16 October 2019

News Flash

उत्साह आणि आनंद (जर्मनी)

युरोपात विशेषत: जर्मनीमध्ये ख्रिसमस कसा साजरा होतो हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

ऑक्टोबरमध्ये थंडीची चाहूल लागली की जर्मनीमध्ये खिसमससाठी दुकाने सजायला लागतात.

श्रद्धा भाटवडेकर – response.lokprabha@expressindia.com
नाताळ-नववर्ष विशेष
जर्मनी
ऑक्टोबरमध्ये थंडीची चाहूल लागली की जर्मनीमध्ये खिसमससाठी दुकाने सजायला लागतात. हळूहळू घरीदारी सगळीकडेच वातावरण ख्रिसमसमय होऊन जाते.

ख्रिसमस म्हटले की साधारणत: २५ डिसेंबरचा दिवस डोळ्यासमोर उभा राहतो. सजवलेला ख्रिसमस ट्री, लाल कपडे आणि टोपी घातलेला, उडत्या रेनडिअरच्या गाडीवरून भेटी घेऊन येणारा सांताक्लॉज, जिंगल बेलसारखी गाणी यांची सामान्यत: ख्रिसमसशी सांगड घातली जाते; पण अनेक वेगवेगळ्या पद्धती, समारंभ आणि धार्मिक सण ख्रिसमसशी जोडले गेले आहेत, जे युरोपात पाहायला मिळतात. अर्थात देशानुसार, तिथल्या हवामानानुसार, लोकांच्या धार्मिक पद्धतींनुसार ख्रिसमस साजरा करण्यात फरक पडतो. युरोपात विशेषत: जर्मनीमध्ये ख्रिसमस कसा साजरा होतो हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

ख्रिसमस म्हटले की, जर्मनीमध्ये उत्साहाचे उधाण येते. ऑक्टोबरमध्ये थंडीची चाहूल लागली की लगेच दुकानेसुद्धा सजावटीचे साहित्य, ख्रिसमससाठीचे खास प्रकारचे केक, चॉकलेट्स आणि अनेकविध गोष्टींनी सजू लागतात. ख्रिसमसची खरी सुरुवात होते अ‍ॅडव्हेंटपासून. अ‍ॅडव्हेंट म्हणजे येशू ख्रिस्ताच्या आगमनाची वाट बघण्याचा काळ. साधारणत: ख्रिसमसच्या आधीचे चार रविवार अ‍ॅडव्हेंट सुरू होतो. ही चर्चच्या नवीन वर्षांचीही सुरुवात मानली जाते. या काळात घरोघरी विशेष अ‍ॅडव्हेंट कॅलेंडर्स लावली जातात. साधारण १ डिसेंबरपासून २४ दिवसांचे हे कॅलेंडर असते. पारंपरिक कॅलेंडरमध्ये २४ खिडक्या असतात. रोज एक खिडकी उघडायची आणि सगळ्या खिडक्या उघडल्या, की ख्रिसमसचे आगमन होते, अशी ही संकल्पना. या खिडक्यांवर ख्रिस्तजन्माची चित्रकथा किंवा बायबलमधील प्रार्थना लिहिलेल्या असतात किंवा चॉकलेट्स, खेळणी अशा गोष्टी ठेवल्या जातात. बरेच जण आपल्या मुलांसाठी घरीच कॅलेंडर्स बनवतात. आजकाल ऑनलाइन कॅलेंडर्ससुद्धा बघायला मिळतात.

अ‍ॅडव्हेंटमधील अजून एक विशेष गोष्ट म्हणजे अ‍ॅडव्हेंट रिथ. फुले आणि हिरव्यागार पानांची गोलाकार आरास आणि त्यावर ठेवलेल्या चार अथवा पाच मेणबत्त्या. पहिल्या रविवारी एक मेणबत्ती, दुसऱ्या रविवारी दोन अशा प्रकारे चौथ्या रविवारी चारही मेणबत्त्या लावल्या जातात. पाचवीमधली मेणबत्ती ख्रिसमसच्या किंवा आदल्या दिवशी लावली जाते. बऱ्याच घरांमध्ये आणि चर्चमध्ये अशा मेणबत्त्या पाहायला मिळतात. याच बरोबरीने दररोज विशेष प्रार्थना करणे, ख्रिसमस ट्री उभारणे आणि घराची सजावट करणे अशा अनेक गोष्टी अ‍ॅडव्हेंटशी संबंधित आहेत.

ख्रिसमसच्या आगमनाची आणखी एक नांदी म्हणजे विशेष मार्केट्सची सुरुवात. अ‍ॅडव्हेंट काळात अशी मार्केट्स गावाच्या चौकात दिसू लागतात. मध्ययुगीन काळात जर्मनीमध्ये या ख्रिसमस मार्केट्सची सुरुवात झाली असली तरी काळानुसार या मार्केट्सचं स्वरूप बदलत गेलं आहे. जर्मनीहून ही मार्केट्स आता जगात इतर शहरांतही पोहोचली आहेत. या मार्केट्समध्ये ख्रिसमस सजावटीच्या तसंच भेट देण्यासाठी विविध वस्तू खरेदी करता येतात. स्थानिक कारागीर त्यांनी बनवलेल्या वस्तू या मार्केटमध्ये विकायला घेऊन येतात. काही मार्केट्समध्ये आकाशपाळणा, मेरी-गो-राऊंड आणि इतर अनेक राइड्ससुद्धा बघायला मिळतात. त्याचबरोबर विविध आकारांचे लेबकुखन, स्टोलनसारखे पारंपरिक केक, चेस्टनटस, भाजलेले बदाम अशा ख्रिसमसच्या खास पदार्थाबरोबरच इतर खाद्यपदार्थाच्या स्टॉल्सने ही मार्केट्स भरून जातात. या मार्केट्समध्ये विशेष आकर्षण असते ग्लुवाइनचे. मुख्यत्वे रेड वाइनमध्ये दालचिनी, लवंग, जायफळ असे अनेक प्रकारचे मसाले घालून ग्लुवाइन बनवली जाते आणि ही वाइन गरम करून प्यायली जाते. फळांचा स्वाद असलेली ग्लुवाइनसुद्धा लोकप्रिय आहे.

ख्रिसमस काळात वाइन पिण्याचा अजून एक पारंपरिक प्रकार म्हणजे फेयुर्झागेनबोले (Feuerzangenbowle). शेगडीच्या मंद आचेवर एक मोठे पातेले ठेवून त्यात रेड वाइन ओतली जाते. स्वादासाठी दालचिनी, लवंग, संत्राच्या साली घातल्या जातात. त्यावर एक विशेष किसणी ठेवून त्यावर साखरेचा कोन ठेवला जातो. त्यावर रम ओतून मग तो कोन पेटवला जातो. हळूहळू साखर वितळून वाइनमध्ये विरघळते. त्या काहीशा जळलेल्या साखरेने वाइनला आणखीनच स्वाद येतो. ही वाइनसुद्धा गरम गरम प्यायली जाते.

ख्रिसमसपूर्वीचा अजून एक सण म्हणजे ६ डिसेंबरला साजरा होणारा ‘संत निकोलस’ दिवस. आपल्याला माहिती असलेल्या आधुनिक सांताक्लॉजचे मूळ या संत निकोलसमध्ये आहे. संत निकोलस मुलांसाठी भेटी घेऊन येतो असा समज आहे. आदल्या रात्री मुले त्यांचे बूट बाहेर ठेवतात आणि जर ती वर्षभर चांगली वागली असतील तर निकोलस त्यांच्या बुटांमध्ये त्यांच्यासाठी भेटी ठेवून जातो. ती शहाण्यासारखी वागली नसतील तर त्यांच्या बुटात त्यांना काठी सापडते. बऱ्याचदा ६ तारखेला स्वत: निकोलस मुलांसाठी भेटी घेऊन घरी येतो. फोलबेर्गमध्ये वाढलेल्या जुलियाच्या आठवणीत आहे त्या दिवशी घरी येणारा निकोलस आणि त्याच्याबरोबर येणारा काहीसा क्रूर दिसणारा क्राम्पूस. ते दोघे एकत्र घरी यायचे आणि मुलांनी वर्षभर काय केले याचा पाढा वाचायचे. मुलांनी वर्षभर चांगले काम केले असेल तर त्यांना निकोलसकडून भेट मिळायची आणि नाही तर क्राम्पूस त्यांना शिक्षा द्यायचा. अर्थात ज्युलियाला कायम छान छान भेटीच मिळाल्याची आठवण आहे.

ख्रिसमस बऱ्याच ठिकाणी २५ तारखेला साजरा होत असला तरी जर्मनीमध्ये मात्र २४ तारखेला जास्त महत्त्व आहे. लुईसा म्हणते, ख्रिसमस खरं तर धार्मिक सण, पण हा तितकाच एक कौटुंबिक समारंभदेखील आहे. २४ तारखेला दुपारी कुटुंब एकत्र भेटते. सगळे मिळून ख्रिसमस ट्री सजवतात. लहान मुलांसाठी चर्चमध्ये दुपारी खास प्रार्थना आयोजित केली जाते. सगळे मिळून एकत्र जेवतात. जुलिया सांगते, आकाशात पहिला तारा दिसू लागला की बेल्सचा आवाज ऐकू येतो. लहान मुले ख्रिसमस ट्रीकडे धाव घेतात आणि त्यांना दिसतात अनेक भेटवस्तू, ज्या देवदूत (Christkind) त्यांच्यासाठी ठेवून जातो. त्यानंतर एकमेकांना भेटी देणे, एकत्र मिळून ख्रिसमसची गाणी म्हणणे आणि चर्चमध्ये रात्री प्रार्थनेला जाणे असे अनेक कार्यक्रम असतात. २४ तारखेची रात्र ही सहसा आई-वडील आणि भावंडे अशा अगदी जवळच्या कुटुंबाबरोबर साजरी केली जाते, तर २५ ला इतर आप्तेष्टही एकत्र येतात.

ख्रिसमस काळात दिवस हळूहळू लहान होत जातात. जर्मनीमध्ये तर चार-साडेचारलाच काळोख पडतो. थंडी वाढत जाते. काही भागांत बर्फही असतो. अशा काळात ख्रिसमस लाइट्स, सजावटीमुळे वातावरणात उत्साह संचारतो. जर्मनीच्या वेगवेगळ्या भागांत ख्रिसमसशी संबंधित सण साजरे करण्याच्या प्रथांमध्ये आणि पद्धतींमध्ये थोडाफार फरक आढळतो; पण कुटुंबाने एकत्र येऊन साजरा करण्याचा हा काळ. सजावटी करणे, खाण्याचे विविध प्रकार बनवणे, गाणी म्हणणे, एकमेकांना भेटी देणे अशा अनेक गोष्टी एकत्र मिळून केल्या जातात आणि त्यात या सणाची खरी मजा आहे.

ख्रिसमस ट्री सजवणे हे सर्वाच्या आवडीचे काम. ख्रिसमस ट्री सजवण्याची सुरुवात लाटविया, एस्टोनिया या उत्तर युरोपियन भागात आणि उत्तर जर्मनीमध्ये १५व्या-१६व्या शतकाच्या सुमारास झाली असावी. आधी प्रोटेस्टंट पंथाची प्रथा मानले गेलेले हे ख्रिसमस ट्री १९व्या शतकात जर्मन समाजात सर्वच स्तरांत लोकप्रिय झाले आणि जर्मनीमधूनच इतर देशांतही पोहोचले. हळूहळू गावाच्या मध्यवर्ती चौकात आणि चर्चमध्ये ख्रिसमस ट्री लावण्याची प्रथा लोकप्रिय झाली. आज बऱ्याच शहरांमधील ख्रिसमस ट्री त्यांच्या उंचीसाठी आणि उत्कृष्ट सजावटीसाठी प्रसिद्ध आहेत.

ख्रिसमस ट्रीची सजावट घरी विविध प्रकारे केली जाते. रिबिनी, प्लास्टिक, धातू अथवा काचेचे गोळे किंवा मूर्ती, इलेक्ट्रिक मेणबत्त्या किंवा माळा लावून ख्रिसमस ट्री सजवले जातात. कधी कँडी, चॉकलेट्स, जिंजरब्रेडसारखे खाण्याचे पदार्थही झाडावर टांगले जातात. बऱ्याचदा वर एक चांदणी लावली जाते जी येशू ख्रिस्ताच्या जन्माशी संबंधित आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावाही काही जण ख्रिसमस ट्रीजवळ उभारतात. काही जण आवडीने हा देखावा स्वत: बनवतात. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी पाळण्यात बाळाची प्रतिकृती ठेवली जाते.

ख्रिसमस ट्री कधी उभारायचा, त्याची सजावट कधी करायची आणि कधी उतरवायची याचेही काही नियम आहेत. अर्थात ते प्रदेशानुसार आणि धार्मिक प्रथांनुसार बदलतात. परंपरेप्रमाणे २४ तारखेला दुपारी ख्रिसमस ट्री घरात आणून सजवायचे आणि मग साधारण १२ दिवस – ५ ते ६ जानेवारीपर्यंत ठेवायचे अशी प्रथा आहे; पण बरेच जण अ‍ॅडव्हेंटपासूनच ख्रिसमस ट्री सजवतात.

या काळात ख्रिसमसशी संबंधित अनेक गाणी म्हटली जातात. ख्रिसमस कॅरोल्स अनेक देशांत लिहिल्या गेल्या आहेत आणि विविध भाषांत त्यांची भाषांतरे झाली आहेत. बऱ्याचशा कॅरोल्स या येशू ख्रिस्ताच्या जन्माशी संबंधित असल्या तरी ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, ख्रिसमस बेल्स अशा अनेक विषयांवर कॅरोल्स लिहिल्या गेल्या आहेत. चर्चमध्ये या कॅरोल्स म्हणण्याचे विशेष कार्यक्रम ख्रिसमसदरम्यान आयोजित केले जातात. विशेषत: काही चर्चमध्ये फक्त मेणबत्त्यांच्या प्रकाशात २४ तारखेला रात्री कॅरोल्स म्हटल्या जातात.

ख्रिसमस काळातील अजून एक विशेष म्हणजे ख्रिसमसमध्ये जेवणात पारंपरिक पदार्थ बनवले जातात. जिल म्हणते, बऱ्याचदा ख्रिसमसच्या आदल्या दिवशी साधेच जेवण बनवले जाते आणि प्रत्यक्ष ख्रिसमसच्या दिवशी मेजवानीचे आयोजन केले जाते. माशांचे प्रकार सामान्यत: जेवणात आढळतात. त्याचबरोबर बटाटय़ाचे सॅलड, कोबीचे सॅलड, सॉसेजेस आणि इतर मांसाहारी पदार्थ आवडीप्रमाणे केले जातात. धार्मिकतेनुसारसुद्धा जेवणाच्या पद्धतीमध्ये फरक पडतो. गोड पदार्थामध्ये लेबकुखन, कुकीज (Plaetzschen) आणि स्टोलन यांचा समावेश असतो.

जर्मनीच्या  Erzgebirge भागात ख्रिसमसच्या आदल्या दिवशी पारंपरिक मेजवानीचे आयोजन केले जाते. नऊ पदार्थाच्या या मेजवानीला Neunerlei असे म्हणतात. या नऊ पदार्थाना विशेष प्रतीकात्मक महत्त्व आहे. उदाहरणार्थ सॉसेजेस (bratwurst) हे सामथ्र्य आणि ऊब यांचे प्रतीक, तर बदामामुळे पुढील वर्ष बिनअडथळ्याचे जाते अशी समजूत आहे. मशरूम आणि बीट आनंद, चांगले आरोग्य आणि सुख घेऊन येतात, असे मानले जाते. डम्पिलग्स, माशांचे प्रकार, डाळी, दुधाचे पदार्थ, सॅलड्स अशा अनेक इतर गोष्टी या जेवणात असतात. या जेवणाशी अनेक पद्धती आणि समजुतीही जोडलेल्या आहेत. जेवताना उठू नये, नाही तर तुमच्याकडे चोरी होईल असे मानले जाते. तसेच उरलेले जेवण दुसऱ्या दिवशी खाल्ले जाते; पण मीठ आणि ब्रेड रात्रभर टेबलवर तसेच ठेवले जातात.

अ‍ॅडव्हेंटपासून सुरू झालेली ही सणांची मालिका इथे २५ तारखेला संपत नाही. ६ जानेवारीला एपिफनी  (Three Magi/ Three Kings Day) म्हणजेच येशू ख्रिस्ताचा देवाचा अवतार म्हणून प्रकटीकरणाचा दिवस साजरा केला जातो. तीन ज्ञानी व्यक्तींनी किंवा तीन राजांनी येशू ख्रिस्ताला या दिवशी भेट दिली, असे मानतात. हा दिवस साजरा करण्यासाठी मुले आणि मुली राजाचे कपडे, मुकुट असे सजून आणि चांदणी लावलेली काठी घेऊन एपिफनीशी संबंधित गाणी म्हणत घरोघरी जातात. त्यांना स्टार सिंगर असे म्हणतात. सोफिया लहान असताना तीही स्टार सिंगर म्हणून गावातल्या घराघरांत जात असे. त्यांना मिठाई मिळत असे. त्यांच्याकडे जगातल्या गरीब मुलांकरिता चॅरिटीसाठी पसे गोळा करण्याचीही जबाबदारी असे. या दिवसाची आणखी एक प्रथा म्हणजे जर्मनीच्या कॅथॉलिक भागात या दिवशी घराच्या मुख्य द्वारावर आशीर्वादपर संदेश लिहितात. बऱ्याचदा हे काम स्टार सिंगर करतात. ख्रिसमस ट्री आणि सजावट सहसा या दिवसापर्यंत ठेवली जाते.

नवीन वर्ष साजरे करण्याचा तसा ख्रिसमसशी संबंध नसला तरी ३१ डिसेंबर हा संत सिल्वेस्टर यांच्या पुण्यतिथीचा दिवस, त्यामुळे खास जेवणाचा बेत, रात्री १२ वाजता चर्चमध्ये प्रार्थना अशा पद्धतीने सिल्वेस्टर साजरा केला जातो. काही घरांमध्ये या वेळी भविष्य सांगण्याची प्रथा आहे, ज्याला Bleigiessen असे म्हणतात. त्यामध्ये शिसे वितळवून ते गार पाण्यात टाकून त्याच्या आकारावरून येणारे वर्ष कसे असेल याचे अंदाज बांधले जातात. अर्थात या प्रथेमध्ये वापरले जाणारे शिसे जास्त प्रमाणात वापरले गेल्याने शरीराला घातक ठरण्याची भीती लक्षात घेऊन आता त्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याला पर्यायी प्रकार सुचवण्यात आले आहेत.

नवीन वर्षांच्या आदल्या रात्री अर्थातच सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असते. रोषणाई, फटाके आणि पार्टी करून नवीन वर्षांचे आगमन साजरे केले जाते. ३१ डिसेंबर आणि त्याआधीचे तीन दिवसच जर्मनीमध्ये फटाके विकण्याची परवानगी आहे. युरोपमधला नवीन वर्षांच्या आगमनाचा सगळ्यात जंगी उत्सव बíलनमध्ये साजरा होतो. बíलनच्या प्रसिद्ध ब्रान्डेनबुर्ग गेटजवळची मध्यरात्रीची आतषबाजी बघण्यासारखी असते.

या वर्षीसुद्धा जर्मनीमध्ये ख्रिसमसचा आनंदोत्सव सुरू झाला आहे. अ‍ॅडव्हेंट कॅलेंडर्स लागली आहेत. छोटय़ा-मोठय़ा गावांत, शहरांत ख्रिसमस मार्केट्समध्ये गर्दी वाढू लागली आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षांच्या स्वागताला जर्मनी सज्ज झाले आहे.

First Published on December 21, 2018 1:07 am

Web Title: christmas celebration in germany