18 February 2019

News Flash

उपक्रम : सायकलवरून बंगलोर ते कन्याकुमारी!

पुढे आम्ही चिन्नपटनम्ला पोहोचलो. दुपारचे दीड वाजले होते. जवळपास ७० किमी सायकलिंग झाले होते.

केरळातील बॅकवॉटर आणि समुद्रकिनाऱ्यांनी सायकलिंगला हुरूप आला

गेल्या काही वर्षांत सायकलिंग हा छंद म्हणून खूप लोकप्रिय झाला आहे. आपल्या छंदाला सामाजिक जोड देणाऱ्या तरुणांचा हा आगळावेगळा सायकल प्रवास.

आम्ही २०१० पासून एचआयव्हीबाधित मुलांच्या विशेषत: अनाथ मुलांच्या  शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन, स्वयंरोजगार व प्रशिक्षण या मूलभूत प्रश्नावर सर्वसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने काम करत आहोत. बाबा आमटे यांनी १९८६ आणि १९८९मध्ये काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेची डॉक्युमेंटरी पाहिल्यावर केवळ डोनेशन, मदत एवढय़ापुरते मर्यादित न राहता आपणही असेच काही तरी करावे असे वाटले. संबंधित डॉक्युमेंट्री पाहिल्यावर सायकलिंगच्या माध्यमातून एड्स जनजागृतीची प्रेरणा मिळाली.

मग काय छोटय़ामोठय़ा मोहिमा पूर्ण केल्या. मुंबई ते कोकण सागरी मार्ग, परभणी- पंढरपूर सायकलवारी, परभणी- पणजी, अकोला- मेळघाट- गोंदिया- विदर्भ सायकल मोहीम, सूरत- माऊंट अबू-  चित्तोडगड, गोंदिया प्रतापगढम्, गडचिरोली तसंच चंद्रपूरच्या दुर्गम जंगलातून व नक्षलग्रस्त भागात सायकल प्रवास केला. प्रत्येक प्रवास तितकाच महत्त्वाचा व खडतर होता. या वर्षी थंडी चालू व्हायच्या अगोदर अर्थात दिवाळीनंतर बंगलोर- केरळ- कन्याकुमारी अशी सायकल मोहीम आखली. तिची दोन महिने आधीपासून तयारी सुरू होती. कर्नाटक, केरळ व तमिळनाडूच्या भागातील मित्र, सायकलिंग ग्रुप, एड्स नियंत्रण विभागाचे अधिकारी या सर्वाशी फोन, ई-मेलने संपर्क साधून आमच्या सायकल मोहीम व जनजागृती मोहिमेची पूर्वकल्पना दिली. नियमितपणे सायकलवर सराव केला. प्रत्येक रविवारी १०० किमी लाँग राइड करून शारीरिक क्षमतेची देखील चाचणी झाली.

शेवटी २४ तारीख उजाडली. सकाळी नांदेड- बेंगलोर ट्रेनमध्ये लगेज कोचमध्ये सायकल बुक केल्या. बुकिंग क्लार्क एकेकाळचे सायकलपटू असल्याने त्यांनी पूर्ण सहकार्य केले. केरळचे विशेष आकर्षण असल्याने मोठी टीम तयार झाली होती. परंतु त्यांच्यापैकी मोठय़ा सायकलिंग मोहिमेचा अनुभव मला व डॉ. संदीप साखरेलाच होता. आम्ही दोघे, डॉ. किरण बकान, डॉ. चंद्रशेखर भालेराव, कैलास तिथे, माऊली खटिंग, ओम तलरेजा आणि सनथ जैन अशी आठ जणांची टीम होती.

बेंगलोर श्रीरंगपट्नम

२५ ऑक्टोबरला बेंगलोर रेल्वे स्थानकात पोहोचून पार्सल ऑफिसमधून सायकल सोडवून रेल्वे स्टेशनच्या मुख्य द्वारापाशी आलो. कर्नाटक आरोग्य विभागाच्या आय.ई.सी.चे संचालक गोिवद राजू, हनुमंत राव व सर्व सहकाऱ्यांनी आमचे स्वागत करून आमच्याकडे एड्स जनजागृतीविषयी प्रादेशिक भाषेतील साहित्य सुपूर्द केले. तिथून आमचा सायकल प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. गजबजलेल्या बेंगलोरमधील वाहतुकीमधून मार्ग काढत थांबू तेथील लोकांना माहितीपत्रक वाटत अखेर बेंगलोरपासून १८ किलोमीटरवर असलेल्या डेकॅथलॉन या स्पोर्ट्स मॉलला भेट दिली. तेथील सहकाऱ्यांनी आम्हास शुभेच्छा दिल्या. भूक लागली होती. त्या भागातील स्पेशल बिदादी इडलीवर ताव मारला. मसूर हायवेवर ही इडली प्रसिद्ध आहे. ती नेहमीच्या इडलीपेक्षा चार-पाच इंच मोठी असते. मसूर हायवेवरून पुढे निघालो. रस्ता मोठा होता परंतु ट्रॅफिकही खूप जास्त होते. वाटेत काही ट्रक ड्रायव्हर्स, तसंच हॉटेलवाल्यांनी आमच्या मोहिमेबद्दल प्रश्न विचारले. आम्हाला एकमेकांची भाषा येत नसल्याने आमच्याजवळची माहितीपत्रकं वाटून त्यांना उत्तर दिले. दुपारी १२ वाजेपर्यंत रामनगर गाठले. रामनगर हे गाव सिल्क सिटी म्हणून ओळखले जाते. येथे सिल्क कापड, साडीचे मोठे मोठे कारखाने आहेत. येथे विविध भागातून कामगार स्थलांतरित झालेले आहेत.

२०१० च्या आकडेवारीनुसार कर्नाटकमध्ये ३६ हजारपेक्षा अधिक एचआयव्ही संक्रमित व्यक्ती एआरटी औषधोपचार घेत आहेत. कामगारांचे स्थलांतर व महिनोंमहिने घरापासून दूर राहिल्याने होणारे असुरक्षित लैंगिक संबंध हे एचआयव्हीच्या प्रसाराचे मुख्य कारण आहे. म्हणून आम्ही रामनगर येथील हायवेवरील मार्केट व कापड कारखाने भागातील मजुरांना व दिसेल त्याला माहितीपत्रके वाटत होतो. हिंदीत माहिती देत होतो.

पुढे आम्ही चिन्नपटनम्ला पोहोचलो. दुपारचे दीड वाजले होते. जवळपास ७० किमी सायकलिंग झाले होते. चिन्नपटनम् हे लहान मुलांच्या लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे. सायकलवर आधीच दहा किलो सामान असल्याने आम्ही खेळण्यांच्या दुकानांना केवळ भेट देत विंडो शॉपिंग केले. तेथील कारागिरांना माहितीपत्रकांचे वाटप केले. पुढे दहा किमी सायकल चालवून एक ढाबा गाठला. भूक लागली होती पण तेथे केवळ फिश कबाब होता. मी शाकाहारी. मग संदीपने घरून आणलेल्या पोळ्या-चटणी खाऊन थोडे स्ट्रेचिंग करून पुढे निघालो. आभाळ भरून आले होते. उन्हामुळे घामाच्या धारा निघत होत्या. मंडय़ा जवळ पाऊस सुरु झाला होता. परंतु थोडय़ाशा फरकाने आम्ही भिजायचे वाचलो. पाच किमी पुढे आलो तर पावसाने अडवले. तब्बल पाऊण तास आडोशाला थांबलो. तेथे गप्पांच्या ओघात ‘महाराष्ट्र-कर्नाटक, भाई-भाई’ म्हणत एक दोस्त मिळाला. त्याने जवळील टपरीवर कॉफी पाजली. घरी चला म्हणून आग्रह करू लागला पण वेळेची मर्यादा असल्याने त्याचा निरोप घेऊन हायवेला लागलो.

पाऊस पडून गेल्याने वातावरण छान झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा भात शेती व काही छोटे-मोठे तलाव होते. रस्ता चांगला होता. छान निसर्गसौंदर्य अनुभवयास मिळाले. कावेरी नदीवरील मोठा पूल ओलांडून ऐतिहासिक शहर असलेल्या श्रीरंगपट्टनम्ला पोहोचलो. सकाळपासून जवळपास १३० किमी सायकलिंग झाले होते. गावाच्या वेशीवर श्रीरंगपट्टनम् एड्स नियंत्रण विभागाची टीम आमच्या स्वागताला होती. त्यांचे स्वागत स्वीकारून सर्वप्रथम प्राचीन रंगनाथ स्वामी मंदिर व महालक्ष्मीचे दर्शन घेतले. तिन्ही बाजूंनी कावेरी नदीने वेढलेले श्रीरंगपट्टनम् एखाद्या बेटासारखे आहे. श्रीरंगपट्टनम् हे एकेकाळी विजयनगरच्या साम्राज्याचा भाग होते. श्रीरंगपट्टनम्च्या किल्ल्यात ब्रिटिशांशी झालेल्या लढाईत टिपू सुलतानचा मृत्यू झाला होता. हैदर अली व टिपू सुलतानशी संबंधित ऐतिहासिक इमारतीना आम्ही भेटी दिल्या. तेथील मार्केट गाठून तेथील ऑटो, भाजीवाले, चहाच्या टापरीवर असलेले गिऱ्हाईक सगळ्यांना माहितीपत्रके वाटली. शासकीय विश्रामगृहात आमची सोय केली होती. पोटभर जेवून झोपलो.

श्रीरंगपट्टनम् ते विराजपेट

२६ ऑक्टोबर रोजी श्रीरंगपट्टनम्हून पहाटे पाच वाजताच उठून रंगनाथ स्वामी मंदिराचे दर्शन घेऊन निघालो. वाटेत रंगनाथीट्ट पक्षी अभयारण्यास भेट दिली.  ओढय़ाकाठी थोडा वेळ बसलो. हा रस्ता थोडा आतल्या भागातला होता पण वातावरण छान होते. भातशेती, कावेरी बॅकवॉटर यातून तीव्र चढ आणि उतार अशा रस्त्यावर सायकल चालवत वृंदावन गार्डन गेट गाठले. गार्डन बंद असल्याने पुढे निघालो. धरण परिसर असल्याने रस्ता चढ-उताराचा होता. सकाळी आठ वाजताही पुष्कळ घाम निघत होता. ३० किमी पेडल मारत पुन्हा राष्ट्रीय महामार्ग २७५ गाठला आणि पुढे निघालो.

वाटेत बिलकेरे गावी नाश्ता केला. तेथील लोकांना फारसे हिंदी येत नव्हते. माहितीपत्रके वाटून पुढे निघालो. मसूर – हुंसुर रस्ता चढ-उताराचा होता. त्यामुळे वारंवार गियर बदलावे लागत होते. हायवेमुळे रस्त्याच्या दुतर्फा झाडं कमी होती. ११ वाजता हुंसुरला पोहोचलो. रस्ता विचारायच्या निमित्ताने मालवाहतूक करणाऱ्या ड्रायव्हर्सना काही पत्रके वाटली. हुंसुरपासून पुढे दहा किलोमीटरवर राज्यमार्ग पकडला. येथून जंगल लागले. दुपारचा एक वाजला होता. येथून विराजपेट ५३ किमी होते. सागर धाब्यावर थांबलो. मी तेथील प्रसिद्ध घी राइसवर आणि इतरांनी फिश राइसवर ताव मारला. बिल देताना ढाबेवाल्या चाचांनी विचारलं, ‘‘कुठून आलात ? कोणत्या गावचे?’’ चाचा मुस्लीम दिसले म्हणून मी हिंदीतच उत्तर देऊ लागलो. तर त्यांनी मस्त सुनावले ‘काय रे, मराठीत बोलायला लाज वाटते का?’ चाचा अनेक वर्षे कोल्हापूरला होते, त्यामुळे मराठी उत्तम बोलत होते. त्यांची गळाभेट घेऊन पुढे निघालो.

वाटेवर विराजपेटचे जंगल लागले. येथून विराजपेट ४० किमी होते. रस्त्याच्या दुतर्फा झाडं, काही माकडं नजरेस पडली. थोडे पुढे आम्हाला घोणस दिसली. दुपारी तीन वाजता तिथीमती येथे पोहोचलो. तेथील टाटा कंपनीचे कॉफीचे मळे बाहेरूनच पाहिले. तिथीमतीचे फॉरेस्ट गेस्ट हाऊस छान होते. चार वाजता गोनिकोप्पा गाठले. तेथील शासकीय रुग्णालयातील एड्स नियंत्रण विभागाचे कौन्सिलर्स व डॉक्टर्सनी आमचे स्वागत केले. तेथील मार्केटमध्ये माहितीपत्रके वाटली. काही व्यक्तींनी आम्हास प्रवासासाठी पैसे देऊ केले परंतु आम्ही त्यांना नकार दिला. गोनिकोप्पा ते विराजपेट तीव्र चढ व घाटाचा रस्ता. काही चढ तर इतके अवघड होते की दोन्ही साइडला गियर एकवर घेऊन पेडल मारावे लागायचे. अचानक गियर बदलल्याने चेन वाजायची. सकाळी १०० किमी सायकल चालवल्यावर जितका थकवा आला नाही तितका या केवळ १५ किमी तीव्र चढ-उताराच्या रस्त्याने घाम काढला. दिवसभरात एकूण ११८ किमी सायकल चालवून सायंकाळी पाच वाजता विराजपेट पोहोचलो.

विराजपेट तसे थंड हवेचे ठिकाण. या भागात भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे ठिकठिकाणी तळी होती. भातशेती, कॉफी व मसाला लागवड ही येथील मुख्य पिके. परंतु कुर्ग जवळ असल्याने पर्यटनासाठी प्रसिद्ध शहर. तेथील प्रसिद्ध गणपती मंदिर, मारियम्मा मंदिर व सिटी टॉवर भागात माहितीपत्रके वाटून जनजागृती केली. मी आणि संदीपने तेथील प्राचीन गणपती मंदिर, सेंट अ‍ॅनी चर्च, मारियम्मा मंदिराला भेट दिली. विराजपेट हा कोडगू जिल्हय़ातील तालुका आहे. हे पर्यटन स्थळ असल्याने लोकांना बऱ्यापैकी हिंदी, इंग्रजी समजते. शाळा, मंदिरामध्ये सोय नसल्याने रात्रीचा मुक्काम नाइलाजाने लॉजमध्ये केला. सुदैवाने केवळ १५०/- प्रति व्यक्तीप्रमाणे रूम मिळाली. या भागात शाकाहारी जेवण मिळणे दुर्मीळ असल्याने संदीपने माझ्यासाठी ब्रेड आणि सॉसची व्यवस्था केली. सायंकाळी स्वेटर घालून आम्ही शहरात फेरफटका मारला. दिवसभराच्या चढ-उताराच्या रस्त्यामुळे पाय थकले होते. पायी फिरल्याने मस्त वाटले. रात्री लवकर झोपी गेलो.

विराजपेट ते वडकरा (केरळ)

२७ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता विराजपेटहून कॉफी पिऊन निघालो. विराजपेट भागात कॉफीचे पुष्कळ मळे होते. सकाळच्या धुक्यातून मार्ग काढत चेक पोस्ट गाठले. तिथून कुर्ग कन्नूर राज्यमार्ग घ्यावा लागतो. येथून जवळपास २० किमी तीव्र उताराचा रस्ता होता. घनदाट ब्रह्मगिरी जंगलातून मार्ग काढत वेगावर नियंत्रण ठेवत उतरत होतो. वाटेत ठिकठिकाणी झरे लागले. प्रसिद्ध शिवमंदिराचे दर्शन घेतले. जवळपास १८ किमी उतार झाल्यावर वाटेत आम्हाला काही बुलेटस्वार भेटले. तेदेखील कन्नूर बेंगलोर बुलेट एक्स्पेडिशनसाठी जात होते. पुढे मक्काकोट्टममाग्रे आम्ही केरळ राज्यात प्रवेश केला.

थोडे पुढे एक नदी ओलांडून व त्या नदीवरील जुन्या पुलावरून आम्ही इरिट्टी हायवेवर निघालो. हा रस्ता अत्यंत खराब होता. ठिकठिकाणी काम चालू होते. पुढे इरिट्टीजवळ चर्च सेंट सेबॅस्तियन व सेंट पेंटेकोस्ट चर्च लागले. वाटेतच नाश्ता केला. इरिट्टी हा कन्नूर जिल्ह्य़ातील एक तालुका, पण अत्यंत सुंदर असे निसर्गसौंदर्य लाभलेले गाव. येथून पुढील रस्ता तीव्र चढ-उतार व काही ठिकाणी अत्यंत कठीण असे चढ असलेला होता. दमटपणा असल्याने घामाच्या धारा वाहत होत्या. पुढे चावशेरीमाग्रे मतन्नूर गाठले. केरळमध्ये कुठेच गाव संपत नाही. एकामागे दुसरे गाव सुरू. प्रत्येक गाव सर्व सुविधांनी युक्त व या भागात उष्मा व दमटपणा असल्याने जागोजागी शीतपेय, ज्यूस मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. मतन्नूरनंतर कुटुपरंबा येथे पोहोचलो. आज दुपारी एकपर्यंत वडकरा येथे पोहोचणे आवश्यक होते, कारण तेथील दोन शाळा, सायकलिंग क्लबने ठिकठिकाणी एड्स जनजागृती संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आमच्या लोकेशनविषयी वडकराहून फोन येत होते. कुटुपरंबाहून पोक्कोड गावातून दोन रस्ते फुटतात. डावीकडे पानुर, माहे, कोषीकोड, तर उजवीकडे तलशेरी, कन्नूर. आम्ही डावीकडे वळलो. पानुर लागले. पानुर ते माहे हा अत्यंत चढ-उताराचा रस्ता. चढ अतिशय तीव्र. सहकारी डॉ. बकान यांच्या गिअर सेटिंगमध्ये प्रॉब्लेम असल्याने ते शिफ्ट होत नव्हते. वडकराशिवाय एक्स्पर्ट सायकल मेकॅनिक मिळणार नव्हता. त्यामुळे ते अक्षरश: चढ आला की सायकल हातात घ्यायचे आणि उतारावर सीटवर बसायचे. आम्ही दोघे पानुर येथे पोहोचलो. उसाचा गार रस पिऊन थोडे स्ट्रेचिंग केले. बस स्टँड भागात मल्याळम भाषेतील एड्स जनजागृती पत्रके वाटली आणि पुढे निघालो. पानुरनंतर चढ-उतार तर होतेच, पण निसर्ग खूप सुंदर होता. समुद्र जवळ असल्याने ठिकठिकाणी बॅकवॉटर, छोटय़ा नद्या व लांबच्या लांब पूल होते. त्यामुळे मजा येत होती. माहे नदीवरील पूल तसंच कुन्हीपल्ली गाव ओलांडून माहे शहरात प्रवेश केला. माहे हे जिल्ह्य़ाचे मुख्यालय. तसे पाँडिचेरी केंद्रशासित प्रदेशामध्ये मोडते. रेल्वे क्रॉसिंग लागले. रेल्वे यायला वेळ आहे हे पाहून आम्ही लगेच माहितीपत्रके वाटली. सर्वाना आमच्या सायकलवरील ओझे, इतका लांबचा प्रवास याबद्दल ऐकून आश्चर्य वाटत होते. पुढे चौकातून डावीकडे वळून नॅशनल हायवे ६६ला लागलो. चार किमीनंतर मुक्काली गाव लागले. माझे होमिओपॅथीतील गुरू डॉ. सुदिन कुमार यांचे हे गाव. त्यांनी आमचे स्वागत केले. संत्रा सर घेतला. सरांच्या क्लिनिकमध्ये थोडा वेळ विश्रांती घेऊन वडकरासाठी निघालो. जवळपास नऊ किमीनंतर वडकरा येथील बी.ई.एस. शाळेत पोहोचलो. सकाळपासून १०३ किमी सायकलिंग झाले होते. सुरुवातीला जरी २५ किमी उतार असला तरी पुढील सर्व रस्ता चढ- उताराचा व समुद्रकिनारी असल्याने दमटपणा खूप होता. त्यामुळे थोडा थकवा आला होता; पण तो थकवा या शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांच्या स्वागतामुळे केव्हाच निघून गेला. स्काऊट गाईडच्या पथकाने आमचे स्वागत केले. उपशिक्षणाधिकारी वेणुगोपाल, बीईएस शाळेच्या प्राचार्या स्टेला, वटकरा रायडर्स या सायकलिंग क्लबचे श्रीजीथ, मनाली मोहनन, दिनेश के. पी., सी. प्रसून यांनी आमचे स्वागत करून विद्यार्थ्यांना आमच्या मोहिमेची माहिती दिली. एड्स जनजागृती पत्रकांचे वाटप करून मदतीचे आवाहन केले. आमचे एचआयव्ही बाधितांच्या हक्कासाठी सुरू असलेले काम, एचआयव्ही एड्सविषयी माहिती देऊन सायकलिंगचे पर्यावरण संवर्धनासाठीचे महत्त्व सांगितले. पुढे श्रीनारायणा इंग्लिश स्कूलकडे निघालो. शाळेच्या गेटमध्ये प्रवेश केला तर शाळेच्या इमारतीच्या तिन्ही बाजूंनी टाळ्यांचा कडकडाट. शाळेच्या बँड पथकाने आमचे स्वागत करत आम्हाला मुख्य हॉलपर्यंत आणले. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक भेटले. केरळमधील प्रसिद्ध अशी आकाराने लहान पण अत्यंत गोड केळी व लिंबू सरबत दिले. थोडे बोलून आम्ही सभागृहाकडे निघालो. सभागृहात नववी ते बारावीतील शेकडो विद्यार्थी बसले होते. त्यांना एचआयव्ही एड्सची कारणे, प्रसार आदीविषयी माहिती देऊन एचआयव्हीबाधित विद्यार्थ्यांना सन्मानाची वागणूक देण्याचे आवाहन केले. सोबत सर्वाना सायकलिंग व फिटनेसचा मंत्रदेखील दिला. पुढे प्रश्नोत्तरांच्या सेशनमध्ये मुलांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. तोपर्यंत पावसामुळे पानुर येथे अडकलेला संदीप पोहोचला. त्याला घेऊन पोटभर जेवलो. डॉ. बकान यांच्या सायकलच्या गिअर सेटिंगचा प्रॉब्लेम होता. तेथील सायकल मेकॅनिकने गिअर सेटिंग दुरुस्त करून दिले. मग वडकरा येथील समुद्रकिनारा बघायला गेलो. वडकरा बीचला सॅण्ड बँक बीचदेखील म्हणतात. कोटक्कल नदी येथे अरबी समुद्राला मिळते. वडकरा येथील लोकणारकवू मंदिर सुप्रसिद्ध आहे. मलबार प्रांतातील वडकरा हे प्रेक्षणीय पर्यटन स्थळ आहे. सायंकाळी ग्रिफी हॉल येथे वटकरा रायडर्स व आयएचएमए वटकराने छान समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती वडकराचे पोलीस उपअधीक्षक टी. प्रेमराज उपस्थित होते. सायंकाळपर्यंत का होईना इतर सायक्लिस्ट कसेबसे सायकल, बॅक अप व्हेइकलने पोहोचले होते. या कार्यक्रमात सर्व सायक्लिस्ट, डॉक्टर्स, फिटनेसप्रेमींच्या उपस्थितीत आम्हा सर्व आठ टीम मेंबर्सचा सत्कार करण्यात आला. मीदेखील या सर्व सायक्लिस्ट, सामाजिक कार्यकत्रे, फिटनेसप्रेमींशी संवाद साधत आजवर एचआयव्ही बाधितांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या कार्यासाठी मदतीचे आवाहन केले. सर्वाना जनजागृती पत्रके वाटली. रात्री डॉ. सुदिन कुमार सरांच्या कुटुंबासोबत केरळ स्पेशल डिश फ्राइड राइस, पापड, रसम, पायसम, नॉन-व्हेजसाठी फिश करी, प्रॉन आणि घी राइस, पराठा यावर सर्वानी आपापल्या आवडीनुसार ताव मारला. रात्रीची झोपण्याची सोय शाळेतील वर्गात केली होती. मस्त बेंच जुळवून आम्ही झोपी गेलो.

वडकरा ते गुरुवायूर

२८ ऑक्टोबरला सकाळी सर्व जण वडकरा बस स्टँडला जमलो. आमच्यासोबत वडकरा रायडर्सचे २० सायकलस्वार काही ठरावीक अंतरासाठी सहभागी झाले होते. वडकरा शहरातून ठिकठिकाणी शाळेतील मुले आमच्या रॅलीला उभे राहून शुभेच्छा देत होती. ३५ कि.मी.नंतर एलट्टर ब्रिज येथे मलबार रायडर्सने रॅलीचे आयोजन केले होते. वाटेत थोडी कॉफी घेऊन कप्पाड बीच पाहिला. वास्को द गामाने येथूनच भारतात प्रवेश केला होता.

कोयीलांडी ओलांडून पुढे ५० सायकलिस्टचा ग्रुप आमच्या स्वागताला तयार होता. माझे होमिओपॅथीतील सर डॉ. गफार, डॉ. प्रशांत, डॉ. उमन सरांनी आमच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. सर्वाना फळांचा रस दिला. मलबार रायडर्स व कॅलिकत पॅडलर्स ग्रुपने आमचे स्वागत केले. या ग्रुपच्या एकापेक्षा एक रोड बाइक, हायब्रीड बाइक देखण्या होत्या. त्यांच्याशी गप्पा झाल्या. आसपासच्या लोकांना जनजागृती पत्रकांचे वाटप केले. ‘मल्याळम् मनोरमा’ व ‘मातृभूमी’ दैनिकाच्या पत्रकाराला एचआयव्ही एड्स जनजागृतीसाठी सुरू असलेल्या आमच्या सायकलिंग उपक्रमाची माहिती दिली. मग एकामागे एक असे ५०-५५ सायकलस्वार निघालो. ठिकठिकाणी शाळकरी मुले टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होती. पुढे कालिकत येथील सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये गेट टुगेदर व न्याहारीची सोय होती. इडली वडा, अप्पम, व्हेज करी, मसाला डोसा, तर नॉनव्हेजवाल्यांसाठी अप्पम फिश करी, चिकन ६५ होते. येथे कोषीकोड आयएचएमए डॉक्टर्सशी आमच्या या सायकल मोहिमेविषयी चर्चा केली. त्यांना जनजागृती पत्रकांचे वाटप केले. कोषीकोड हे केरळ राज्यातील नागरी वस्ती असलेले सर्वात मोठे शहर आहे. या शहराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. कालिकत बीच बघून गुरुवायुरसाठी राष्ट्रीय महामार्ग ६६ ला लागलो. दुपारचे १२ वाजले होते. आणखी १०० कि.मी. बाकी होते. एक वाजता कोटक्कल येथे कार्यक्रम होता; परंतु तोपर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. शिवाय कोटक्कलमाग्रे गुरुवायुर १२५ कि.मी., तर तिरुरमाग्रे १०० कि.मी. होते. पुढे कालिकत विद्यापीठजवळ तीन अवघड असे चढ चढून विद्यापीठाजवळ पोहोचलो. सायकलस्वार वसिमचा निरोप घेतला आम्ही रस्ता चुकू नये म्हणून तो ३० कि.मी. सोबत आला होता. तो आयटीचे शिक्षण घेतो. त्याचे घर कालिकत विद्यापीठ येथे असून तो रोज ५० कि.मी. सायकलवर प्रवास करतो. कालिकत विद्यापीठाच्या शेवटच्या एक कि.मी. लांबीच्या चढाने सर्वाचा घाम काढला. सर्वानी नारळाच्या दुधापासून बनवलेला रस घेतला. डॉ. अन्वर सरांना कोटक्कल ड्रॉप करत असल्याची कल्पना देऊन माफी मागितली. कारण डॉ. अन्वर यांनी टीम सफारीसोबत एका मोठय़ा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पुढे चेलारी जंक्शनहून उजवीकडे कोस्टल रूटला लागलो.

हायवेपेक्षा हा रूट कमी रहदारीचा. निसर्गसौंदर्याची उधळण होती. नारळाची, फणसाची झाडे, एका बाजूला सागरी किनारा आणि बॅकवॉटर. मजा येत होती. टायईलीकडवू पुलावर आलो. कडंलुंडी नदीवर फोटो काढले. थोडी चिक्की खाल्ली. गुरुवायुर ९० कि.मी. बाकी होते. चेट्टीपडी रोड खराब होता, परंतु सायकलला त्रास नव्हता, शिवाय वाहतूक कमी होती. डॉ. अन्वर सरांना आम्हास भेटण्याची इच्छा होती. ते कारने परंपनगडी येथे भेटण्यास आले. दिलखुलास गप्पा झाल्या. त्यांच्या टीम सफारी रायडर्ससाठी जनजागृती माहितीपत्रके दिली. पुढे रामेश्वर शिव क्षेत्र मंदिर पाहून पोरामपूझा बॅकवॉटरचे पूल ओलांडून तनूर येथे पोहोचलो. तनूर हे एक छोटे गाव आहे. तेथील रिक्षावाल्यांना रूट विचारून माहितीपत्रके वाटली. पुढे तिरुर येथील मुख्य चौकमध्ये जनजागृती पत्रके वाटली. थोडी केळी खाल्ली व चमरावाटनम् पुलावर पोहोचलो. इतर मित्रांची वाट पाहत पुलावर बसून पक्षी, निसर्गसौंदर्य न्याहाळत होतो. भरतपुझा नदीवर बांधलेला हा पूल जवळपास ७५० मीटर्स लांबीचा आहे. पुलावरून भरतपुझा नदी व आसपासचे दृश्य नयनरम्य होते. बाकी मित्र येईपर्यंत तेथील लोकांना जनजागृती पत्रके वाटली. पाच वाजले होते. सायंकाळी ७ वाजता गुरुवायुर येथे कार्यक्रमास पोहोचणे आवश्यक होते. मग मी, संदीप, डॉ. बकान यांनी ३५ कि.मी. अंतर कसे कापायचे याचे नियोजन केले. व्यवस्थित लयबद्ध पेडिलग करत पोनानीला पोहोचलो. पोनानी गावाबाहेर कॉफी घेतली. पाणी भरून घेतले. आता केवळ २५ कि.मी. शिल्लक होते. ६ वाजत आले होते. हेड लॅम्प ऑन केला. तिघे एकापाठोपाठ एक असे पेडिलग करत गुरुवायुर कोची रोडच्या चौकामध्ये पोहोचलो. गुरुवायुर पाच कि.मी. होते. गुगल मॅपवर इंद्रप्रस्थ हॉटेल टाग्रेट केले आणि बरोबर ७ वाजून १० मिनिटांनी मी, संदीप आणि डॉ. बकान पोहोचलो. डॉ. चंद्रन सर व आयएचएमए थ्रिसूर टीमने आमचे स्वागत केले. त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात केरळच्या सांस्कृतिक पद्धतीने आमचे स्वागत शाल देऊन करण्यात आले. इतर लोक कालिकत विद्यापीठ व तिरुरजवळ थकल्याने बॅक अप व्हेइकलने कसेबसे पोहोचले. मी सायकलिंगची कशी प्रेरणा मिळाली व सायकलिंगच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या मनापर्यंत पोहोचून कशी जनजागृती सुरू आहे याविषयी तसेच एचआयव्ही बाधितांच्या मूलभूत हक्कांविषयी संवाद साधला. शेवटी डॉ. चंद्रन सरांनी आभार मानले. रात्रीचे जेवण आम्हा सर्वानी सोबतच घेतले. रात्री उशीर झाल्याने प्राचीन विष्णू मंदिर गुरुवायुर देवस्थानचे दर्शन शक्य झाले नाही. दिवसभरात १५४ किमी सायकलिंग झाल्याने थकलो होतो.

गुरुवायूर कोची चेरथला

२९ ऑक्टोबर रोजी सकाळी उठायला थोडा उशीर झाला. गर्दी असल्याने गुरुवायूर विष्णू मंदिराचे बाहेरून दर्शन घेतले. माझ्या दोन्ही मुलींसाठी पारंपरिक केरळी फ्रॉक विकत घेतले. निघेपर्यंत साडेसात वाजले. आता इथून पुढे आमचे इतर सहकारी सायकलवरुन सोबत येणार नव्हते. त्यामुळे पुढील प्रवास मी आणि संदीपच करणार होतो.

दोघे एकामागे एक असे पेडिलग करत हायवेला लागल्यावर दहा किमीनंतर नाश्त्याचा ब्रेक घेतला. नाश्ता करून कोडूनगलूर रस्त्याला लागलो. हा तसा राष्ट्रीय महामार्ग. वाटेत सुंदर असे रामाचे मंदिर होते. ११ वाजता कोडूनगलूर पोहोचलो. येथे प्राचीन माँ भगवतीदेवीचे मंदिर आहे. आम्मे शरणम्चा जयघोष करत हजारो भाविक देवीचे दर्शन घेतात. मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी लुंगी घालणे आवश्यक आहे. आम्ही दोघांनी दर्शन घेऊन मंदिर परिसरातील भाविकांना एड्स जनजागृती पत्रकाचे, वाटप केले. पुढे हायवेला लागलो. सेलम- कन्याकुमारी हा प्रचंड रहदारी असलेला रस्ता. तिथे सायकल चालवणे अवघड होते. समुद्र जवळ असल्याने प्रचंड उकाडा जाणवत होता. उष्मा असला तरी रस्ता छान होता. आम्ही दोघे पूल आला की फुटपाथवरून सायकल चालवत फोटोसेशन, व्हिडीयो, सेल्फी वगैरे करत चाललो होतो. रस्त्यात वरपुझा ब्रिज लागला. नदीच्या किनारी एक फिशनेट, आसपासची सुंदर हिरवळ, तिचे प्रतििबब पाण्यात पडून पाणी हिरवे दिसत होते. वरपुझा पूल ओलांडून एर्नाकुलम शहरात प्रवेश केला. दुपारचे दीड वाजले होते. उष्मा  आणि मागील चार दिवसापासूनच्या सततच्या सायकलिंगमुळे सॅडल सोअरनेस आले होते. सीटवर नीट बसता येत नव्हते. भूक लागली होती. आम्ही कोचिन स्पेशल बिर्याणी खाल्ली. पुढे डॉ. मोहम्मद सलिह व आयएचएमए कोचिनच्या सहकाऱ्यांनी आमचे स्वागत केले. त्यांना जनजागृती पत्रकांचे वाटप केले. त्यांनी आम्हाला शहाळ्याचे मधुर पाणी पाजले. पुढे डेकॅथलॉन मॉलवरून फोमचे सीट कव्हर घेतले. तेथे अनेक सायकलिस्टशी भेट झाली. ते देखील बॅक वॉटर राइडसाठी जात होते. त्यांना आमच्या मोहिमेविषयी माहिती देऊन पत्रके वाटली.

पुढे आल्लेपी हायवेला लागलो. वाटेत कोची युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अ‍ॅण्ड ओशियन स्टडीजला भेट दिली. एक मोठा ब्रिज लागला.  चेरथला केवळ ३० किमी बाकी होते. भरपूर पाणी पिऊन देखील उष्णतेमुळे लघवीला थोडा त्रास होता. म्हणून लिक्विड ओआरएस घेतले. २० किमी बाकी असताना कॉफी पिऊन चिक्की खाल्ली. आता केवळ ११ किमी बाकी होते. रेल्वे क्रॉसिंग ओलांडून कोस्टल रूट घेतला. दोन्ही बाजूला छान घरे आणि अत्यंत तुरळक ट्रॅफिक. सायंकाळ झाली होती. पण मुक्कामाचे ठिकाण जवळ असल्याने आम्हाला घाई नव्हती. शेवटी दिवसभरात १२५ किमी सायकलिंग करून सायंकाळी सहा वाजता कणिचूकुलांगरा मंदिर, चेरथला पोहोचलो. मंदिर दीपोत्सवाने छान सजले होते. डॉ. शिबा राणी मॅडमना आम्ही पोहोचल्याचा कॉल करून त्या येईपर्यन्त तासभर मंदिरातील दीपोत्सव, पालखी, मिरवणुकीचा आनंद घेतला. तेथील उपस्थित भक्तांना जनजागृती पत्रकांचे वाटप केले. चेरथला येथे कणिचूकुलांगरा देवीचे प्राचीन मंदिर आहे. तेथील देवस्थानच्या भक्तनिवासामध्ये आमच्या राहण्याची सोय केली होती. सायंकाळी डॉ. शिबा राणी आणि त्यांचे पती यांनी खूप छान आदरातिथ्य केले. पोटभर जेवू घातले. रात्री वेळेवर झोपलो.

चेरथला कोल्लम चाट्टनूर 

३० ऑक्टोबरला पहाटे साडेपाचलाच निघालो. काटूर बीचवर सूर्योदय अनुभवला. काटूर बीच जास्त लोकांना माहीत नसल्याने हा बीच शांत व स्वच्छ होता. तोपर्यंत आल्लेपी रायडर्सचे सायकलस्वार पोहोचले. २०-२५ सायकलस्वारांसोबत सायकलिंग करत आम्ही आल्लेपी शहरात प्रवेश केला. आल्लेपीला बॅकवॉटरचे शहर म्हणतात. येथील हाऊसबोट जगप्रसिद्ध आहेत. आल्लेपीच्या जवळपास माझ्या सायकलच्या बॉटम बेअिरगमध्ये प्रॉब्लेम झाला. कट कट आवाजासोबत पेडिलगला अवघड जात होते. काही रायडर्स टूल घेऊन आले तर लक्षात आले की, आतील बेअिरग आणि एक्सेल खराब झालेत. मी थोडा निराश झालो. डॉ. राजेश कुमार सरांच्या येथे पोहोचलो. मेकॅनिक दहाच्या आधी भेटणे शक्य नव्हते. आल्लेपी रायडर्स व आयएचएमए आल्लेपीने आम्हा दोघांचे स्वागत केले. पुढे थोडा नाश्ता करून पॅरामेडिकलचे विद्यार्थी, उपस्थित सायकलस्वार आणि डॉक्टर्सशी आमची सायकल मोहीम, एचआयव्ही बाधितांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या कार्याविषयी संवाद साधला. डॉ. शिबा राणी मॅडमनी ते मल्याळममध्ये भाषांतरित करून सांगितले. १० वाजता सायकलदुरुस्तीसाठी मेकॅनिककडे गेलो. त्याने केवळ २० मिनिटांत दुरुस्त करून दिले. तोवर इडली-वडय़ावर ताव मारला. सर्वाचे आभार मानून मी आणि संदीप निघालो. आधीच उशीर आणि या तीन तासांत सायकल खराब झाल्यामुळे मनाची खूपच चलबिचल झाली होती. पुढचा १०५ किमी प्रवास बाकी होता.

बाटल्या भरून त्यात एनरझल ओआरएस मिसळून निघालो. आल्लेप्पी-कोल्लम भागात प्रचंड दमटपणा, ऊन, त्यामुळे पायात गोळे येऊ नयेत म्हणून व्यवस्थित पाण्याचे संतुलन व लयबद्ध पेडलिंग करत ३० कि.मी. सायकलिंग करत हरिपादला पोहोचलो. नॅशनल हायवे असल्याने हरिपादपर्यंत प्रचंड रहदारी होती. येथून एक रस्ता कोल्लम तर दुसरा कोट्टायमकडे जातो. आम्ही कोल्लमचा रस्ता पकडला. हा हायवे समुद्राच्या अगदी जवळून जातो. आणखी ३० कि.मी.नंतर दुपारी एक वाजता करुनागपल्ली पोहोचलो. पायात ताण जाणवू लागला म्हणून मोसंबी रस, ग्लुकोज घेतले. चॉकलेट खाऊन थोडे स्ट्रेचिंग केले. कोल्लम ३० कि.मी. बाकी होते. पुढे कायमकुलम येथील केरळ ललित कला अ‍ॅकॅडमीला भेट दिली. त्याला शंकर मेमोरियल नॅशनल कार्टून म्युझियम म्हणतात. तेथील विविध कार्टून, हस्तकला, विविध लाकडांवर कोरलेली देखणी शिल्पे  होती. दुपारचे जेवण रद्द केले, कारण दोन-तीन वेळा रस, चिक्की, कॅडबरी झाले होते. सकाळी उशीर होऊनदेखील सकाळपासून जवळपास ८०-८५ कि.मी. अंतर कापले होते. पुढे चवारा गाव ओलांडून चार वाजता कोल्लम शहरात प्रवेश केला. कोल्लम शहरात प्रवेश करताना अष्टमुडी लेकला जोडलेल्या बॅकवॉटर्सवर एक मोठा पूल ओलांडून जावे लागते. या पुलावरून समुद्राचे व समुद्राला मिळणाऱ्या कालदा नदीचे पाणी व किनारी उभ्या असलेल्या मोठय़ा बोटी हे दृश्य खूपच मोहक दिसते.

हॉटेल लेक व्ह्य़ू कोल्लमला पोहोचलो. कोल्लम हे प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शनचे गाव. तेथे आयएचएमए कोल्लमचे पदाधिकारी डॉ. बिजू जॉन, डॉ. हरिकृष्णन, डॉ. रेजिथ कुमार यांनी स्वागत केले. त्यांना एड्स जनजागृती सायकल मोहिमेविषयी माहिती देऊन माहितीपत्रकांचे वाटप केले. मेदू वडा व मोसंबी रस घेऊन त्यांचा निरोप घेतला. कोल्लमला पोहोचायला उशीर झाल्याने एका शाळेत संवादाचा कार्यक्रम होऊ शकला नाही म्हणून वाईट वाटले. कोल्लम-त्रिवेंद्रम हा अत्यंत गजबजलेला व नेहमीच वर्दळ असलेला रस्ता. त्यातून मार्ग काढत नेहमीचाच राष्ट्रीय मार्ग क्र. ६६ पकडला. सहा वाजता चात्तन्नूरला पोहचून डॉ. शाजी सरांना फोन केला. तेही सायंकाळची बिझी ओपीडी असतानाही लगेच आम्हास घ्यायला आले. डॉ. शाजी सर मानसोपचार व होमिओपॅथिक तज्ज्ञ. त्यांनी आमची मुक्कामाची सोय त्यांच्या घरीच केली होती. पारंपरिक केरळी घरात आमचा पहिलाच मुक्काम. आम्ही दोघे फ्रेश होऊन डॉ. शाजी, त्यांचे कुटुंब आणि डॉ. परिमल चॅटर्जी सरांसोबत जेवायला गेलो. केरळी पद्धतीचे व्हेज व नॉनव्हेज खाद्यपदार्थ पोटभर जेवलो. सायंकाळी डॉ. शाजी सरांच्या प्राध्यापक पत्नीसोबत आमच्या कामाबाबत गप्पा झाल्या. त्यांनी आम्हाला त्यांच्या घरातील स्पेशल काजू व केळी दिली. त्यांच्या मुलाची पेंटिंग पाहिली. रात्री वेळेवर झोपी गेलो, कारण उद्याचे टाग्रेट नागरकॉइल किंवा कन्याकुमारी होते.

चाट्टनूर त्रिवेंद्रम कन्याकुमारी

३१ ऑक्टोबर रोजी डॉ. शाजी सरांनीच आम्हास साडेचारला उठवून गरम चहा व केळीचे वेफर्स दिले. सर स्वत: आमच्यासोबत पारपल्लीपर्यंत सायकलिंग करत आले. पुढे कधीतरी मोठय़ा सायकल मोहिमेत सहभागी होईन असे आश्वासन त्यांनी दिले. पारपल्लीला त्यांचा निरोप घेऊन पुढे निघालो. पारपल्ली आटिंगल व तिरुअनंतपूरम रस्ता चढउताराचा, रोिलग व प्रचंड रहदारी व नागरी वस्तीनं गजबजलेला होता. २५ कि.मी. सायकलिंगनंतर आटिंगल पोहोचलो. थोडे शेंगदाणा लाडू खाऊन निघालो. कुडवूरजवळ हत्तीचे दर्शन झाले. काझाकोट्टाम ओलांडल्यावर त्रिवेंद्रम टेक्नो पार्क लागले. तिथे विप्रो, इन्फोसिससारख्या मोठय़ा आयटी कंपन्यांचे ऑफिस होते. किमान येथे ऑफिसला जाणारी व्यक्ती पारंपरिक कपडय़ांऐवजी फॉर्मल सूटमध्ये दिसू लागली. असे सगळ्या केरळमध्ये कोची सोडून क्वचितच पाहायला मिळाले. आकुलम लेकवरील पूल ओलांडून त्रिवेंद्रम शहरात प्रवेश केला. रस्ता चुकू नये म्हणून नॅशनल हायवे कन्याकुमारी रस्ता सोडला नाही. हेवी रहदारीमधून मार्ग काढत त्रिवेंद्रम येथील मित्र डॉ. कन्नन सरांच्या घरी पोहोचलो. तेथे त्यांची पत्नी डॉ. ज्योती, दोन मुले, रेल्वेमधून सेवानिवृत्त झालेले इंजिनीअर प्रकाश व त्यांच्या मित्रांनी आमचे स्वागत केले. डॉ. ज्योती कन्नन मॅडमने आग्रहाने केरळी डिश – पुट्ट व सांबर खाऊ घातले. चहा घेऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला. आभाळ भरून आल्याने उष्णता जाणवू लागली होती. रस्ता चढउताराचा आणि लहान असल्याने रहदारी व बाजूने एकदम जवळून जाणाऱ्या बसेसचा त्रास होत होता. २० कि.मी. पुढे गेल्यावर बलरामपूर पोहोचलो. तेथील प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिरास भेट दिली. त्या मंदिराची कमान व कमानीवरील श्रीकृष्ण व अर्जुनाची मूर्ती देखणी होती. पुढे नेयार नदीवरील पूल ओलांडून नेयटीकरा गाव ओलांडले. दुपारी एक वाजता पारशाला गावातून तामिळनाडू राज्यात प्रवेश केला. इतके दिवस केरळमध्ये छान रस्ते अनुभवले होते, पण पारशाला ते टकालीमधील रस्ता छोटा आणि ठिकठिकाणी काम चालू होते. भूक लागली होते. व्यवस्थित हॉटेल मिळत नव्हते. उष्णता आणि प्रचंड चढउतार यामुळे थकवा आला होता. केळी घेतली तर त्या केळीवालीला हिंदी येत नव्हते. मग एकाची मदत घेऊन भाव विचारून पैसे दिले तर काय ४० रुपयांना तीन केळी, त्यातील दोन कच्ची. एक केळं दोघात खाऊन दोन वाजता मरतडम् येथे पोहोचलो. तेथे एका हॉटेलमध्ये पेस्ट्री, आइस्क्रीम, रस घेतला. थोडे बरे वाटू लागले. गावातून दोन कि.मी. बाहेर आलो असू तितक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. ऑक्टोबर असल्याने रेनकोट घेतला नव्हता. एका घराच्या छताखाली आडोशाला थांबलो. दीड तास झाला. पावसाचा जोर होता. दुपारचे चार वाजले होते. कन्याकुमारी ४५ कि.मी. बाकी होते. सायंकाळी मुक्कामी पोहोचू की नाही, असे विचार सुरू झाले. मग न राहवून एखाद्या पियाजो, छोटा हाथी, मालवाहू गाडय़ांना हात दाखवणे सुरू झाले, पण कोणीच थांबेना. बाजूच्या हॉटेलवाल्याची मदत घेतली. त्याने पुढे पाच किलोमीटरवर वेलोकोड स्टॉप आहे तिथे विचारून पाहा, असे सांगितले. सुदैवाने पाच कि.मी.नंतर पावसाचा जोर कमी झाला. मग हळूहळू मनातील नकारात्मक विचार कमी होऊ

First Published on March 23, 2018 1:20 am

Web Title: cycling from bangalore to kanyakumari for social emphasis