. फेक न्यूज, टिक टॉकवरील अश्लिल व्हिडीओ, फार्मव्हिला यांच्या आहारी जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची गरज आता भासत आहे. या सर्व रोजगाराच्या मोठय़ा संधी आहेत. स्थानिक गोष्टी जागतिक स्तरावर नेण्यासाठी स्थानिक भाषा आणि इंग्रजीचं समसमान ज्ञान असलेल्यांची आवश्यकता आहे. समाजमाध्यमं अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विकसनशील देशांमध्ये आपले हातपाय पसरू पाहत आहेत. ज्यांना भाषा, तंत्रज्ञान, कला, विविध कौशल्यं अवगत आहेत त्यांच्यासाठी वेगळे पर्याय यानिमित्ताने खुले झाले आहेत.

फक्त इतरांच्या सोशल मीडिया अकाऊंटची काळजी घेणं यातच रोजगार नसून समाजमाध्यमांच्या कंपन्यांमध्येही रोजगाराच्या आव्हानात्मक संधी उपलब्ध आहेत. कलागुणांना वाव देण्यासाठी, विविध गोष्टींची जाहिरात किंवा विक्री करण्यासाठी या माध्यमांचा उपयोग सुरू झाला असताना त्याला अधिकाधिक युजर फ्रेंडली केलं जात आहे. यासाठी कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे. एखादं समाजमाध्यम स्थानिक भाषेत असलं तरी त्यासाठीची प्रक्रिया मोठी असते. त्याशिवाय पडद्यामागून व्यासपीठाची तांत्रिक बाजू सांभाळणं, मार्केटिंग, नवीन धोरण ठरवणं, प्रतिस्पध्र्याचा अभ्यास करून अधिक चांगल्या सुविधा निर्माण करणं, व्यासपीठावरील युजर्सच्या माहितीचा अभ्यास करून पुढील वाटचाल ठरवणं, माहिती गोळा करून त्याचं व्यवस्थापन करणं, उपलब्ध माहितीचा वेगवेगळ्या कारणांसाठी कसा वापर करता येईल, इतर व्यासपीठ किंवा ब्रॅण्डसोबत हातमिळवणी करून महसुलात कशी वाढ करता येईल, या सर्व गोष्टींचा व्यावसायिक पद्धतीने विचार करणारी माणसं आज हवी आहेत.

गेल्या काही काळात अनेक ब्लॉगर्स उदयाला आले आहेत. ते खाणं, फिरणं, फॅशन, लाईफस्टाईल, ऑटोमोबाईल, तंत्रज्ञान, चित्रकला, फिटनेस या विषयांशी संबंधित मजकूर तयार करत आहेत. अनेकजण तर मोठय़ा कंपन्यांसाठी ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणूनही काम करू लागले आहेत. पण त्यांच्या यशामध्ये मेहनत, चिकाटी, प्रयोगशीलता आणि कामातील सातत्य या गोष्टींचा सर्वात मोठा वाटा आहे. जे प्रसिद्धीच्या यशोशिखरावर पोहोचले आहेत त्यांनी भविष्याची पावले ओळखून या व्यासपीठांचा नियमितपणे वापर सुरू ठेवला, त्यातील बारकावे समजून घेतले, लोकांच्या प्रतिसादावरून काहींनी मागणी तसा पुरवठा हे धोरण अवलंबले तर काहींनी आपल्या प्रयोगांद्वारे इतरांना आपलंसं करून घेतलं. त्याचं फळ त्यांना आता मिळत आहे.

समाजमाध्यमं आपल्या आवडी आणि सवडीनुसार कुठलीही गोष्ट करण्याची मुभा देत असल्याने येथे अनेक कल्पना राबवून पाहण्याची आयती संधी असते. तुमच्याकडे वेगळी कल्पना असेल आणि त्याला १०० टक्के वेळ देण्याची तयारी असेल तर समाजमाध्यमांद्वारे तुम्ही रोजगारनिर्मिती करू शकता. ज्यांनी एकटय़ाने या कामाला सुरुवात केली होती, त्यांच्या कामाचा आवाका आता इतका वाढला आहे, की त्यांना वेगवेगळ्या कामांसाठी खात्रीलायक आणि त्या कामाची माहिती असलेल्या लोकांची टीम तयार करणं गरजेचं झालं आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या विषयांमध्ये स्वारस्य आहे किंवा ज्या व्यक्तींची कामं आवडतात त्यांच्यासाठीही समाजमाध्यमांचं काम करण्याचे दरवाजे खुले झाले आहेत.

समाजमाध्यमांद्वारे यापुढेही वैयक्तिक पातळीवरील खासगी आणि सार्वजनिक बाबी शेअर केल्या जाणार आहेत. पण अर्थार्जनाची संधी त्यांनाच मिळेल ज्यांना हे बदल इतरांपेक्षा लवकर लक्षात येतील आणि ते त्यानुसार वेळीच अंमलबजावणी करतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2019 1:03 am

Web Title: career opportunities in social media
Next Stories
1 चित्रकलेतील अगस्ती
2 तरुणाई सांगते रमजानचे महत्त्व
3 प्रेक्षणीय दापोली
Just Now!
X