पर्यटन विशेष
उन्हाळा असह्य़ व्हायला लागला की दोन-तीन दिवसांसाठी का होईना हिल स्टेशन गाठायचे असेल तर नेहमीच्या हिल स्टेशन्सपासून जवळ आणि कमी गर्दीची ही ठिकाणं माहीत असायलाच हवीत.

हिल स्टेशन म्हणजे आरामात पाय पसरून झोपायचे ठिकाण. वाटलेच तर हॉटेल किंवा होम स्टेच्या बाहेर पडायचे, थोडे परिसरात जाऊन पाय मोकळे करायचे. नाहीतर हॉटेलच्याच परिसरात भटकायचे. नेहमीच्या कामातून पूर्ण बाजूला जात, निवांतपणे रिलॅक्स होण्याचे ठिकाण. ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील सह्यद्रीच्या डोंगररांगांमध्ये माथेरान,  महाबळेश्वर अशी काही ठिकाणं निवडून त्याचं रूपांतर उन्हाळी सुट्टय़ांमध्ये राहण्यासाठी केले. इतर लोकप्रिय पर्यटन स्थळांप्रमाणेच आता ही ठिकाणंदेखील प्रचंड गर्दीने गजबजलेली असतात. इतकेच नाही तर त्यांच्यापर्यंत पोहोचणाऱ्या रस्त्यांवर वाहनांचा खोळंबा होत असतो.  सध्या तरी तुलनेने त्यांना ठोस पर्याय नसले तरी काही तुरळक पर्याय नक्कीच आहेत.

घाटावरून कोकणात उतरणाऱ्या काही महत्त्वाच्या घाटरस्त्यांमध्ये अंबोली घाटाचा समावेश होतो. अंबोली गेल्या काही वर्षांपासून पर्यटनाच्या नकाशावर चांगलंच झळकतंय तसेच सरीसृप प्राण्यांच्या अभ्यासकांचे आवडते ठिकाणदेखील झाले आहे. पण तेथेदेखील महामूर गर्दी असते. पण येथून जवळच सात-आठ किमीवर असणारे चौकुळ मात्र तसे अजून गर्दीपासून दूर आहे. अर्थात पावसाळ्यात येथेदेखील गर्दी होत असतेच. पण याच चौकुळमध्ये सध्या होम स्टेच्या सुविधा चांगल्या प्रकारे विकसित होत आहेत. गावाच्या दोहोबाजूंच्या टेकडय़ांवरील लांबलचक सडा,  लांबवर पसरलेली डोंगररांग आणि गर्द नसली तरी बऱ्यापकी हिरवाई असे हे टुमदार गाव आहे. चौकुळच्या अनेक वाडय़ा आजूबाजूच्या डोंगरात पसरलेल्या आहेत.  मूळ गावात काही पुरातन मंदिरं आहेत. गाव तसं अगदीच साधं आहे. फारसा शहरीकरणाचा वारा लागलेला नाही. पण पर्यटनाचे दुष्परिणाम हळूहळू का होईना दिसायला लागले आहेत. साधे पण रुचकर जेवण देणारे होम स्टेज सध्या येथे उपलब्ध आहेत. गावाची उंची अंबोलीपेक्षाही थोडी अधिकच आहे. त्यामुळे बऱ्यापकी आल्हाददायक वातावरण येथे असते. गावाच्या थोडे अलीकडे एक रिसॉर्टदेखील नव्याने झाले आहे.  अंबोली ते चौकुळ प्रवासासाठी अंबोलीतून टमटम मिळू शकतात.  पण स्वत:चे वाहन असेल तर चौकुळच्या आजूबाजूच्या नयनरम्य परिसराच्या भटकंतीचा आनंद घेता येतो.

चौकुळवरून पुढे पारगडकडे (१७ किमी) एक रस्ता जातो.  अगदी घाटमाथ्यावर छोटेखानी विसावलेला हा किल्ला आहे.  पूर्वी इकडे जाण्यासाठी पायवाटच होती. पण आता चांगली डांबरी सडक झाली आहे. संपूर्ण हिरवाईने आच्छादित असा हा परिसर पावसाळ्याच्या सुरुवातीला पाहायला अतिशय उत्तम आहे. किल्ल्यावर राहण्याची प्राथमिक सुविधा आहे. तेथून पुढे तिलारी नगर हे तिलारी प्रकल्पाची वस्ती असणारे गाव लागते.  हा सारा परिसर घनदाट अरण्याचा आहे.  हत्तींचा आणि गव्यांचा वावर या भागात अनेकदा मुक्तपणे होताना दिसतो.  तुमचे नशीब चांगले असेल तर तुम्हालापण त्यांचे दर्शन होऊ शकते.  चौकुळला एक-दोन दिवस मुक्काम आणि पारगड,  तिलारी अशा हिरव्यागार भटकंतीने तुमची सुट्टी चांगली जाऊ शकते.  तिलारी नगरवरून हवे तर तुम्ही चोर्ला घाटाने गोव्यात उतरू शकता किंवा उलटे बेळगाव किंवा चंदगडवरून कोल्हापूरला येऊ शकता.

बारा ज्योतिìलगांपकी भीमाशंकर हे एक ज्योतिर्लिग. समुद्रसपाटीपासून सुमारे १०३४ मीटर उंचावर हे ज्योतिìलग अभयारण्यात वसलेले आहे.  १२४ चौरस किमी परिसरावर वसलेल्या या अभयारण्यात भटकंतीचे अनेक पर्याय आहेत.  येथे आतमध्ये अनेक गावं आहेत.  भीमाशंकराच्या सीमेवर धार्मिक पर्यटकांच्या सोयीसाठी अनेक छोटय़ामोठय़ा सुविधा झाल्या आहेतच.  पण अभयारण्याच्या सीमेबाहेर अलीकडच्या काळात चांगली रिसॉर्ट झाली आहेत.  येथे अ‍ॅक्टिव्हिटीला किती वाव असेल यापेक्षा शांतता, भीमाशंकर अभयारण्यातील पक्षीवैभवाचा आनंद घेता येऊ शकतो.  दोन-तीन दिवसांची छोटी सुट्टी सत्कारणी लागू शकते.  पुणे-नाशिक रस्त्यावर मंचरवरून डावीकडे भीमाशंकरसाठी रस्ता जातो.  घाटरस्त्याने चढून डोंगरमाथ्यावर गेल्यावरच हवेतला बदल जाणवू लागतो.  उन्हाळ्यात संपूर्ण आसमंतात पळसाचे साम्राज्य असते.  अभयारण्यातील गावांना जोडणाऱ्या कच्च्या-पक्क्या रस्त्याने विनाउद्देश भटकंतीचा आनंद येथे घेता येतो.  फक्त भीमाशंकर मंदिर परिसर मात्र अतिशय गर्दीने आणि कचऱ्याने गजबजलेला आहे.  होम स्टेची संकल्पना अजून फारशी विकसित झालेली नाही.  एमटीडीसीचे एक छोटेखानी रिसॉर्ट भीमाशंकर मंदिराजवळ आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने अलीकडे नव्याने चांगलेच विकसित झालेले आणखी एक ठिकाण म्हणजे कोयनानगर. महाराष्ट्रातील पहिले मोठे धरण, कोयनेचा भूकंप, तेथील जलविद्युत प्रकल्प यांमुळे कोयना आपल्या ओळखीचे आहे. पण कोयनानगरमध्ये गेल्या काही वर्षांत किमान पंधराएक तरी मोठी हॉटेल्स, रिसॉर्टस् झाली आहे. विशेष म्हणजे ही सर्व रिसॉर्ट गावापासून दूर आणि जलाशयाच्या बॅकवॉटरजवळील डोंगरपठारावर आहेत. अनेक रिसॉर्टस्मधून थेट जलाशय दिसत राहतो. कोयना पावसाळी पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे.  पण सध्या इतर मोसमातदेखील तेथे बऱ्यापकी गर्दी असते. कोयनेचा जलाशय, त्याभोवतालची घनदाट वनराई आणि सायंकाळच्या शांततेतील गार वारा हे सारे अनुभवता येते.  कोयना परिसरातील रामघळ, जंगली जयगड, जलाशयातील बोटिंग ही पूरक भटकंतीदेखील करता येते. कोकणात चिपळूणकडून किंवा पुणे-बंगळूरमहामार्गावरून कोयनेला पोहोचता येते. महामार्गावरून येताना वाटेतदेखील काही रिसॉर्टस्ची सुविधा आहे.

नुसतेच जाऊन अक्षरश: झोपा काढायच्या असतील तर माळशेज घाटाच्या माथ्यावरील एमटीडीसीचे रिसॉर्ट हा झक्कास पर्याय आहे. मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर या तीनही ठिकाणांहून सहज जाता येण्यासारखे हे ठिकाण. साप्ताहिक सुट्टय़ा सोडल्या तर येथे बुकिंग आरामात मिळते. ऑनलाइन बुकिंग करता येते. सह्य़ाद्रीचे रौद्र रूप अनुभवायचे असेल तर येथील मुक्काम सार्थकी लागतो. मस्त ताजेतवाने होण्यासाठी उत्तम जागा आहे. भंडारदरा हेदेखील गेली काही वष्रे चांगलेच गजबजलेले असते. तुलनेने येथील गर्दी पावसाळ्यात अधिक असते. पण उन्हाळ्यातदेखील इकडे भटकायला काहीच हरकत नाही.

पुणे-मुंबईकरांसाठी आणखी एक पर्याय म्हणजे ताम्हिणी घाट आणि मुळशी परिसर. हा परिसरदेखील पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. पण आजही अनेक ठिकाणी असणारे घनदाट जंगल आणि मुळशीचे बॅकवॉटर यामुळे येणारा गारवा उन्हाळ्यात एक-दोन दिवस येथे भटकण्यास काहीच हरकत नाही. येथे तर हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सची रेलचेलच आहे.  घाटमाथ्यावरचे ठिकाण असल्यामुळे सायंकाळची अमीट शांतता आणि गारवा अगदी भर उन्हाळ्यातदेखील अनुभवता येतो.

उत्तर महाराष्ट्रातील सातपुडा आणि तोरणमाळ ही ठिकाणे टिपिकल पर्यटनस्थळांपेक्षा नक्कीच चांगला पर्याय आहेत. चार-पाच दिवस हाताशी ठेवून त्यांची भटकंतीदेखील करता येऊ शकते.

वर सांगितलेल्या सर्व ठिकाणी किमान सुविधा नक्कीच आहेत. रस्ते बऱ्यापकी उत्तम आहेत, पण लोकप्रिय पर्यटनस्थळांवरील शॉिपग किंवा बोटिंग वगरेसारख्या टिपिकल अ‍ॅक्टिव्हिटी मात्र येथे नाहीत. शक्यतो स्वत:ची गाडी असेल तर प्रवास आणखीनच सुखकारक होऊ शकतो.
सुहास डोंगरवाला – response.lokprabha@expressindia.com