30 March 2020

News Flash

संमेलन : पुन्हा ‘ठोकळेबाज’ संमेलन!

साहित्य संमेलन उद्घाटन आणि समारोप सोहळ्यास प्रचंड गर्दी होत असते.

साहित्य-सांस्कृतिक नगरी डोंबिवलीतले ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निव्वळ उपचार ठरले. खरे तर तोचतोचपणा आलेल्या संमेलनाचे एकूणच स्वरूप बदलण्याची आता गरज आहे..

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी भाषेचा आणि साहित्याचा ‘महाउत्सव’असतो. साहित्यप्रेमी, वाचक, लेखक यांच्यासाठी ती ‘साहित्य वारी’ असते. पण गेल्या काही वर्षांपासून त्यातील ‘साहित्य रंग’ हरवत चालला असून तो ‘उरुस’ झाला आहे. केवळ एक ‘उपचार’ म्हणून साहित्य संमेलन दरवर्षी पार पाडले जात आहे. ही संमेलने आता राजकीय पुढारी आणि त्यांच्या ताब्यातील संस्थांच्या कह्य़ात गेली आहेत. संमेलनाचे ‘स्वागताध्यक्ष’ पद गेल्या काही वर्षांत आमदार, खासदार, मंत्री, तथाकथित शिक्षणसम्राट अशा ‘मनी’ व ‘मसल’पॉवर असणाऱ्या ‘बडय़ा’नेत्याकडेच राहिलेले आहे. डोंबिवलीतील साहित्य संमेलनातही सुरुवातीला काही बडय़ा धेंडांनी ‘स्वागताध्यक्ष’ होण्यासाठी  प्रयत्न केले.

मात्र संमेलन आयोजक संस्था ‘आगरी युथ फोरम’ने यंदा ‘स्वागताध्यक्ष’पद बाहेर जाऊ न देता आपल्याकडेच ठेवायचे ठरविले व आगरी युथ फोरमचे गुलाब वझे ‘स्वागताध्यक्ष’ झाले. त्यामुळे नाराज झालेल्या इच्छुक  बडय़ा नेत्यांनी आर्थिक मदतीच्या बाबतीतही हात आखडता घेतला. वझे यांना राजकीय पाश्र्वभूमी असली तरी अन्य राजकीय नेत्यांप्रमाणे ते ‘बडे धेंड’ वर्गातले नाहीत. त्यामुळे आर्थिक नियोजनाबाबत काहीसे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. महापालिका व अन्य राजकीय नेत्यांनी मदत केली असली तरी वझे आणि ‘आगरी युथ फोरम’च्या सर्व सहकाऱ्यांनी संमेलनाचा सर्वच बाबतीतील डोलारा यशस्वीपणे उभा केला, असे म्हणावे लागेल.

विशिष्ट समाजाच्या हातात साहित्य संमेलनाची सर्व सूत्रे गेल्यामुळे डोंबिवलीतील काही सन्माननीय अपवाद वगळता अन्य ‘आंब्याचे टहाळे’ संमेलनापासून चारहात लांब राहिले होते. काही जणांनी गावकीचे संमेलन म्हणून लाजेस्तव तर काहींनी मनापासून आपला सक्रिय सहभाग यात नोंदविला.

संमेलन आयोजक ‘आगरी युथ फोरम’नेही राजकीय पक्ष व त्यांचे नेते नाराज होऊ नयेत म्हणून संमेलनाचे उद्घाटन व समारोप सोहळ्यात सर्वपक्षीय राजकारण्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. संमेलनातील ‘ग्रंथग्राम’च्या उद्घाटनाला मनसेचे राज ठाकरे, उद्घाटन सोहळ्याला माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी कँाग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि समारोपाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार होते. पण या तिघांनीही संमेलनाला दांडी मारली. उद्घाटन व समारोप सोहळ्यास शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर आणि महापालिकेतील शिवसेना पदाधिकारी वगळता शिवसेनेचे ठाणे जिल्ह्य़ातील किंवा कल्याण-डोंबिवलीतील कोणीही बडे नेते व्यासपीठावर हजर नव्हते. त्यामुळे उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि समारोपाला सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा मंत्री विनोद तावडे हे भाजपचे नेते उपस्थित होते.

साहित्य संमेलन उद्घाटन आणि समारोप सोहळ्यास प्रचंड गर्दी होत असते. उभारण्यात आलेला भव्य मंडपही जमा झालेल्या गर्दीला अपुरा पडतो असे गेल्या काही वर्षांतील संमेलनांधील चित्र होते. डोंबिवलीकर रसिक संमेलनास अशाच प्रचंड संख्येने उपस्थित राहतील, पुस्तक प्रदर्शनातूनही विक्रमी ग्रंथविक्री होईल अशी अपेक्षा होती. मात्र ती पूर्ण झाली नाही. उद्घाटन व समारोप सोहळ्यास मुख्य सभामंडप भरला होता, पण ओसंडून वाहणारी गर्दी पाहायला मिळाली नाही. पहिल्या दिवशी पुस्तक प्रदर्शनास काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी त्याची कसर भरून निघेल आणि चांगली विक्री होईल असे प्रकाशक आणि विक्रेत्यांना वाटत होते. ग्रंथग्राम मुख्य सभा मंडपाला लागून उभारण्यात आले होते, फिरण्यासाठी जागाही ऐसपैस होती. पण ग्रंथविक्रीबाबत अपेक्षाभंग झाल्याचे प्रकाशकांचे म्हणणे पडले.

ज्योत्स्ना प्रकाशनाने बालसाहित्य लेखिका आणि साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त माधुरी पुरंदरे यांच्या पुस्तकांचे खास दालन तयार केले होते. रविवारी स्वत: माधुरी पुरंदरे या स्टॉलवर उपस्थित होत्या. त्यांनी बालवाचक, पालक यांच्याशी संवाद साधला. मराठीतील सहा प्रकाशकांनी एकत्र येऊन तयार केलेल्या ‘मराठी रिडर’ या ई-बुक अ‍ॅपचेही दालन येथे होते. ई-मेलच्या माध्यमातून वाचकांना ‘इ-बुक’ पाठविणाऱ्या ‘ई साहित्य प्रतिष्ठान’ने ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर पुस्तके ही आगळी संकल्पना आपल्या दालनात राबविली होती. येणाऱ्या साहित्यप्रेमी, वाचकांनी त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर आपले नाव व गाव कळविले की प्रतिष्ठानतर्फे स्मार्ट भ्रमणध्वनीवर एक पुस्तक पाठविले जाणार आहे. ‘श्यामची आई’ या  पुस्तकाने या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. ‘ग्रंथग्राम’मधील हे वेगळेपण ठरले. पुस्तकांच्या अन्य दालनात नेहमीप्रमाणे व्यक्तिमत्त्व विकास, प्रवासवर्णन, आत्मचरित्रे, अध्यात्म, पाककला, ज्योतिष आदी विषयांवरील पुस्तकांना मागणी होती.

साहित्य संमेलनाचा उद्घाटन व समारोप सोहळ आणि काही परिसंवाद वगळले तर संमेलनातील अन्य कार्यक्रमांना विशेष गर्दी होत नाही, हे चित्र डोंबिवली साहित्य संमेलनातही पाहायला मिळाले. एकाच वेळी मुख्य मंडपासह तीन ते चार ठिकाणी चर्चा व परिसंवादाचे कार्यक्रम सुरू होते. त्यामुळे गर्दी विभागली गेली होती. मुख्य मंडपात झालेल्या ‘युद्धस्य  कथा’, ‘प्रतिभायन’ आणि अन्य काही परिसंवादांना श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लेखक आणि संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले, प्रकाशक रामदास भटकळ यांच्यातील ‘गायक’ श्रोत्यांना अनुभवता आला व ऐकायला मिळाला. गझल काव्य प्रकाराला उत्तेजन मिळावे यासाठी ‘गझल कट्टा’ हे स्वतंत्र दालन होते. त्याला तसेच नवोदित क वींच्या कवी कट्टय़ालाही चांगला प्रतिसाद मिळाला. पण एकूण विचार केला तर संमेलनात कार्यक्रमांचा भडिमार झाला होता त्याची संख्या कमी करता आली असती.

मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस हे वर्षभरात त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहिले. ते बेधडक बोलतातही. त्यामुळे उद्घाटन सोहळ्यात पुणे येथील राम गणेश गडकरी यांच्या पुतळा उखडण्याप्रकरणी संबंधित ‘संभाजी ब्रिगेड’चे थेट नाव घेऊन त्या संघटनेचा व त्यांच्या कृत्याचा निषेध करतील अशी सुजाण साहित्यप्रेमी व वाचकांची अपेक्षा होती. मात्र सबनीस यांनी असा थेट उल्लेख करण्याचे टाळले. संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनीही त्यांच्या अध्यक्षीय भाषणात याचा थेट निषेध केला नाही. तसेच त्यांचे भाषणही दरवर्षीच्या संमेलनाध्यक्षांच्या भाषणाप्रमाणे रटाळ व एकसुरी झाले. छापील भाषण वाचून दाखविण्यापलीकडे त्यात काहीच वेगळेपण नव्हते. संमेलनाच्या समारोपात खुल्या अधिवेशनात ‘गडकरी पुतळा’ घटनेचा निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला, पण त्यातही हे कृत्य  करणाऱ्या  संघटनेचे थेट नाव घेण्याचे टाळण्यात आले. संमेलन समारोपप्रसंगी ‘आगरी युथ फोरम’तर्फे महामंडळाच्या तर महामंडळातर्फे ‘आगरी युथ फोरम’च्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात जवळपास पाऊण तासांचा वेळ वाया गेला. कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वगळून त्याची महापालिका/नगरपालिका करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. याच ठरावावरून संमेलन व्यासपीठाचा राजकीय आखाडा झालेला उपस्थितांना पाहायला मिळाला. साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदा असे घडले. मांडण्यात आलेल्या या ठरावावर व्यासपीठावरूनच वाद-प्रतिवाद झडले.

साहित्य संमेलनाला आणि त्यातील कार्यक्रम, चर्चा, परिसंवाद यात साचेबद्धपणा येत चालला आहे. गेली काही वर्षे तेच तेच विषय  आलटून-पालटून किंवा वेगळ्या नावाने संमेलनात येत आहेत. तीन-तीन तास चालणारे उद्घाटन व समारोप सोहळे, एकमेकांचे सत्कार, संमेलनाध्यक्षांचे छापील व रटाळ भाषण, खुल्या अधिवेशनात मांडण्यात येणारे ठराव, तेच तेच नेहमीचे दिसणारे चेहरे आता सवयीचे झाले आहे. यात आमूलाग्र बदल होणे आणि एकूणच साहित्य संमेलन आयोजनाचे स्वरूप पालटणे आवश्यक झाले आहे. तीन दिवसांऐवजी एक किंवा दोन दिवसांचे संमेलन, भारंभार परिसंवाद, चर्चा आणि कार्यक्रमांऐवजी मोजकेच कार्यक्रम, संमेलनाध्यक्षाने छापील व रटाळ भाषण वाचून दाखविण्याऐवजी पंधरा मिनिटे ते अर्धा तास इतक्या मोजक्या वेळेत केलेले उत्स्फूर्त भाषण, व्यासपीठावर लोकप्रतिनिधी व महामंडळाच्या भरमसाठ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती नसणे, महामंडळ अध्यक्ष आणि स्थानिक आमदार/खासदार/मंत्री वगळता व्यासपीठावरील अन्य खोगीरभरती बंद करणे, राजकीय नेते किंवा अन्य सेलिब्रेटी न बोलाविता समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्या मंडळींना उद्घाटन व समारोप सोहळ्यास बोलाविण्याचा नवा पायंडाही साहित्य संमेलनात पाडता येऊ शकेल.

‘आगरी युथ फोरम’ने डोंबिवलीत आयोजित केलेल्या ९० व्या साहित्य संमेलनात असे काही वेगळे बदल करायला हवे होते. तसा आग्रह साहित्य महामंडळाकडे धरायला हवा होता. ते पुढील संमेलन आयोजकांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरले असते. डोंबिवली साहित्य संमेलनाने एक वेगळा पायंडा पाडला आणि काहीतरी नवे बदल घडविले अशी साहित्य संमेलन इतिहासात नोंदही झाली असती. पण डोंबिवली साहित्य संमेलनही रुळलेल्या वाटेवरूनच पार पडले. दरवर्षीप्रमाणे साहित्य संमेलन उरुसाचा उपचार कमी-जास्त वाद व सोयी-गैरसोयींसह सुफळ, संपूर्ण पार पडला.

कला दिग्दर्शक संजय धबडे  यांची सजावट
बॉलीवूडमधील प्रख्यात कला दिग्दर्शक संजय धबडे हे डोंबिवलीकर. त्यांनी कल्पकतेने संमेलन व्यासपीठ, पु. भा. भावे साहित्य नगरीचे मुख्य प्रवेशद्वार सजविले होते. पेनाच्या निफचा आकार असलेला उंच सेल्फी पॉइंट, कारंजी तसेच पु. ल. देशपांडे, शांताबाई शेळके, बहिणाबाई चौधरी यांचे पुतळे आणि संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या भव्य मूर्ती व मंदिरेही लक्षणीय ठरली. या सर्वच ठिकाणी सर्वसामान्य नागरिक व साहित्यप्रेमींची छायाचित्रे काढून घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

08-lp-jhonडोंबिवली साहित्य संमेलनात परदेशी पाहुणा
डोंबिवली साहित्य संमेलनात समारोपाच्या दिवशी म्हणजे रविवारी लंडननिवासी जॉन गॉल्टनने हजेरी लावली होती. जॉन ‘मानववंश शास्त्र’ या विषयात ‘डॉक्टरेट’ करत असून या ‘भाषिक संशोधन’या विषयावर अभ्यास करण्यासाठी तो सध्या मुंबईत आला आहे. ‘आयबीएम’ कंपनीत ‘सॉफ्टवेअर इंजिनीअर’ म्हणून काम करणाऱ्या डोंबिवलीकर कौशिक लेले या तरुणाकडे जॉन सध्या मराठीचे धडे गिरवितो आहे. कौशिकचे दोन ब्लॉग असून हे ब्लॉग व ‘यु टय़ूब’च्या माध्यमातून तो अमराठी लोकांना मराठीचे ‘ऑनलाइन’धडे देत आहे. आपल्या गावात मराठी साहित्य संमेलन होत आहे तर तू संमेलनाला येशील का, असे कौशिकने जॉनला विचारले आणि तो तयार झाला. साहित्य संमेलनात कौशिकसह जॉन ‘ग्रंथग्राम’, संमेलनाचा मुख्य मंडप व अन्य ठिकाणी फिरला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे नेमके काय हे त्याने पाहिले व अनुभविले. याबाबत ‘लोकप्रभा’शी बोलताना जॉन म्हणाला, गेल्या दोन-अडीच वर्षांपासून मी ऑनलाइन मराठी भाषा शिकत आहे. आता देवनागरी लिपी मला समजते. मोडक्या-तोडक्या भाषेत का होईना, पण मला मराठी बोलता येते आणि थोडेफार समजते. पुस्तकांचे भव्य प्रदर्शन आणि एकूणच हे संमेलन मला खूप आवडले. येथे येऊन मला आनंद झाला.
शेखर जोशी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2017 1:05 am

Web Title: marathi sahitya sammelan 2017
Next Stories
1 धर्मस्वातंत्र्य घरी, सरकारदरबारी नव्हे!
2 राज्याचा आढावा : सोलापूर – निर्बीजीकरणात सातत्याचा अभाव
3 राज्याचा आढावा : पुणे – पुण्यात श्वानराज्याची धास्ती
Just Now!
X