18 February 2019

News Flash

‘केबीं’चा एकलव्य!

के. बी. कुलकर्णी हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील नामवंत कलावंतांपैकी एक महत्त्वाचे नाव.

अरुपाचे रूप
या तरुण चित्रकाराचा ध्यास एकलव्य़ासारखा एवढा जबरदस्त होता की, केबींकडून अनौपचारिक पद्धतीने खूप काही शिकत गेला..

के. बी. कुलकर्णी हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील नामवंत कलावंतांपैकी एक महत्त्वाचे नाव. कलावंतांच्या अनेक चांगल्या पिढय़ा घडविण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. त्यातही केबींनी हे सारे केले ते कलापंढरी असलेल्या मुंबईपासून कोसों दूर असलेल्या बेळगावामध्ये राहून. कलापूर असलेल्या कोल्हापूर आणि बेळगाव यांचे तसे घनिष्ट नाते असले तरी बेळगावामध्ये राहून कलाकरांच्या पिढय़ा घडविणे हे तसे सोपे काम नक्कीच नव्हते. त्यांच्या शिष्यांमध्ये जॉन फर्नाडिस, रवी परांजपे आदी नामवंत कलावंतांचा समावेश होतो. त्यांनी बेळगावातील चित्रमंदिर या संस्थेमध्ये शिकवणे बंद केले त्याचवेळेस वयाने विशी- बाविशीत असलेला एक युवा चित्रकार त्यांच्याकडे पाहून कलाध्यासाने पुरता पछाडलेला होता. एवढा की, त्याने इलेक्ट्रॉनिक इंजिनीअिरगचे शिक्षण पूर्ण केले खरे पण पेशा मात्र स्वीकारला नाही. त्या चित्रकाराचे नाव चंद्रशेखर आत्माराम रांगणेकर. मग त्याने ती आवड जोपासली ती एकलव्यासारखी मेहनत घेत.

बेळगावचे वातावरण, केबींचा प्रभाव, बालपणापासून असलेली चित्रकलेची आवड यामुळे रांगणेकर खरे तर चित्रकलेवरच अधिक पोसले गेले. त्यामुळे इंजिनीअिरगचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरही त्यांनी व्यवसाय म्हणून कला क्षेत्राकडेच आपली पावले वळवली. बेळगाव तरुण भारतमध्ये ते रेखाचित्रकार म्हणून दाखल झाले. १८ वर्षे त्यांनी तेच काम निगुतीने केले. ते करताना आपली मूळ ललित कलेची आवडही त्यांनी अभ्यास आणि मेहनतीने जोपासली. केबींकडून थेट चित्रकलेचे धडे गिरवता आले नाहीत, कारण त्यावेळेस केबींनी वयोमानपरत्वे शिकवणे बंद केले होते. पण एकलव्य़ासारखा ध्यास एवढा जबरदस्त होता की, दर एक- दोन महिन्यांनी या तरुणाने आपली चित्रे घेऊन त्यांच्याकडे दाखवायला जाण्यास सुरुवात केली. मग केबींनी केलेल्या मार्गदर्शनातून अनौपचारिक कलाशिक्षण होत गेले. सध्या रांगणेकर मनुष्याकृतीप्रधान चित्रे आणि निसर्गचित्रणात पारंगत आहेत तेवढेच ते व्यक्तिचित्रणातही पारंगत आहेत. जगप्रसिद्ध अमेरिकन अभिनेता अर्नॉल्ड श्वात्र्झनेगर याच्या संग्रहामध्ये रांगणेकर यांनी केलेले त्यांचे व्यक्तिचित्र विराजमान आहे. त्यांचे चित्रप्रदर्शन गेल्याच आठवडय़ात वरळी येथील नेहरू केंद्राच्या कलादालनात पार पडले.

जलरंग, तैलरंग आणि पेस्टल या तिन्ही माध्यमांवर रांगणेकर यांची उत्तम पकड आहे, हे त्यांची चित्रे पाहताना जाणवते. मनुष्याकृतीप्रधान कलाकृतींवर केबींचा प्रभाव जाणवल्याशिवाय राहात नाही. केवळ एखादी शैली पाहून शिकणे आणि उत्तमपद्धतीने घोटवणे हे कौशल्याचेच आहे. मात्र भविष्यात त्यांनी त्यातून थोडे बाहेर पडत आता स्वतच्या शैलीचा शोध घेणे गरजेचे आहे. केबी स्कूलमधून आलेल्या सर्वच कलावंतांचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे ते म्हणजे निसर्गदृश्यांमध्ये पकडलेली भाववृत्ती. भाववृत्तीचा तो तजेलदार क्षण पकडणे सर्वांनाच जमत नाही. रांगणेकर यांनी मात्र त्यांच्या सर्वच निसर्गदृश्यांमध्ये तो यशस्वीरित्या पकडला आहे. त्यांची निसर्गदृश्यातील रंगलेपन शैली मात्र त्यांची स्वतचीच आहे. मात्र या सर्वांवर कडी करतात ती त्यांनी पेस्टलमध्ये केलेली रंगचित्रे. त्या माध्यमाचा पोत आणि जाणवणारा फील यात ते बाजी मारतात. साडीवरील जरतारीचे त्यांनी केलेले चित्रण हे वापराचे माध्यम कोणतेही असले तरी ते केवळ नजरेत भरणारे असेच आहे. मात्र याही बाबतीत त्यांनी बेळगावी शैलीतून बाहेर पडत स्वतलाच अधिक धुंडाळण्याचा प्रयत्न केला तर त्यांना अधिक खूप काही गवसण्यासारखे आहे. कारण धुंडाळण्याची आणि नवतेला भिडण्याची त्यांची क्षमता नक्कीच आहे हे त्यांचे आताचे काम पाहिल्यावर जाणवते. ज्या बेळगावी मातीशी आणि कलासंस्कारांशी नाळ जोडलेली आहे, त्यांच्याशी प्रामाणिक राहून काम करणारा एक गुणी कलावंत या निमित्ताने बऱ्याच काळाने मुंबईकरांना अनुभवता आला.
विनायक परब – vinayak.parab@expressindia.com /  @vinayakparab

First Published on March 30, 2018 1:07 am

Web Title: drawing artist k b kulkarni