हाताने मुक्तपणे मारलेल्या रेघोटय़ा ही कलेशी आपली पहिली ओळख. या उभ्या, आडव्या, तिरप्या रेघाना त्यांचं विशिष्ट असं व्यक्तिमत्त्व असतं.

हातात खडू, पेन्सिल धरता यायला लागल्यापासून दिसेल तिथे रेघोटय़ा मारणे हा लहान मुलांचा आवडता उद्योग. कलेशी ही त्यांची पहिली ओळख. त्यातूनच मग थोडे मोठे झाल्यावर उभ्या रेघांमधून नारळाचे झाड, तिरक्या रेघांमधून डोंगर, आडव्या रेघांमधून पाणी आणि वक्राकार रेषेतून सूर्य!! नकळत आपली निरीक्षणशक्ती आपल्या बोटांतून रेघांच्या मार्फत बाहेर पडते.

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
Who will give the manifesto of health guarantee for the elderly
वृद्धांच्या आरोग्याच्या हमीचा ‘जाहीरनामा’ कोण देणार?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती

कलेच्या क्षेत्रात किंवा दृश्य माध्यमात बिंदू किती महत्त्वाचा आहे हे आपण जाणतोच. बिंदूपासून बनते ती. रेघ. रेघ ही अशा न मोजता येणाऱ्या हजारोबिं दूंनी बनलेली असते. मजेने आपण म्हणू शकतो की रेघ म्हणजे फिरायला निघालेला बिंदू!

शाळेमध्ये आपल्याला शिकवले जाते की रेघेला फक्त लांबी असते, म्हणजे ती एकमितीय असते. पण हे खरे नाही. रेघेला जाडीसुद्धा असते. कला विश्वामध्ये एखादी रचना रेघेच्या लांबीबरोबरच त्याच्या जाडीवर पण अवलंबून असते. प्रत्येक रेघेची स्वत:ची अशी खासियत असते. कलाकार आपली संकल्पना ह्या वेगवेगळ्या रेघांच्या माध्यमातून व्यक्त करत असतो. उभी-आडवी, जाडी-बारीक, गोलाकार, तुटक, तिरकी, नाजूक-ठसठशीत अशा किती तरी रेघांमधून कलाकाराच्या भावना व्यक्त होत असतात.

गृहसजावटीमध्ये रेघांच्या माध्यमातून आपण बरेच काही सांगू शकतो आणि महत्त्वाचे म्हणजे पाहिजे तो परिणाम साधू शकतो. रेघांच्या कल्पक रचनेतून एखादी खोली प्रशस्त, उंच भासवू शकतो किंवा अगदी नाटय़मयरीत्या पण सजवू शकतो. रेघांमधून व्यक्त होणारा अर्थ आपल्याला लहानपणीसुद्धा समजतो. छोटे मूल ‘उंच उंच झाड’ म्हणून आडव्या रेघा नाही काढणार किंवा ‘लांब साप’ म्हणून तिरकी रेघ नाही काढणार. कदाचित लां..ब म्हणून कागदाच्या बाहेपर्यंत त्याची रेघ जाईल. अशा ह्या महत्त्वाच्या रेघा गृहसजावट अर्थपूर्ण कशा बनवतात ते बघू या.

आडवी रेघ- ‘आडवा’ ह्य शब्दातच एक प्रकारचा आळसावलेपणा, विश्रांतीची भावना आहे. क्षितिजाशी समांतर अशा ह्य रेघा माणसाला नेहमीच शांत करतात. अथांग पसरलेला समुद्र किंवा दूरवर पसरलेली हिरवळ हे ह्यचे उत्तम उदाहरण आहे. ह्य रेघांमधून उतरलेली कलाकृती नेहमीच स्थिर भासते आणि आपलीशी वाटते. कुठल्याही गोष्टीची लांबी भासवण्यासाठी आडव्या रेघा कामी येतात. एखादी छोटी जागा लांबी किंवा रुंदीला जास्त भासवण्यासाठी कल्पकतेने आडवी रचना केल्यास तीच जागा ऐसपस वाटते. आपल्यापासून दूर जाण्याऱ्या रेघांमुळे खोली -डेप्थ मिळते व आहे तीच जागा प्रशस्त वाटते.

अशा रेघांची कलाकृती कुठे वापरावी, तर शक्यतो आपल्या झोपायच्या खोलीत किंवा विश्रांतीच्या जागी. आडव्या रेघांमधून तयार केलेले चित्र, वॉल हॅन्गिग, वॉल पेपर वापरल्याने त्या खोलीत एक प्रकारची सुरक्षितता व शांतता निर्माण होते. त्याचप्रमाणे िभतीवर लावायचे फोटो किंवा पेंटिंग्स ह्यमध्ये कुठलेही निसर्गचित्र वा कलाकृती ज्यामध्ये आडव्या रेघांमधून चित्रित केलेला सूर्यास्त, सूर्योदय, विस्तीर्ण जलाशय, दूरवर पसरलेले माळरान आहे, असे असावे. शक्यतो उभ्या आणि आडव्या रेघांनी चित्रित केलेले उंचच उंच कडे, झाडं, उसळलेल्या समुद्राच्या लाटा अशी चित्रे विश्रांतीच्या खोल्यांमधून लावणे टाळावे.

उभी रेघ-आडव्या रेघेखालोखाल उभ्या रेघा महत्त्वाच्या असतात. कुठल्याही गोष्टीवरची आपली नजर डावीकडून उजवीकडे फिरते व पहिल्यांदा आडव्या रेघा ग्रहण करते. आडव्या रेघांवर उभ्या रेघांनी दिलेला छेद हा कलाकृतीला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो.

कधी कधी ही उंची स्वत:मधल्या शक्तिप्रदर्शनासाठी वापरली जाते. जमिनीला काटकोनात असलेल्या ह्य उभ्या रेघा नेहमीच उंचीचा भास निर्माण करतात. ह्य रेघांमधून आत्मविश्वास, वृद्धी आणि ऊर्जा प्रकट होते. त्याचप्रमाणे सावधानता हा ह्य रेघेचा मूळ स्वभाव आहे. जेव्हा संकटाची चाहूल लागते तेव्हा प्राण्यांमध्ये त्यांचे कान, शेपटी, मान आपोआप उंचावते. त्यामुळे जशी आडव्या रेघेमुळे एक प्रकारची नििश्चतता येते, त्याच्या विरुद्ध उभ्या रेघेमधून आक्रमकता व सावधपणा व्यक्त होतो.

आकाशाला भिडणाऱ्या ह्य रेघा आजकाल जागोजागी वास्तू रचनेत दिसत असल्या तरी पूर्वी ह्य जास्तकरून धार्मिक वास्तूंसाठी वापरल्या जायच्या. जिथे देवापुढे खुजेपणाची भावना जाणीवपूर्वक निर्माण केली जायची. दृढपणा आणि ताठपणा ह्य रेघांतून व्यक्त होतो.

कुठल्याही चित्रामध्ये आडव्या रेघांबरोबर उभ्या रेघा मारल्या तर चौकट / फ्रेम तयार होते. कलाकार किंवा फोटोग्राफर अशा तऱ्हेने ती चौकट तयार करतात की आपले लक्ष बरोबर त्या कलाकृतीकडे खिळून राहते. मग ही बाजारातील लाकडी चौकटच पाहिजे असे नाही. दोन झाडांमधून दाखवलेला सूर्यास्त, खिडकीच्या चौकटीतून घेतलेला उडणाऱ्या पक्ष्याचा फोटो.. अशा उभ्या -आडव्या रेघांतून तयार झालेल्या अकृत्रिम फ्रेम्स नेहमीच जास्त आकर्षक दिसतात.

उभ्या रेघांमुळे एखाद्या चित्राला किंवा कलाकृतीला खोली मिळते, ज्यामुळे ती कलाकृती जिवंत वाटते आणि म्हणूनच आडव्या रेघांना छेद देणाऱ्या उभ्या रेघा जरुरी असतात. ज्याप्रमाणे आडव्या रेघांमुळे लांबी भासवली जाते त्याप्रमाणे उभ्या रेघांमुळे उंचीचा आभास निर्माण करता येतो.

आजकाल बिल्डर लोक आपल्याला घराचे छत पूर्वीसारखे उंच देत नाहीत. त्यातच वेगवेगळ्या प्रकारच्या फॉल्स सीिलगमुळे उंची अजूनच कमी होते. अशा वेळी गृहसजावटीमध्ये उभ्या रेघांची रचना भिंतीवर केली किंवा आडव्याऐवजी उभ्या फोटोफ्रेम्स लावल्या, पेंटिंगमधील रचना उंची दर्शवणारी वापरली, पडदे-सोफा ह्यांवरील डिझाइन उभे घेतले तर ती खोली जरा उंच भासेल. म्हणतातच ना बुटक्या माणसांनी आडवे पट्टे असलेले कपडे घालू नयेत. तसेच आहे हे.

तिरक्या रेघा – उभ्या आणि आडव्या रेघांपेक्षा ह्य रेघांची खासियतच निराळी आहे. जेव्हा आपण एखादी कृती किंवा हालचाल करतो तेव्हा आपोआप आपले शरीर पुढे-मागे किंवा बाजूला झुकते. स्थिरपणे एखादे काम करणे हे जवळपास अशक्य आहे. त्याचप्रमाणे पळताना, चालताना आपले शरीर हे पुढे झुकलेले असते. शरीराला आलेला हा बाक किंवा कोन ह्यमुळे हालचाल करायला किंवा पुढे जायला मदत होते. त्यामुळे जेव्हा एखाद्या कलाकृतीत आपण ह्य तिरक्या किंवा कोनामध्ये असलेल्या रेघा बघतो तेव्हा आपल्याला गतीचा भास होतो आणि त्यामुळे ती कला जास्त चतन्यपूर्ण दिसते.

सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे आडव्या रेघा शांतता आणि विश्रांती दर्शवतात. त्याच्या विरुद्ध तिरक्या रेघा ह्य जागृत, आव्हानात्मक वाटतात. एखादी गोष्ट नाटय़मय करायची असेल तर ह्य प्रकारच्या रेघांचा खूप उपयोग होतो. फोटोग्राफी, प्रकाशयोजना, गृहसजावट किंवा चित्रकलेमध्ये ह्यचा पुरेपूर वापर केलेला आढळतो.

उभ्या व आडव्या रेघांमध्ये एक प्रकारचा औपचारिकपणा येतो. तिरक्या रेघांमुळे तीच रचना एकदम हटके, मुक्त वाटते. त्या रचनेचा बोजडपणा कमी होतो. जास्त काळापर्यंत एखाद्या रचनेमधील कुतूहल टिकून राहते.

सरळसोट उभी रचना मनावर दडपण आणते, पण हीच रचना कोनात फिरवल्यास जास्त आपलीशी वाटते. उदाहरणार्थ खडय़ा पहाडावर चढण्यापेक्षा त्यातून काढलेल्या तिरक्या पायऱ्या किंवा रस्त्यावरून जायला नेहमीच सुरक्षित आणि सोपे वाटते. बऱ्याच प्रसिद्ध चित्रकारांनी स्वत:चे चित्र वेगवेगळ्या रेघांच्या माध्यमातून रेखाटले आहे. कोणी फक्त आडव्या रेघा वापरल्या तर कोणी नागमोडी, कोणी जाड तर कोणी एकदम पुसट.. त्यातून त्या चित्रकाराच्या स्वभावाबद्दल, त्याच्या तेव्हाच्या मूडबद्दल बरीच माहिती मिळते.

तुम्हाला तुमचे चित्र कुठल्या रेघांत काढायला आवडेल?
वैशाली आर्चिक –