03 March 2021

News Flash

स्मरण : आगळावेगळा नेता

११ जानेवारी १९६६. त्या वेळी मी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर निवेदक या पदावर कार्यरत होतो.

लालबहादूर शास्त्री यांच्यासारख्या फारसा बोलबाला नसलेल्या नेत्याने पंडीत नेहरुंनंतरची पोकळी केवळ भरुनच काढली नाही तर जागतिक राजकारणात भारताची पत नि प्रतिष्ठा वाढविली. २ ऑक्टोबर या शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या व्यक्तित्वाला दिलेला उजाळा..

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सतत १७ र्वष पंतप्रधानपदी राहिलेल्या पं. जवाहरलाल नेहरू या उत्तुंग उंचीच्या नेत्यानंतर लालबहादूर शास्त्री यांच्यासारख्या फारसा बोलबाला नसलेल्या नेत्याने ही पोकळी भरून काढली. इतकंच नव्हे तर पाकिस्तानच्या युद्धखोरीला ‘मूँहतोड जबाब’ देऊन जागतिक राजकारणात भारताची पत नि प्रतिष्ठा वाढविली.

११ जानेवारी १९६६. त्या वेळी मी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर निवेदक या पदावर कार्यरत होतो. वेळ साधारण पहाटे साडेचार- पाचची असेल. घराची ‘कॉलबेल’ वाजली म्हणून झोपेतून उठून दरवाजा उघडतोय तो आकाशवाणीचा ड्रायव्हर अनपेक्षितपणे दारात उभा! तो रडवेल्या चेहऱ्याने म्हणाला, ‘साहेब, लालबहादूर शास्त्री गेले. तुम्हाला लगेच केंद्रावर बोलावलंय!’

लवकरात लवकर केंद्र सुरू करून या दुर्दैवी घटनेची माहिती लोकांना देणं आवश्यक होतं. कारण त्या वेळी जनसंपर्क साधण्याचं एकमेव प्रभावी आणि जलद माध्यम आकाशवाणी हेच होतं. काही वृत्तपत्रं अशा वेळी जादा अंक काढायची. पण त्यामानाने आकाशवाणीचं माध्यम किती तरी व्यापक! आदल्या दिवशीच, आकाशवाणीवरील रात्रीच्या बातम्यात ऐकलं होतं की, भारत-पाकदरम्यान रशियातील ताश्कंद येथे शांतता करारावर सह्य़ा झाल्या. इतकंच नाही तर या करारावर दोन्ही राष्ट्रांचे एकमत झाल्याने शास्त्रीजी खूशीत होते असंही बातमीत पुढे म्हटलं होतं. असे असताना, पुढच्या आठ-दहा तासांत असं काय घडलं की शास्त्रीजींना त्यामुळे मृत्यू यावा? मी ताबडतोब स्टुडिओत गेलो आणि केंद्र सुरू करून प्रथम अशुभसूचक अशा सारंगीवादनाची ध्वनिमुद्रिका लावली. आणि नंतर निवेदन केलं- ‘‘आकाशवाणी पुणे केंद्र. ३८४ अंश ६ मीटर्स किंवा दर सेकंदाला ७८० किलोसायल्सवरून आम्ही बोलत आहोत. आम्हाला सांगायला अतिशय वाईट वाटतं की आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय लालबहादूर शास्त्री यांचं रशियातील ताश्कंद येथे आज पहाटे निधन झालं.’’

शास्त्रीजींचं निधन आकस्मिक झालं होतं. अशा वेळी लोकांची साहजिकच अपेक्षा असते की निधन कशामुळे झालं याचा तपशील आणि मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कार्याचा परिचय सांगितला जावा. तथापि शास्त्रीजींच्या देहावसानाच्या एका ओळीच्या बातमीशिवाय आम्ही आमच्या श्रोत्यांना काहीच सांगू शकत नव्हतो; कारण आम्हालाच याबाबतीत अधिक माहिती नव्हती. शास्त्रीजींच्या मृत्यूचा तपशीलासाठी आकाशवाणीचा दूरध्वनीही खणखणू लागला. काय करावं हे सुचत नव्हतं. पण मग मी एक कागद घेतला आणि शास्त्रीजींबद्दल मला जी काही थोडी माहिती होती त्यातील मुद्दे लिहायला सुरुवात केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात प्रत्यक्ष युद्ध चालू असताना आमच्या पुणे केंद्रावरून, दररोज संध्याकाळी आम्ही ‘जयनाद’ नावाचा ५ मिनिटांचा एक कार्यक्रम प्रसारित करीत असू. आपल्या जवानांनी युद्धभूमीवर गाजविलेल्या शौर्याच्या, त्यांच्या हौतात्म्याच्या ताज्या वीरकथांवर आधारित असा हा कार्यक्रम असे. त्यातील मला तेव्हा आठवलेल्या घटनांचा समावेश मी या मुद्दय़ात केला. याखेरीज रेल्वेमंत्री असताना अरियालूड  येथे घडलेल्या रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून शास्त्रीजींनी तेव्हा राजीनामा दिला होता. ही घटनाही मी मुद्दय़ात घातली. त्यानंतर शास्त्रीजींच्या मृत्यूची बातमी सांगता सांगता, वरील माहितीचाही अंतर्भाव मी त्यांत करीत राहिलो. अशा रीतीने अर्धा तास मला भरून काढता आला. त्यानंतर दिल्ली केंद्रावरून शास्त्रीजींच्या मृत्यूचा तपशील आणि त्यांचे कार्य यासंबंधातील माहिती देण्यात येऊ लागली. ती आमच्या केंद्रावरून सहक्षेपित करू लागलो

शास्त्रीजींबद्दल जनसामान्यांना फारशी माहिती नसण्याचं कारण बघायला गेलं तर ते नि:संदेहपणे त्यांच्या प्रसिद्धिपराङ्मुख स्वभावात आढळतं. वस्तुत: स्वातंत्र्य चळवळीत ते म. गांधीजींच्या खांद्याला खांदा लावून लढले आणि त्यात त्यांना अनेक वेळा तुरुंगवासही भोगावा लागला. स्वातंत्र्योत्तर नेहरू मंत्रिमंडळात ते रेल्वेमंत्री, वाहतूक आणि दळणवळण खात्याचे मंत्री होते. इतकंच नाही तर त्यांनी दोन, सव्वादोन र्वष गृहमंत्री म्हणूनही अतिशय कार्यक्षमतेने आणि कणखरपणे काम केलं हे आज किती जणांना आठवत असेल?

पंजाबातील स्वतंत्र खलिस्तान चळवळीचे अध्वर्यू म्हणून भिन्द्रानवाले यांचं नाव घेतलं जातं. तथापि या चळवळीच्या कित्येक र्वष आधी, पं. नेहरूंच्या हयातीत, पंजाबातील त्या वेळचे नेते मास्टर तारासिंग यांनी भिन्द्रानवाले यांच्याच धर्तीवर ‘स्वतंत्र पंजाबी सुभा’च्या निर्मितीसाठी मोठं आंदोलन छेडलं होतं. भिन्द्रानवाले यांच्या चळवळीप्रमाणे ते फारसं रक्तलांछित नव्हतं हे खरं, पण त्यात राष्ट्रापासून फुटण्याचीच बीजं होती. मास्टर तारासिंग हे शीख समाजातील एक बऱ्यापैकी लोकप्रिय नेतृत्व होतं आणि त्यांना स्वतंत्र पंजाबी सुभ्याच्या मागणीच्या समर्थनार्थ शीख समुदायातील काहींचा उघड तर काहींचा छुपा पाठिंबा होता. अशा परिस्थितीत मास्टर तारासिंग यांनी आमरण उपोषण आरंभिलं आणि ते दीर्घकाळ चालू राहिलं. त्यांनी उपोषण मागे घ्यावं म्हणून प्रयत्न झाले, पण ते अधिकच ताठर बनले. त्यामुळे चिंताक्रांत परिस्थिती उद्भवली. तथापि त्या वेळी गृहमंत्री असलेल्या शास्त्रीजींनी अतिशय कणखर भूमिका घेऊन ‘स्वतंत्र पंजाबी सुभा’च्या आंदोलनाला मुळीच भीक घातली नाही. हळूहळू हे आंदोलन अस्तंगत पावलं. अशाच प्रकारची स्वतंत्र ‘द्रविडस्थान’ची मागणी दक्षिणेतील द्रुमक पक्षाने करून त्यासाठी चळवळही सुरू केली होती. काही काळाने तर ही चळवळ चांगलीच फोफावली होती. तथापि शास्त्रीजींनी ही देशद्रोही मागणीही फेटाळून लावली. अण्णादुराईंसारख्या नेत्यांना तर त्यांनी बजावलं की, या देशापासून फुटून निघण्याचे कोणाचेही मनसुबे यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत!

शास्त्रीजींच्या स्वभावात जसा कणखरपणा होता तसाच कमालीचा मुत्सद्दीपणाही होता. काँग्रेस पक्षात त्या वेळी अनेक अव्वल दर्जाचे ज्येष्ठ राजकारणी आणि महत्त्वाकांक्षी नेते होते. आणि त्यातील काही जण नेहरूंनाही डोईजड होत असत. तेव्हा काँग्रेस संघटना बळकट करण्याची आवश्यकता आहे, असे कारण देऊन त्यासाठी मंत्रिमंडळातील सदस्यांनी राजीनामे द्यावेत आणि स्वत:ला पक्षकार्याला वाहून घ्यावं असा ठराव काँग्रेस कार्यकारिणीने संमत केला. ‘कामराज योजना’ म्हणून त्या वेळी ओळखल्या गेलेल्या या खेळीमुळे अनेक ज्येष्ठ मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेही! त्यामुळे सत्ताकरणात नेहरूंना होणारा अंतर्गत विरोध बऱ्याच प्रमाणात मावळला. आश्चर्य वाटेल, पण या योजनेचे पडद्यामागचे खरे शिल्पकार होते स्वत: शास्त्रीजी! योजनेनुसार त्या वेळी शास्त्रीजींनीही राजीनामा दिला होता. पण त्यानंतर थोडय़ाच काळाने पं. नेहरूंनी त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं! दक्षिणेकडील राज्यांत हिंदी भाषेचा वापर करण्याच्या विरोधात चाललेली  प्रचंड मोठी चळवळ शास्त्रीजींनी थंड डोक्याने शमविली. दक्षिणेकडील राज्यांना राज्य कारभारात, इतर व्यवहारांत हिंदी भाषेचा वापर नको होता, त्यांना इंग्रजीच हवी होती. शास्त्रीजींनी त्यावर असा तोडगा काढला की, हिंदीचा पुरेसा परिचय जोपर्यंत तेथील लोकांना होत नाही तोपर्यंत या दोन्ही भाषांचा वापर केला जाईल. तशा आशयाचा ठरावही त्यांनी संसदेत मंजूर करून घेतला. त्यामुळे एक मोठंच भाषिक संकट टळलं!

पं. नेहरूंनी आपला वारस म्हणून शास्त्रीजींची केलेली निवड अनेकांना संभ्रमात टाकणारी होती. मोरारजी देसाईंसारखे अनेक ज्येष्ठ, कार्यक्षम आणि प्रभावशाली नेते पक्षात असताना नेहरूंनी शास्त्रीजींना कशी काय पसंती दिली, याचं तेव्हा आश्चर्य वाटलं होतं. पण नेहरूंनी हे पाऊल विचारपूर्वक, दूरदृष्टीने उचललं होतं हे नंतरच्या घटनांनी स्पष्ट केलं. शास्त्रीजींचं स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, त्याग, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळातील विविध खात्यांच्या मंत्रिपदांची त्यांची यशस्वी कारकीर्द, त्यांच्या स्वभावातील संयमित कणखरता अन् लवचीकता, साधी जीवनशैली, प्रामाणिकपणा आणि निरपवाद चारित्र्य, इत्यादी गुण हेरूनच शास्त्रीजींची निवड नेहरूंनी केली असली पाहिजे. नेहरूंच्या मृत्यूनंतर कामराज यांनी इंदिरा गांधींना पंतप्रधानपद स्वीकारण्याची विनंती केली होती, पण त्यांनी त्याला नकार देऊन त्याऐवजी शास्त्रीजींची निवड करण्याची इच्छा व्यक्त केली.

अवघ्या ५ फूट उंचीच्या आणि किरकोळ शरीरयष्टीच्या शास्त्रीजींनी जेव्हा पंतप्रधानपदाची सूत्रं हातात घेतली तेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांना त्यात मोठीच संधी दिसली. या ‘खुज्या’ माणसाच्या कार्यकाळात आपल्याला काश्मीरवर कब्जा मिळविता येईल असा दु:साहसी विचार करून त्यांनी भारतावर युद्ध लादलं.

तथापि आंतरराष्ट्रीय राजकारणात काय किंवा देशांतर्गत घडामोडीत काय, ज्यांनी ज्यांनी शास्त्रीजींना कमी लेखलं त्यांचा त्यांचा भ्रमनिरास झाल्याचं दिसलं. १९६५ सालच्या युद्धात मानहानीकारक पराभव करून पाकिस्तानच्या साहसवादाला शास्त्रीजींनी सडेतोड उत्तर दिलं. तथापि भारत हे युद्धखोर, साम्राज्यवादी राष्ट्र नसून शांततापूर्ण सहजीवनाचं तत्त्व अंगीकारणारा देश असल्याचा संदेश, ताश्कंद करारावर सही करून शास्त्रीजींनी साऱ्या जगाला दिला. हा करार होण्यापूर्वी शास्त्रीजी आणि आयुब खान यांच्यात जवळजवळ आठवडाभर वाटाघाटी चालू होत्या. करारात काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याचं कलम अंतर्भूत करावं असा धोशा आयुब खान यांनी लावून धरला होता. तथापि शास्त्रीजींनी त्याला ठामपणे नकार दिला आणि आपल्या अटींवर आयुब खान यांना करारावर सही करण्यास भाग पाडलं.

कराराची शाई वाळते न वाळते तोच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. औषधोपचार करायला त्यांनी मुळी फारसा अवसरच ठेवला नाही. शास्त्रीजींचे व्यक्तिगत डॉक्टर आणि रशियन डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही शास्त्रीजींचे प्राण वाचू शकले नाहीत. भारताचे तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण, परराष्ट्रमंत्री स्वर्णसिंग हेही त्या वेळी तिथे उपस्थित होते. नंतर शास्त्रीजींच्या मृत्यूच्या कारणाबाबत शंका, कुशंका व्यक्त करण्यात आल्या आणि आज अर्धशतकानंतरही त्यात खळ पडलेला नाही. याबाबतीत शास्त्रीजींचे चिरंजीव अनिल शास्त्री यांनीही त्यांच्या मृत्यूबाबतचे कागदपत्र प्रसिद्ध करावेत अशी मागणी नुकतीच केली. तथापि वस्तुनिष्ठ विचार केला की असं दिसतं की, शास्त्रीजींना अगोदरपासूनच हृदयविकार होता आणि २/३ वेळेला त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला होता. शास्त्रीजी संवेदनशील होते. ताश्कंद करार झाल्यानंतर, त्या करारातील अटींबद्दल भारतीय जनतेची काय प्रतिक्रिया आहे अशी त्यांनी पृच्छा केल्याचं आदल्या दिवशीच्या आकाशवाणीवरच्या बातमीत मी ऐकलं होतं. असो, ईश्वरेच्छा बलियसी!

जनतेला प्रेरणा देण्यासाठी देशातील सर्वोच्च नेते काही वेळा ‘गरिबी हटाव’सारख्या घोषणा देतात. काही काळ त्यांना लोकप्रियताही मिळते. तथापि ‘जय जवान जय किसान’ हे शास्त्रीजींचं घोषवाक्य भारतीय जनतेच्या हृदयसिंहासनावर कायमचं कोरलं गेलं आहे.

शास्त्रीजींच्या वैभवशाली देशकार्याचा गौरव देशाने त्यांना ‘भारतरत्न’ किताब देऊन केला. पण त्यामुळे त्या किताबाचंच वैभव वाढलं!
सुधाकर वढावकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 1:15 am

Web Title: lal bahadur shastri
Next Stories
1 संस्कृती : भारत नागपूजकांचा देश
2 कथा : एका आडाण्यावरून
3 कथा : संशय
Just Now!
X