भारतीय दैवतांमध्ये प्राणीशीर्षी दैवतांची परंपरा फार जुनी आहे. वैदिक वाङ्मयात प्राण्यांचे दैवतीकरण तर झाले आहेच, परंतु अनेक देवतांची तुलना पशुपक्ष्यांशी केलेली आहे.

सुमारे नवव्या-दहाव्या शतकात शैव शक्ती देवता योगिनी, ज्या तंत्रमार्गात विशेषत्वाने पूजल्या जात होत्या, त्यांचा संप्रदाय अचानक वर आला. त्यांच्यासाठी वर्तुळाकार मंदिरे हिरापूर, राणीपूर, झरियाल (ओरिसा), भेडाघाड (मध्य प्रदेश) वगैरे अनेक स्थळी बांधली गेली. सामान्यत: या योगिनींची संख्या चौसष्ट मानली जाते.

या मंदिरांमधील योगिनी शिल्पे त्यांच्या आकर्षक शरीरसौष्ठवाबद्दल, नृत्यमुद्रांबद्दल व सौंदर्याबद्दल प्रसिद्ध आहेत. चार्लस् फॅबरीसारखा कलासमीक्षक, ओरिसामधील हिरापूर योगिनी शिल्पे व त्यांचे सौंदर्य पाहून भारावून गेला होता.

गंमत अशी, त्यातील काही योगिनी प्राणीशीर्षी देवतांच्या स्वरूपात आहेत. शरीर मानवी परंतु शिर्षांच्या जागी प्राणीमुद्रा अशी ही शिल्पे आहेत. यामध्ये अश्व, सर्प, महिष, ससा, गाय, बोकड यांची शीर्षे असलेल्या योगिनी आढळतात.

प्राणीशीर्षी देवतांचा आढळ वैदिक वाङ्मयात सापडतो. यात ‘व्याघ्रमुखी’ देवतेचा उल्लेख आहे. भारतीय दैवत संघात अशा प्राणीशीर्षी दैवतांची परंपरा फार जुनी आहे. वैदिक वाङ्मयात प्राण्यांचे दैवतीकरण तर झाले आहेच, परंतु अनेक देवतांची तुलना पशुपक्ष्यांशी केलेली आहे.

महाभारतातील शल्य पर्वात कार्तिकेयाच्या सैन्यात अंतर्भूत असलेल्या गणांच्या मोठय़ा याद्या आहेत. त्यातील काही गण पशुशीर्षीदेखील आहेत.

इजिप्त, सीरिया येथे आढळणाऱ्या पशुशीर्षी देवतांच्या संदर्भात लेविस स्पेन्स नावाच्या संशोधकाने एक सिद्धांत मांडलेला आहे. जेव्हा मनुष्याला निसर्गातील आपल्या वर्चस्वाचे भान होते तेव्हा दैवतीकरण झालेल्या पशुंना मानवी शरीर प्राप्त होते व त्याचे शीर्ष पशूचे राहते. तो म्हणतो, ‘‘इजिप्तमधील सूर्य देवता असणाऱ्या बास्क नावाच्या देवतेचे अंकन फक्त एका मर्जराच्या रूपाने होते. पण पुढे तिचे रूपांतर मर्जराचे शीर व स्त्रीचे शरीर यांचा समन्वय करून मर्जारशीर्षी देवता उत्क्रांत झाली. आता आपण काही वैदिक देवतांच्या अवतारांचे विश्लेषण करू.

विष्णू या देवतेचे अनेक अवतार आहेत. त्यातील दहा प्रसिद्ध आहेत. या दहांतले पहिले चार प्राणीरूपी आहेत. मत्स्य व कच्छ हे अवतार प्राणीस्वरूपीच राहिले; परंतु वराह अवतार दाखवताना वराहाचे शीर्ष व मानवाचे शरीर असे शिल्पांकन झालेले आहे. भोपाळजवळच्या उदयगिरी गुंफांमध्ये वराह अवताराचे विराट शिल्पांकन झालेले आहे ते वरीलप्रमाणे आहे. या अवताराचे मूळ वेदिक वाङ्मयात आहे.

विष्णूचा अत्यंत प्रसिद्ध नरसिंह अवताराचे स्वरूप सिंहाचे शीर्ष आणि मानवी शरीर असे आहे. आता आपण अधिक परिचित प्राणीशीर्षी देवतांकडे वळूया. यात गणपती ही देवता प्रसिद्ध आहे. एका लोककथेनुसार पार्वती स्नानाला बसली असता आपल्या अंगाच्या मळीतून एक मानसपुत्र तयार करून त्याला द्वारावर उभे राहण्यास सांगितले. आपले स्नान निर्वेध व्हावे म्हणून, या आपल्या मानसपुत्राला कोणीही आला तरी त्याला आत सोडू नको अशी आज्ञा दिली.

योगायोग असा की साक्षात प्रभू शिवमहादेव दारावर येऊन उभे राहिले. द्वाररक्षकाने जेव्हा त्याला आत सोडण्याचे नाकारले तेव्हा घनघोर युद्ध होऊन त्यात सदाशिवाने त्याचे डोके उडवले.

24-lp-god

पार्वतीला जेव्हा हे कळले तेव्हा ती आकांत करू लागली. तेव्हा शिवाने गजाचे मस्तक आणून त्याच्या धडावर बसविले. आणि एक गजमुखी देवता अस्तित्वात आली. जाता जाता येथे एक गोष्ट नमूद करणे जरुरी आहे. गणपतीच्या मूर्तीचा पहिला उल्लेख महाराष्ट्राच्या पैठणचा राजा सातवाहन याने संकलन केलेल्या महाराष्ट्रीय प्राकृत गाथांच्या संग्रहात मिळतो.

या गजशीर्षांचा परिणाम या देवतेच्या स्वभाव विशेषांवर झाला. हत्ती हा अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे त्यामुळे गजशीर्ष असलेल्या या देवतेला बुद्धीची देवता होण्याचा मान मिळाला व त्याला महाभारतकथा लिहिण्याची संधी मिळाली. महाभारताचा कर्ता असलेल्या व्यासाने या बुद्धिदेवतेला अशी अट घातली की, काव्य समजल्याविना त्याने पुढे जाऊ नये. असे म्हणतात की, गणेशाच्या बुद्धीला चकवण्यासाठी व निवेदनाच्या ओघात थोडी विश्रांती मिळावी म्हणून व्यासांनी महाभारत काव्यात काही जटिल कोडी घातली. मग महाभारतकर्ता व्यास व गजशीर्षां बुद्धिदेवतेत एक बौद्धिक चढाओढ सुरू झाली. असे म्हणतात की, व्यासांनी घातलेली कोडी गणेश चुटकीसरशी सोडवीत.

गजमुखी देवतेला त्याच्याचप्रमाणे पूर्णत: शाकाहारी मानले गेले आहे व त्याला देण्यात आलेले उपहार व उपचार त्याच्या या स्वभावाला अनुरूप आहे.

हत्तीला दूर्वा आवडतात म्हणून गजमुखी देवतेला दूर्वा वाहण्याची प्रथा सुरू झाली. याशिवाय ऊस, केळी, नारळ, डाळिंब यासारख्या हत्तीला प्रिय असलेल्या वस्तूंचा समावेश त्याच्या पूजेत होऊ लागला. हत्तीप्रमाणे दोन नाही तरी एकदंताचा तो स्वामी बनला. त्याचे कान हत्तीप्रमाणे सुपासारखे झाले. हत्तीचे उदर जसे विशाल तसेच गणपतीचेपण. त्याच्या विशाल उदराविषयी एक कथा प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, एकदा कुबेराला आपल्या संपत्तीचा गर्व झाला. आपल्या वैभवाचे प्रदर्शन करावे म्हणून त्याने शिवाला भोजनासाठी आमंत्रित केले तेव्हा त्याचा कावा ओळखून शिवाने गणेशाला आमंत्रण करण्यासाठी सांगितले. आपल्या विशाल उदरावर हात फिरवून ही हत्तीदेवता जेव्हा भोजनाला बसली तेव्हा तिने आपल्या स्वभावानुसार कुबेराची धनधान्य कोठारे फस्त केली. अन्नाचा एक कणही उरला नाही हे पाहून कुबेराचा चेहरा पडला.

त्यानंतर आपल्याला कपीमुखी हनुमानाची आठवण येते. वानर जातीत जन्मल्यामुळे जन्मत: तो कपीमुखी होता, पण त्याचे शरीर मानवी होते. कपीमुखी असल्यामुळे कपींचे खोडकरपणा, चापल्य, पुच्छप्रदर्शन यांचे दर्शन त्याच्या कथांमध्ये येते. बालपणी हनुमान अत्यंत खोडकर होता व आपल्या खोडय़ांनी आजूबाजूच्या आश्रमात राहणाऱ्या ऋ षीमुनींची धांदल उडवून दिली होती. सीतेने जेव्हा त्याला अशोकवनातील फळे खाण्याची अनुज्ञा दिली तेव्हा त्याने आपल्या कपी स्वभावाला अनुरूप अशी गोष्ट केली. त्यांनी जी काही फळे खाल्ली ती तर खाल्ली असतीलच पण त्यासोबत अशोकवनात विध्वंस माजवला, जेव्हा वानराची टोळी शेतावर येऊन उतरते तेव्हा उभ्या पिकाची नासाडी करणे हा त्यांचा आवडीचा उद्योग आहे. वानरजात लांब उडय़ा घेण्यात प्रसिद्ध. हनुमानाने याच गुणाच्या आधारावर लंका नगरीच्या देवतेने जेव्हा त्याला नगर प्रवेश नाकारला तेव्हा कपी स्वभावाला अनुरूप वर्तन त्याच्याकडून झाले. त्याने तिच्यावर हल्ला करून चपराकींचा प्रसाद दिला.

त्यावरून आपल्या असे लक्षात येते की प्राणीशीर्ष देवतांमध्ये त्या त्या प्राण्यांचे गुण अवगुण असतात. सिंहमुख असलेल्या नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे उदर विदीर्ण करावे हे स्वाभाविकच होते.
म. ल. वराडपांडे – response.lokprabha@expressindia.com