विद्येचा देव म्हणून, चौसष्ट कलांचा अधिपती म्हणून, थेट आपल्या घरीच वास्तव्याला येणारा देव म्हणून अशा वेगवेगळ्या कारणांमुळे भक्तांच्या भावविश्वात इतर कोणाही देवापेक्षा गणपतीबाप्पांना एक वेगळंच स्थान असतं. मराठी मनांमध्ये रुंजी घालणारी गीतं लिहिणाऱ्या गीतकार गुरू ठाकूर यांच्याही मनात बाप्पांचं असं वेगळं स्थान आहे. त्यांनी ते फक्त शब्दरूपातच नाही तर चित्ररुपातही रेखाटलंय. बाप्पांचं हे त्यांनी काढलेलं चित्र खास ‘लोकप्रभा’च्या वाचकांसाठी…

लेखनकला आत्मसात करण्याआधीपासून मला जवळची वाटणारी कला म्हणजे चित्रकला. ती मला कधी अवगत झाली, हे मलाही आठवत नाही; पण आई म्हणते की अक्षर ओळख होण्याआधीपासूनच मी हातात खडू घेऊन रेघोटय़ा मारू लागलो अन् विविध आकारांनी जमिनी, िभती भरू लागलो. तेव्हा ‘हे काय काढलंयस?’ या प्रश्नाचं उत्तर मी हमखास ‘गम्पती’ असं देत असे म्हणे आणि सगळे कौतुक करीत. कारण त्यांना त्या आकारात तो दिसे. त्यानंतरच्या बालवयात देखील अनेकदा मी काढलेल्या इतर चित्रांची ओळख पटायला लोकांना वेळ लागतोय पण गणपती मात्र चटकन ओळखता येतोय, हे माझ्या लक्षात आलं अन् तो माझा लाडका झाला. आता विचार केल्यावर लक्षात येतं गणपती रेखाटण्याची भुरळ प्रत्येक कलावंताला या करताच पडत असावी की, तुम्हाला कोणत्याही आकारात तो सापडतो, फक्त मनात तो शोधायची भावना हवी.

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..

मलाही तो तसाच अनेक रूपात सापडत गेला, चित्रकलेच्या अनेक माध्यमांतून अन् वेगवेगळ्या फॉम्र्समधून मी त्याला रेखाटलं. मग गीतकार झाल्यावर अनेक गीतांतून त्याची रूपं शब्दबद्ध केली, अजूनही करतोय. त्याच्या अगणित भव्यदिव्य, राजा, महाराजा रूपांपेक्षाही मला स्वत:ला त्याचं खटय़ाळ मिश्कील वाटणारं बालरूप भावतं! एखादं हसरं गोंडस बालक पाहताना जशी सकारात्मक ऊर्जा मिळते, तशी त्यातून मिळते.

हे सारं असूनही एक गोष्ट मला इथे मुद्दाम नमूद करावीशी वाटते ती म्हणजे माझ्या मनातला गणेशू ही एक विचारधारा आहे. मांगल्याचा प्रारंभ करायला उद्युक्त करणारी, कलात्मकतेला पूरक चालना देणारी, नकारात्मकतेला दूर ठेवणारी एक ऊर्जा जिला मी सतत नवनिर्मितीमध्ये शोधतो. मंगल कार्याच्या किंवा एखाद्या सत्कार्याच्या आरंभात शोधतो आणि मला वाटतं तिथेच ती सापडते, जाणवत राहाते. त्यामुळेच असेल आजवर मला एकदाही एखाद्या मंदिराच्या गाभाऱ्यात ती शोधावी लागली नाही. एवढेच काय प्रचंड कल्लोळात बुडून गेलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपातदेखील ती सापडेल या आशेने मी गेलो नाहीय.

माझ्याच एका गीतात म्हटल्याप्रमाणे;

राहतो जो मनी
या जनी जीवनी
एका पाषाणी तो
सांग मावेल का?
बघ उघडून दार
अंतरंगातलं
देव गावेल का…

हा अनुभवलेला विचारच मी माझ्या आणखी एका गीतातून मांडला;

जिथे पाहतो तिथे नव्याने दिसे तुझा आकार।
खुळ्या भाबडय़ा जिवास माझ्या तुझाच रे आधार।
गजमुखा करतो जयजयकार॥

एखादी नवनिर्मिती माझ्या हातून घडते तेव्हा वाटतं, माझ्या हातात लेखणी देऊन जी ऊर्जा मला लिहायला भाग पाडते तिचं चित्ररूप कागदावर आणायचं झालं तर ते नेमकं असंच मी काढलेल्या सोबतच्या चित्रासारखंच असेल!
गुरू ठाकूर