ganesh visheshविदर्भात जवळजवळ दोन हजार वर्षांपासून गणेशपूजनाची परंपरा असल्याचे आढळते. साहजिकच परिसरात तेवढीच विविध गणेशस्थानं, त्यांच्या पूजनाच्या परंपरा दिसतात. विदर्भातील अशा प्राचीन परंपरा असलेल्या गणेशांची ही शब्दयात्रा-

रांझीचा महागणेश, पवनी (जिल्हा भंडारा)

Vasundhara Day, Yavatmal,
‘वसुंधरा दिवस’ साजरा होत असताना यवतमाळात ४० वृक्षांची कत्तल! विश्रामगृहात विनापरवानगी वृक्षतोड
ram navami, shobha yatra, akola, vishwa hindu parishad, ram navami in akola, ram navami shobha yatra, ram navami vishwa hindu parishad, marathi news, ram navami news, akola news,
अकोला : रामनवमीनिमित्त राजराजेश्वरनगरी भगवामय; शोभायात्रेची ३८ वर्षांची परंपरा
Loksatta vasturang On the occasion of Gudi Padwa home purchase investment
गुढीपाडवा आणि गृहखरेदी
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा

मंदिरांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक पवनी गावाच्या उत्तरेकडे, वैनगंगेच्या तिरावर हे महागणेशाचे मंदिर आहे. हे गणेश मंदिर प्राचीन असून घोडेपाटाजवळील वेळूंच्या (बांबूच्या) घनदाट रांझीमध्ये स्थापन करण्यात आले. त्यामुळे या मंदिराला रांझीचे गणेश मंदिर म्हणून प्रसिद्धी मिळाली. या मंदिरातील गणेशमूर्ती एकाच दगडावर कोरीव काम करून तयार केलेली असून ही एक अद्वितीय व भव्य मूर्ती आहे. साधारणपणे सात फूट उंचीची ही मूर्ती आहे. मंदिरातील मूर्ती ही िभतीपासून दूर असून मूर्तीच्या सभोवतीच प्रदक्षिणा करता येते असे हे एकमेव प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर भोसलेकालीन असून या मंदिराची व्यवस्था काळीकर कुटुंबाकडे होती. मात्र गेल्या १५ वर्षांपासून गणेशकाळात एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात.

प्राचीन काळात पवनी शहरात प्रवेश करण्यासाठी दोन मार्ग होते. एक सडक मार्ग व दुसरा जलमार्ग. सडक मार्गाने जवाहर गेटपासून प्रवेश केल्यास धरणीधराचे सुंदर मंदिर दिसते, तर जलमार्गाने प्रवेश केल्यास रांझीच्या महागणेशाचे दर्शन होते. वैनगंगा नदीला मोठा पूर येतो, पण या रांझी गणेशाच्या मूर्तीला पाण्याने स्पर्श केला की पूर ओसरतो, अशी येथील लोकभावना आहे. पूर्वी हा प्रदेश वेळूच्या रांझीने व्यापलेला निसर्गरम्य होता. आता वृक्षतोडीमुळे तसे राहिले नाही. तरी नदीकाठाने जाणारा प्रत्येक जण या गणेशाचे दर्शन घेतो.

गणपति, पारशिवनी, जि. नागपूर : (तृतीय कालखंड इ.स. १००१ ते १२००)

येथील केशवराव मंदिराबाहेरील छोटय़ा आवाराला लागून ही गणपतीची प्रतिमा आहे. ती छोटय़ाशा देवळीत आहे. चतुर्भुज प्रतिमा वामललितासनात बसली आहे.  मूर्तीचा डावा पाय खालील द्विरथ पीठावर सोडलेला आहे. खालील उजवा हात खालील मांडीवर स्थिर आहे, परशु व अंकुश वरील उजव्या डाव्या हातात आहेत. खालील डावा हात भग्न आहे. त्यात बहुतेक मोदक असावा. मूर्ती बहुधा बाराव्या शतकातील असावी.

श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर, वनोजा (ता. वरोरा, जि. चंद्रपूर)

वरोरा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर वनोजा येथे हे श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर आहे. वनोजा गावाला लागून एका मालगुजारी तलावाच्या पाळीवर हे मंदिर आहे. झुडुपांच्या दाटीत हे मंदिर बरीच वष्रे लपलेले होते, मंदिराचे स्वरूप प्राचीन असले तरी मंदिराच्या इतिहासाबद्दल फारशी माहिती नाही. या मंदिराचे पूर्वीचे स्वरूप म्हणजे छोटासा गाभारा व अत्यंत तेजस्वी रेखीव मूर्ती एवढेच होते.

इ.स. १९११ साली मंदिराचा जीर्णोद्धार काही भक्तांनी थोडय़ा प्रमाणात केला. त्या वेळी केलेल्या खोदकामाने १७व्या शतकातील नाणी सापडली. त्यावरून मंदिराचे प्राचीनत्व लक्षात येते.

गेल्या काही वर्षांपासून शाम बोस हे या मंदिराची व्यवस्था पाहतात, पूजा-अर्चा चालते. मंगळवार, संकष्टी चतुर्थी व माघ महिन्यातील गणेश जयंतीला गणेशयाग या सगळ्या धार्मिक प्रसंगांना भक्तांची गर्दी असते. पंचक्रोशीतून भक्त दर्शनाला येतात.

खटींचा गणपती, चंद्रपूर

चंद्रपूर शहरात खटींचा गणपती म्हणून सुंदर मंदिर आहे. श्रीमंत भोसलेंच्या कारकीर्दीत चंद्रपूर येथे अंबाबाई खटी नावाची स्त्री सती गेली तिच्या मालमत्तेतून मंदिराची डागडुजी व दुरुस्ती करण्यात आली. प्रत्यक्ष मंदिराचे बांधकाम राजा बीरशहाने (बिरसिंग) याच्या कार्यकाळात (१६९६ ते १७०४) बालाजीवाडीत सुरू केले. पुढे हे बांधकाम राणी हिराईने (१७०४-१७१९) पूर्ण केले. मंदिर अतिशय भव्य असून वर उंच कळस आहे. मंदिराच्या चारही दिशांना चार उंच मनोरे असून, मुस्लीम स्थापत्य शैलीचा प्रभाव स्पष्ट दिसतो. गणेश प्रतिमा अत्यंत चित्तार्षक असून ती कापडाने वेढलेली असल्याने प्रतिमेचे मूळ स्वरूप कळत नाही. शिखर किमान ६० फूट उंच असून ५०० वर्ग फुटांचे क्षेत्रफळात बांधकाम आहे. प्रशस्त पटांगण आहे. संकष्टी, विनायकी व भाद्रपद गणेश चतुर्थी हे वार्षकि सण आहेत. बालाजी वॉर्डात हे मंदिर आहे.

नृत्य गणेश, मार्कण्डी, जि. गडचिरोली : (तृतीय कालखंड इ.स. १००१ ते १२००)

येथील प्रसिद्ध मंदिर-समूहांतील मार्कण्ड ऋषी मंदिराच्या दक्षिणेकडील शिल्पपट्टावर आहे. गुणवत्ता आणि सौंदर्य यांच्या निकषावर उत्कृष्ट ठरेल अशीच ही नृत्यगणेशाची मूर्ती आहे. प्रतिमा त्रिभंगात उभी असून तिला आठ हात आहेत. उजवीकडील सर्वात वरील हातात बहुतेक नाग आहे. सर्वात खालील उजव्या हातात दात (की कमलकलिका) आहे. त्यावरील हातात परशु आहे आणि त्यावरचा उजवा हात परशुला वळसा घातलेला अभिनयमुद्रेत आहे. डाव्या बाजूला सर्वात वरील हातात नागाची शेपटी तर त्या खालील दोन हातांत पुष्पे व मोदकपात्र असून सर्वात खालील उजवा हात मांडीवर स्थिरावला आहे. या हाताची मूळ अर्धवट झाकलेली आहे. मस्तक, गळा,  हात, पाय सर्वामध्ये अलंकार धारण केलेले आहेत. सर्पाचे यज्ञोपवीत आहे. तसेच ठळक दिसतील असे शूर्पकर्ण (सुपासारखे कान) आहेत. डोक्यावर मुकुट आहे. सोंड अगदी वरील बाजूकडून डावीकडे वळलेली आहे. पादपीठाच्या समोरील बाजूस गणेशाचे वाहन उंदीरमोदक हातात पकडताना दाखविले आहे. असे शिल्प खजुरहोलाही आहे.

पाटणसावंगीचे श्रीगणेश मंदिर

नागपूर-सावनेर मार्गावर ३० कि.मी. अंतरावर पाटणसावंगी नावाचे १५-२० हजार लोकवस्तीचे गाव आहे. गावाच्या दोन-तीन कि.मी. अंतरावर श्री गणेशाचे मंदिर असून लांबूनच कळस दिसतो. मंदिराचा परिसर तसा छोटासाच असून रस्त्याच्या डाव्या बाजूस देवळाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृह व एक छोटा मंडप असे मंदिराचे स्वरूप आहे. मूर्ती पूर्वाभिमुख असून चतुर्भुज आहे. उंची पाच ते सहा फूट आहे. मंदिराच्या डाव्या बाजूस एक कुंड आहे व त्याला गणेशकुंड असेच संबोधतात याच कुंडातून ही भव्य प्रतिमा निघाल्याचे सांगतात. जवळच दूर्वाचे वन असून मागील बाजूस शमी वृक्ष आहे.

सुमारे १५०-१६० वर्षांपूर्वी तानबाजी पांढरीपांडे यांनी श्रावण शुद्ध प्रतिपदेला मूर्तीची प्रतिष्ठापना केली. म्हणून येथे प्रतिपदेपासून सात दिवस यात्रा असते. चातुर्मासात येथे होणाऱ्या उत्सवास पंचक्रोशीतून हजारो गणेशभक्त येथे येतात. गावाची अर्थव्यवस्था गणरायांवर अवलंबून आहे. चंपालालजी मोटगावकर, भाट ही मंडळी देवालयाचे काम पाहतात.

तळ्याचा गणपती, नागपूर

सीताबर्डीच्या टेकडीवरून येणारा पश्चिमवारा जेथे महालाच्या दाराशी येतो तिथे, म्हणजे टिळक पुतळ्याजवळ शुक्रतारी तलावाच्या काठावर एक उत्तराभिमुख गणपतीचे देऊळ आहे. मूर्ती पुरुषाएवढी उंच असून तिचे अधिकृत नाव सिद्धिविनायक आहे. मूर्तीच्या दोन्हीकडे विशाल कानांचा फलकारा, उत्तरेच्या दिशेने पाहत असलेली सूक्ष्म दृष्टी आणि प्रदीर्घ सोंड उजव्या दिशेने वळलेली आहे. हात अभय मुद्रेत आहेत.

गणपतीच्या गाभाऱ्याव्यतिरिक्त सर्व देवळाचा भाग आधुनिक असून तत्कालीन इंग्रज राज्यकर्त्यांच्या इमारत बांधणीचा प्रभाव स्पष्ट दिसतो.

देऊळ ज्या तलावाच्या काठी आहे तो शुक्रवार तलाव किंवा जुम्मा तलाव भोसले शाहीच्या पूर्वीचा आहे. थोरल्या रघुजीच्या कारकीर्दीत तलावावर चारही बाजूंनी दगडी घाट बांधण्यात आले. या तलावाला काहीसे रूप आले. देवळाच्या बाजूला या तलावाच्या घाटाला जाण्या-येण्याची सोय आहे आणि येथेच गॅलरीसारखे सज्जे केले आहेत. येथून तलावाच्या मध्यभागी असणारे बेट व विहंगम दृश्य दिसते.

माघ शुद्ध त्रयोदशीला १७८८ साली दुसऱ्या रघुजीने सिद्धिविनायकाची स्थापना केली. यासंबंधीचे दि. २० फेब्रुवारी १७८८ रोजी लिहिलेले पत्र उपलब्ध आहे. दुसरा रघुजी आणि भोसल्यांच्या परिवारातील अनेक लोक या गणपतीच्या दर्शनास नेहमी येत असत.

गणपती, लाडाचे कारंजे, जि. अकोला</strong> : (प्रथम कालखंड इ.स. ४०१ ते ८००)

येथील गणेशमूर्ती फार प्राचीन, इसवीच्या आठव्या शतकाच्याही आधीची असावी. स्कंदपुराणात या मूर्तीचा उल्लेख येतो. प्रतिमा चतुर्भुज असून प्रदक्षिणाक्रमाने पाश, मुळा (याला येथील पुजारी तुटलेला दात समजतात), फाळ आणि अंकुश ही याची आयुधे आहेत. पायापाशी डावीकडे त्याचे वाहन उंदीर आहे. चौकोनी पीठावर मूर्ती आसनस्थ असून तिने निमुळता उंच मुकुट धारण केला आहे.

वैशिष्टय़पूर्ण गणेशस्तंभ, पवनी, जि.भंडारा :

(द्वितीय कालखंड इ.स. ८०१ ते १०००)

येथील भट यांच्या घरासमोर ओसरीमध्ये एक गणेशपट्ट असून हा ९० सें.मी. उंचीच्या स्तंभाच्या रूपाचा असून चारही बाजूंना श्री गणेशाच्या वेगवेगळ्या प्रतिमा आहेत आणि कर्ण-छेदरेषेवर पाचवी प्रतिमा आहे. डॉ. पदवाड यांनी या प्रतिमेला विघ्नराज पंचानन असे म्हटले आहे. तर काहींच्या मते याला सवतोभद्र गणेश म्हटले आहे. नाव काहीही दिले तरी हा गणेशस्तंभ एक वैशिष्टय़पूर्ण स्तंभ मानावयाला हवा.

गणपति, घोट-िनबाळा, जि. चंद्रपूर :

(तृतीय कालखंड इ.स. १००१ ते १२००)

येथील सोमनाथ मंदिर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका भग्न मंदिराच्या आवारात इतस्तत: पडलेल्या मूर्तीमध्ये एक गणेशाची मूर्ती आहे. ही मूर्ती चतुर्भुज असून खालील डाव्या हातात बीजपूरक तर वरील डाव्या हातात मुळा (की दात) धरलेला आहे. वरील उजव्या हातात परशु तर खालील उजव्या हातात अंकुश आहे. गळ्यात यज्ञोपवीत आणि अलंकार, तसेच दंडात केयूर आहेत. मूर्ती इसवीच्या ११ ते १२ व्या शतकातील असावी. ही मूर्ती आसन मूर्ती आहे.

वरद-विनायक, मार्कण्डी, जि. गडचिरोली :

(तृतीय कालखंड इ.स. १००१ ते १२००)

येथील प्रसिद्ध मंदिर समूहात वरद विनायक मंदिर नावाच्या एका छोटय़ा मंदिरात ही मूर्ती आहे. ही प्रतिमा  जवळजवळ दीड मीटर उंच असावी. प्रतिमा चतुर्भुज आहे. प्रदक्षिणाक्रमाने दात, परशु, अंकुश आणि बीजपूरक ही आयुधे गणपतीने धारण केली आहेत. मूर्ती सव्यललितासनात बसली आहे. हातात कडी, तर दंडात केयूर धारण केलेले आहेत. डोक्यावर मुकुट आहे. धोतराचा शेला पायापर्यंत लोंबताना दिसतो. पायाशी उंदीर आहे. मूर्ती शेंदूराने माखलेली आहे. मूर्ती इसवीच्या बाकाव्या शतकातील असावी. या कालखंडातील एकच ब्रह्मादेवाची मूर्ती विदर्भात आढळते.

गणपती, वणी, जि. यवतमाळ :

(तृतीय कालखंड इ.स. १००१ ते १२००)

येथील विष्णूच्या मंदिरात प्रवेश करताच डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे. मूर्ती सुमारे १९५ मी. उंचीची असून द्विरथ पीठावर सव्यललितासनात बसलेली आहे. प्रतिमा चतुर्भुज आहे. खालील उजवा हात वरद मुद्रेत आहे. बाकी तीन हातांत प्रदक्षिणाक्रमाने अंकुश, परशु आणि बीजपूरक ही आयुधे आहेत. मुकुट उंच निमुळता असून पायात तोडे आहेत. शेंदुराने प्रतिमा माखलेली असल्यामुळे मूर्तीचा काल ठरविणे कठीण आहे. तथापि उत्तर यादव कालातील (इसवीचे १२ वे शतक) ती असावी.

स्थानक-गणेश, मार्कण्डी, जि. गडचिरोली :

(तृतीय कालखंड इ.स. १००१ ते १२००)

येथील मार्कण्ड ऋषी मंदिरातील ओसरीवरील खांबावरील ही स्थानक गणेश मूर्ती आहे. मूर्ती चतुर्भुज असून उजव्या हातात परशु व दात आहे तर डाव्या हातात लांब देठवाले कमळ असून पात्र भरून मोदक आहेत.

आकोटचा भोसलेकालीन सिद्धिविनायक..

सातपुडा पर्वतरांगांनी वेढलेल्या मेळघाटच्या पायथ्याशी वसलेलं अकोला जिल्ह्य़ातील आकोट शहर. दंडकारण्यात येणाऱ्या आकोटला तत्कालीन राज्यकर्त्यांमध्ये खूप महत्त्व होतं. वऱ्हाड परगण्यात वचक राहण्यासाठी सातपुडय़ातील नरनाळा किल्ल्याखालोखाल आकोट महत्त्वाचं मानलं जायचं. शहराच्या नैसर्गिक स्थानामुळे निजाम, मराठे, इंग्रज अशा सर्वच राज्यकर्त्यांना आकोट हे सामरीक महत्त्वाचं ठिकाण होतं.

ऐतिहासिक, राजकीय, धार्मिक, आध्यात्मिक व पुरातन वारसा लाभलेलं शहर. आकोटमधील सिद्धिविनायक मंदिर हे ऐतिहासिक वारसा सांगणारं मंदिर आज विदर्भातील तमाम गणेशभक्तांचं आकर्षण झालं आहे. नागपूर सुभ्याचा कारभार सांभाळणारं रघुजी भोसले यांनी १८ व्या शतकात हे मंदिर बांधल्याचं समजतं. या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते. १७५१ मध्ये रघुजी भोसले हे कर व शेतसारा वसुलीसाठी आकोट परिसरात आले होते. निजामाला त्यांची चाहूल लागताच त्याने रघुजी भोसलेंवर हल्ला केला. आकोटमधील सोमवार पेठ (वेस) भागात रघुजी भोसले यांचा हत्तीखान, घोडपागा आणि सैन्याची एक तुकडी होती. निजामाच्या अचानक हल्ल्यामुळे रघुजी भोसले यांनी सोमवार पेठेतील हत्तीखान्यात आश्रय घेतला. निजामाच्या हल्ल्यात रघुजी भोसले यांचा जीव वाचला. त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. गणेशानेच हत्तीच्या रूपात आपले प्राण वाचवले म्हणून त्यांनी या ठिकाणी सिद्धिविनायकाचे मंदिर बांधलं असं सांगितलं जातं. आकोट परिसरातील अडगाव-सिरसोली येथे १८०२ साली इंग्रज व मराठय़ांचं युद्ध झालं होतं. त्या वेळी युद्धासाठी रघुजी भोसले हे आकोट परिसरात आले होते. याची तशी शासकीय नोंददेखील अकोला डिस्ट्रिक्ट गॅझेटिअरला आहे.

या मंदिरातील मूर्तीबाबत मिळणारी माहिती रंजक आहे. पूर्वी ही मूर्ती म्हणजे शेंदुरचर्चित भला मोठा तांदळा होता. मात्र फेब्रुवारी २००१ मध्ये शेंदराचा हा थर निखळल्याचं सांगितलं जातं. त्या शेंदराच्या लेपाखाली सिद्धिविनायकाची मूर्ती शाबूत होती. अतिशय सुंदर, मनमोहक, रेखीव, कोरीव व उजव्या सोंडेच्या गणेशमूर्तीचं हे मूळ रूप अनेक र्वष शेंदराखाली झाकलं गेलं होतं. चार-साडेचार फूट उंच, तीन फूट रुंद अशी काळ्या पाषाणातील ही चर्तुभूज मूर्ती आहे. सिंहासनावर आरूढ असणाऱ्या या मूर्तीच्या डोक्यावर नागदेवता आहे.

या मंदिराबरोबरच भोसल्यांनी आकोटात आणखी दोन गणेश मंदिरांची बांधणी केल्याचं सांगितलं जातं. नरसिंग मंदिराजवळ डाव्या सोंडेचं प्राचीन गणपती मंदिर आहे, तर तिसरं गणपती मंदिर परकीय आक्रमणात नष्ट झाल्याचं समजतं.

संतोष विणके

response.lokprabha@expressindia.com