त्या दिवशी मन्या नाहीसा झाला तो परत कधी आलाच नाही. आम्ही त्याला खूप शोधलं पण काहीच उपयोग झाला नाही. मनीच्या बाबतीतही असंच झालं. तीही नाहीशी झाली ती परत कधी न येण्यासाठीच..

सुमारे तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमच्या दादांच्या कारखान्यात नेहमीकरिता, जणू आपले घरच आहे असे समजून बाळंतपणाच्या जागा शोधणाऱ्या मांजरीने तीन पिल्लांना जन्म दिला. तीनही सोनेरी रंगाची होती. मांजरी त्यांची जागा रोज बदलायची, कारण शेजारी तीन बोके टपून बसलेले. सुमारे महिन्याभराने ती पिल्ले वरखाली जा-ये करायला लागली. त्यातील एक पिल्लू एक दिवस गायब झाले. त्यामुळे ती मांजरी दिवसभर त्या पिल्लाचा शोध घेत आरडाओरड करत राहिली. कारखान्यातील सगळ्याच मंडळींच्या कानावर हे वृत्त गेले. कारखान्यात तीन मुस्लीम भगिनी गेल्या सुमारे वीस वर्षांहून अधिक काळ काम करीत आहेत. त्यातील एका महिलेला सोनेरी वर्ण असलेले पिल्लू फर्गसन कॉलेजच्या रस्त्यावर दिसले. हे पिल्लू बहुधा आपल्याच मांजरीचे असे समजून तिने कारखान्यात आणले. दादा फार खूश झाले. पण मांजरी त्याला स्वीकारेना, ती धुसफुस करू लागली. मी सकाळी नेहमीप्रमाणे ११ वाजता कारखान्यात गेले. कारखाना आठलाच सुरू होतो. पण माझा टाइम १०।।/११ च्या आसपासचा आहे. मी सापडलेले पिल्लू पाहिले व दादांना हे आपल्या मनीचे पोर नव्हे असे सांगितले. दादांकडे शेकडो माणसे येतात. त्यांना माणसांची ओळख, पारख तशी कमीच! त्यामुळे मांजरांच्या पिल्लांचा बारकावा समजला नाही यात काही नवल नाही. आमची मनी व तिची दोन्ही उरलेली पिल्ले या नवीन ‘मन्याला’ जवळ येऊ देत नव्हती. इकडे हे अंदाजे दीड महिन्याचे पिल्लू सारखे ओरडत होते. मग मी त्या पिल्लाला जवळ घेऊन स्वच्छ केले. हळूहळू चमच्याने दूध पाजले. कारखान्यात मी जरी उशिरा आले तरी माझा मुक्काम रात्री ८॥/ ९ पर्यंत असतो. त्यामुळे त्या पिल्लाला मांडीत बसवून पुन:पुन: दूध पाजणे सहज जमले. त्या पिल्लालाही विश्वास आला. चार-पाच दिवसांनी ते पिल्लू बशीतून आपणहून दूध पिऊ लागले. थोडा धीर चेपल्यावर इतर दोन्ही पिल्लेही त्या पिल्लाबरोबर दूध पिऊ लागली. नेहमीच्या मुक्कामाची मनी मांजरीसुद्धा आठ दिवसांनंतर त्या पिल्लाला धुसफुस न करता, त्याला जवळ घेऊ लागली. मग चार आठ दिवसांतच हे नवीन पिल्लू सर्वाचाच ‘मन्या’- एरवी ‘वरवरचा’ सगळ्यांनाच धाक असणाऱ्या दादांचा- प. य. वैद्य खडीवाल्यांचा लाडका मन्या बनला.

हळूहळू हे पिल्लू अंग धरू लागले. त्याला कोणी शिकवले नाही तरी ते ‘एक नंबर’करिता समोरच्या मोरीत जाऊ लागले. कारखान्यात, कोठीत, रुग्ण तपासणीच्या खोलती त्याने कधीच घाण केली नाही. हे पिल्लू इतर दोन पिल्लांबरोबर खेळू लागले. लवकरच या मूळ दोन पिल्लांपैकी एका अगदी अशक्त पिल्लाची जीवनयात्रा एके दिवशी अचानक संपली. दुसऱ्या पिल्लाला बोक्याने मारले. त्यामुळे मन्या एकटाच राहिला. तेव्हापासून त्याने माझ्या मांडीचा ताबा घेतला तो शेवटपर्यंत. यापूर्वी आमच्याकडे मनीची तीन बाळंतपणे दर पाच-सहा महिन्यांच्या अंतराने झाली होती. पण तिच्या पिल्लांची तेथे असेपर्यंत घाण पुसणे यापलीकडे कोणालाच इंटरेस्ट नव्हता. माझ्या मांडीवर बसलेला मन्या हा सर्वाचा लाडका- गळ्यातला ताईत केव्हा बनाल हे कळले नाही. या मन्याची चोवीस तासांची जबाबदारी सर्वच मंडळींनी आळीपाळीने उत्स्फूर्तपणे केव्हा घेतली हे कळलेच नाही.

या मन्याचे वैशिष्टय़ असे की, जे बहुतेक प्राण्यांचे असते- ते म्हणजे दादा व माझ्यावरील विलक्षण निष्ठा. दादा दर मंगळवारी व नंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार सकाळी आठ वाजता कारखान्यात यायचे. नेमके त्या वेळेस मन्या दादांबरोबर वर यायचा. तोपर्यंत तो कुठेही असायचा. पण या नेमक्या चार दिवशी तो वर दादांबरोबर जाणार, पायापायात येणार व हक्काचे दूध मिळवणार. स्वयंपाकघरातील खोलीत दूध आहे हे त्याला माहीत असायचे पण मन्याने कधी चोरून किंवा आपणहून दूध प्यालेले आठवत नाही. त्याला बशीत दूध ओतेपर्यंत मात्र धीर निघायचा नाही. काही वेळा दूध गरम असायचे. मग दादा व इतरांची दूध गार करण्याकरिता काय धावाधाव! मन्या जणू काही आदल्या रात्रीपासून भुकेला असे! स्वाभाविकपणे त्याला वेळेवर वारंवार व त्याच्या आवडीप्रमाणे किंचित कोमट दूध लागे. खरे म्हणजे मन्याला दादांकडून लाड करून दूध हवे असे. कारण भल्या सकाळी सावंत आजोबा व त्यानंतर चंद्रकांत मामा यांनी त्याला दूध दिलेले असेच. तो माणसे बरोबर ओळखायचा.

काही वेळा मन्याला अजीर्ण किंवा अरुचीचा त्रास व्हायचा. तो मग दुधाला तोंड लावायचा नाही. अशा वेळेस मी त्याला आले- सुंठ घालून दूध प्यायची सवय करविली. एकदा त्याची भूक – वासना अजिबात गेली, तर मग त्याला ‘पाचक चूर्ण’ चाटवले. त्याने कसे तरी चाटवून घेतले पण पोट ठीक झाले. एकदा बाहेरच्या बोक्याशी बचावाची लढाई खेळताना मन्याचा पंजा दुखावला. जखम झाली. मग त्याला मी पकडून पंजा साफ केला. त्याला एलादि तेल लावले. तो पट्टी काही ठेवू देईना. मग दोन-तीन वेळा एलादि तेलाचे ठिपके लावले. त्यामुळे मन्या दोन दिवसांत उत्तम चालू लागला. एकदा मन्याला थोडा ताप आला असे वाटले. त्याबरोबर ‘ज्वरांकुश’ गोळी बारीक करून पाण्यात मिसळून, मांडीत झोपवून जबरदस्तीने दिली. सायंकाळी मन्या एकदम तंदुरुस्त झाला.

एकदा त्याला मी वेफर्स दिले. त्याला भारी आवडले. त्याची त्याला चटकच लागली. टेबलाच्या कपाटाचा नुसता आवाज झाला तरी तो कितीही गाढ झोपलेला असला तरी उठत असे. एक दिवस त्याला वेफर्सच हवे होते. दूध दिले तरी घेईना. शेवटी दादा तडक उठले, कोपऱ्यावरून दुकानातून वेफर्स घेऊन आले. मग कुरकुर वाजणारे वेफर्स खाल्ल्यावर मन्या शांत झाला. त्याला पेढाही फार आवडे. मी कुठेही कोणत्याही कार्यक्रम लग्न-मुंजीला गेले तरी आल्यावर त्याला पेढा द्यायची, तो मजेत खायचा. मन्याला केक-बिस्किटे काहीच चालत नसत. दुपारी आमच्या सर्वाच्या जेवणाच्या वेळी मन्याला वेगळी पोळी दिली तर खात नसे. पण तूप लावलेली माझ्या पानातील पोळी, त्याला मांडीवर बसवून तुकडे करून दिली तरच हा ‘हट्टी’ कौतुक करून घेऊन मगच खात असे.

मन्या हळूहळू मोठा होऊ लागला, तसा दबकतच बाहेर जाऊ लागला व एक एक उद्योग सुरू झाले. एक मोठा बोका त्याला मारायला टपला हाता. त्याचे भांडण होऊन दोन-तीन वेळा मोठय़ा जखमा झाल्या. मग पूर्वीप्रमाणेच एलादि तेलाचा प्रयोग करावा लागला व त्याने तो बिनदिक्कत करून घेतला. मन्या कायम माझ्या मांडीत बसून असे. मी यायच्या अगोदर तो दादांच्या मांडीत बसायचा. कंटाळा आला तर टेबलाच्या पैशाच्या ड्रॉवरमध्ये बिनधास्त ताणून द्यायचा. मग त्या ड्रॉवरला कोणीच हात लावत नसे. कितीही गरज पडली तरी मन्याची झोप डिस्टर्ब केली नाही. काही काही वेळा तो सलग पाच पाच तास झोपायचा. रुग्ण तपासण्याच्या खोलीतील पलंग ही एक त्याची झोपण्याची हक्काची जागा होती. पण तो अशा पद्धतीने एका बाजूला झोपायचा की मला वा दादांना पेशंट तपासायला अडचण पडू नये.

सायंकाळी झाली की मन्याची घालमेल बघण्यासारखी असे. त्याला महिती की आता दादा-ताई घरी जाणार मग तो माझ्या मांडीवरून हालायचा नाही. काही वेळा दादांचा आयुर्वेद वर्ग वरच्या मजल्यावर चालू असला की माझ्या खालच्या हॉलमध्ये फेऱ्या मारणे चालू असायचे. मन्या बरोबर माझ्याइतक्या त्याच गतीने फेऱ्या मारायचा. काही वेळा तो खूप लाडात यायचा. माझ्या गळ्याला मारलेली मिठी सोडायचा नाही. खाली सोडू द्यायाचा नाही. आम्ही घरी जात असताना गेटपर्यंत, मेहेंदळे मारुतीपर्यंत साथ द्यायचा. माग नाइलाजाने त्याला बारकी शोभा परत घेऊन जायची.

काही वेळा मन्या कारखान्याच्या गच्चीत जाऊन बसायचा. एक दिवस तो गच्चीत आहे हे माहीत नसताना बारक्या शोभाने चुकून गच्चीचे दार बंद केले. मग गडबडच झाली. आम्ही अन्य ठिकाणी सर्वत्र त्याचा शोध घेत होतो. कोणाला तरी शंका आली व मन्याचा क्षीण आवाज आला म्हणून गच्चीचे दार उघडले तर दीन झालेला, काही तास उपाशी राहिलेला मन्या आला तो काही तास मला चिकटून राहिला. कारखान्यात सुट्टीच्या दिवशी तो असाच दोन दिवस अडकला होता. एक दिवस तर दादांना घरून त्याने यायला लावले. कारण रात्रीच्या त्याच्या ओरडण्याने शेजाऱ्यांचे फोन आले. दादा जाऊन पाहतात तर तो कारखान्यातील गोडाऊनमध्ये कोंडला गेलेला. हे महाशय काही वेळा कारखान्यातील पोत्यावर ताणून द्यायचे. आमचे दादा वरवर सगळ्यांनाच कडक वाटतात, पण मन्या हा त्यांचा विक पॉइंट होता. दादा म्हणायचे, ‘मला चार मुले, पण इतके प्रेम, लळा कोणी लावला नाही.’

मला वाटते इथेच घात झाला. मन्या व आमच्या प्रेमाला दृष्ट लागली. त्याचे खूप कोडकौतुक सर्वाच्यासमोर चालत असे. संगीता, आताच्या जनरल मॅनेजर यांनी मन्याचे खूप छान छान फोटो काढले होते. जो येई तो मन्याची व माझी किंवा दादांच्या मांडीत बसलेल्या मन्याची चौकशी करी. लहान मुले-मुली खास करून मन्याला बघायला येत. अनेकांनी आम्हाला असे मांजर घरी मिळेल का अशी चौकशी केली.

आमच्या आसपास खूप माकडे यायची. त्या वेळेस मन्याची घाबरगुंडी बघण्यासारखी असे. २३ जानेवारी २००३, मंगळवार होता. त्याला मी बाहेर- शेजारच्या घराच्या पत्र्यावरचे माकड दाखवले. हा आमचा शेवटा एकमेकांचा दिवस हे त्या क्षणी जाणवलेच नाही. नेहमीप्रमाणे दादा बुधवारी सकाळी कारखान्यात आले. मन्या दुधाकरिता आला नाही. दादा थोडी चौकशी करून छापखान्यात गेले. दुपारी आले तर मन्या नाही. कारखान्यात, शेजारच्या लॅबच्या बिल्डिंगमध्ये सर्वत्र शोधले. मन्या नाही. संपूर्ण दिवस वाट पाहिली. असा दिवस पूर्वी कधीच आला नव्हता. रात्री आम्हा दोघांना त्याची तीव्र आठवण सतत येत राहिली. कारण सायंकाळी मन्याची माझ्याबरोबर येरझरा घालण्याची सवय असायची. काही वेळा मन्या आळसावला तर त्याला मी सुतळी, दोरा देऊन उडय़ा मारायला लावायची. चेंडूमागे धावायला लावायची. दोन दिवस असे आठवणीत गेले. गुरुवारी आसपासच्या सर्व घरे, वाडे, ब्लॉकमध्ये कारखान्यांतील पाचपंचवीस बायका चौकशी करून आल्या, पण व्यर्थ. दादांनी पत्रके छापून नारायण गेट, शिंदेपार, अष्टभुजा, रमणबाग शाळा, ओंकारेश्वर परिसर सर्वत्र वाटली. पण मन्या काही परत आला नाही.

मी ज्योतिषी गाठले. त्यातील दोघांनी मन्याला कोणी तरी नेले आहे, परत येणार नाही, असे ठाम सांगितले. तसेच घडले. मला आता असे वाटते की आमच्याकडे एक सिंधी कुटुंब औषधाकरिता येत असे. त्यांना मन्या फार आवडायचा. ते नेहमी त्याची मागणी करायचे. मन्याच्या त्या दिवशीच्या नाहीसे होण्यानंतर ते कुटुंब पुन्हा आलेच नाही, असे आता मला आठवते.

या सगळ्यामध्ये मनी-पुराण राहून गेले. या काळानंतर आमच्या त्या मनीला पुन्हा तीन वेळा बाळांतपण आले. तिची आम्ही इतरांकडे दिलेली दोन- तीन पिल्ले सोडली तर इतर जगलीच नाहीत. पूर्वानुभवावरून तिच्या नंतरच्या पिल्लांना दादांनी माया लावू दिली नाही. आपणही अलिप्त राहिले. सुमारे दोन महिन्यांपूर्वी मनीच्या शेवटच्या बाळंतपणानंतर एक पोर मरतुकडे होऊन गेले, दोन दत्तक दिली. त्यानंतर मनी जी गायब झाली ती गायबच. जी कधीच आमचा कारखाना सोडत नव्हती ती एकदम नाहीशी झाली. निसर्गप्रेमी व ढीगभर मांजरे सांभाळलेल्या डॉ. हेमा साने यांच्या म्हणण्याप्रमाणे बोके गायब होतातच. मन्या बोका होता हे सांगायचे राहिलेच.

वैद्य वीणा मानकामे – response.lokprabha@expressindia.com