17 February 2020

News Flash

गणेश विशेष : मूर्तिमंत गणेश

गणपतीच्या मूर्तीचा आकार ती घडवणाऱ्या कलाकारांना कायमच आकर्षित करत आला आहे.

गणपतीच्या मूर्तीचा आकार ती घडवणाऱ्या कलाकारांना कायमच आकर्षित करत आला आहे. देशभरातल्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये असलेल्या प्राचीन गणेश मूर्तीमधलं वैविध्य पाहिलं की याचीच प्रचीती येते.

निर्वघ्निं कुरुमे देव, सर्व काय्रेषु सर्वदा अशी प्रत्येक कार्याची सुरुवात गणेशाच्या आराधनेने केली जाते. ‘आम्ही हाती घेतलेल्या या कार्यात कोणत्याही प्रकारचे विघ्न येणार नाही याची काळजी तू घे रे बाप्पा’ असे सांगून कुठल्याही कार्याचा शुभारंभ केला जातो. सुखकर्ता असलेला गणपती हा देव. खरेतर याचा प्रवास हा विघ्नकर्ता म्हणून सुरू झाला आणि पुढे तो विघ्नहर्ता झाला. हा प्रवास रंजक असला तरी तो एक स्वतंत्र विषय होतो. िहदू धर्मात शिव, वैष्णव, शक्ती या देवतांनंतर बऱ्याच काळाने गणपती ही देवता अस्तित्वात आली, तरीसुद्धा लोकप्रियतेमध्ये इतर सर्व देवतांपेक्षा कितीतरी पुढे या देवतेची लोकप्रियता बघायला मिळते. मंदिरांच्या आणि घरांच्या दरवाजावर असलेल्या कोनाडय़ात प्रस्थापित होण्याचा मान या देवतेला मिळाला. अग्रपूजेचा मान प्राप्त झालेला गणेश हा आपल्या वैशिष्टय़पूर्ण रूपामुळे नुसता आकर्षकच झाला असे नाही तर तो तितकाच सर्वाच्या आवडीचा जणू सखासोबती असलेला देव झाला. त्याच्या रूपाची मोहिनी जशी सर्वसामान्य लोकांना पडली तशीच ती कलाकारांनादेखील पडली. कलाकार मग तो चित्रकार असो अथवा मूíतकार, गणेशाच्या विविध रूपांचे सादरीकरण या कलाकारांनी आपल्या कलेद्वारे केलेले पाहायला मिळते.

भारतात विविध प्रांतात निरनिराळ्या राजवटी राज्य करत होत्या. प्रत्येक राजवटीच्या काळातली कलेची एक विशिष्टय़ शैली विकसित झालेली दिसते. प्रत्येक शैलीमध्ये गणपतीची मूर्तीरूपे आपल्याला बघायला मिळतात. ‘यथा देहे तथा देवे’ या न्यायाने, माणसांनी आपल्या सगळ्या भाव-भावना देवाशी निगडित करून तशा मूर्ती घडवलेल्या पाहायला मिळतात. याच न्यायाने गणेशाच्यासुद्धा सुंदर मूर्ती तयार केल्या गेल्या. मग तो बसलेला, उभा, नृत्य करताना, ते अगदी झोपलेला इथपर्यंत गणेशाच्या मूर्तीची विविधता बघायला मिळते.

गणपतीच्या विविध मूर्ती, त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आलेली देवालये आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या अनेक ऐतिहासिक कथा, दंतकथा या सगळ्यासह आपल्यासमोर उभा राहतो मूíतमंत गणेश! त्याच्या मूर्तीचा विचार करताना अनेक ठिकाणी तिथल्या देवळांचा अथवा त्याच्याशी निगडित कथांचा सुद्धा विचार करावाच लागतो. ते विशेष स्थान, त्या सुंदर कथा यामुळे गणेशाच्या रूपाला अजूनच सौंदर्य प्राप्त झाल्याचे दिसून येते.

हम्पीचे सुंदर गणपती

ससिवेकलु गणेश

हेमकूट टेकडीच्या दक्षिण पायथ्याला वसला आहे हा सुंदर असा महागणपती. हम्पीच्या इतर स्थापत्या प्रमाणेच हा गणपतीसुद्धा हम्पीच्या सौंदर्यात भरच घालतो आहे. आपल्याकडे एखादे दैवत, एखादे मंदिर आले की त्यासोबत अतिशय सुंदर अशी एखादी तरी दंतकथा येतेच येते. या गणपतीचीही एक अशीच कथा इथे सांगतात. एकदा भरपूर भोजन झाल्यामुळे गणपतीचे पोट एवढे फुगले की ते अगदी फुटायच्या अवस्थेला पोचले. अशा वेळी गणपतीने एक सर्प पकडला आणि आपल्या फुगणाऱ्या पोटाभोवती आवळून बांधला आणि त्याचे पोट वाढायचे थांबले. या नावाचीसुद्धा अशीच एक गंमत आहे. गणपतीचे पोट मोहरीच्या दाण्याच्या आकाराचे झाले. स्थानिक भाषेत मोहरीला ससिवेकलु असे म्हणतात, त्यामुळे हा गणपती झाला ससिवेकलु गणेश!

एकसलग पाषाणातून कोरून काढलेली ही गणेशाची मूर्ती आठ फूट उंचीची आहे. बसलेल्या स्थितीत असलेल्या या देखण्या मूर्तीला चार हात असून खालच्या उजव्या हातात सुळा आहे, तर वरच्या उजव्या हातात अंकुश, वरच्या डाव्या हातात पाश आणि खालच्या डाव्या हातात प्रसादपात्र आहे. पोटावर नागबंध दिसतो. मूर्तीभोवती सुंदर असा उघडा सभामंडप बांधलेला आहे. इथे मिळालेल्या शिलालेखानुसार सन १५०६ मधे चंद्रगिरीच्या (सध्या आंध्र प्रदेशात) कोणा व्यापाऱ्याने राजा नरसिंह दुसरा याच्या स्मरणार्थ हा सभामंडप बांधला.

समृद्ध अशा विजयनगर साम्राज्याचे राजधानीचे शहर हम्पी. आज जरी बरेचसे शहर उद्ध्वस्त झालेले असले तरीसुद्धा विरुपाक्ष, विठ्ठल, कृष्ण ही मंदिरे आणि सर्वत्र विखुरलेले अवशेष आजही या नगरीत पाहायला मिळतात. शशिवेकालु आणि कडवेकालु असे दोन गणपती हम्पीमध्ये जवळजवळ स्थापित केलेले दिसतात. पकी शशिवेकालु गणपती हेमकूट पर्वताच्या दक्षिण पायथ्याला वसला आहे. एकाच दगडातून कोरून काढलेली जवळजवळ आठ फूट उंचीची ही गणेश मूर्ती पाहण्याजोगी आहे.

कडवेकालु गणेश

शशिवेकालु गणेश मंदिराच्या जवळच उत्तर दिशेला कडवेकालु गणेश मंदिर आहे. बहुधा दक्षिण भारतातील ही सर्वात भव्य अशी गणपतीची मूर्ती असावी. ही मूर्ती १५ फूट उंच आहे. या मूर्तीच्या नावाची पण अशीच गंमत आहे. गणपतीची ही मूर्ती एकाच मोठय़ा दगडातून कोरून काढलेली आहे. या गणपतीचे पोट अशा रीतीने घडवलेय की ते हरभऱ्याच्या डाळीच्या दाण्यासारखे दिसते. स्थानिक भाषेत हरभऱ्याच्या डाळीला कडवेकालु म्हणतात, आणि म्हणून हा गणपती झाला कडवेकालु गणेश !

या गणपतीचे मंदिर फारच देखणे आहे. गणपतीच्या मूर्तीच्या बाजूने गर्भगृह बांधून काढले आहे. त्यासमोरील सभामंडप अत्यंत देखणा आहे. सभामंडप आणि त्यावर असलेल्या खांबांवर विविध काल्पनिक प्राण्यांची चित्रे कोरलेली दिसतात. चौकोनी खांब आणि त्यावर असलेली वैशिष्टय़पूर्ण शिल्पकला ही अगदी विजयनगर कलेची खासियत म्हणायला हवी. विविध शिल्पांनी समृद्ध असा हा सभामंडप आणि हा गणपती हम्पी भेटीत न चुकता पाहावा असा आहे.

गणेशटोक – सिक्कीम

कांचनगंगा डोंगररांगेत वसलेले नितांतसुंदर राज्य म्हणजे सिक्कीम. खरं तर इथे बौद्ध धर्माचे प्राबल्य असूनही गणपतीचे एक सुंदर स्थान पाहायला मिळते. सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून फक्त सहा कि.मी. अंतरावर नथुला िखडीच्या रस्त्यावर समुद्रसपाटीपासून सहा हजार १०० फूट उंचीवर हा गणपती वसला आहे. गर्भगृहात गणेशाची प्रसन्न मूर्ती विराजमान झालेली आहे. इथून दिसणारा नजारा मात्र अफलातून आहे. गंगटोक शहर, राजभवन, आणि कांचनगंगा शिखराचा अप्रतिम देखावा इथून दिसतो. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पवित्र मानल्या गेलेल्या रंगीबेरंगी पताका लावलेल्या असतात. सिक्कीम भेटीत हे स्थळ न चुकता पहावे असेच आहे.

भोरगिरीचा गणपती

भोरगिरी-भीमाशंकर या पदभ्रमण मार्गावरचे सुरुवातीचे गाव आहे हे भोरगिरी. राजगुरूनगरवरून वाडा, टोकावडेमाग्रे जाणारा रस्ता भोरगिरी गावाशी संपतो. अगदी छोटं टुमदार गाव आहे हे. पुण्यापासून जेमतेम ८० किमी अंतरावर हे गाव आहे. गावामागे भोरगिरीचा किल्ला उभा आहे. किल्ल्याच्या पोटात गुहा खोदलेल्या आहेत. इथे भीमेच्या काठावर कोटेश्वर मंदिर आहे. कोटेश्वर मंदिरात शिविपडी तर आहेच पण गाभाऱ्याच्या बाहेर एक गणपतीचे वैशिष्टय़पूर्ण शिल्प आहे. जेमतेम दीड फूट उंची असलेल्या गणेशाची वेशभूषा आकर्षक आहे. मुली ज्या प्रकारे स्कर्ट घालतात तशीच त्याच्या वस्त्राची रचना दिसते. ही वेशभूषा पाश्चात्य वाटते. तुंदिल तनु असलेला हा गणेश उभा आहे. तो चतुर्भुज असून त्याच्या वरच्या उजव्या हातामध्ये परशू दिसतो. तर वरच्या डाव्या हातामध्ये बहुधा एखादे फळ असावे, कारण गणपतीची सोंड त्या फळावर टेकलेली आहे. छोटेखानी असलेली ही गणेशमूर्ती त्याच्या वस्त्रामुळे निश्चितच वेगळी झालेली आहे.

उच्ची पिल्लायार गणपती –  तिरुचिरापल्ली

आपल्याकडे देव आणि त्यांच्यासंबंधीच्या दंतकथा विपुल प्रमाणात सापडतात. त्या अतिशय आकर्षकसुद्धा असतात. या गणपतीच्या बाबतीत असेच आहे. लंकाविजयानंतर रामचंद्रांनी बिभीषणाला एक विष्णुमूर्ती भेट दिली. बिभीषण हा असुर असल्यामुळे त्याने ती मूर्ती लंकेला नेऊ नये असे देवांना वाटले. देवांनी विनायकाला विनंती केली की त्याने बिभीषणाला रोखावे. विनायक गुराख्याच्या वेषात भेटायला गेला. बिभीषण स्नानाला गेला असताना ती विष्णुमूर्ती विनायकाने सांभाळायचे ठरले. ती मूर्ती जर जमिनीला टेकली तर ती तिथेच राहील अशी अट असल्यामुळे विनायकाने ती मूर्ती मुद्दाम जमिनीवर टेकवली आणि तो जवळच्या डोंगरावर पळून गेला. बिभीषणाला हे समजल्यावर तो त्या गुराख्याच्या मागे धावला आणि त्याने त्याच्या डोक्यावर प्रहार केला. त्यानंतर देवाने आपले खरे रूप प्रकट केले आणि बिभीषणाने त्याची क्षमा मागितली. जमिनीवर टेकवलेली विष्णूमूर्ती कावेरी नदीच्या तीरावर श्रीरंगम इथे प्रस्थापित झाली, आणि डोंगरावर गेलेल्या विनायकाचे मंदिर तिथेच बांधले गेले. या मूर्तीच्या कपाळावर आजही एक टेंगूळ पाहायला मिळते. पल्लव राजांनी हे मंदिर बांधायला घेतले, पण नंतर विजयनगर साम्राज्याच्या, मदुराईच्या नायकांनी ते पूर्ण केले. तिरुचिरापल्ली इथे टेकडीवर असलेल्या प्रसिद्ध रॉकफोर्टमध्ये हे मंदिर आहे.

निद्रिस्त गणेश – आव्हाणे

निद्रिस्त हनुमानाची मंदिरे आपल्याला खुलताबाद, लोणार इथे पाहायला मिळतात. पण निद्रिस्त गणेशाचे मंदिर हे एकमेवाद्वितीयच असेल. नगर जिल्ह्य़ातील तीसगावपासून अंदाजे १५ कि.मी. अंतरावर आहे आव्हाणे हे गाव. गावात पूर्वी कोणी दादोबा देव नावाचे गणेशभक्त राहात होते. ते दरवर्षी मोरगावची वारी करायचे. वयोमानाप्रमाणे त्यांना वारी करणे झेपेना. तेव्हा त्यांना मोरया गोसावींचा दृष्टांत झाला की आता त्यांनी वारी करू नये. तरीसुद्धा निस्सीम गणेशभक्त दादोबांनी आपला हट्ट सोडला नाही आणि ते वारीला निघाले. वाटेत असलेल्या ओढय़ाला मोठा पूर आला होता. मोरयाचे नाव घेऊन दादोबा त्या ओढय़ात उतरले खरे, पण पाण्याच्या त्या प्रचंड प्रवाहाबरोबर लांब वाहात गेले. वाटेत असलेल्या एका बेटावर ते थांबले असता तेव्हा त्यांना गणपतीचा दृष्टांत झाला की मीच तुझ्या गावी येतो. कालांतराने दादोबा देवांचे निधन झाले. त्यानंतर आव्हाणे गावात एक शेतकरी शेत नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ कुठल्याशा वस्तूला लागून अडला. पाहतात तो काय एक स्वयंभू गणेशांची मूर्ती जमिनीत होती. दादोबा देवांच्या मुलाला, गणोबा देव याला दृष्टांत झाला की ती मूर्ती आहे तशीच असू देत, त्याच अवस्थेत तिची पूजा कर. ती मूर्ती म्हणजेच हा निद्रिस्त गणेश होय. मूर्तीच्या छातीवर नांगराच्या फाळाची खूण अजूनही दिसते. प्रशस्त बांधलेल्या मंदिरातील गाभाऱ्यात जमिनीखाली दोन फुटांवर स्वयंभू गणेशमूर्ती आहे. ही मूर्ती निद्रिस्त गणेशाची असल्यामुळे जमिनीखाली आडवी ठेवलेली आहे. त्यावर काचेचा दरवाजा केलेला दिसतो. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी हे मंदिर बांधून दिले. तसेच दादोबा देवांच्या वंशजांना वतन म्हणून जमिनी दिल्या. त्यामुळे त्यांची नावे जहागीरदार भालेराव अशी पडली. निद्रिस्त गणेशाचे हे आगळेवेगळे आणि महाराष्ट्रातील बहुधा एकमेव मंदिर मुद्दाम जाऊन पाहण्याजोगे आहे.

नृत्यगणेश

शिवाप्रमाणेच गणपतीसुद्धा विविध कलांचा अधिपती असल्याचे मानले गेले आहे. मध्ययुगीन काळात गणपतीच्या नृत्य प्रतिमा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. इथे गणपतीला सहा, आठ किंवा दहा हात दाखवलेले असतात. अनेकदा गणपतीने आपले दोन हात डोक्यावर नेऊन त्यात एका मोठय़ा सापाला आडवे धरलेले दाखवलेले असते. नृत्यगणेशाची नितांतसुंदर मूर्ती एकतर आपल्याला खजुराहोला दिसते आणि तशीच म्हणजे अगदी तशाच धाटणीची मूर्ती गडचिरोली जिल्ह्य़ातल्या मार्कण्डी इथल्या देवालयावर बघायला मिळते. मार्कण्डीची मूर्ती अतीव सुंदर अशा श्रेणीत मोडणारी आहे. मार्कण्डी इथला गणपती आठ हातांचा असून दोन हात नृत्य मुद्रेत आहेत. तर उर्वरित हातात दंत, परशु, तसंच मातुलुंग हे सुफलनाचे प्रतीक असलेले फळ, तर डोक्यावरील दोन हातांत सर्प धरलेला आहे. गळ्यात नागाचे यज्ञोपवीत, तर कमरेला आणि मुकुटावर विविध आभूषणे असे हे सर्वागसुंदर गणेशाचे रूप निव्वळ देखणे आहे. नृत्य करताना शरीराला येणारा बाक ठसठशीतपणे दाखवला आहे. उजवा पाय किंचित उचललेला असल्यामुळे गणेश नृत्यात अगदी रममाण झाल्याचे दिसते. इतकी सुंदर मूर्ती बहुधा दुर्मीळच म्हणायला हवी. खजुराहो इथल्या नृत्यगणेशाच्या मूर्तीला दहा हात असून ती मूर्तीही खूपच सुंदर आहे. मात्र त्याचे काही हात भग्न झालेले आहेत. इथेही गणेशाच्या वरच्या दोन हातांत सर्प धरलेला स्पष्ट दिसतो. गणेशाच्या पायाशी विविध वादक गणेशाला साथ करताना स्पष्टपणे दाखवलेले आहेत.

अशीच एक देखणी नृत्य गणेशाची मूर्ती दक्षिणेकडे असलेल्या हळेबीडू इथल्या होयसळेश्वर मंदिरावर बघायला मिळते. इथे नृत्य करणाऱ्या गणेशाच्या डोक्यावर नव्हे तर त्याच्या डाव्या हातात तीन फणांचा नाग धरलेला दिसतो. पायाशी वादक तर आहेतच. गणेशाची मुद्रा काहीशी निराळी आहे. आणि खास होयसळ शिल्पशैलीची सगळी वैशिष्टय़े इथे बघायला मिळतात. गणेशाची मूर्ती भरपूर आभूषणांनी मढवलेली दिसते. कुठलीही मूर्ती ही आभूषणांनी नखशिखांत मढवायची ही होयसळांची खास शैली. हा गणपतीसुद्धा असाच नखशिखांत आभूषणांनी नटवलेला आहे. गणेशाचा मुकुट आणि कमरेची वस्त्रे तर अगदी बघत राहावीत अशीच आहेत. मुकुटावर असलेली झालर ही दगडात कोरून केलेली आहे यावर विश्वासच बसत नाही. सोनार जसे सोन्यामध्ये मोठय़ा नजाकतीने दागिने घडवतो तसेच या ठिकाणी कलाकारांनी दगडात हे दागिने घडवलेले आहेत.

त्रिमुखी लाकडी गणेश – बुरोंडी

बुरोंडी या दापोलीपासून फक्त १२ कि.मी. वर असलेल्या गावातली ही गणेशाची मूर्ती आहे. या गावात कोळी आणि खारबी समाजाचे लोक राहतात. अर्थातच मासेमारी हाच या लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. या मूर्तीबाबत अशी आख्यायिका आहे की या गावातले नंदकुमार आणि दुर्वास साखरकर हे दोघे त्यांच्या एकवीरा नावाच्या होडीतून मासेमारी करण्यासाठी हण्रच्या जवळ खोल समुद्रात गेले असताना त्यांच्या होडीपाशी काही एक लाकडी वस्तू तरंगताना त्यांना आढळली. उत्सुकतेने त्यांनी ती काय आहे म्हणून बघितले तर एक लाकडाची गणेशाची मूर्ती होती ती. कोणीतरी ती विसर्जति केली असावी असे समजून या दोघांनी तिची पूजा केली आणि परत समुद्रात सोडून दिली. काही वेळाने अजून आत समुद्रात गेल्यावर त्यांना तीच मूर्ती परत बोटीजवळ आलेली दिसली. त्यांनी परत ती सोडून दिली. बरेच अंतर समुद्रात गेल्यावर त्यांना पुन्हा ती मूर्ती त्यांच्या होडीच्या जवळ आलेली दिसली. आता मात्र ते चक्रावून गेले. गजाननाला आपल्याकडे यायचे असावे असे समजून त्यांनी ती मूर्ती परत किनाऱ्यावर आणली. सगळा प्रसंग गावातल्या मंडळींना सांगितला. सगळ्या ग्रामस्थांनी एकमताने असे ठरवले की या गणेशमूर्तीला आता आपल्या गावामध्येच स्थापित करायचे. गावात तर मूर्ती ठेवण्याजोगे मंदिर नव्हते, मग शेवटी या मंडळींनी गावातल्याच श्री सावरदेवाच्या मंदिरात एका भागात माघी गणेश जयंतीच्या दिवशी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. चार फूट उंचीची शिसवी लाकडाची ही मूर्ती तीन तोंडाची आहे. मूर्तीला सहा हात असून पाश, दंत अशी आयुधे तिच्या हातात आहेत. तुंदिलतनु आणि विविध अलंकारांनी मढवलेली ही गणेश मूर्ती अतिशय देखणी आहे. मूर्तीच्या अलंकारांची कलाकुसर अतिशय अप्रतिम आहे. गणेशाच्या पायाशी त्याचे वाहन मूषक आणि बाजूला बीजपूरक दिसते. बीजपूरक हे फळ लाडवासारखे दिसते. सुफलता आणि नवनिर्मिती याचे ते प्रतीक आहे. ते कायम गणपतीजवळ दाखवलेले असते. दापोली दाभोळ या परिसरात असलेली तीन तोंडाची लाकडाची सुंदर गणेशमूर्ती मुद्दाम बघण्याजोगी आहे. आणि ती बघताना त्याच्या मागे असलेली ही सुंदर कथा माहिती असेल तर ती मूर्ती बघण्यातली मौज नक्कीच वाढते.

पुण्यातसुद्धा त्रिशुंड गणपती प्रसिद्ध आहे. इथे सुद्धा गणपतीला तीन सोंडा असून देव मोरावर बसलेला आहे. मूळचे मंदिर हे शंकराचे होते. तशा आशयाचे शिलालेख मंदिरात बघायला मिळतात. पण कालांतराने तिथे तीन सोंड असलेला गणपती वास्तव्याला आला. गिरीगोसावी समाजाच्या मंडळींनी हे मंदिर बांधले. या मंदिराला एक तळघर असून ते म्हणजे हठयोगी साधकांची साधनेची जागा असल्याचे सांगितले जाते.

स्त्री रूपातील गणेश-भुलेश्वर

पुणे-सोलापूर रस्त्यावर असलेल्या यवतपासून अंदाजे आठ किलोमीटर अंतरावर आहे सह्य़ाद्रीची भुलेश्वर रांग. शिवकाळात इथे मुरार जगदेवांच्या काळात दौलतमंगळ नावाचा एक किल्ला उभारला होता. भुलेश्वर मंदिराच्या दक्षिणेला असलेल्या मंगळाई देवीच्या ठाण्यामुळे त्याला म्हणू लागले दौलतमंगळ. या किल्ल्याचे फारसे अवशेष आता शिल्लक नाहीत पण इथे असलेलं अप्रतिम शिवमंदिर मात्र आवर्जून जाऊन पाहण्याजोगे आहे. इथंपर्यंत येण्यासाठी उत्तम डांबरी रस्ता बांधलेला आहे. यादव काळात बांधले गेलेले हे मंदिर पूर्वाभिमुख असून शिल्पसमृद्ध आहे. वादक, नर्तकी, हत्ती, घोडे, सुरसुन्दरी या शिल्पांसोबतच अनेक देवदेवतांच्या शिल्पांचेसुद्धा या मंदिरावर अंकन केलेले आढळते. या सर्व शिल्पाकृतींमध्ये स्त्री रूपातील गणपतीची प्रतिमा आपल्याला खिळवून ठेवते. हा काय प्रकार आहे ? गणपती असा स्त्री रूपात का दाखवला असेल? शिल्पकाराची ही चूक तर नाही ना झाली असे प्रश्न मनात येणं अगदी साहजिक आहे. पण ही चूक वगरे काही नाहीये. प्रत्येक देवतेची शक्ती ही जर मूर्तीरूपात दाखवायची असेल तर ती स्त्री रूपात दाखवतात. सप्तमातृका हे पण त्याचेच प्रतीक आहे. अंधकासुर वधाच्या वेळी शिवाने मदतीसाठी देवांना त्यांच्या शक्ती मागितल्या. देवांनी त्या शक्ती युद्धात मदत करण्यासाठी शिवाला दिल्या होत्या. त्यांचे शिल्पांकन करताना स्त्री प्रतिमा दाखवून त्या त्या संबंधित देवाची वाहने त्या प्रतिमांच्या खाली दाखवतात. साहित्यामध्ये शक्ती हे स्त्रीिलगी रूप आपण वापरू शकतो, परंतु मूर्ती घडविताना शक्ती ही स्त्री रूपात दाखवतात. विनायकाची शक्ती म्हणून ती विनायकी असे नामकरण केलेलं आहे. वैनायकी-लंबोदरी-गणेशी अशा नावांनी ओळखली जाणारी ही गणपतीच्या शक्तीची प्रतिमा असते. इथे भुलेश्वरला प्रदक्षिणा मार्गावर वरती वैनायकीची देखणी प्रतिमा आहे. त्याच्या खाली उंदीरसुद्धा दाखवला आहे. बीड जिल्ह्य़ातल्या अंबेजोगाई देवीच्या मंदिरात कळसातील एका कोनाडय़ात अशीच एक गणेशीची मूर्ती आहे. इथे चेहरा गणपतीचा आणि अंगावर साडी हे वस्त्र दाखवलेले आहे. तसेच कपाळावर स्त्रिया लावतात तसेच कुंकू लावलेले आहे. सोळा हातांची ही प्रतिमासुद्धा सुरेख दिसते.

गणपतीचे जन्मस्थान – दोडीताल

देवभूमी गढवाल म्हणजे भटक्यांचे नंदनवन. उंच उंच देवदार वृक्ष, गर्द हिरवी झाडी, पाठीमागे अनेक हिमाच्छादित शिखरे असे हे स्थान. गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ अशी विविध देवालये इथे हिमालयाच्या कुशीत वसलेली आहेत. समुद्र सपाटीपासून दहा हजार ७५७ फुटांवर असलेले दोडीताल हे त्यातलेच एक. गणपतीचे जन्मस्थान म्हणून हे प्रसिद्ध आहे. पुराणात सांगितलेली गणेश जन्माची कथा इथेच घडल्याचे सांगितले जाते. महादेवाने गणपतीचे शीर उडवले आणि नंतर त्याजागी हत्तीचे शीर बसवले ही कथा याच ठिकाणी झाल्याचे समजले जाते. दोडीताल हे एक रम्य सरोवर आहे. याचे मूळ नाव ‘धुंडीताल’, जे गणपतीच्या नावावरूनच पडले आहे. उत्तरकाशी-संगमचट्टी-अगोडा-दोडीताल असा हा २२ कि. मी. चा ट्रेक आहे. या ठिकाणी गणपतीचे मंदिर आणि आत गणेशाची सुंदर मूर्ती विराजमान आहे. नयनरम्य गढवाल प्रांती असलेले हे गणेश जन्मस्थान पाहण्यासाठी २२ कि. मी. ची पायपीट करावी लागते. पण एक आगळेवेगळे आणि महत्त्वपूर्ण ठिकाण निश्चितच भेट देण्यायोग्य आहे.

मोरयाचा धोंडा

छत्रपती शिवाजीराजांचे स्वराज्य पश्चिमेला सिंधुसागरापर्यंत विस्तारले. कोकणचा कारभार करायचा तर समुद्रावर स्वामित्व हवंच. सुसज्ज आरमार आणि त्याच्या मदतीला तेवढेच बेलाग जलदुर्ग यांचे महत्त्व या राजाने केव्हाच ओळखले होते. मालवण इथे आले असता त्यांच्या मनात समुद्रातील एक बेट भरले. कुरटे बेट. शुद्ध खडक, स्थल उत्तम, गोडय़ा पाण्याचाही ठाव आहे, ऐसे पाहून राजियांनी आज्ञा केली-‘ या जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा. चौऱ्यांशी बंदरी ऐसा जागा दुसरा नाही!’ महाराजांनी इथे सिंधुदुर्ग किल्ल्याचे काम सुरू करायचे ठरवले. स्थानिक प्रजेला अभय दिले, वेदमूर्तीना विश्वास दिला आणि महाराज पूजेला बसले. तो दिवस होता २५ नोव्हेंबर १६६४. कोणत्याही कार्याचा शुभारंभ हा अर्थातच गणपतीच्या पूजनानेच व्हायला हवा. मालवणच्या किनाऱ्यावर होता का गणपती? हो. होता ना. जिथे महाराज पूजेला बसले त्याच जागी आहे एक मोठा खडक. याला म्हणतात मोरयाचा धोंडा. मालवण किनाऱ्यावर वायरी भूतनाथाच्या हद्दीत फेरुजिनस क्वार्टझाईट बनलेला जांभळट, तांबडय़ा रंगाचा हा खडक आहे. त्यावर विघ्नहर्ता गणेश, चंद्र, सूर्य, शिविलग, नंदी आणि पादुका कोरलेल्या आहेत. यावर कोरलेल्या गणेशमूर्तीमुळे याचे नाव झाले मोरयाचा धोंडा. या मोरयाची साग्रसंगीत पूजा करून महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यास सुरुवात केली. शिवरायांच्या स्पर्शाने पावन झालेलं हे स्थळ सध्या मात्र उघडय़ावर निसर्गाच्या सर्व ऋतूंचा मारा सहन करत उभे आहे. मालवणला गेल्यावर किनाऱ्यावर जाऊन या मोरयाला नक्की वंदन करावे. इथून सिंधुदुर्ग किल्ला फार सुरेख दिसतो. मालवणला पोलीस ठाण्याजवळ राजकर्णक महाराजांची समाधी मुद्दाम पहावी. कर्णक नावाची एक संन्यस्त व्यक्ती कुरटे बेटावर वास्तव्य करून होती. शिवरायांनी याच कुरटे बेटावर बलाढय़ किल्ला बांधायचे ठरवले. किल्ल्यामुळे कर्णक महाराजांच्या साधनेत व्यत्यय येईल म्हणून त्यांना कुरटे बेटाऐवजी मालवण गावाजवळ शांत परिसरात राहण्याची विनंती शिवरायांनी केली. तेव्हा राजांच्या कानात त्यांनी काही मोलाच्या गोष्टी सांगितल्या. तेव्हापासून त्यांना ‘राजकर्णक’ म्हणू लागले. मेढा या भागात त्यांचे वास्तव्य होते. तिथेच त्यांनी संजीवन समाधी घेतली. आता इथे एक छोटी घुमटी आणि आत एक शिविलग आहे.

खरे तर मानवी देह आणि हत्तीचे तोंड ही संकल्पना काहीशी विचित्र वाटते. पण भक्ती आणि श्रद्धेपोटी याच विचित्र कल्पनेचे एका सर्वागसुंदर मूर्तीमध्ये झालेले रूपांतर पाहताना माणसाच्या रसिकतेला दाद द्यावी लागते. आपल्या लाडक्या देवतेला मूर्तीरूपात सजवताना कलाकारांनी त्यात आपले प्राण ओतले. त्याला बहुरंगी, बहुढंगी असे सजवले. त्या सजवण्यात कुठेही हातचे राखून ठेवलेले दिसत नाही. जे जे उत्कट, उदात्त, उन्नत ते ते सर्व या विविध मूर्तीतून आपल्याला दिसत असते. काळ बदलत गेला, राजवटी बदलत गेल्या तरीसुद्धा गणेशाच्या मूर्ती विविधतेने घडवण्याचे कार्य सतत सुरूच होते. अगदी किल्ल्यावर असलेले गणपती, त्यांची आयुधे, त्यांचे वैशिष्टय़पूर्ण कान हे सगळे बघत बघत आपण जेवढे त्या सुखकर्त्यांपुढे नतमस्तक होतो, तेवढेच त्याला घडवणाऱ्या कलाकारांपुढे देखील नतमस्तक व्हावे लागते. अफाट कल्पनाशक्ती आणि हातात असलेल्या कलेच्या जोरावर या मंडळींनी मूíतमंत गणेश आपल्यासमोर उभा केला आहे. निर्गुणरूपातील त्या भगवंताला सगुण रूपात आपल्यासमोर उभे करताना या कलाकार मंडळींनी आपले प्राण त्या कलेत ओतलेले जाणवते. भारताच्या कोणत्याही भागात गेले तरीसुद्धा गणेशाची ही देखणी रूपे आपल्याला कायमच भावतात, आकर्षति करतात. त्यांचे दर्शन घेणे यामागे आध्यात्मिक बाबी असतीलही, परंतु त्या गणेशाच्या मूर्तीचे अभ्यासपूर्ण दर्शन घेणे हे आनंददायी निश्चितच आहे. त्या तुंदिलतनु, राजस, देखण्या देवाचे दर्शन वारंवार व्हावे आणि जिथे आपण जाल तिथे मूíतमंत गणेश आपल्यासमोर विविध रूपांत यावेत हीच त्या विघ्नहर्त्यांच्या चरणी प्रार्थना!
आशुतोष बापट – response.lokprabha@expressindia.com

First Published on August 18, 2017 1:05 am

Web Title: lokprabha gash vishesh 2017 ganesha
Next Stories
1 गणेश विशेष : पारंपरिक लिंबागणेश
2 गणेश विशेष : अष्टविनायकांची पुरातत्त्वीय पार्श्वभूमी
3 गणेश विशेष : विघ्नकर्ता आणि विघ्नहर्ता
Just Now!
X