वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com
आजच्या काळात अपरिहार्य असलेल्या सोशल मीडियाचा नेमका आणि योग्य वापर करून घेतला जातो का? काही साइट्सवर नजर टाकली तर अनावश्यक माहिती निर्माण केली जाते आणि इकडून तिकडे फिरवली जाते, असं दिसतं.

आजच्या काळात सोशल मीडिया ही अपरिहार्य गोष्ट आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात राहू इच्छिणाऱ्या, काहीतरी करू इच्छिणाऱ्या आजच्या काळातल्या कुणालाही सोशल मीडियाशिवाय जगणं, जगता येणं अशक्य आहे. हा बदल अगदी अलीकडच्या काळातला आहे. गेल्या २५-३० वर्षांत तंत्रज्ञानात झालेल्या क्रांतीने आपलं समाजमन फार वेगाने ढवळून काढलं आहे. २५-३० वर्षांपूर्वीच्या संपर्क यंत्रणांची व्यवस्था कशी होती हे ऐकलं तर त्यावर आजच्या स्मार्टफोन वापरणाऱ्या स्मार्ट पिढीचा कणभरही विश्वास बसत नाही. एक काळ असा होता की एका गावाहून दुसऱ्या गावाला महत्त्वाचा निरोप पाठवायला तार हे वेगवान साधन होतं. पत्र पाठवणं हे आधुनिक समजलं जायचं. मग फोन आले. घरी लॅण्डलाइन फोन असणं हे श्रीमंतीचं लक्षण होतं. तेव्हा घरातले सगळे जण मिळून तो एक फोन वापरायचे. आसपासचे लोकही त्या घरातला फोन अडीअडचणीला वापरता यावा यासाठी त्या कुटुंबाचे चांगले संबंध राखून ठेवायचे. बाहेरगावी कुणाशी तरी बोलण्यासाठी ट्रंककॉल करावे लागायचे. तेसुद्धा आधी बुक करावे लागायचे. असं सगळं करण्यासाठी फोन घरी हवा असेल तर त्यासाठी नंबर लावावा लागायचा. त्याची प्रतीक्षा यादी मोठी असायची. आता एकेका व्यक्तीकडे किमान एक मोबाइल असतो. त्या एका मोबाइलमध्ये दोन सीम कार्ड असतात. त्यामुळे बहुतेकांकडे किमान दोन मोबाइल नंबर असतात आणि त्याच्या हातातल्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यू-टय़ुब, स्काइप एवढी तरी किमान समाजमाध्यमं असतात. या सगळ्या समाजमाध्यमांवर सेकंदासेकंदाला कुणी तरी टाकलेल्या नवनवीन पोस्ट येत असतात. त्यातून माहितीचा प्रचंड ओघ निर्माण होत असतो. ही सगळीच माहिती त्या त्या वापरकर्त्यांच्या उपयोगाची असो किंवा नसो, ती सतत त्याच्यावर येऊन आदळत असते. त्या अर्थाने कोणताही सर्वसामान्य माणूस दिवसाचे २४ तास सोशल मीडियावर असतो. हे आजच्या काळातले कट्टेच आहेत.

lok sabha election 2024 phase 1 of lok sabha polls registers 62.37percent polling despite heatwave
६२.३७ टक्के मतदान; पहिल्या टप्प्यात २०१९ पेक्षा ७ टक्के मतांची घसरण; त्रिपुरात सर्वाधिक
demat accounts touch 15 crore in march 2024
डिमॅट खाती पहिल्यांदाच १५ कोटींच्या पुढे
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
Glenn Maxwell makes bizarre comment on Virat Kohli
T20 World Cup : ‘मला आशा आहे की विराट कोहलीची निवड होणार नाही’, आरसीबीच्या ‘या’ खेळाडूचे चकित करणारे वक्तव्य

सामान्य माणसाचा सामाजिक सहभाग पूर्वी अशा पद्धतीचा नव्हता. तो सामाजिक पातळीवर जगायचा, पण त्यासाठी एकत्र यायची माध्यमं वेगळी होती. वेगवेगळ्या सभा, भाषणं, कार्यक्रम या निमित्ताने लोक एकत्र यायचे. २५-३० वर्षांपूर्वी ही माध्यमं जोरात असायची. त्यांना गर्दी व्हायची. पण लोकांना उठून या कार्यक्रमांच्या ठिकाणी जावं लागायचं. तेही हे कार्यक्रम कुणी आयोजित केले असतील तर, ते जेव्हा असतील तेव्हा आणि जिथे असतील तिथे जाऊन त्यांचा आस्वाद लोकांना घेता यायचा. तिथे लोकांची भूमिका फक्त ऐकणाऱ्याची असायची. त्यांना तिथे त्यांचं मत मांडायला काहीच संधी नसायची. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सगळे कट्टे लोकांच्या घरात नाही तर थेट हातातच आले आहेत. लोकांना स्वत:ला उठून कुठे जावं लागत नाही तर ही सगळी माध्यमं त्यांच्या हातातच आहेत. त्यातल्या कोणत्या माध्यमात सहभागी व्हायचं, कोणत्या नाही याचा निर्णय लोकांच्याच हातात आहे. या माध्यमांवर जाऊन कुणीतरी काहीतरी मांडतंय आणि लोकांनी ते फक्त पाहायचं, ऐकायचं आहे असं नाही, तर त्यांना स्वत:ला जे म्हणायचं आहे, ते मांडायचं, चर्चा करायचं स्वातंत्र्य आहे. समाजमाध्यमांनी लोकांना काय दिलं याचा विचार केला तर या जमेच्या बाजू पुढे येतात. एवढे दिवस माध्यमांकडून माहितीचा स्रोत लोकांपर्यंत यायचा. आता माहिती लोकांकडून या समाजमाध्यमांकडे जाते आहे. त्यामुळे एखादी नुकतीच घडलेली घटना, वृत्तवाहिन्यांच्या भाषेत सांगायचं तर ब्रेकिंग न्यूज पारंपरिक माध्यमांमधून कळण्याच्याही आधी समाजमाध्यमांमधून पसरलेली असते. अशा सगळ्यामुळे मला समाजमाध्यमं नकोत, त्यांच्याशिवाय मी जगेन असं म्हणून आज कुणालाही जगाशी जोडून न घेता जगता येत नाही.

याचा दुसरा परिणाम म्हणजे समाजमाध्यमांमधून सातत्याने वाहत असलेला डेटा, माहिती. एखादी नदी जशी अखंड वाहत असते, तसा हा डेटा सतत वाहत असतो; पण नदीसारखा तो एकरेषीय नसतो. एखादी माहिती ‘अ’कडून ‘ब’कडे जाते. मग ‘ब’कडून ती ‘क’कडेच जाते असं नाही. ती ‘अ’कडून ‘ब’बरोबरच आणखी १०० जणांकडे जाते. त्या १०० जणांकडून एकमेकांना कुणालाही पाठवली जाते. त्यांच्यातल्याच कुणाकडून तरी ती परत ‘अ’कडेही येऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅपवरची एखादी पोस्ट इकडून तिकडे अशी भारंभार फिरताना दिसते. असं आपल्याला एका वेळी एखाद्या पोस्टबद्दल जाणवतं. प्रत्यक्षात जगभरात ते केवढय़ा मोठय़ा प्रमाणात चालत असेल याचा आपण केवळ अंदाज करू शकतो.

जगात सोशल मीडियावर दर मिनिटाला ८४० नवीन वापरकर्ते सहभागी होतात. २०१३ च्या तुलनेत २०१७ मध्ये ट्विटरवर ५८ टक्के ट्वीट्स वाढल्या. २०१७ मधल्या ट्वीट्सची संख्या दर मिनिटाला ४५५,००० एवढी होती. यूटय़ूबच्या वापराबाबतची आकडेवारी सांगते की, २०१४-२०१६ मध्ये दर मिनिटाला ४०० तासांचे व्हिडीओ यूटय़ूबवर बघितले जात असत. आता ४,१४६,६०० व्हिडीओ दर मिनिटाला बघितले जातात. इन्स्टाग्रामवर दर मिनिटाला ४६,७४० पोस्ट अपलोड केल्या जातात. २०१३ मध्ये दर मिनिटाला जेवढय़ा फेसबुक पोस्ट शेअर व्हायच्या त्यांच्या संख्येत २०१६ पर्यंत २२ टक्के वाढ होऊन त्यांची संख्या ३ कोटींच्या आसपास गेली. आता फेसबुकवर दर मिनिटाला ५१०,००० कॉमेंट्स केल्या जातात, २९३,००० स्टेट्स अपडेट होतात, १३६,००० फोटो अपलोड होतात. दर मिनिटाला ४ कोटी लाइक्स दिले जातात. दर मिनिटाला ३,६०७,०८० गुगल सर्च होतात आणि दर मिनिटाला जगभरात १५,२२०,७०० एवढे लिखित मेसेज पाठवले जातात.

ही सगळी आकडेवारी दडपून टाकणारी आहे; पण हा सगळा डाटा  आपल्याचकडून निर्माण होत असतो, शेअर केला जात असतो, लाइक केला जात असतो. त्या अर्थाने आपण त्या आकडेवारीचा, त्या डाटाचा एक भाग असतो. खूपदा आलं काही चांगलं, कर चार जणांना शेअर, असं करत आपण या डाटामध्ये भर घालत असतो; पण त्याची खरंच गरज आहे काय याचा विचार मात्र आपण करत नाही. कारण कुणाकडून तरी आलेली माहिती आपण पुढे कुणाला तरी निर्थकपणे पाठवत राहतो. दिवसभरात मिळून आपल्याला सोशल मीडियावरून काय काय येत असतं त्यातलं आपल्या खरोखर उपयोगाचं काय असतं, या सगळ्या माहितीचं नेमकं काय करायचं याची प्रातिनिधिक पाहणी केली. ‘एक दिवस सोशल मीडियावर’ हे त्याचं फलित आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर दिवसभर येणाऱ्या मेसेजेसची ठरवून पाहणी केल्यावर त्या सगळ्या मेसेजेसमध्ये एक ‘मेथड इन मॅडनेस’ आहे असं जाणवलं. इथे सोयीसाठी दोन-तीन ग्रुप्सवर दिवसभरात काय चालतं याची नोंद घेतली आहे.

सकाळी सहा वाजल्यापासून वेगवेगळ्या ग्रुपवरून गुड मॉर्निगचे मेसेजेस सुरू झाले. त्यात वेगवेगळ्या फुलांची खरी तसंच फोटोशॉप केलेली प्रसन्न छायाचित्रे होती. वेगवेगळ्या ठिकाणच्या सूर्योदयाची छायाचित्रे होती. त्यातली बरीच फोटोशॉप केलेली होती. हसणाऱ्या लहान मुलांची वेगवेगळी छायाचित्रं सुप्रभात, शुभ प्रभात किंवा गुड मॉर्निग म्हणत होती. काही मेसेजेसमध्ये जगण्यातली सकारात्मकता अधोरेखित करणारे सुविचार होते. ‘शुभ सकाळ, आपल्यामधला विश्वास पर्वतालाही हलवू शकतो, परंतु आपल्यामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करते.’ असे सुविचारवजा मेसेज होते. याशिवाय चहाची वेळ झाली याची आठवण करून देणारे, आता चहा घ्या, असं सुचवणारे आणि त्यासाठी चहाचा कप किंवा चहाच्या किटलीची फोटोशॉप केलेली छायाचित्रे होती. साधारण सगळ्या ग्रुप्सवर तसंच वैयक्तिक पातळीवर दोनेक तास हा मारा झाल्यानंतर साडेआठच्या सुमारास मेसेज बदलायला लागले. कुणीकुणी कुठेकुठे वाचलेल्या, आवडलेल्या, न आवडलेल्या बातम्या शेअर करायला सुरुवात केली. त्यामध्ये व्यापम घोटाळ्यातील आरोपी डॉ. मनीषा यांचा इंजेक्शनचा जास्त डोस घेऊन मृत्यू, कन्हैया कुमारच्या ताफ्यावर हल्ला, गाडय़ांची मोडतोड अशा बातम्या होत्या. हळूहळू अशा वेगवेगळ्या बातम्या एकमेकांना पाठवल्या जाऊ लागल्या. कुणी त्या फॉरवर्ड केल्या, कुणी त्यांच्यावर कॉमेंट केल्या, कुणी त्या कॉमेंटवर चर्चा केली.

एका ग्रुपवर सदस्याचा वाढदिवस होता. तो रात्री १२ नंतरच सुरू झाला होता. रात्री बारानंतर त्याला काही जणांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्या नुसत्या नव्हत्या तर त्या शुभेच्छाबरोबर सुंदर बुकेंचे फोटो होते. शिवाय केक होते, चॉकलेट्स होती. नुसती फुलं होती. तुम जियो हजारो साल वगैरे टायपोग्राफी होती. ग्रुपचा डीपी म्हणून वाढदिवसवाल्या सदस्याचं छायाचित्र होतं. सकाळी साधारण दहा अकरापर्यंत बहुतेकांचं वाढविसाच्या शुभेच्छा देऊन आणि त्या व्यक्तीचं दर दोनचार मेसेजेसनंतर सगळ्यांचे आभार मानून झालं. आता हे सगळं संपून ग्रुप नवीन काही तरी सुरू करेल असं वाटत असतानाच दुपारी एक नंतर हॅपी बर्थ आफ्टरनून सुरू झालं. पुन्हा केक, बुके, चॉकोलेट्स आणि मेसेजेस, शेरोशायरी, चारनंतर सगळी मंडळी थोडी शांत झाली आणि सहापासून हॅपी बर्थ इव्हिनिंग सुरू झालं. कुणी तरी वाढदिवसवाल्या सदस्याबद्दल कौतुकाची पोस्ट लिहिली. तीही अनेकांनी लाइक केली. आपला त्या व्यक्तीबद्दलचा अनुभव लिहिला. त्या व्यक्तीचा वाढदिवस असल्याने हे अनुभव अर्थातच कौतुकवजा होते. हॅपी बर्थ नाइट करून व्हॉट्सअ‍ॅपरचा या ग्रुपचा दिवस संपला.

दुसऱ्या एका ग्रुपवर दिवसाची सुरुवात ‘remember you are living in modified new india.’ या ‘सुविचारा’ने झाली. पण मग लाइफ अ‍ॅण्ड स्टाइलविषयक मेसेज सुरू झाले. उदाहरणार्थ लिपस्टिक कुठल्या तरी घातक रसायनांपासून तयार केलेली असते, तेव्हा ती वापरणं किती धोकादायक आहे, हे सांगणारा व्हिडीओ कुणी तरी शेअर केला. लिपस्टिक वापरणारे हे सगळं चुकीचं आहे, हे असं काही नसतंच, असं सांगत होते तर लिपस्टिक वापरणारे हे बघा आणि लिपस्टिक वापरू नका अशी चर्चा करत होते. मग कुणी तरी आणखी काय काय घातक असतं अशी चर्चा सुरू केली. अपरिहार्यपणे ती दूधसुद्धा हल्ली किती घातक असतं इथपर्यंत येऊन पोहोचली. दूधच घातक असेल तर शुद्ध काय उरलं, असा मुद्दा कुणी तरी उपस्थित केला. त्यावर चर्चा सुरू झाली तेवढय़ात ग्रुपमधले तिघे त्याच क्षणी कुठे तरी भेटले होते आणि त्यांनी तिघांचा, ते काय खात होते त्याचा सेल्फी टाकला आणि गंभीर चर्चेला एकदम वेगळं वळण मिळालं. भराभरा या सेल्फींना कौतुकाचा अंगठा दाखवणं सुरू झालं. ते तिघंही कुठे आहेत, काय खाताहेत, आम्हालापण का सांगितलं नाही, आता ग्रुपचं गेटदुगेदरच करायला हवं ही चर्चा सुरू झाली. त्या तिघांनी मात्र बहुतेक फोटो टाकून सगळ्यांना जळवून फोन बंद करून गप्पा आणि खाण्याकडे मोर्चा वळवला होता.

आणखी एका ग्रुपवरची सकाळ ‘वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात देव मदत करतो.’ या सुविचाराने झाली. मग दसरा उद्या साजरा करायचा की परवा, असा प्रश्न कुणी तरी विचारला. वेगवेगळे लोक वेगवेगळं सांगताहेत, मग काय करायचं, कालनिर्णयप्रमाणे जायचं का यावर चर्चा सुरू झाली. मग या वेळचा दसरा वेगवेगळ्या दिवशी का आहे याच्या कारणांची ग्रुपवर चर्चा सुरू झाली. १२-१३ जण त्यावर आपलं मत मांडून मोकळे झाले. तेवढय़ात कुणी तरी ‘पुण्यातली लोकप्रिय हॉटेल्स अस्वच्छतेत नंबर वन.’ ही हॉटेल वैशाली, रुपाली आणि गुडलकच्या संदर्भातली बातमी टाकली आणि दसऱ्याची चर्चा हॉटेल या विषयावर वळली. ती साधारणपणे सगळीच हॉटेल्स अशीच असतात इथपासून वैशाली, रुपाली हा पुणेकरांचा निव्वळ स्टेटस सिम्बॉल कसा आहे, मला हॉटेलच्या अस्वच्छेतेचे अनुभव कसे आले इथपर्यंत रंगली. मग अचानक एटीएमचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, कशी घ्यावी असा एक मोठा मेसेज कुणी तरी टाकला. त्याला दहा-बारा जणांनी ‘अंगठा’ दाखवला आणि दुजोरा दिला. ते सुरू असतानाच कुणी तरी घरच्या झाडाला आलेल्या फुलाचं छायाचित्र टाकलं. पुन्हा अनेकांच्या लाइक्स, त्या फुलावरून उर्दू शेर, पुन्हा त्याला लाइक हे सगळं सुरू झालं. मग दुसऱ्या व्यक्तीने आपल्या घरातल्या झाडाचं, फुलांचं छायाचित्र टाकलं. त्याला लाइक मिळायला लागले. मध्येच कुणी तरी एक विनोद टाकला. त्याच्या स्मायली सुरू झाल्या. दसरा अगदी जवळ आला आहे हे सूचित करणारी रांगोळ्यांची, झेंडूच्या फुलांची, पाटीवर काढलेल्या सरस्वतीची छायाचित्रे टाकली गेली. आणि मग एकदम दसऱ्याच्या इन अ‍ॅडव्हान्स शुभेच्छा सुरू झाल्या त्या रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. या तिन्ही ग्रुपवर माणसं वेगवेगळी असली तरी गुडमॉर्निगचे मेसेजेस, जोक्स, सुविचारांचे मेसेजेस, उर्दू शेरोशायरी एखादा दुसरा अपवाद वगळता तीच होती.

फेसबुक

व्हॉट्सअ‍ॅपच्या तुलनेत फेसबुक हे एकदम वेगळं माध्यम. फेसबुकही आपल्या सदस्यांना वेगवेगळ्या पद्धतीने जोडून घेत इंटरॅक्टिव्ह राहायचा प्रयत्न करतं. म्हणजे कुणाकुणाच्या दोघांच्या मैत्रीला पाच र्वष, सात र्वष झाल्याचं सेलिब्रेशन म्हणून फेसबुकनेच त्या दोघांच्या फोटोंचा वापर करून तयार केलेले व्हिडीओ असतात. तुम्ही कुणाशी मैत्री करा हे सुचवत फेसबुक तुमची मित्र यादी वाढवायला मदत करतं.

फेसबुकवर दोन-चार ओळींपासून हवा तेवढा मोठा मजकूर लिहिता येतो, फोटो टाकता येतो, व्हिडीओ टाकता येतो, फेसबुक लाइव्ह करता येतं, फेसबुक पेज चालवता येतं, अशा अनेक गोष्टींमुळे फेसबुक हे लोकप्रिय समाजमाध्यम आहे, बिग बी अमिताभ बच्चन यांनी यूपीतल्या शेतकऱ्यांना मदत करायचं ठरवलं असून ८५० शेतकऱ्यांना ५.५ कोटींचं अर्थसाहाय्य देणार आहेत, ही बातमी फेसबुकवर वर्तमानपत्राच्या फेसबुक पेजवरून शेअर केली गेली. १.७ हजार लोकांनी ती लाइक केली, १६८ लोकांनी शेअर केली आणि २८१ लोकांनी तिच्यावर कॉमेंट केली. या कॉमेंटमध्ये सगळ्याच्या सगळ्या लोकांची भावना अशी होती की त्यांची जन्मभूमी भलेही यूपी असेल, पण कर्मभूमी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातले शेतकरी आत्महत्या करताहेत तर त्यांनी जी काही मदत करायची ती इथल्या शेतकऱ्यांना करायला पाहिजे होती. नुकताच प्रसिद्ध झालेला ‘तुम्बाड’ हा सिनेमा एका मुलीला अतिशय आवडला असावा. ‘तिने तुम्बाड’शी संबंधित फोटो आणि पोस्टचा दिवसभर मारा केला होता. तिच्या पोस्टवर तुला आवडला सिनेमा म्हणजे आम्हालाही का आवडावा, आम्ही पैसे खर्च करून का बघावा असा प्रतिवाद केला जात होता. पण तिला आवडलेल्या सिनेमाच्या कौतुकाचे मेसेज जास्त होते. आपल्याकडे लॅब्रोडोर, डॉबरमॅन, जर्मन शेफर्ड, पग या सगळ्या जातीच्या कुत्र्यांची पिल्लं उपलब्ध आहेत आणि इच्छुकांनी संपर्क साधावा या पोस्टला ३०-३५ लाइक मिळाले होते. गांधीजी हा समाजमाध्यमांमध्ये कायमच ‘हिट’ असलेला विषय. ‘गांधीजींचे सत्याचे प्रयोग’ या विषयावर लिहिलेल्या पोस्टमालिकेवर घमासान चर्चा सुरू झाली. या चर्चेत गांधीजींना मानणारे आणि न मानणारे असे दोन उघड तट होते. गांधी या विषयाला भारतात अजूनही ग्रे शेड्स नाहीत, असाच याचा अर्थ घ्यायचा का? अमृतसर येथे झालेल्या रावणदहनादरम्यानच्या अपघातावर दु:ख व्यक्त करतानाच लोकांना त्यातून आपल्या व्यवस्थांवरचा, धर्मभोळेपणावरचा, सुरक्षेचा विचार न करता केलेल्या सेलिब्रेशनवरचा राग व्यक्त करायचा होता. अमृतसरला जे झालं त्याचा पूर्वपक्ष इतर ठिकाणी वेगवेगळ्या सण, उत्सव, जत्रा, यात्रांदरम्यान होतच असतो असं त्यांचं म्हणणं. पण या मुद्दय़ावर आस्तिक-नास्तिक लोकांमध्ये फेसबुकवर भांडणं लागली होती. नास्तिक लोकांनी आता फटाके फोडून आनंद व्यक्त करू नये असं आस्तिक लोक त्यांना बजावताना दिसत होते. एका तरुण लेखकाने आपल्या आगामी कादंबरीतला पाचेकशे शब्दांचा एक तुकडा शेअर केला आणि त्याच्यावर आम्हाला याचा मागचापुढचा भाग वाचायची उत्सुकता निर्माण झाली आहे हे सांगणाऱ्या पोस्ट होत्या. एका व्यक्तीचा मुलगा काही दिवस बेपत्ता आहे, कुणाला काही माहीत असल्यास कळवा या आवाहनाला तो स्वत:हून निघून गेला नसेल कशावरून हीच प्रतिक्रिया जास्त प्रमाणात दिसली.

ट्विटर

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकपेक्षा ट्विटर हे अधिक इंटलेक्चुअल माध्यम आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसारखं इथे भसाभसा लिहायचं नसतं. तसं लिहून चालतच नाही. तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते २८० अक्षरांमध्ये म्हणावं लागतं. आधी त्याची मर्यादा १४० अक्षरं होती. कमीत कमी शब्दांमध्ये काहीतरी म्हणणं ही तशी अवघड गोष्ट. त्यामुळे फार लोक ट्विटरच्या नादाला लागत नाहीत. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, यूटय़ूब वापरणाऱ्यांच्या आणि ट्विटर वापरणाऱ्यांच्या संख्येत त्यामुळेच जमीन-अस्मानाचा फरक आहे. जे काही म्हणायचं आहे ते थोडक्यात आणि नेमकेपणाने म्हणणं ट्विटरवर अपेक्षित असल्यामुळे तसं नेमकेपणाने काही सांगता येत नसतं ते लोक ट्विटरचा फारसा वापर करत नाहीत असं दिसून आलं.

इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम हे वाचण्यापेक्षा बघण्याचं माध्यम जास्त आहे. आपण काढलेले चांगले फोटो इन्स्टाग्रामवर टाकून ते जास्तीतजास्त पोहोचवण्याऐवजी आपले जास्तीत जास्त फोटो इन्स्टाग्रामवर टाकण्याला प्राधान्य दिलं जाताना दिसतं. यालाही अर्थात अपवाद आहेतच. पण ते वगळता सर्वसामान्यांच्या पातळीवर इन्स्टाग्राम म्हणजे स्वत:च्या सचित्र मार्केटिंगचं माध्यम आहे.

एकूण सोशल मीडियावरच्या माहितीच्या महाजंजाळात किती अडकायचं हे ठरवायची आता वेळ आली आहे.