-सुनिता कुलकर्णी

करोनासंदर्भात घ्यायच्या काळजीबाबतची सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुखपट्टी. जगभरात सगळीकडेच आरोग्य क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी घराबाहेर पडताना लोकांनी मुखपट्टी वापरावी याचा आग्रह धरला. असं असेल तर कशा प्रकारची मुखपट्टी सगळ्यात सुरक्षित, सगळ्यात चांगली याचीही चर्चा झाली. त्यावरही संशोधन झालं, अभ्यास झाला आणि बहुतेक तज्ज्ञांनी ‘कोविड-19’ ला अटकाव करण्यासाठी ‘N 95’ ही मुखपट्टी सगळ्यात चांगली असल्याचा निर्वाळा दिला. पण ‘N 95’ या मुखपट्ट्या वैद्यकीय वापरासाठी होत्या. शिवाय त्या महाग होत्या आणि जास्त वेळ चेहऱ्यावर ठेवायच्या तर गैरसोयीच्यादेखील होत्या. त्यामुळे आपल्या देशासह अनेक देशांमधल्या वैद्यकीय क्षेत्रातल्या जाणकारांनी चेहरा झाकू शकणाऱ्या, नाकावरून सहज बांधता येतील अश सुती कापडाच्या घरगुती पद्धतीच्या मुखपट्ट्या वापरायला हरकत नाही असं सुचवलं.

आता आपल्याकडे पावसाळा सुरू झाला आहे. आधीच ‘कोविड’चा कहर आणि त्यात पावसाळा म्हणजे संसर्गजन्य आजारांचा ऋतू. त्यात आणखी काळजी घेण्याची गरज असते. नुकतेच इंडियन सायंटिस्ट्स रिस्पॉन्स टू कोविड -19 (आयएसआरसी) या व्यासपीठातर्फे एक वेबिनार आयोजित केले होते. डॉक्टर, इंजिनियर, संशोधक, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, पत्रकार, विद्यार्थी अशी वेगवेगळ्या क्षेत्रामधली पाचशेहून जास्त माणसं या व्यासपीठाशी निगडित आहेत. या वेबिनारमध्ये असं मांडण्यात आलं की पावसाळ्याच्या काळात तिपदरी सर्जिकल मुखपट्टी वापरणे आवश्यक आहे.

मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या डॉ. अर्णव भट्टाचार्य यांनी सांगितलं की या मुखपट्टीला असलेल्या बाह्य आवरणामुळे ती पावसाळी वातावरणात पटकन ओली होत नाही. या प्रकारच्या मुखपट्ट्यांना हायड्रोफोबिक बाह्य आवरण असतं. तुमच्या मुखपट्टीला असं आवरण आहे का? ते पाहण्यासाठी तिच्यावर पाण्याचा एक थेंब टाकून बघा. तिच्यावर हायड्रोफोबिक आवरण असेल तर पाण्याचा थेंब तिच्यावरून घरंगळून जाईल, असं ते सांगतात.

ही मुखपट्टी योग्य पद्धतीने घालणं आवश्यक असतं. या मुखपट्टीचे फिका रंग असलेले आवरण आतल्या बाजूसाठी तर गडद रंग असलेले हायड्रोफोबिक आवरण बाहेरील बाजूसाठी असते. त्याची आतली बाजू जलरोधक नसते, त्यामुळे ही मुखपट्टी आतल्या बाजूने ओली झाली तर ती कोरडी होण्यासाठी बाजूला ठेवून दुसरी वापरणे हाच उपाय असतो. ही मुखपट्टी पूर्ण ओली झाली तर ती टाकून द्यायची असते कारण सतत ओली होऊन तिची कार्यक्षमता संपुष्टात येते.

अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनी या काळात मुखपट्टीबरोबरच फेस शील्ड वापरणं आवश्यक आहे. फेस शील्डमुळे त्यांच्या चेहऱ्यावरची मुखपट्टी ओली कोरडी राहू शकेल, असा मुद्दा या वेबिनारमध्ये मांडण्यात आला.