वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं. पण असं असलं तरी कशासाठी वाचायचं, कसं वाचायचं आणि काय वाचायचं हे कुणी सांगतंच असं नाही. त्याचबरोबर वाचनातून आनंद कसा मिळवायचा, स्वत:ला समृद्ध कसं करत न्यायचं हेसुद्धा अनेकांना समजतच असं नाही. या सगळ्या सवयी लहान मुलांना जाणीवपूर्वक लावल्या तर त्यांच्यामध्ये वाचनाची, पुस्तकांची आवड निर्माण होऊ शकते. त्याचा आनंद ती घेऊ शकतात. नवेनवे विषय समजणं, लेखकाशी जोडलं जाणं, लेखकाशी होणाऱ्या संवादाचा आनंद त्यांना मिळू शकतो. या सगळ्यांमधून त्यांचं व्यक्तिमत्त्व संपन्न होऊ शकतं. फक्त हे कुणी तरी मिशन म्हणून करायची गरज असते. या पुस्तकाचे लेखक नरेंद्र लांजेवार यांनी मिशन म्हणून ते केलं. ते भारत विद्यालय नावाच्या शाळेत ग्रंथपाल म्हणून काम करत असल्यामुळे मुलांवर वाचनसंस्कार घडवणं त्यांना शक्यही झालं. हे संस्कार घडवण्यासाठी केलेल्या वेगवेगळ्या प्रयत्नांविषयी आणि त्यातून निर्माण झालेल्या फलिताविषयी त्यांनी या पुस्तकात लिहिले आहे. त्यामुळे पुस्तकाचं नावच ‘एका ग्रंथपालाची प्रयोगशाळा’ असं आहे. त्यांच्या शाळेतली मुलं पुस्तकांच्या जगात कशी वावरायला लागली, त्यांनी लेखकांना लिहिलेल्या पत्रांना लेखकांची उत्तरं आली की ती कशी भारावून जायला लागली हे सगळं या पुस्तकातून वाचायला मिळतं तेव्हा मुलांच्या मनात एखादी ठिणगी प्रज्वलित करण्याचं काम किती महत्त्वाचं असतं हे जाणवतं. घरचे लोक आता वाचन पुरे झालं म्हणून सांगतात तेव्हा एक वाचनवेडी मुलगी शाळेच्या ग्रंथालयात बसून आपली वाचनाची भूक भागवते. दरम्यानच्या काळात तिची एक कविता आनंद मासिकात पूर्ण नावाने प्रसिद्ध होते. तिच्या कवितेमुळे आपलं नाव छापून आलं हे बघून आनंदलेले वडील मग तिला कितीही वेळ पुस्तकं वाचायची परवानगी देतात. तीच मुलगी नंतर शाळेत ‘उत्तम वाचक’ पुरस्काराची मानकरी ठरते. पुस्तक आवडलं तर लेखकाला आवर्जून पत्र पाठवलं पाहिजे हा संस्कार झाल्यावर पत्रं जातात आणि चक्क डॉ. अब्दुल कलाम आझाद यांचं उत्तर येतं. आकाशवाणीवर डॉ. जयंत नारळीकरांची मुलाखत घेण्यासाठी नारळीकरांची सगळी पुस्तकं वाचून काढतात. एका मुलाच्या हातून ग्रंथालयातल्या कपाटाची काच त्याच्या हातातला बॉल लागून फुटते तेव्हा त्याला ओरडा बसत नाही तर नीट समजून घेतलं जातं. त्यामुळे नी दुसऱ्या वर्षीचा ‘उत्तम वक्ता’ ठरला. शाळेतर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्काराची सगळी प्रक्रियाही मुलांतर्फेच उत्साहाने राबवली जाते. त्यासाठी बोलावलेल्या लेखकाशी संवाद साधणे ही त्यांच्यासाठी आनंदाची पर्वणी असते. आपल्या वाढदिवसाला शाळेच्या ग्रंथालयाला एक पुस्तक भेट द्यायचं या उपक्रमालाही विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद कसा दिला, त्यामुळे त्यांनी ते ग्रंथालय शाळेचे ग्रंथालय न वाटता आपलेच कसे वाटायला लागले याविषयी लेखकाने लिहिले आहे.

भारत ज्ञानविज्ञान समुदाय आणि केरळ शास्त्र साहित्य परिषदेतर्फे शाळकरी मुलांसाठी सगरेत्सव नावाचा उत्सव केला जातो. लेखकाने आपल्या शाळेतल्या काही मुलांना तो उत्सव पाहायला नेलं. केरळी घरात राहिलेली मराठी मुलं, केरळमधील साहित्य चळवळीचा त्यांच्या बालमनावर झालेला संस्कार, तिथल्या एकूण वातावरणाचा मुलांवर झालेला परिणाम, त्याबद्दल त्यांनी परत आल्यावर केलेलं लिखाण ही सगळी माहिती आवर्जून वाचण्यासारखी आहे.
एका ग्रंथपालाची प्रयोगशाळा, नरेंद्र लांजेवार, साकेत प्रकाशन, मूल्य – १०० रुपये, पृष्ठे – ११७

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
How Did Get Name Tulsibaug To Pune Famous Market
Pune : पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठेला ‘तुळशीबाग’ हे नाव कसे पडले? जाणून घ्या, या नावामागचा इतिहास
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
deep learning definition
कुतूहल : डीप लर्निग – सखोल शिक्षण म्हणजे काय?

‘पाण्यावरचे दिवे’ हा लेखिका छाया महाजन यांच्या लेखांचा संग्रह आहे. यातले बहुतांश लेख हे ‘लोकसत्ता’मध्ये ‘संवाद’ या सदरातून प्रसिद्ध झालेले आहेत, असा पुस्तकावर उल्लेख आहेत. सदरलेखनाचं पुस्तक केलं की त्याला जी मर्यादा येते, ती या पुस्तकाला आलेली आहे. ते अपरिहार्यच आहे. पण हा मुद्दा बाजूला ठेवून हे पुस्तक वाचायला घेतलं तर त्यात अतिशय ओघवती अशी भाषाशैली आहे, अगदी समोर बसून बोलणं चाललं आहे, असं वाटावं असा सहजसंवाद आहे. मुख्य म्हणजे विषयाचं कोणतंही बंधन नाही, किरण देसाईसारखी साहित्यिक, मीरा नायरसारखी सिनेनिर्माती, रोजच्या जगण्यात भेटणारी वेगवेगळी माणसं, त्यांचे विविध प्रकारचे अनुभव, लेखिकेचे तिच्या जगण्यातले असे वेगवेगळे अनुभव असं सगळं या पुस्तकातल्या वेगवेगळ्या प्रकरणांमधून आहे. या माणसांबद्दलचं, अनुभवांबद्दलचं लेखिकेचं चिंतन मननही त्या त्या ठिकाणी निवेदनाच्या ओघातून येतं. पाण्यावर दिवे सोडले की ते मंदपणे तेवत वाऱ्याच्या दिशेने वाहत जातात. दूरवर जाईपर्यंत आपल्याला ते दिसत राहतात, पण ते आपले राहत नाहीत, पाणी आणि अग्नी यांचं त्या दिव्यांच्या रूपाने साहचर्य निर्माण होतं, पण ते परस्परपूरक ठरतं, तसंच काहीसं या पुस्तकातल्या लेखांचं झालं आहे. एखादा मुद्दा पकडून त्याच्याबरोबर वाहत गेलेले विचार, असं त्याचं स्वरूप आहे.
पाण्यावरचे दिवे, छाया महाजन, जनशक्ती वाचक चळवळ, पृष्ठे- १५९, मूल्य- १५०

आपल्याला आपल्या आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटत असतात, त्यांच्या भेटीचा आपल्या मनावर काही ना काही परिणाम होत असतो. त्यात ही माणसं नावारूपाला आलेली, भरपूर अनुभव गाठीशी असलेली, आयुष्याचा आवाका जाणणारी असतील तर आपल्याला त्यांच्याकडून बरंच काही शिकायला, अनुभवायला मिळतं. आपल्या आयुष्यात भेटलेल्या अशा वेगवेगळ्या मोठय़ा व्यक्तींचे अनुभव लेखक प्रवीण दवणे यांनी या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत. त्यात कुसुमाग्रज आहेत, पु. ल. देशपांडे आहेत, शांताबाई शेळके आहेत, सुनीता देशपांडे आहेत. या सगळ्या माणसांनी आपलं आयुष्य सुरेल केलं, म्हणून ते भेटले ते गाणारे क्षण असं प्रवीण दवणे म्हणतात. उषा मंगेशकर, लता मंगेशकर, अनिल मोहिले, मंगेश पाडगावकर, भक्ती बर्वे, विद्याधर गोखले, जयश्री गडकर, राम शेवाळकर अशा अनेक दिग्गजांबरोबर अनुभवलेले प्रसंग लेखकाने असे मांडले आहेत की आपण त्यात गुंगून जातो. पुलंना भेटायची इच्छा व्यक्त करणाऱ्या एका मित्राला घेऊन लेखक थेट पुलंच्या घरी जातो, तेव्हा आलेला सुनीताबाईंचा अनुभव लक्षात राहणारा आहे. लेखकाने अनुभवलेले नामवंत आणि त्यांचे किस्से असं या पुस्तकाचं स्वरूप आहे.
गाणारे क्षण, प्रवीण दवणे, सुरेश एजन्सी, मूल्य – १४० रुपये, पृष्ठे – १२४

हजारो वर्षांनंतरही गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान आजही खूप मोठय़ा समूहाच्या चिंतनाचा, अभ्यासाचा, आचरणाचा भाग आहे, यातच त्याची ताकद काय आहे, ते समजतं. डॉ. प्रदीप आवटे यांनी या पुस्तकात त्यांना समजलेलं बुद्धांचं तत्त्वज्ञान साध्या, सोप्या गेय मराठीत मांडलं आहे. बुद्धांनी सांगितलेला त्यांचा धम्म, इतर धर्मग्रंथांविषयीची त्यांची मतं, धर्म म्हणजे नेमकं काय हे सांगत सांगत बुद्धविचार अतिशय सहजसोप्या ओघवत्या शैलीत आपल्यापुढे येतो. यातल्या सगळ्या प्रकरणांच्या शेवटी ‘तथागत म्हणे’ असं उपपद जोडत लेखकाने बुद्धतत्त्वज्ञानाचं बीजरूप निर्माण केलं आहे, ते अभंग, ओव्यांची आठवण करून देणारे आहे.

तथागत म्हणे, घडवू जे हवे

सन्मित्रा निर्मूया, जग पुन्हा नवे

तथागत म्हणे, देव आणि दैव

अज्ञानी मनाची, आंधळी ही ठेव

धम्मबळे फुटे मनाला पालवी

तुझी नौका आता, तुझी तू वल्हवी

तथागत म्हणे उजेडाचे थवे

आपुल्या आभाळी मित्र नवे नवे

तथागत म्हणे जाण भलेबुरे

ओळख आपुले हित खरेखुरे

अशा पद्धतीने प्रत्येक प्रकरणांच्या शेवटी ओळी येतात आणि बुद्धविचार सूत्ररूपात सांगतात.
धम्मधारा, प्रदीप आवटे, जनशक्ती वाचक चळवळ, पृष्ठे :  १०१, मूल्य : १०० रुपये

कर्मकांडात गुरफटलेला वैदिक धर्म, यावनी आक्रमणांनी त्रस्त केलेलं रोजचं जगणं या सगळ्यात कावलेल्या दिशाहीन झालेल्या अकराव्या-बाराव्या शतकातल्या सामान्य माणसाला संतांनी खरी वाट दाखवली. जातिधर्माच्या भिंती तोडत आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली. या परंपरेत संत जनाई स्वत:ला नामयाची म्हणजे नामदेवांची दासी म्हणवून घेत असली तरी तिला तिचे स्वत:चे असे वैशिष्टय़पूर्ण स्थान आहे. काव्यरचना करणं, भागवतधर्माची पताका खांद्यावर घेत ती वाट चालणं जनाईसाठी अधिक अवघड होतं, कारण स्त्री असल्यामुळे आणि शूद्र समाजातली असल्यामुळे तत्कालीन समाजव्यवस्थेत ती सर्वात तळच्या पायरीवर होती. पण तरीही ती ओंकाराची रेख कशी ठरली हे लेखिकेने कादंबरीत मांडले आहे.
ओंकाराची रेख जनी, मंजुश्री गोखले, मेहता प्रकाशन, पृष्ठे – ३०८, मूल्य- २९५

अमेरिकेत ह्य़ूस्टनला राहणारे ज्ञान मयूर आणि अनिता वाकणकर या दोघांनी संयुक्तपणे हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच ‘एका जगप्रवाशाने टिपलेल्या त्रिखंड समाज प्रतिमा’ असा उल्लेख केला आहे. ह्य़ूस्टन -अमेरिका, स्वीडन आणि भारत या तिन्ही ठिकाणी आलेले माणसांचे, जगण्याचे  वेगवेगळे अनुभव आणि त्यावरचं त्यांचं चिंतन असं यातील तीन वेगवेगळ्या विभागांतील लेखांचं स्वरुप आहे. त्यातलं भारतासंदर्भातलं लिखाण आत्मीयतेने, तळमळीने  केलेलं असलं तरी कुठेतरी ‘आम्ही आणि ते’ या भावनेतून आहे, असं वाटत राहतं. अमेरिका आणि स्वीडन या दोन प्रकरणांमधील लिखाण वाचनीय आहे, पण ती सगळी निव्वळ माहिती आहे.
समाजरंग, ज्ञान मयूर, अनिता वाकणकर- कुलकर्णी, ग्रंथाली, पृष्ठे – २२०, मूल्य- २५० रुपये