29 May 2020

News Flash

देवीमाहात्म्य : रचना, इतिहास आणि परंपरा

पुरातन या शब्दावरून पुराण हा शब्द आला असावा असे एक मत आहे.

देवीमाहात्म्य हा देवीच्या लीला वर्णन करणारा ग्रंथ देवीभक्तांकरिता अतिशय पूजनीय आणि महत्त्वपूर्ण आहे. मार्कण्डेय पुराणात समाविष्ट केले गेलेले हे १३ अध्यायांचे देवीमाहात्म्य, चण्डीपाठ आणि दुर्गासप्तशती या दोन नावांनीदेखील ओळखले जाते. या देवीमाहात्म्याच्या उगम आणि परंपरेची माहिती.

पुरातन या शब्दावरून पुराण हा शब्द आला असावा असे एक मत आहे. प्राचीन काळातील कथांचा समावेश या पुराणग्रंथांमध्ये असतो. एखादी कथा अगर उदाहरण जुने झाल्याने आता त्याचा दाखला देणे योग्य नाही असे सुचविताना ‘पुराणातील वानगी पुराणातच ठेवा’ असे वाक्य मराठीभाषक वापरतात. यावरून प्राचीन काळातील (धार्मिक) गोष्टी सांगणारा ग्रंथ म्हणजे पुराण होय, अशी कल्पना सर्वसामान्यांच्या मनात असते, असे म्हणता येईल. पुराण या नावाने अनेक ग्रंथ प्रसिद्ध असले तरी त्यातील १८ ग्रंथ विशेष प्रसिद्ध असून त्यांना महापुराणे असे म्हणतात. या पुराण ग्रंथांची निर्मिती साधारणपणे १८०० ते १२०० वर्षांपूर्वी झाली असावी असे मानले जाते. त्यातही मत्स्य, मार्कण्डेय, कूर्म, विष्णू इत्यादी पुराणे अधिक प्राचीन मानली जातात. पुराण प्रकारात मोडणारी थोडय़ा नंतरच्या काळात तयार झालेली १८ उपपुराणेदेखील प्रसिद्ध आहेत.

जुन्या काळातील कथा म्हणजे पुराण असा समज सामान्यपणे असला तरी विष्णुपुराणामध्ये पुराण कशाला म्हणायचे, ते पुढील व्याख्येमध्ये नेमके सांगितले आहे-

सर्गश्च प्रतिसर्गश्च

वंशो मन्वन्तराणि च ।

वंशानुचरितं चेति पुराणं पञ्चलक्षणम् ॥

सर्ग (सृष्टीची निर्मिती कशी झाली याविषयीच्या कथा), प्रतिसर्ग (सृष्टीचा नाश अथवा प्रलय कसा होतो याविषयीच्या कथा), ऋषी आणि देवतांचे वंश, विविध मनू आणि त्यांच्यामधील काळातील (मन्वंतर) कथा आणि राजेलोकांचे वंश या पाच गोष्टी पुराणाची म्हणजे पुराणाची पाच लक्षणे होत. थोडक्यात, एखाद्या ग्रंथात यापकी काही किंवा सर्व प्रकारच्या हकिगती असल्या म्हणजे तो ग्रंथ पुराण असल्याचे मानता येते. म्हणजेच पुराण हा एक विशिष्ट असा साहित्य प्रकार आहे.

१८ महापुराणांची रचना वेदव्यासांनी केल्याचे भारतीय परंपरा सांगते. त्या पुराणांची नावे आणि रचना पाहिली असता विशिष्ट देवतेचे माहात्म्य कथन करण्याकरिता पुराणे निर्माण झाली असावीत असे म्हणता येते. तसेच विशिष्ट राजवंशांची माहिती विशिष्ट पुराणांमध्ये येत असल्याने ती ती पुराणे त्या त्या राजवंशांचे राज्य ज्या परिसरात होते, तिथे निर्माण झाली असावीत, असेही काही संशोधकांचे मत आहे. मत्स्य, कूर्म, वराह, वामन, मार्कण्डेय, पद्म, वायू, भविष्य, ब्रह्म, ब्रह्माण्ड, ब्रह्मवैवर्त, विष्णु, अग्नि, नारद, भागवत, स्कन्द, िलग आणि गरुड ही १८ पुराणांची नावे पाहता त्यांचा मुख्यत: वैष्णव आणि शैव परंपरांशी असणारा जवळचा संबंध सहज लक्षात येतो.

मार्कण्डेय पुराण

यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे मार्कण्डेय पुराण हे प्राचीन पुराणांपकी एक असल्याचे मानले जाते. मार्कण्डेय ही व्यक्तिरेखा तसे पाहता शैव आणि वैष्णव दोन्ही परंपरांशी संबंधित आहे. अल्पवयात होऊ घातलेला अपमृत्यू मार्कण्डेयाने शिवभक्ती करून टाळल्याची कथा जशी प्रसिद्ध आहे, तसेच विष्णूने त्याला प्रलयाचे घडविलेले दर्शन आणि त्या प्रलयातही एका वडाच्या पानावर लीलया तरंगणाऱ्या बालरूपातील परमात्म्याचे मार्कण्डेयाने बालमुकुन्दाष्टक रचून केलेले स्तवनदेखील प्रसिद्ध आहे. याच मार्कण्डेयाच्या नावाने ओळखले जाणारे पुराण हेदेखील काही इतर पुराणांप्रमाणे विशिष्ट अशा देवतेच्या पंथाचे (वैष्णव अगर शैव) मानले जात नाही, हे विशेष होय. महाभारताच्या कथानकाशी या पुराणाचा जवळचा असणारा संबंध आणि पुराणग्रंथाच्या उपरोक्त व्याख्येशी बऱ्यापकी प्रामाणिक असलेली संहिता यामुळे संशोधकांना त्याचे प्राचीनत्व सहज पटते.

असे हे मार्कण्डेय पुराण एकूण १३७ अध्यायांचे आहे. मार्कण्डेयाला व्यासांच्या चार शिष्यांपकी एकाने, जैमिनीने विचारलेल्या प्रश्नापासून या पुराणाचा प्रारंभ होतो. महाभारताचे सखोल अध्ययन करूनही ज्यांची उकल झाली नाही, अशा गोष्टींविषयी हे प्रश्न आहेत. मार्कण्डेय मात्र स्वत: जैमिनीचे शंकासमाधान करण्याऐवजी त्याला विन्ध्य पर्वतात निवास करणाऱ्या चार बुद्धिमान पक्ष्यांचा सल्ला घेण्याचे सुचवितात. जैमिनीच्या त्या पक्ष्यांशी झालेल्या संवादातून मग योगशास्त्र, धर्मशास्त्र, कर्मसिद्धान्त, पाप-पुण्याची फळे, स्वर्ग आणि नरकाच्या कल्पना इत्यादी नानाविध गोष्टी मार्कण्डेय पुराणाने उलगडून दाखविल्या आहेत. या पुराणात ८०व्या अध्यायापर्यंत आणि नंतर ९४वाव्या अध्यायापासून पुढे खुद्द मार्कण्डेयाचा संवाद आला आहे. या संवादात, मध्येच अध्याय क्रमांक ८१ ते ९३ अशा एकूण तेरा अध्यायाचे देवीमाहात्म्य येते. त्यावरून हे देवीमाहात्म्य (जे कदाचित मुळात एक स्वतंत्र ग्रंथ असू शकेल) मार्कण्डेय पुराणात मागाहून घालण्यात आले असावे, असा तर्क अभ्यासकांनी केला आहे. देवीमाहात्म्याचा विचार केला तर असे दिसते की ते शैव किंवा वैष्णव अशा कोणा एका पुरुषदेवतेच्या संप्रदायाशी संबंधित नसून ते स्वतंत्रपणे अस्तित्व राखून आहे. तसेच शाक्त संप्रदायाशी त्याचा संबंध असला तरी ते केवळ शाक्त परंपरेतच पूजनीय आहे, असे मात्र नाही. कदाचित मार्कण्डेय पुराणसुद्धा विशिष्ट संप्रदायातील नसल्याने देवीमाहात्म्याचा अंतर्भाव करण्याकरिता पुराणपरंपरेला ते योग्य वाटले असावे.

देवीमाहात्म्याची प्राचीनता

देवीमाहात्म्याचा अंतर्भाव मूळ मार्कण्डेय पुराणाच्या संहितेत मागाहून झाला असावा हे मत मान्य केले, तरी देवीमाहात्म्य फार अर्वाचीन नाही, असेही संशोधकांना वाटते. देवीमाहात्म्याची स्वतंत्र हस्तलिखितेही मोठय़ा प्रमाणावर सापडतात. उपलब्ध नोंदींनुसार त्यातील सर्वात प्राचीन हस्तलिखित नेपाळमधील असून ते दहाव्या शतकातील आहे. राजस्थानमधील जोधपूरजवळच्या दधिमती माता मंदिरात (जे दहिया ब्राह्मणांशी संबंधित आहे) असणाऱ्या पुरातन शिलालेखात देवीमाहात्म्यातील सुप्रसिद्ध असा ‘सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तु ते॥’ हा श्लोक सापडला आहे. लेखातील उल्लेखाप्रमाणे २८९ व्या वर्षी हा लेख कोरला गेला. देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांच्या मते लेखाच्या अक्षरवटिकेवरून हे वर्ष गुप्तकालगणनेतील मानले पाहिजे. त्यामुळे लेखाचा काळ इ. स. ६०८ ठरतो. यावरून असा तर्क करता येतो की, देवीचा महिमा या काळात प्रसृत होऊ लागला होता. याच दरम्यान कधीतरी मार्कण्डेय पुराणाशी देवीमाहात्म्याचा संबंध जोडला गेला असावा. ब्रह्मविष्णुमहेशात्मक त्रिदेव, जे विश्वाची उत्पत्ती-स्थिती-लय होण्यास कारणीभूत आहेत, त्यांचे महत्त्व पुराण काळात अनन्यसाधारण वाढल्याचे दिसते. त्यांच्या पत्नी अथवा शक्ती (सहकारिणी) मानल्या जाणाऱ्या पार्वती-लक्ष्मी-सरस्वती या त्रिदेवींचे महत्त्वही या काळात होतेच. शाक्त पंथाच्या दृष्टिकोनातून विचार करता मूळ शक्ती एकच असून त्या शक्तीचीच विविध रूपे म्हणजे इतर सर्व देवता होत. याच विचाराशी साम्य दर्शविणारी तीन देवतांची चरिते (कथा) देवीमाहात्म्यात ग्रंथित केली आहेत.

देवीमाहात्म्याची विषयवस्तू

देवीमाहात्म्यामध्ये एकूण १३ अध्याय आहेत. यामध्ये महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन देवतांनी असुरांचे निर्दालन केल्याच्या कथा संकलित केलेल्या आहेत. शिवाची सहकारिणी म्हणून पार्वतीचा उल्लेख असला, तरी त्या शिवाचे भरव अथवा काल म्हणून प्रसिद्ध असणारे जे रौद्र स्वरूप आहे, त्याची सहकारिणी म्हणून भरवी अथवा काली या देवतेचा उल्लेख येतो. त्यामुळे प्रस्तुत ग्रंथात महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती अशा देवतात्रयीचे मुख्यत: वर्णन केले गेले असावे. मात्र देवीमाहात्म्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वराच्या सहकारिणी म्हणून या तीन देवी महत्त्वाच्या नसून त्या स्वत:च स्वतंत्र, स्वयंसिद्ध देवता म्हणून महत्त्वाच्या मानल्या आहेत. ही विषयाची पाश्र्वभूमी देखील पहिल्या अध्यायापासून विशद होत जाते. अनेकदा या तीनही देवतांचा संबंध या ना त्या मार्गाने विष्णूशी जोडलेला दिसतो. उदाहरणार्थ, प्रथम चरितामधील महाकाली म्हणजे विष्णूची योगनिद्रा आहे. मध्यम चरितामधील महिषमर्दनिी तर साक्षात महालक्ष्मी म्हणूनच ओळखली जाते. तसेच उत्तम चरितामधील देवता महासरस्वती असली, तरी युद्धानंतर सर्व देव तिची नारायणी म्हणून स्तुती करतात. यावरून असे सुचवावेसे वाटते की जरी देवीमाहात्म्य हा ग्रंथ आदिशक्तीचे एक स्वतंत्र देवता म्हणून असलेले स्थान अधोरेखित करीत असला, तरी तो काहीसा आदिशक्तीच्या विष्णूशी संबंधित असणाऱ्या अंशाकडे झुकल्यासारखे वाटते.

देवीमाहात्म्याच्या प्रथम चरितात मार्कण्डेयांच्या संवादामध्ये सावर्णिनामक मनूचा उल्लेख येतो. या मनूच्या काळातील, म्हणजेच सावर्णिमन्वन्तरातील कथा सांगत असता, प्रथम सुरथ राजाचा उल्लेख मार्कण्डेय करतात. सुरथाच्या राज्यावर परचक्र आले असता तो एकाकी अवस्थेत आपल्या घोडय़ावर बसून वनामध्ये जातो. मेधा (संस्कृतमध्ये मेधस्) नावाच्या एका मुनींच्या आश्रमामध्ये पोहोचून तेथे काही दिवस मुक्काम केला असता राजाच्या मनात सतत आपल्या राज्याविषयीच विचार येत असतात. आपले अधिकारी प्रजेची नीट काळजी घेतील का, परक्या राजाच्या हाताखाली माझा प्रधान, माझे नोकरचाकर कसे बरे काम करीत असतील, वायफळ खर्च करून माझा खजिना ते रिकामा तर करून टाकणार नाहीत ना इत्यादी असंख्य चिंता त्याचे मन पोखरत असतात. त्याच दरम्यान मेधा मुनींच्या आश्रमातील समाधी नावाच्या एका वैश्याशी राजाची गाठ पडते. या वैश्याचे घरदार आणि सर्व संपत्ती लाटून त्याच्या बायका-मुलांनीच त्याला घराबाहेर काढलेले असते. आश्रमात राहात असता तोही सतत माझी मुले आता तरी सुखात असतील ना, बायका खुशीत दिवस घालवतील ना, आता ती सर्व मंडळी सदाचाराचे पालन करतात की अजूनही दुर्वर्तनीच आहेत, इत्यादी विचारांनी चिंताक्रांत झाला आहे. राजा त्याला विचारतो की, ज्या कुटुंबियांनी तुलाच घराबाहेर काढले, त्यांची काळजी करायची तुला गरजच काय? त्यावर तो वैश्य म्हणतो की, मी माझ्या मनाला खूप समजावले, परंतु मनात सतत घरच्यांचेच विचार येत राहतात.

शेवटी एकदा ते दोघे मेधा मुनींना भेटले असता राजा आपली शंका त्यांना विचारतो. तो म्हणतो ‘माझ्या गेलेल्या राज्याची काळजी इथे आश्रमात राहूनही अखंडपणे करीत आहे. या वैश्याची कथाही माझ्यासारखीच आहे. तोही जी मंडळी त्याच्याशी वाईट वागली, त्यांच्याच चिंतेत सतत व्यग्र असतो. असे आमच्या बाबत का घडते आहे?’

मेधा त्यावर म्हणतात, तुम्हा दोघांची स्थिती त्या पक्ष्यांसारखी झालेली आहे जे स्वत: भुकेने व्याकूळ झाले असूनही आपल्या पिल्लांच्या तोंडात घास भरवितात. महामायेची मोह नावाची शक्ती अत्यंत अद्भुत आहे. त्या मोहाच्या तावडीत सापडलेल्याची काय गत होईल ते सांगता येत नाही. यावर राजा आणि वैश्य महामायेविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा प्रकट करतात. त्यावर मेधा म्हणतात, भगवान विष्णूची शक्ती असणारी महामाया हे सर्व विश्व चालवते. महान अशा विद्वान लोकांच्या चित्तालाही संमोहित करून मोहाधीन करणारी ही महामाया प्रसन्न झाली असता मात्र मनुष्यांना मोक्ष प्रदान करते-

ज्ञानिनामपि चेतांसि देवी भगवती हि सा।

बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति॥

तया विसृज्यते विश्वं जगदेतच्चराचरम्।

सषा प्रसन्ना वरदा  नृणां भवति मुक्तये॥

मेधा स्पष्ट करतात की, ही महामाया जरी मूलत: अव्यक्त स्वरूपात असली, तरी देवतांच्या साहाय्यासाठी ती अनेकवार प्रकट होते. देवीमाहात्म्यात या तिच्या अनेक प्रकटनांपकी पहिले अगदी थोडक्यात वर्णन केले आहे. आतापर्यंतचा उपरोक्त कथाभाग आणि देवीचे पहिले प्रकटन सांगणारी कथा पहिल्याच अध्यायात संपते. म्हणजेच प्रथम चरित केवळ एकाच अध्यायाचे आहे. प्रथम चरितात देवीचे हे पहिले प्रकटन योगनिद्रा स्वरूपात पुढीलप्रमाणे मांडलेले दिसते- शेषावर शयन करणाऱ्या विष्णूच्या कानातील मळापासून उत्पन्न झालेले मधू आणि कैटभ हे दोन असुर एकदा ब्रह्मदेवालाच ठार करण्यास उद्युक्त झाले. त्यावेळी ब्रह्मदेवाने विष्णूच्या डोळ्यांत घर करून असणाऱ्या (हरिनेत्रकृतालया) योगनिद्रेची स्तुती केली. त्या स्तुतीने प्रसन्न होऊन योगनिद्रेने विष्णूस जागे केले आणि मग विष्णूने मधुकैटभांना ठार मारले.

मध्यम चरित हे प्रथम चरितापेक्षा मोठे असून त्यामध्ये एकून तीन अध्याय (अध्याय २ ते ४) आहेत. महिष नावाच्या असुराच्या छत्राखील एकजूट झालेल्या असुरांनी देवतांशी शंभर वष्रे युद्ध करून देवतांचा दारूण पराभव केला आणि त्यांना स्वर्गातून हाकलून दिले. पदच्युत झालेल्या देवांची पदे असुरांनी आपल्याकडेच घेतली. त्यांचा राजा अर्थातच महिषासुर होता. सर्व देवतांनी विष्णू आणि शिवाकडे धाव घेऊन कोसळलेल्या संकटाविषयी त्यांना सांगितले. विष्णू आणि शिव सर्व हकिगत ऐकून रागावले असता त्यांच्या मुखातून महान तेज बाहेर पडले आणि त्यामध्ये इतरही देवतांच्या तेजाची भर पडली. त्यातून एका स्त्रीची आकृती साकार झाली. तिला या सर्व देवतांनी वस्त्रालंकार, विविध आभूषणे आणि आपापली आयुधे दिली आणि युद्धाकरिता सज्ज केले.

दुसऱ्या अध्यायामध्ये पुढे देवीने असुरसन्याचा, त्यातील प्रमुख असुरांचा आणि महिषाचा सेनापती असलेल्या चिक्षुराचा नाश कसा केला याची कथा येते तर तिसऱ्यात तिने महिषाला कसे ठार मारले ते सांगितले आहे. देवीने केलेला महिषाचा वध ही प्राचीन भारतातील असंख्य शिल्पकारांनी ठिकठिकाणच्या मंदिरांवर शिल्पांकित केलेली सुप्रसिद्ध कथा आहे. महिषाने विविध रूपे घेऊन देवीला त्रास देण्याचा प्रयत्न केला. अंतत: तिने महिष रूपात त्याला पकडून त्रिशूळाचा वार केला असता एक शेवटचा प्रयत्न म्हणून तो मनुष्यरूप धारण करतो. महिषमुखातून मनुष्यदेह घेऊन बाहेर पडू पाहणाऱ्या असुराचा देवी शिरच्छेद करते, असे देवीमाहात्म्य सांगते. चौथ्या अध्यायात देवांनी केलेली महिषमर्दनिीची स्तुती आहे. शेवटी देवी त्यांना असे आश्वासन देते की त्यांना आवश्यकता भासेल तेव्हा तेव्हा ती प्रकट होऊन असुरांविरुद्ध देवांना साहाय्य करेल.

देवीमाहात्म्याचे यापुढील सर्व अध्याय मिळून आकाराने सर्वात मोठे असलेले ‘उत्तम चरित’ बनते. उत्तम चरितातील मुख्य कथा जरी शुंभ आणि निशुंभ या जुळ्या असुरांच्या वधाची असली तरी त्या अनुषंगाने देवीने इतरही अनेक असुरांचा संहार केला होता, ती सर्व वर्णने येथे सविस्तर सांगितली आहेत.

उत्तम चरिताच्या प्रारंभी (अध्याय ५) शुंभ आणि निशुंभ या दोघांनी देवांवर मिळवलेल्या विजयाची आणि त्यांना स्वर्गातून पदच्युत केल्याची कथा येते. यापूर्वी देवीने दिलेल्या (असुरांच्या संहारासाठी प्रकट होऊन देवांना मदत करण्याच्या) आश्वासनाची आठवण काढून देव हिमालयात जातात आणि देवीची स्तुती करतात. या ठिकाणी देवांनी या विश्वामध्ये विविध रूपांत नांदणाऱ्या देवीच्या विविध स्वरूपांना ‘या देवी सर्वभूतेषु’ या शब्दांनी सुरू होणाऱ्या श्लोकांद्वारे नमन केले आहे. हे श्लोक सुप्रसिद्ध असून त्यांचे स्वतंत्रपणेही अनेकदा पठण केले जाते. देवांकडून स्तुती केली जात असता गंगेवर स्नानाकरिता आलेली पार्वती ही स्तुती ऐकून देवांना तुम्ही कोणाची स्तुती करता, असा प्रश्न करते. तेव्हाच तिच्या शरीरातून शिवा प्रकट होते आणि सांगते की हे देव माझीच स्तुती करत आहेत, मीच अंबिका आणि कौशिकी या नावांनी ओळखली जाते. पार्वतीच्या शरीरातून शिवेचे निर्गमन झाल्यावर पार्वती काळी पडते आणि काळ्या वर्णामुळे काली या नावाने संबोधली जाऊ लागते.

इकडे अत्यंत सुस्वरूप अशा अंबिकेच्या रूपाची महती चण्ड आणि मुण्ड या असुरांकरवी शुंभ आणि निशुंभ या असुरबंधूंच्या कानावर पडते. तिच्याशी लग्न करण्याच्या कामनेने शुंभ दूतास रवाना करतो, तो दूत अंबिकेला शुंभाचा निरोप पोहोचवतो. अंबिका मात्र उलट असा निरोप पाठवला की माझ्याशी लग्न करण्याची इच्छा असणे ठीक आहे. परंतु माझी अशी प्रतिज्ञा आहे की जो मला युद्धात हरवेल, त्याच्याशीच मी लग्न करेन. त्यामुळे तुमच्या असुरराजालाही माझ्याशी युद्ध करूनच मला जिंकावे लागेल. त्यानंतरच ही इच्छा पूर्ण होऊ शकते.

सहाव्या अध्यायामध्ये दूताने अंबिकेचा निरोप कथन केल्यावर पुढे काय घडले त्याचे वर्णन येते. असा निरोप ऐकून शुंभ साहजिकच चिडतो आणि धूम्रलोचनाला ससन्य जाऊन देवीस पराभूत करून खेचून आणण्यास फर्मावतो. मात्र घडते उलटेच- देवी धूम्रलोचनाचेच भस्म करते आणि तिचे वाहन, सिंह, असुरसन्याचा नाश करतो. याने अधिक क्रोधित होऊन शुंभ चण्ड आणि मुण्ड या असुरांना पाठवतो. यावेळी काली त्या दोन्ही असुरांचा शिरच्छेद करते. देवीमाहात्म्य असे सांगते की कालीने चण्ड आणि मुण्ड या दोन असुरांना मारल्याने ती चामुण्डा या नावाने प्रसिद्ध झाली.

यानंतर सातव्या अध्यायामध्ये शुंभाने पाठवलेल्या महासन्याशी देवीने दिलेल्या लढय़ाचे विस्तृत वर्णन येते. अंबिका, तिचा सिंह आणि काली त्वेषाने असुरसन्याशी लढत असता, त्यांच्या मदतीस अन्य देवांच्या शक्ती धावून आल्या. हंसवाहक विमानात आसनस्थ असलेली ब्रह्माणी, बलावर बसलेली त्रिशूलधारिणी माहेश्वरी, मोरावर स्वार झालेली कौमारी, गरुडारूढ वैष्णवी, वराहस्वरूप धारण केलेली वाराही, नारीदेह व सिंहमुख असणारी नारसिंही आणि गजारूढ वज्रहस्ता ऐन्द्री या त्या सात शक्ती होत. त्याच वेळी अंबिकेच्या शरीरातून महाभयंकर अशी चण्डिका प्रकट झाली. तिने शिवास आपला दूत म्हणून शुंभ आणि निशुंभाची भेट घेऊन त्यांना ‘पराभव मान्य करून निमूटपणे पाताळात निघून जा’ असा निरोप देण्यास सांगितले. देवी शिवाला आपला दूत करते, याद्वारे ती शिवाहून श्रेष्ठ असल्याचे सूचित केले गेले आहे. या प्रसंगामुळे तिला शिवदूती (शिव जिचा दूत आहे अशी) हे नामाभिधान प्राप्त झाले. अर्थातच शिवाचे हे दौत्य वाया गेले, हे सांगायला नकोच. असुरांतर्फे रक्तबीज लढण्याकरिता आला, ज्याचे रक्त जमिनीवर सांडले असता प्रत्येक थेंबातून पुन:पुन्हा असंख्य रक्तबीज तयार होत होते. देवीने कालीस आज्ञा केली की तिने तिचा अक्राळविक्राळ जबडा वासून मारलेल्या प्रत्येक रक्तबीजाचे सर्व रक्त प्राशन करावे, जेणेकरून ते जमिनीवर पडणार नाही आणि नव्याने रक्तबीजांची निर्मिती होणार नाही. त्यानुसार रक्तबीजाचे सर्व रक्त प्राशन करून कालीने रक्तबीजासही हतवीर्य केले, आणि शेवटी अंबिकेकडून त्याचा नाश झाला.

निशुंभाने देवीवर केलेल्या स्वारीचे वर्णन नवव्या अध्यायात आहे. घनघोर युद्ध करून देवीने निशुंभाच्या हृदयावर शूलाघात केला असता त्यातून पुन्हा एक पुरुष प्रकट होतो, ज्याचा ती शिरच्छेद करते. दहाव्या अध्यायात निशुंभापाठोपाठ येणाऱ्या शुंभाशी देखील तिचे भयंकर युद्ध होते, जे केवळ पृथ्वीवरच नव्हे तर आकाशातही चालते. शेवटी देवी शुंभास जमिनीवर आपटते आणि तो उठला असता त्रिशूलाने ठार मारते. अकराव्या अध्यायामध्ये देवतांनी केलेली स्तुती आहे. या अध्यायाचे नाव नारायणीस्तुती असे आहे. या अध्यायाच्या अखेरीस देवीने देवांना पुन्हा आश्वस्त केले असून पुढे होऊ घातलेल्या आपल्या रक्तदन्तिका, शताक्षी, शाकम्भरी, दुर्गा, भीमा, भ्रामरी अशा स्वरूपांविषयी काही भविष्यकथन केले आहे.

बाराव्या अध्यायात देवीने देवांना आपली पूजा कशा प्रकारे केली जावी, याविषयी मार्गदर्शन केले आहे. अर्थातच देवीमाहात्म्याचे श्रवण करणे हादेखील उपासनेचा एक श्रेष्ठ मार्ग असल्याचे देवीने सांगितले आहे. हा उपदेश जरी देवतांकरिता असला, तरी एका परीने तो मानवाकरिताच आहे, कारण देवीमाहात्म्याचं वर्णन केलेल्या पद्धतीने मनुष्यही तिची पूजा करू शकतात.

तेराव्या अध्यायात देवीच्या या सर्व चरितांची जोडणी पुन्हा मूळच्या कथाबंधाशी करण्यात आली आहे. मेधा मुनींद्वारे सांगितली गेलेली ही तीन चरिते ऐकून राजा आणि वैश्य देवीची मातीची मूर्ती बनवून तिची उपासना करतात. तीन वर्षांनंतर त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन चण्डिका प्रकट होते आणि दोघांनाही वर देते. वैश्याला त्याचे ममत्व सुटून मोक्षगती प्राप्त होते. सुरथ राजाला त्याचे राज्य प्राप्त होते, परंतु देवी त्याला असे सांगते की पुढील कल्पांती तोच मनू म्हणून जन्म घेणार असून त्यावेळी तो सावर्णी या नावाने प्रसिद्ध होईल. आपल्याला विविध पुराणांमध्ये एकूण चौदा मनूंचे वर्णन सापडते. त्यांपकी सावर्णी हा आठवा मनू होय.

चण्डीपाठाची परंपरा

मार्कण्डेय पुराणातील हे १३ अध्यायांचे देवीमाहात्म्य एकूण ७०० श्लोकांचे असल्याने त्याला देवीसप्तशती अथवा दुर्गासप्तशती (आणि अनेकदा नुसतेच ‘सप्तशती’) म्हटले जाते. त्यामध्ये चण्डी अथवा चण्डिका या देवतेचे माहात्म्य असल्याने त्याला चण्डीपाठ असे संबोधून त्याचे पारायण करण्याची परंपरा आहे. केवळ शाक्त पंथीयांकरिताच नव्हे तर बहुतांश िहदूंकरिताही भगवद्गीतेप्रमाणेच अतिपूजनीय ठरलेला हा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे.

घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत, म्हणजेच नवरात्रीच्या काळात, देवीमाहात्म्याचे पठण करण्याची परंपरा अनेक घरांमध्ये असते. मात्र देवीमाहात्म्य वाचण्याच्याही काही पारंपरिक पद्धती आहेत. संपूर्ण सप्तशतीचा पाठ करण्याऐवजी स्वतंत्र चरिते विशिष्ट पद्धतीने वाचली जातात. एकच चरित वाचावयाचे झाल्यास मध्यम चरित (महिषासुरवधाची कथा सांगणारे अध्याय २ ते ४) वाचावे. दोन चरिते वाचावयाची असल्यास प्रथम आणि मध्यम ही चरिते वाचता येतात. अन्यथा तीनही चरिते (संपूर्ण सप्तशती) वाचावी लागतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर प्रथम अथवा उत्तम चरित स्वतंत्रपणे वाचू नये, अशी परंपरा आहे. तसेच उत्तम चरित वाचण्याकरिता प्रथम आणि मध्यम ही दोन्ही वाचली जाणे गरजेचे आहे. प्रथम चरिताची देवता महाकाली असून ऐं हे तिचे बीज आहे. मध्यम चरिताची देवता महालक्ष्मी असून ह्रीं हे तिचे बीज आहे. तसेच उत्तम चरिताची देवता महासरस्वती असून तिचे बीज क्लीं असे आहे. सप्तशतीमधील प्रत्येक अध्यायाच्या प्रारंभी आणि अंती त्या त्या देवतेच्या बीजाचा उच्चार केला जातो. त्याचप्रमाणे प्रत्येक चरिताच्या प्रारंभी त्या त्या देवतेचे ध्यान दिलेले आहे.

या ग्रंथाचा तंत्रमार्गानुसार सविस्तर पाठ करण्याकरिता मात्र केवळ सप्तशती म्हटली जात नाही तर त्यापूर्वी आणि नंतर इतरही अनेक सूक्ते / स्तोत्रे विधिवत म्हणणे अपेक्षित असते. तांत्रिक पद्धतीनुसार सप्तशती यंत्राची स्थापना करून प्रथम त्याची पूजा करावी लागते. चण्डीकवच, अर्गलास्तोत्र आणि कीलकस्तोत्र यांचा पाठ केला जातो. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीनही देवतांशी संबंधित असणारा आणि त्या देवतांच्या बीजांनी युक्त असा ‘ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे’ हा नवार्णव मंत्र म्हणून सुविख्यात असणारा मंत्र जपला जातो. वैदिक आणि पौराणिक परंपरेतील रात्रिसूक्तांचे पठण केले जाते. या विधींनंतर मग देवीसप्तशतीचा पाठ केला जातो. यानंतर वैदिक आणि तांत्रिक देवीसूक्त, प्राधानिकरहस्य, वैकृतिकरहस्य आणि मूíतरहस्य अशी तीन स्तोत्रे म्हटली जातात. त्यानंतर काही उत्तरविधी करून पूजेचे समापन होते. देवीपूजनामध्ये समाविष्ट असणारी कुञ्जिकास्तोत्र, देवीक्षमापनस्तोत्र आणि दुर्गापदुद्धारस्तोत्र हीदेखील महत्त्वाची स्तोत्रे आहेत.

देवीची उपासना करण्याचा एक प्रकार म्हणजे देवीसप्तशतीमधील श्लोकांचा वापर करून होम करणे हा होय. होमाकरिता किती वेळा पाठ केला जाणार, त्यावर नवचंडी, शतचंडी, सहस्त्रचंडी इत्यादी प्रकारचे उत्तरोत्तर मोठे होत जाणारे होम करता येतात. त्यांच्यासाठीही वेगळा विधी आचरावा लागतो.

सप्तशतीमधील मंत्र

देवीमाहात्म्यात म्हणजे सप्तशतीमध्ये एकूण ७०० श्लोक आहेत, हे आपण वर पाहिले. देवीभक्तांमध्ये या ग्रंथातील हरएक श्लोकात मंत्रत्व असल्याची मान्यता आहे. सप्तशतीमधील ठरावीक श्लोकाचा विशिष्ट कार्याकरिता जप केला असता ते ते कार्य सिद्धीस जाते असे देवीभक्त मानतात. उदाहरणार्थ ज्ञानिनामपि.. (१.५५) हा श्लोक वशीकरणासाठी;  शब्दात्मिका सुविमल.. (४.१०) हा श्लोक सुखप्राप्तीसाठी; मेधासि देवि विदिता.. (४.११) हा श्लोक वाक्सिद्धीसाठी; दुग्रे स्मृता हरसि.. (४.१७) हा श्लोक दारिद्रय़निवारणासाठी; शूलेन पाहि नो देवि.. (४.२४) हा श्लोक अपमृत्युनाशार्थ; करोतु सा न: शुभहेतु.. (५.८१) हा श्लोक सर्वकामनापूíतकरिता; यस्माच्चण्डं च मुण्डं च.. (७७.२७) हा श्लोक देवीच्या कृपाप्राप्तीकरिता; देवी शूलेन वज्रेण.. (८.६०-६१) हे दोन श्लोक शत्रुनाशार्थ; देवि प्रपन्नाíतहरे प्रसीद.. (११.३) हा श्लोक मनीषापूर्तीसाठी; त्वं वैष्णवीशक्ति.. (११.५) हा श्लोक संमोहनारकरिता; विद्या समस्ता तव.. (११.६) हा श्लोक विद्याप्राप्तीसाठी; सर्वमंगलमांगल्ये.. (११.१०) हा श्लोक अभीष्टसिद्धीसाठी, हिनस्ति दैत्यतेजांसि.. (११.२७) हा श्लोक बालग्रहशांतीकरिता; रोगानशेषान्.. (११.२९) हा श्लोक रोगनाशासाठी; उपसर्गा: शमं यान्ति.. (१२.१७) हा श्लोक दु:स्वप्नपीडानाशासाठी आणि स्तुता संपूजिता.. (१२.४१) हा श्लोक पुत्रप्राप्तीसाठी वापरता येतो.

या परंपरेचा विचार करता एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे मूळ देवीमाहात्म्यामध्ये उपरोक्त श्लोक काहीशा वेगळ्या संदर्भामध्ये आले असतील, तरी ते स्वतंत्रपणे काढून, सुटे सुटे घेऊन वाचल्यास त्यांच्यामधून जो अर्थ निष्पन्न होईल, त्यानुसार त्या त्या श्लोकांचे फल सांगण्यात आले आहे. उदाहरणार्थ, आपण पूर्वी पाहिलेल्या ‘ज्ञानिनामपि चेतांसि’ या श्लोकामध्ये महामायेच्या मोहशक्तीची जाणीव करून देण्यात आली आहे, आणि असे सांगितले आहे की ज्ञानीजनांच्या चित्तासही ती मोहात पाडू शकते. या श्लोकाचा उपयोगही परंपरेने वशीकरणासाठी सांगितला आहे, ज्यामध्ये चित्त मोहून घेणेच अभिप्रेत असते. ‘दुग्रे स्मृता हरसि’ या श्लोकाच्या उत्तरार्धात दारिद्रय़दु:खभयहारिणी का त्वदन्या (दारिद्रय़, दु:ख आणि भयाचे हरण करणारे तुझ्याहून अन्य कोण आहे?) असे देवीस उद्देशून म्हटले आहे, आणि त्याचा विनियोगही दरिद्रता जाऊन धनप्राप्ती व्हावी याकरिता करावा असे परंपरा सांगते. तसेच ‘सर्वमंगलमांगल्ये’ या श्लोकातच देवीला सर्वार्थसाधिका म्हणून संबोधले आहे आणि परंपरेने त्याचा विनियोगही अभीष्टसिद्धिकरिता सांगितला आहे. थोडक्यात परंपरेने सुचविलेले सप्तशतीमधील मंत्रात्मक श्लोकांचे विनियोग अन्वर्थक असेच आहेत.

देवीमाहात्म्याच्या आवृत्ती

मार्कण्डेय पुराणातील मूळ संस्कृत देवीमाहात्म्य हे अनेक प्रकाशनांतर्फे प्रकाशित करण्यात आले असून ते बाजारात सहज उपलब्ध होते. वर्णेकरकृत देवीमाहात्म्याची आवृत्ती जुनी, परंतु विधिविधानांची आणि मंत्रांची सविस्तर माहिती देणारी आहे. सार्थसप्तशती नावाचा ग्रंथ उत्तमश्लोक नामक देवीभक्ताने लिहिला असून त्यामध्ये प्रत्येक अध्यायातील कथेचे प्रसंगोचित वर्णन आणि आध्यात्मिक मार्गाचे निरूपण केलेले आहे. मूळ संस्कृत देवीमाहात्म्याप्रमाणेच या ग्रंथाचे वाचनही करण्याची पद्धत आहे.
डॉ. अंबरीश खरे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2017 1:07 am

Web Title: indian goddess history
Next Stories
1 कुलदेवता
2 राजस्थानातील देवीची मंदिरे
3 आचरण जमेल ?
Just Now!
X