जॉब गेल्यावर पोरगा मुंबईतून गावी यावा तसा पाऊस आला. गॅस अचानक गेल्यावर गृहिणी जशी दिसते तशी माझ्या आवारातली चिंच वाऱ्यावर कावरीबावरी झाली. सगळी मजा असते! ‘ऑफबीट’ पावसाने अवकाळी रूप धारण केलं तर काही वाटत नाही. त्या चक्रम निसर्गचक्राची सवय झालीय, पण पावसाळा वेळच्या वेळी आला, तर मात्र ती नवलकथा वाटू लागते. पूर्वी पावसाचे म्हणून चार महिने आमच्या कौलारू शाळेत सांगितले जयचे. फुटक्या कौलांतून किंवा वादळवाऱ्यात उडून गेलेल्या पत्त्यांतून पाऊस आम्हाला भेटत राहिला. मी आणि तेव्हाचा सख्खा बेंच सोबती प्रताप भट्टे, आम्ही पूर्ण भिजायचो आणि विंदा करंदीकरांच्या कवितेतली ओळही हळूच म्हणायचो

‘हळूच म्हणाल्या मॅडम कुट्टी

चला, पळा शाळेला सुट्टी’

फरक एवढाच की, आमच्या बाईंचं नाव कुट्टी नाही, तर कुंटे होतं. कृष्णाबाई कुंटेबाईंनी अनेक पावसाळे उन्हाळे अख्खं आयुष्य एकटीने झेपवले होते. ती ताकद माझ्यात आली! मी ही वाद-वादळांशी अकेला लढत राहिलो. गुरुजन असा जीवनशैलीचा संस्कारही देतात तर!

पाऊस तर इतकं काही देत असतो की, शेवटी त्याच्यापाशी काहीच राहत नाही. त्याचे ढग विरळ, पोकळ होत जातात. पाऊस सगळ्यांसाठी सारखा मात्र नाही. गायगरीब माणसांच्या झोपडय़ांमध्ये तो नको जन्म करतो आणि पुढच्या जन्माची आशा ठेवावी, तर तेही केवळ स्वप्नरंजन ठरतं.

आपण कुणीच नव्हतो, आपले पूर्वजही नव्हते. मनुष्य प्राणीच पृथ्वीवर नव्हता. तेव्हापासून आकाश पावसाची ओली स्वप्न वाहून नेत आलं. स्वप्नांचंही ओझं होतं. स्वप्नं टाकून मन उठतं.

माझ्या एका स्वप्नात तर गारांच्या पावसात सैरावैरा पळणाऱ्या लाखो मुंग्या मी पाहिल्या. अख्खं वारूळ गारांमुळे झाकलं गेलं आणि रस्त्यावर आलेल्या मुंग्या बिचाऱ्या गारांखाली ठेचल्या गेल्या. गारा वितळल्या, तरी मुंग्या वाहून जाणारच. एखाद्या सिटीवर हमला व्हावा, तसं ते स्वप्नदृश्य होतं. स्वप्नात अशा मुंग्या आल्यावर, नंतर मला झोपच लागली नाही. कुणी तरी रात्री तीन-साडेतीनच्या सुमाराला माझ्या खुराडय़ाची कडी वाजवत होतं. तो वाराच असणार! समीर, मी आता या वेळी दार उघडणार नाही. ही वेळ आहे का घरी यायची? हे बोलूनही काही उपयोग नाही. वारा हाताबाहेर गेला आहे.

पाचूचे पंख असलेले हिरवे बुलबुल शिवणींच्या झाडावर येऊन बसले. शिवण त्यांना म्हणाली, ‘आता पाऊस थांबल्यावर जा. किती भिजलात तुम्ही! स्वत:ची काही काळजीच नाही.’ शिवण काही त्या पाखरांची खरी आई नाही. तिने तरीही त्यांना ममता दिलीय. आमच्या शेजारी दाबके नावाच्या आमच्याच प्राथमिक शाळेतल्या शिक्षिका राहायच्या. त्यांना मूलबाळ नव्हतं. माझ्या आईपेक्षा या दाबके बाईंनी माझी काळजी जास्त घेतली. त्यामुळे ब्राह्मणी पद्धतीच्या गोड जेवणाची मला आवड निर्माण झाली. त्यांना मी ‘तेते’ म्हणायचो. जशी आत्ये, तशी तेते. सावली देणारी ही आमची सगळी भली माणसं जगातून निधून गेली. त्यामुळे, कृष्णविवराप्रमाणे एकेक अस्तित्व गिळणाऱ्या कालशक्तीची तीव्र जाणीवही मळभाच्या पावसाळी काळातच होते.

पावसाळ्यात तरंगणारी क्षणभंगुर लिंबाच्या रंगाची फुलपाखरं असतात, तसे आपण सगळे तेवढय़ापुरतं जगतो. राडे, झगडे विशेष निर्थक वाटतात. भाषणबाजी, हा, जी हा, जी यांचा कंटाळा येतो. जगात फक्त मी आहे आणि माझा पाऊस आहे असा फील येतो. मी वितळणार आहे आणि तरी एखाद्या पुस्तकात गोठूनही पडणार आहे.

कदाचित, अस्तित्वाची ही अंतिम निर्थकता कोवळ्या वयात जाणवल्या-मुळेच माझ्या प्रपंचाची भातुकली मी मांडली नसेल. संसार ही केवळ एक स्वार्थी सोय आणि तडजोड आहे. संसार केला नाही तर काही कडेलोट होत नाही. आम्हा एकेकटय़ा माणसांच्या दिशेने उगाच काही ‘हेलस्टोन्स’ येत असतात. नंतर त्या गाराही वितळतात. पुन्हा आकाश मोकळं होतं!

बालगीतांमधला पाऊस मात्र सुखद असतो. ‘टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू’ असं ते गाणं ‘गिरकी’ घेत सांगतं. दुसरं बालगीत ‘ए आई, मला पावसात जाऊ दे’ म्हणतं. तिसरं ‘पाऊस आला, वारा आला पान लागले नाचू’ म्हणू लागतं. चौथं ‘नाच रे मोरा’ म्हणत त्या देखण्या पाखरराजाला नाचवतं. मला वाटतं, मनाने पुन्हा ‘लहान’ होऊनच पावसाळा अनुभवावा, तरच त्या निरागसतेत जीवनाची अस्तित्ववादी निर्थकता विसरता येईल. गारा वेचता येतील आणि मग हे पानसुद्धा मनात वाचताना नाचू लागेल!
माधव गवाणकर – response.lokprabha@expressindia.com