आलू कचोरी
साहित्य :
४-५ मऊ उकडलेले बटाटे
२-३ टेबलस्पून कॉर्नफ्लोवर किंवा साबुदाण्याचं पीठ
मीठ
३-४ ब्रेड स्लाइसचे क्रम्स (उपवासासाठी हवं असेल तर ब्रेड आणि कॉर्नफ्लोवर वापरू नका.)
सारणासाठी :
१ वाटी खवलेला नारळ
प्रत्येकी ८-१० बेदाणे आणि काजू
१ टीस्पून ताजी मिरपूड
३-४ अगदी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
अर्धे लिंबू ऐच्छिक
तळण्यासाठी तेल
कचोरी घोळवण्यासाठी जाडसर साबुदाणा पीठ किंवा ब्रेड क्रम्स.
कृती :
बटाटे सोलून किसून घ्यावेत. त्यात साबुदाणा पीठ/कॉर्नफ्लोवर, ब्रेड क्रम्स आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून गोळा मळून घ्यावा. बेदाणा आणि काजूचे तुकडे करून घ्यावे. कोथिंबीर धुऊन, सुकवून, बारीक चिरून घ्यावी. नारळात काजू, बेदाणा, मिरपूड, मिरची, कोथिंबीर आणि लिंबू रस घालून मिश्रण फोर्कने अलगद एकत्र करावं. सगळ्यात शेवटी मीठ घालून मिश्रण ढकलावं. तयार बटाटय़ाच्या मिश्रणाचा लिंब थोडा लहान गोळा घेऊन त्याची खोलगट वाटी बनवावी. त्यात मावेल एवढं सारण भरून वाटी बंद करून त्याला गोल आकार द्यावा. तयार कचोरी ब्रेड क्रम्स किंवा पिठात घोळवून घ्यावेत. जसजसे तयार होतील तसतसे लालसर रंगावर तळून घ्यावेत. हा एक करायला सोपा पण नाजूक पदार्थ आहे. थोडा काळजीपूर्वक केला तर तुमच्या सुगरणपणाला भरभरून दाद मिळेल हे नक्की!
चटपटीत चिजी चिरोटा
साहित्य :
दीड वाटी मैदा
अर्धी वाटी बारीक रवा
पाव वाटी तांदूळ पिठी
पाव वाटी तूप
मीठ
प्रत्येकी १ टीस्पून ताजी जिऱ्याची आणि मिऱ्याची पूड
३-४ चीज क्यूब्ज
तळण्यासाठी तेल
१ अंड- ऐच्छिक
चाट मसाला.
कृती :
मैदा, रवा, मीठ एकत्र करून घ्यावं. त्यावर कडकडीत गरम तेलाचं (पाव वाटीहून थोडंसं कमी) मूठ वळेपर्यंत मोहन घालावं. मोहन पिठाला व्यवस्थित चोळून घ्यावं. अंड फेटून घालावं. मिक्स करावं. लागेल तसं पाणी घालून मऊसर पीठ भिजवून गोळा झाकून ठेवावा. साधारण अध्र्या तासाने पिठाचे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून अगदी मऊ करून घ्यावे. गोळा परत मळून घ्यावा. त्यात २ किसलेले चीज क्यूब मिक्स करावे. तूप फेटून अगदी हलकं करून घ्यावं. तयार पिठाची अगदी पातळ पोळी लाटावी. त्यावर फेटलेलं तूप पसरवावं. त्यावर जिरं-मिऱ्याची पूड, किसलेलं चीज आणि थोडी तांदूळपिठी भुरभुरावी. त्यावर अजून एक पातळ पोळी घालून त्यावर परत जिरं-मिरं, चीज, तांदूळपिठी भुरभुरावी. त्यावर अजून एक पातळ पोळी घालून त्यावर परत जिरं-मिरं, चीज, छोटे छोटे (साधारण १ इंच बाय १ इंच मापाचे) काप करून ते हलक्या हाताने लाटून तळून घ्यावेत. वरून चाट मसाला भुरभुरून चिरोटे थंड झाले की डब्यात भरून ठेवावेत.
लो कॅलरी ब्रेड रोल
साहित्य :
८-१० ब्राऊन ब्रेडच्या स्लाईस
२ उकडलेले बटाटे
५० ग्रॅम पनीर
१ चीज क्यूब
१ टेबलस्पून जिरं मिरची पेस्ट
कोथिंबीर
मीठ
लो कॅलरी बटर
१ टीस्पून ताजी मीरपूड.
कृती :
पनीर, चीज आणि बटाटे किसून घ्यावे. त्यात जिरं मिरची पेस्ट, कोथिंबीर, मीठ आणि मीरपूड घालून हलक्या हाताने मिक्स करून घ्यावं. ब्रेडवर तयार मिश्रण लावून त्यावर दुसरी स्लाईस ठेवावी. तयार सॅण्डविचला दोन्ही बाजूंनी बटर लावून तव्यावर लालसर रंगावर दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावं. अर्ध कापून पुदिना चटणी आणि टोमॅटो केचपबरोबर खायला द्यावं.
पोह्य़ाचं चटपटीत डांगर
साहित्य :
२ वाटय़ा पोहे ७-८ हिरव्या मिरच्या
कोथिंबीर १ टेबलस्पून जिरं
मीठ ताक १ वाटी
तेल
कृती :
पोहे हलके भाजून घेऊन थंड करून मिक्सरवर त्याचं बारीक पीठ करावं. मिरच्या आणि जिरं मिक्सरवर बारीक करून घ्यावं. तयार पोह्य़ांच्या पिठात जिरं, मिरचीचं वाटण, मीठ, ताक आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरवर एकत्र करावं. त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि १-२ टेबलस्पून तेल घालून परत मिक्सरवर एकत्र करावं. स्मूथ गोळा झाला की काढून त्याच्या पुरीच्या लाटय़ांऐवढय़ा लाटय़ा वळाव्यात. सव्र्ह करताना एका डिपच्या छोटय़ा बाऊलमध्ये तेल आणि प्लेटमध्ये तयार लाटय़ा ठेवाव्यात. तेलात बुडवून लाटय़ा खाव्यात. हा एक अतिशय सोपा, न्यूट्रिशियस आणि चविष्ट पदार्थ आहे. आवडीप्रमाणे मिरच्यांचं प्रमाण कमी-जास्त करावं.
हेल्दी होल व्हीट केक
साहित्य :
दीड वाटी कणीक ३ अंडी
पाऊण वाटी पिठीसाखर २ टीस्पून बेकिंग पावडर
१ टीस्पून व्हॅनिला इसेन्स पाव कप दूध.
अर्धा वाटीहून १ टेबलस्पून जास्त तूप
कृती :
पॅनला तूप लावून त्यावर कणीक भुरभुरून पॅन पालथं करून अंडय़ातलं पांढरं आणि पिवळं वेगळं करावं. पांढरं भरपूर फुलेपर्यंत फेसून घ्यावं. कणकेत बेकिंग पावडर घालून तीनदा चाळून घ्यावी. फक्त एअरेशनसाठी चाळायचं असल्यामुळं वर आलेला कोंडाही त्यातच मिसळावा. दुसऱ्या भांडय़ात तूप हलकं होईपर्यंत फेटून घ्यावं. त्यात साखर, एगयोक आणि इसेन्स घालून फेटावं. फेटलेल्या अंडय़ाच्या पांढऱ्यात तुपाचं मिश्रण आणि कणीक घालून पटापट मिक्स करून तयार पॅनमध्ये ओतावं. मिश्रण सहज पडण्यासारखं नसेल तरच थोडं दूध घालावं. १८० अंश सेल्सिअसवर २०-२२ मिनिटं केक बेक करावा. वरून लालसर झाला की ओव्हन बंद करावं. बेससाठी हा हेल्दी केक वापरून अनेक सुंदर डेझर्ट्स करता येतात.
बेबी कॉर्न पनीर शेजवान
साहित्य :
३-४ लाल टोमॅटो
१ टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण
१ टेबलस्पून बारीक चिरलेलं आलं
भरपूर गावरान कोथिंबीर
अर्धी वाटी तेल
२ टेबलस्पून कश्मिरी लाल मिरच्यांची पेस्ट किंवा १ टेबलस्पून बेबीकॉर्न
२०० ग्रॅम पनीर
अर्धी वाटी कॉर्नफ्लोवर
तेल
कांदापात
१ टेबलस्पून साखर- ऐच्छिक.
कृती :
टोमॅटो कूकरमध्ये शिजवून त्याची प्युरी करून घ्यावी. अर्धी वाटी तेल गरम करून त्यात अर्धा लसूण आणि अर्धा आलं परतावं. त्यात टोमॅटो प्युरी आणि मीठ घालून तेल सुटेपर्यंत अधूनमधून परतावं. तेल सुटल्यावर त्यात अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परतून घ्यावं. गॅसवरून उतरवून ठेवावं. कॉर्नफ्लोवरमध्ये पाणी घालून पातळ पीठ भिजवावं. त्यात मीठ घालावं. पनीर आणि बेबी कॉर्नचे आवडीप्रमाणे तुकडे करून कॉर्नफ्लोवरच्या मिश्रणात बुडवून भज्यांसारखे तळून घ्यावे. सिमला मिरची लांबट चिरून घ्यावी. तयार शेजवान गरम करून त्यात तळलेले पनीर, बेबीकॉर्न आणि सिमला मिरची घालून परतावं. वरून कांदापात आणि साखर घालून खायला द्यावं, ही रेसिपी थोडी लो कॅलरी करायची असेल तर शेजवान सॉस करताना तेल कमी वापरावं तसंच बेबीकॉर्न आणि पनीर न तळता १ टेबलस्पून तेलावर थोडं परतून, नुसतं वाफवून घेऊन वापरलं तरी चालेल.
ब्रेड पिझा
साहित्य :
६-८ ब्रेड स्लाईसेस
प्रत्येकी १ सिमला मिरची
कांदा आणि टोमॅटो
१ टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण
मीठ
बटर
२ चीजक्यूब्ज
१ टीस्पून पिझा मसाला
ओरेगॅनो
चिली फ्लेक्स
७-८ तुळशीची पानं.
कृती :
टोमॅटो गॅसवर डायरेक्ट भाजून घ्यावा. बारीक चिरून घ्यावा. कांदाही बारीक चिरावा. १ टीस्पून बटर गरम करून त्यात अर्धा कांदा आणि लसूण परतून घ्यावं. त्यात टोमॅटो घालून परतावा. तुळशीची पानं चिरून त्यात घालून तयार सॉस, मीठ व गॅसवरून उतरवावा. सिमला मिरची चिरून घ्यावी. ब्रेडला बटर लावून घ्यावं. एक बाजू हलकी टोस्ट करून उलटवावी. त्यावर तयार सॉस, सिमला मिरची, कांदा किसलेलं चीज घालावं. वरून पिझा मसाला, ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स भुरभुरावे. तवा किंवा पॅनवर ब्रेड पिझा करत असू तर एखादा मिनिट चीज वितळण्यापुरतं झाकण ठेवावं. ओव्हन असेल तर १८० अंश सेल्सिअसवर ५ ते ७ मिनिटं बेक करावं. त्रिकोणी तुकडे काढून खायला द्यावं.
डेट व वॉलनट केक
साहित्य :
२२५ ग्रॅम मैदा
२०० ग्रॅम पिठीसाखर
१२० ग्रॅम लोणी
१ वाटी बिया काढलेला खजूर
अर्धा वाटी अक्रोड
१ टीस्पून बेकिंग पावडर
२ अंडी
२ टीस्पून व्हॅनिला इसेन्स
चिमूटभर सोडा
कृती :
आधीच्या रेसिपीप्रमाणे पॅन तयार करून ठेवावं. खजूर ३-४ टेबलस्पून पाण्यात चिमूटभर सोडा घालून भिजवून ठेवावे. मैदा, बेकिंग पावडर आणि पिठीसाखर हे सगळं तीनदा चाळून घ्यावं. अंडी फोडून एग व्हाईट आणि एग योक वेगवेगळं फेसून घ्यावं. लोणी फेसून घ्यावं. त्यात फेसलेली अंडी घालून पुन्हा फेसावं. मैदा, व्हॅनिला इसेन्स घालून मिश्रण एकत्र करावं. त्यात निथळलेले खजूर आणि अक्रोड मिक्स करून तयार पॅनमध्ये ओतावं. १८० अंश सेल्सिअसवर अर्धा तास बेक करून घ्यावं.
मेडलिन्स
साहित्य :
तयार होल व्हीट केकचे लांबट ८-१० तुकडे
ब्लू कोरॅको किंवा स्ट्रॉबेरी क्रश अर्धी वाटी
अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट
कृती :
एका ताटलीत डेसिकेटेड कोकोनट पसरवून ठेवावा. ब्लू कोरॅको किंवा स्ट्रॉबेरी क्रशही एका पसरट बाऊलमध्ये ठेवावा. केकचा तुकडा आधी क्रशमध्ये घोळवावा. तोच तुकडा सगळ्या बाजूंनी डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवावा. तयार मेडलिन्स प्लेटमध्ये किंवा डब्यात ठेवावेत. फ्रूट क्रशच्या रंगामुळे तसेच डेसिकेटेड कोकोनटमुळे मेडलिन्स खूपच आकर्षक दिसतात. फ्रूट क्रश नसेल तर जॅम थोडा पातळ करून वापरावा.
झटपट रेसिपीज
दिवाळीच्या धावपळीत ऐन वेळी कधी कधी पाहुणे येतात. अशा वेळेस थोडी कल्पनाशक्ती लढवून मस्त चविष्ट पदार्थ बनवून पाहुण्यांना खूश करणं सहज शक्य असतं.
बिस्कीट चाट – १
साहित्य :
१ पॅक खारी बिस्किट्स
१ चीज क्यूब
१ टीस्पून मिरपूड
कोथिंबीर
१ टीस्पून चिली सॉस
ओरेगॅनो
कृती :
ताटलीत बिस्किट्स पसरवून ठेवावीत. त्यावर किसलेलं चीज पसरवावं. त्यावर चिली सॉस, मिरपूड आणि कोथिंबिरीची पानं ठेवून सव्र्ह करावं.
बिस्किट चाट – २
साहित्य :
१ पॅक खारी बिस्किट्स
२-३ टेबलस्पून प्रत्येकी खवलेलं खोबरं
बारीक चिरलेली कोथिंबीर
फोडणीचं साहित्य
२-३ किसलेलं पनीर
कृती :
१ डाव तेल गरम करावं. त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली की चिमूटभर हळद आणि हिंग घालावा. गॅस बंद करावा. बिस्किट चाट सव्र्ह करण्याच्या वेळेस प्लेटमध्ये बिस्किट्स पसरवून ठेवावीत. त्यावर किसलेलं पनीर घालून त्यावर थोडी फोडणी घालावी. त्यावर थोडं थोडं खोबरं आणि कोथिंबीर घालून लगेच सव्र्ह करावं.
समोसा चाट
साहित्य :
७-८ तयार विकतचे समोसे १ बाऊल ताजं घट्ट दही
चिंचेची चटणी पुदिना चटणी
कोथिंबीर बारीक शेव
मीठ २-३ टे. स्पून साखर
कृती :
दही फेटून घ्यावं. त्यात मीठ, साखर घालून ढवळून घ्यावं. सव्र्ह करण्याच्या बाऊलमध्ये समोसा थोडा मोडून ठेवावा. त्यावर १ डाव दही, चिंचेची चटणी, पुदिना चटणी, कोथिंबीर आणि बारीक शेव घालून सव्र्ह करावं.
झटपट दहीवडा
साहित्य :
बेकरीत मिळतात ते १०-१२ जिरा बटर
१ मोठा बाऊल ताजं दही कोथिंबीर
१ टेबलस्पून आलं-मिरची पेस्ट मीठ
२-३ टेबलस्पून साखर चिंचेची चटणी
बारीक शेव जिरं पावडर
लाल तिखट.
कृती :
१ ग्लास पाणी कोमट करावं. त्यात बटर पूर्ण बुडवून बाऊलमध्ये झाकून ठेवावेत. दही व्यवस्थित फेटून घ्यावं. त्यात मीठ, साखर, आलं-मिरची पेस्ट घालून ढवळून घ्यावं. दहीवडा खायला देताना बाऊलमध्ये भिजवलेला बटर ठेवून त्यावर दोन डाव दही घालावं. त्यावर चिंचेची चटणी, जिरं पावडर, कोथिंबीर आणि शेव घालून खायला द्यावं. घरात चिंचेची चटणी, दही असं साहित्य सहज उपलब्ध ठेवता येऊ शकतं. सगळं सामान असेल तर अगदी १५-२० मिनिटांत दहीवडे सव्र्ह करता येऊ शकतात.
कांचन बापट – response.lokprabha@expressindia.com
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 14, 2016 1:19 am