23 November 2017

News Flash

लोकप्रभा दिवाळी २०१७ : ‘तुमचा आराम’ हाच उद्योग

रोजच्या धावपळीतून जिवाला दोन घटका आराम देण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते.

सुहास जोशी | Updated: October 18, 2017 3:42 PM

# ट्रेण्डिंग
एखादं नैसर्गिक किंवा ऐतिहासिक ठिकाण बघायचं म्हणून पर्यटनाला जाण्याबरोबरच आता ट्रेण्ड आहे आराम करण्यासाठी घराबाहेर पडण्याचा. त्यातून एक मोठी इण्डस्ट्री विकसित होत गेली आहे.

रोजच्या धावपळीतून जिवाला दोन घटका आराम देण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. कुणी घरी लोळत पडेल, कुणी नाटक-चित्रपट पाहायला जाईल, तर कुणी मित्रांबरोबर गप्पा मारत बसेल. जाहिरात कंपनीतल मोठय़ा पदावर असणाऱ्या एका गृहस्थांशी बोलताना समजले की, ते आराम करायला एखाद्या रिसॉर्टमध्ये जातात. तिथे जाऊन सकाळी आरामात उठायचं, रिसॉर्टमध्येच असलेल्या हॉटेलात नाश्ता उरकायचा, तिथल्याच स्पामध्ये जायचं, मसाज घेऊन, आंघोळ वगैरे करून परत आडवं व्हायचं. उठल्यानंतर कधी छोटे-मोठे खेळ खेळायचे किंवा पूलमध्ये डुंबायचं, सायंकाळी रिसॉर्टमध्येच आयोजित केलेल्या छानशा स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आणि परत झोपायचं. पाच-पन्नास हजार खर्चून एखाद्या पर्यटनस्थळी असलेल्या या रिसॉर्टमध्ये दोन-चार दिवस हेच करीत राहायचं, हे वाचून जरा अतिशयोक्ती वाटू शकते. मध्यमवर्गीयांच्या साचेबद्ध पर्यटनात रिसॉर्ट हे आता नवीन राहिलेलं नसलं तरी इतके पैसे घालून केवळ रिसॉर्टमध्येच पडून राहायचं आणि त्या परिसरात असलेल्या पर्यटनस्थळी जायचंच नाही हे पचनी पडायला जड जाऊ शकतं. पण असं करणारे बरेच लोक आहेत हीदेखील सत्य आणि सद्य:स्थिती आहे.

यासारखंच मात्र जरा वेगळंच उदाहरण. ते म्हणजे आपल्याच शहरातल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन दोन-चार दिवस राहणं. दोन-चार दिवस मोकळा वेळ काढून फक्त आरामासाठी जायचं आपल्या घरापासून २०-२५ किलोमीटरवरच्या  हॉटेलात जायचं, तेथील सोयीसुविधांचा आनंद घ्यायचा आणि परत आपल्या घरी परत यायचं. हा प्रकार आपल्याला अगदीच चमत्कारिक वाटू शकतो. पण तसं सध्या सुरू आहे.

क्लब महिंद्राचंच उदाहरण घेतलं तर गेल्या दोन-तीन वर्षांत अनेक सभासद हे केवळ रिसॉर्टमध्ये येऊन राहण्यास प्राथमिकता देताना दिसतात. तीन-चार दिवसांची सुट्टी असेल तर  फार तर अर्धा-एक दिवस ते रिसॉर्टच्या बाहेर जातात, उर्वरित सर्व वेळ ते रिसॉर्टमधील सुविधांचा आनंद घेतात. अशा प्रकारे सुट्टी घालवणाऱ्यांची संख्या त्यांच्या एकूण सदस्यांच्या ५० टक्के असल्याचे क्लब महिंद्राचे प्रमुख विक्री अधिकारी गिरिधर सीतारामन् सांगतात.

मग हे असे रिसॉर्टमध्ये थांबणारे पर्यटक काय करतात? भरपूर पैसे मोजून भरलेली एकरकमी सभासद वर्गणी असताना तेथील पर्यटनाचा आनंद बाहेर जाऊन घेण्यापेक्षा त्या वास्तूत का थांबतात? त्यामागे ‘रिलॅक्स अ‍ॅण्ड रिज्युवनेशन’ याकडे लोकांचा वाढता कल दिसून येतो. अशा लोकांना व्यवसायातील वाढत्या ताणतणावापासून मोकळीक हवी असते. ती आज अनेकांची गरज झाली आहे. त्यामुळे असे पर्यटक ही विशिष्ट पद्धत स्वीकारताना दिसतात. त्यातही जे पर्यटक यापूर्वी एखाद्या ठरावीक पर्यटन स्थळाच्या रिसॉर्टला भेट देऊन गेले आहेत, ते पुन्हा येतात तेव्हा त्यांचा अशा प्रकारे केवळ आराम करण्याचा हेतू अधिक असतो. म्हणजेच एक प्रकारे रिसॉर्ट हेच त्यांच्यासाठी पर्यटन स्थळ म्हणावं लागेल. तेव्हा अशा रिसॉर्टमध्ये अगदी कॅरम खेळण्याच्या सुविधेपासून ते स्पा, नवनवीन पदार्थ करायला शिकण्याची सुविधा अशा अनेक गोष्टी पुरवल्या जातात. पर्यटकांना आहे त्याच ठिकाणी गुंतवून ठेवण्याचं काम या सुविधा करतात. इतकंच नाही तर अशा वेळी लहान मुलांसाठी वेगवेगळ्या खेळांची विशेष योजना केली जाते. सकाळी सात ते रात्री दहा-अकरापर्यंत त्या ठिकाणी जे काही करता येईल ते सर्व उपलब्ध करून देण्याकडे या क्लब रिसॉर्टस्चा भर असतो.
(संपूर्ण लेखासाठी प्रत्यक्ष वाचा लोकप्रभा दिवाळी २०१७. सर्वत्र स्टॉल्सवर उपलब्ध)
सुहास जोशी

First Published on October 18, 2017 3:42 pm

Web Title: lokprabha 2017 diwali special issue touring to get rest trend