विश्वाधार देशमुख

महात्मा गांधीजी जे भारतीयत्व अधोरेखित करू पाहत होते, त्या ‘समन्वया’ची पताका आपल्या साहित्यातून सतत फडकवीत ठेवणारी काही मंडळी आजही आहेत. नुकताच ‘सरस्वती सन्मान’ प्राप्त झालेले (गुजराती) लेखक सितांशु यशश्चंद्र हे यामधील महत्त्वाचे नाव आहे.

‘समन्वय हे भारतीय संस्कृतीचे सत्त्व आहे; म्हणून बहुविधतेचा आदर राखत ज्याला टोकदारपणा टाळून सहज होता येते, त्याची वाटचाल भारतीयत्वाकडे होऊ लागते. आक्रमक, अतिरेकी आग्रह ही भारतीयत्वाची ओळख ठरू शकत नाही; तर जुने आणि नवे, परंपरा आणि प्रयोग, धर्म आणि विज्ञान, माझे आणि तुझे यात ज्याला समन्वय साधता येतो, तो खरा भारतीय!’ ही महात्मा गांधी यांनी सांगितलेली भारतीयत्वाची व्याख्या. लुई फिशर या पाश्चात्त्य पत्रकाराने ‘अ विक विथ गांधी’  या पुस्तकात नोंदवलेली. युद्धज्वराने झपाटलेल्या पर्यावरणात देशभक्ती मोजण्याचे नवेनवे मापदंड तयार होत असताना आपण ज्यांची दीडशेवी जयंती साजरी करतोय, त्या राष्ट्रपित्याने केलेली भारतीयत्वाची व्याख्या दिशादर्शक ठरणारी आहे.

खऱ्याखुऱ्या भारतीयत्वासाठी पर्यावरण पराकोटीचे प्रतिकूल होत असताना गांधीजी जे भारतीयत्व अधोरेखित करू पाहत होते, त्या ‘समन्वया’ची पताका आपल्या साहित्यातून सतत फडकवीत ठेवणारी काही मंडळी आजही आहेत. नुकताच ‘सरस्वती सन्मान’ प्राप्त झालेले (गुजराती) लेखक सितांशु यशश्चंद्र हे यामधील महत्त्वाचे नाव आहे.

सितांशु यशश्चंद्र मेहता हे गुजराती साहित्य विश्वातील प्रतिभावंत ज्येष्ठ लेखक. सत्याहत्तर वर्षांचे त्यांचे वय. पण ‘प्रौढत्वी नीज शैशवास जपणे, बाणा कवीचा असे’ ही केशवसुतांनी सांगितलेली ‘सर्जनखूण’ आपल्या भाळी गोंदवून बसलेले. इतकं मोठं नाव की राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं  आहे तसेच विविध स्वरूपात आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही त्यांच्या साहित्यविषयक कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

ज्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय, त्यामध्ये रणजीत राम सुवर्ण चंद्रक, नर्मद सुवर्ण चंद्रक, गुजरात साहित्य परिषद व गुजरात साहित्य अकादमीचे पुरस्कार, राष्ट्रीय साहित्य अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय कबीर सन्मान, गंगाधर मेहर सन्मान, कवी कुसुमाग्रज राष्ट्रीय काव्य पुरस्कार, पद्मश्री सन्मान आणि नुकताच लाभलेला के. के. बिर्ला फाऊंडेशनचा अतिशय प्रतिष्ठेचा ‘सरस्वती सन्मान’. अशा किती तरी पुरस्कारांनी त्यांच्या लेखनकर्तृत्वाला मानाचा कुíनसात केला आहे.

त्यांची निर्मितीही विविधरूपी अन् विविधांगी राहिलेली आहे. ज्यामध्ये नाटक, समीक्षा, भाषांतर, रूपांतर आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कविता अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांत त्यांचा मोकळा वावर राहिला आहे.

‘केम मकानजी क्या चाल्या’, ‘खग्रास’, ‘अश्वत्थामा आजे पण जीवे छे’, ‘आखानी ओळखाणो’, ‘तोखर’, ‘एक सपनुं बडु शैतानी’, ‘नक्कामो माणस छे नरसि मेहता’, ‘आ माणस मद्रासी लागे छे’ अशी नाटय़संपदा. ‘सीमांकन अने सीमोल्लंघन’, ‘रमणीयतानो वाग्विकल्प’, ‘अस्य सर्ग विधाओ’ अशा समीक्षा ग्रंथांतून साहित्य अभ्यासाच्या आधारे त्यांनी सद्धांतिक विवेचन केले आहे.

परंतु बहुआयामी सितांशु यशश्चंद्र यांचा पूर्ण परिचय करून देण्यासाठी ही साहित्य संपदा पुरेशी नाही. कवी, नाटककार, भाषांतरकार, समीक्षक ही तर त्यांची ओळख आहेच; पण याबरोबरच त्यांचा शैक्षणिक क्षेत्रातला वैश्विक वावर हा चतन्यदायी राहिलेला आहे. सौराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू, यूजीसीचे एमिरीट्स प्रोफेसर, भारतीय साहित्यकोशाचे माजी संपादक, फुल्ब्राइट स्कॉलरशिप आणि फोर्ड पश्चिम युरोपीय फेलोशिप मिळवणारे विद्वान, इंडियाना विद्यापीठ, अमेरिका येथून तौलनिक साहित्यात पीएचडी, तर मुंबई विद्यापीठातून भारतीय आणि पाश्चात्त्य काव्यशास्त्रात पीएचडी, बडोदा येथील महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठात प्राध्यापक असताना पॅरिस येथील सोरबन विद्यापीठ, लॉस एंजलिस येथील लोयोलो मेरीमाऊंट विद्यापीठ आणि कोलकता येथील जाधवपूर विद्यापीठात ‘व्हिजिटिंग प्रोफेसर’ असा जगभर विद्वत वावर आणि याबरोबरच आधुनिक भारतीय भाषांचे, त्यामधील साहित्याचे निस्सीम चाहते असा त्यांचा विविधांगी परिचय राहिलेला आहे.

बहुपेडी प्रतिभेचे धनी असलेल्या सितांशु यांची भारतीय पातळीवरील ओळख मात्र ‘कवी’ अशीच राहिलेली आहे. म्हणून तर के. के. बिर्ला फाऊंडेशनचा अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा २०१७ सालचा ‘सरस्वती सन्मान’ त्यांच्या ‘वखार’ या काव्यसंग्रहाला २२ जानेवारी २०१९ रोजी प्रदान करण्यात आला. या संग्रहापूर्वी त्यांचे ‘ओडिस्युसनु हलेसू’ (१९७४) आणि ‘जटायू’ (१९८६) असे दोन कवितासंग्रह काव्यरसिकांच्या पसंतीला उतरले आहेत.

पुरस्कार प्रदान करताना सरस्वती सन्मान निवड समितीने प्रसृत केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ‘वखार हा सितांशु यांच्या आजपर्यंतच्या काव्यप्रवासाचा कळस आहे. जिथे वास्तवाचा परीघ ओलांडून एकीकडे भाषेचे स्वातंत्र्य आणि सर्जनाची स्वायत्तता तर दुसरीकडे मानवी भावना आणि विचार यामध्ये अद्भुत समन्वय साधला जातो.’

खरेतर समन्वय हे काही त्यांच्या केवळ एका कवितासंग्रहाचे वैशिष्टय़ नाही; तर त्यांचा एकूण लेखनप्रवास हा समन्वयाच्या पायांवर उभा राहिलेला आहे. प्राचीन आणि अर्वाचीन, परंपरा आणि आधुनिकता, गद्य आणि पद्य, स्वप्न आणि वास्तव, मिथक आणि सत्य यांचा अनोखा संगम त्यांच्या साहित्यात झाल्याचे पाहायला मिळते. ‘ओडिस्युसनु हलेसु’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९७४ साली प्रकाशित झालेला. त्यात एक कविता आहे, ‘परदादी अने हुं’. ‘परदादी और मं’ असा त्याचा हिंदी अनुवादही त्यांनीच केला आहे. आपल्या अनेक कवितांचे इंग्रजी अनुवादही त्यांनी स्वतच केलेले आहेत. या कवितेत परदादा आणि परदादी कवीच्या स्वप्नात येतात. आपल्या पतवंडाचे बिघडलेले बाह्य़रूप पाहून हैराण होतात. घराण्याला घरघर लागली म्हणून हताशही होतात; पण बाह्य़रूपाच्या आवरणाखाली दडलेले त्याचे ‘मूळ रूप’ दृष्टीस पडता आपल्या ‘वंशाचा वारसा’ अद्यापही अबाधित असल्याची त्यांना खात्री पटते. आणि परदादा-परदादी भेटून गेल्याने घराला अधिकचे घरपण आल्याचे कवीच्या लक्षात येते.

हा केवळ पूर्वज आणि वंशज यांच्यातला संवाद नाही. तर इतिहास आणि वर्तमान, परंपरा आणि आधुनिकता यांच्यातलाही संवाद आहे. इतिहास असो की परंपरा त्यांनी आपली जुनी झापडे बाजूला सारून नव्याकडे पाहिले पाहिजे पण त्याचवेळी वर्तमानानेही आधुनिकतेचे गौरवगान करताना आपण जिच्या खांद्यावर उभे आहोत त्या परंपरेबद्दल कृतज्ञ राहिले पाहिजे, असा समन्वयाचा संदेश या कवितेत आहे.

काहीसा असाच संदेश त्यांच्या ‘नक्कामो माणस छे नरसी मेहता’ (निकम्मा आदमी है नरसी मेहता) या नाटकातही आहे. पृथ्वी थिएटरच्या नाटय़ महोत्सवासाठी २००७ मध्ये लिहिलेले हे नाटक.

पंधराव्या शतकातील थोर संतकवी नरसी मेहता यांनी समकाळाशी केलेला आत्मसंवाद या रूपातील हे नाटक. गद्य आणि पद्य यांची अजोड सांगड घालून लिहिलेलं. ज्यामध्ये नरसींची पदे कोणती आणि सितांशु यांची पदे कोणती यातला फरकच लक्षात येऊ नये इतके ते एकरूप झाले आहेत. श्रद्धा आणि अश्रद्धा, आस्तिक्य आणि नास्तिक्य, सहिष्णुता आणि असहिष्णुता यांच्यातील हा संवाद एकीकडे आपल्याला बौद्धिक आनंद देतो तर दुसरीकडे आपल्या चित्ताला प्रसन्न बनवतो.

कोणताही एक काळ, एक भाषा, एक सभ्यता, एक संस्कृती यांच्या चौकटीत कैद होणे सितांशु यांना कबूल नाही. ‘तौलनिक साहित्य’ हा त्यांच्या चिंतनाचा विषय राहिलेला आहे. यातून त्यांनी जसा गुजराती आणि संस्कृत भाषा-साहित्याचा तौलनिक अभ्यास केला आहे तसेच इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषांतील साहित्याकडेही तौलनिक दृष्टीने पाहिले आहे. इंग्रजी, फ्रेंच भाषेतील साहित्याची त्यांनी केलेली भाषांतरे, रूपांतरे आणि माध्यमांतरे ही सगळी त्यांच्या ‘तौलनिक दृष्टीची’ निदर्शक आहे. थॉमस हार्डीच्या ‘डे आफ्टर द फेअर’ या कथेचे ‘वैशाखी कोयल’ या नाटकात त्यांनी केलेले माध्यमांतर असो वा फ्लोबेरच्या ‘मादाम बोव्हरी’वरून त्यांनी लिहिलेली ‘माया मेमसाब’ या १९९३ मधील हिंदी चित्रपटाची पटकथा असो या सगळ्यांतून ठळकपणे जाणवणारी गोष्ट म्हणजे ‘भाषा आणि संस्कृती यांच्यातील देवाणघेवाणीवर’ त्यांचा दृढविश्वास आहे. त्यांनी एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले आहे, ‘वोल्गा ते गंगा’ लिहिणाऱ्या राहुल सांस्कृत्यायन यांच्यासारख्या सांस्कृतिक भाष्यकारांच्या आदर्शाचे आपल्याला झालेले विस्मरण हे आपल्या अस्मितांच्या वाढत्या अरेरावीमागील मुख्य कारण आहे.’

भारतासारख्या प्राचीन देशाची खरी समृद्धी त्याच्या ‘भाषिक आणि सांकृतिक वैभवात’ आहे. पण हे नीटपणे लक्षात घेतले जात नाही. विशिष्ट वेशभूषा, खानपान, राहणीमान यावरून माणसांवर ‘विशिष्ट प्रदेशाचे शिक्के’ मारायची सवय आपण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लावून घेतली आहे. आज जशा भाषिक प्रदेशाच्या तटबंदी आपण उभ्या केल्या आहेत, त्या पूर्वी नव्हत्या. पण दिवसेंदिवस आपला ‘प्रदेश’ हाच जणू आपल्याला ‘स्वायत्त देश’ वाटू लागला आहे. याचा अतिशय कडवट उपहास सितांशु यांनी ‘आ माणस मद्रासी लागे छे’ या नाटकातून केला आहे. ‘नव्याने राहायला आलेल्या मूळच्या गुजराती असणाऱ्या माणसाला गल्लीतले लोक त्याच्या वेगळेपणामुळे ‘मद्रासी’ समजतात. आणि मग ‘परप्रांतीय’ मानून त्याला हळूहळू कसे बहिष्कृत करत जातात याचा वेध या नाटकात आहे. साधारणत पन्नास वर्षांपूर्वी आलेले हे नाटक, त्याचा विषय आणि त्यातली भाषा या दोन्ही बाबतीत ‘बोल्ड’ होते. अकादमिक वर्तुळाने यातील काही प्रसंग आणि संवाद अश्लील ठरवून या नाटकावर टीकेची झोड उठवली होती; पण स्वभावत ‘सौम्य पण धाडसी’ असणाऱ्या सितांशुंनी आपल्यावर होणाऱ्या कोणत्याही टीकेला ना कधी मनावर घेतले, की रोखठोक भाषेत त्याचा समाचार घेण्याचा कोरडा उपचार करत बसले. ‘साधू चलता भला; पाणी बहता चला’ या न्यायाने ते आपले लेखन करत राहिले.

गुजराती लेखक असणारे नरसी मेहता आणि महात्मा गांधी यांच्यात जशी बंडखोरी होती तशीच बंडखोरी सितांशु यांच्याही स्वभावात आहे. या सगळ्यांच्या लेखनात परंपरेबद्दल एक ‘प्रियता’ आहे हे खरेच; पण त्यासोबत ‘रूढी’ म्हणून, कर्मकांड बनून जे ‘साचलेपण’ जमा झाले आहे, त्याचा नुसता निषेध नाही तर थेट धिक्कारही आहे. नाटय़अभ्यासक नौसिल मेहता यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘आपल्या अटींवर श्रीकृष्णाची भक्ती करणारे, तत्कालीन जातव्यवस्थेला जाब विचारणारे नरसी मेहता आणि आपल्या शर्तीवर परंपरांचे पुनर्वाचन करणारे सितांशु, या दोघांतील महत्त्वाचे साम्य म्हणजे दोघेही गुजराती साहित्याचे ‘ब्रँड अम्बॅसिडर’ आहेत, एक मध्ययुगातील तर दुसरे आधुनिक काळातील.’

मराठी भाषिक म्हणून आपणाला निदान कन्नड, तेलुगू, तमीळ भाषेतील साहित्याचा थोडा तरी परिचय आहे. तसे गुजराती साहित्याबद्दल, तेथील साहित्यपरंपरेबद्दल आपणाला घोर अज्ञान आहे. खरे तर १९६० मध्ये महाराष्ट्रासोबतच गुजरात राज्य अस्तित्वात आले. त्या अगोदर मुंबई या द्वैभाषिक राज्यातच गुजरातचा समावेश होता. मुद्रित स्वरूपातील पहिले गुजराती लेखन १७९७ मध्ये ‘बॉम्बे कुरियर प्रेस’मध्ये प्रकाशित झाले. योगायोगाची गोष्ट म्हणजे त्यानंतर १८०८ मध्ये प्रकाशित झालेल्या रॉबर्ट ड्रमंड यांच्या ‘इलुस्ट्रेशन्स ऑफ द ग्रॅमॅटिकल पार्ट्स  ऑफ गुजराती, मराठा अँड इंग्लिश लँग्वेजेस’ या पुस्तकात गुजराती, मराठी आणि इंग्रजी भाषांच्या व्याकरणिक व्यवस्थांचा विचार आहे.

पण ‘मुंबई कुणाची’ या वादाचा एक दुष्परिणाम असा झाला की आपल्या मनात गुजरात आणि गुजराती याबद्दल एक नकाराची छटा तयार झाली. खरेतर जसा नरसी मेहतांच्या पदांचा मराठी कवितेवर प्रभाव आहे, तसेच महात्मा गांधी यांच्या (गुजराती) लेखनानेही मराठी मानस प्रभावित झालेले आहे. याशिवाय पारसी (गुजराती) नाटक कंपन्यांचे मराठी नाटकाला महत्त्वाचे योगदान आहे. मात्र वर उल्लेख केलेल्या नकार दृष्टीमुळे हे सारे दुर्लक्षित झाले. परिणामी मागील काही वर्षांत भरप्पा, कर्नाड यांचे लेखन जसे मराठीत भाषांतरित होऊन आले तसे उमाशंकर जोशी, सुरेश जोशी, चिनू मोदी, मधू राय किंवा सितांशु यांच्या लेखनाबद्दल होऊ शकलेले नाही. सितांशु यांच्या बहुतांशी नाटकांचे सर्वाधिक प्रयोग हे तर मुंबईमध्ये झालेले आहेत. असे असतानाही त्यांचा जटायू हा कवितासंग्रह वगळता अन्य फार काही मराठीत आलेले नाही. सितांशु ज्या भाषिक आणि सांस्कृतिक समन्वयाबद्दल सातत्याने बोलत असतात, त्यांच्या साहित्याच्या स्वागताचे सौजन्य आपण अद्यापही दाखवलेले नाही. आजूबाजूला काय घडतंय, काय लिहिलं जातंय याकडे कसलेही लक्ष न देता आपण आपल्यातच मग्न राहून तृप्तीची ढेकर देण्याची जी खोड मराठी माणसाला लागली आहे, त्यामुळे आपल्यातला स्वागताचा अन् त्यातून आकारणाऱ्या समन्वयाचा सांधा निखळून पडला आहे.

भले सितांशु यांचा जन्म भूजमधला असेल, त्यांचे वास्तव्य बडोद्यात असेल, त्यांचे लेखन गुजराती भाषेत असेल; पण म्हणून ‘आ माणस गुजराती लागे छे’ असा शिक्का मारून त्यांची संभावना ‘गुजराती लेखक’ (प्रादेशिक लेखक किंवा भाषा कवी) अशी करता येणारी नाही. उलट ‘परंपरा आणि प्रयोग’ यांच्या संगमातून त्यांनी जो ‘अतिवास्तववाद’ (Surrealism) साकारला आहे, तो भारतीय पातळीवर अजोड असा आहे. विशेषत त्यांच्या कवितेतील प्रतिमा, प्रतीके, संकेत, श्रद्धा, चिन्हे यातून जे ‘भारतीय लोकमानस’ व्यक्त होते, त्यावरून त्यांचे ‘भारतीय लेखक’ असणे ठळकपणे अधोरेखित होत जाणारे आहे.

गुजराती-मराठी साहित्याच्या अभ्यासक सुषमा करोगल यांनी त्यांच्या कवितेची काही ठळक वैशिष्टय़े सांगितली आहेत. जसे की त्यांनी गुंतागुंतीच्या जटिल अनुभवांची मांडणी अगदी विलक्षणरीत्या केली आहे. दृश्यरूपातील कडव्यात व ओळीत असलेली असमानता हे त्यांच्या कवितेच्या मांडणीचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. आधुनिक जगण्यातील हरवलेले माणूसपण, परकेपण, परात्मता, खंडितता, कोसळलेले सांस्कृतिक आधार संचित आणि हे सारे आविष्कृत करताना निर्माण झालेली आगळीवेगळी प्रतिमासृष्टी यामधून सितांशुंच्या संवेदनावकाशाची जटिलता व गहिरेपणा व्यक्त होत जातो.

‘वैष्णव जन तो तेने रे कहिए; पीड पराई जाने रे’ अशी वैष्णवाची ओळख सांगणारे नरसी मेहता, हे भजन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवून जनमानसाला अिहसा आणि सहिष्णुतेचे मोल सांगणारे गांधीजी आणि ‘वेदना तू अंध ना कर; वेदना तू नेत्र दे’ म्हणत वैश्विक करुणेचे पसायदान मागणारे सितांशु हे तिघेही केवळ गुजरातचे प्रतिनिधी कसे मानता येतील? उलट जी ‘गंगा-जमनी तेहजिब’ ‘भारत’ नावाच्या देशाची मूळ ओळख आहे, त्या भारतीयत्वाचे हे खरेखुरे ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’ आहेत!