News Flash

जंगल वाचन : हाका सह्यद्रीच्या!

तरुण गिर्यारोहकांसाठी सह्यद्री हे एक आव्हान...

‘सेव्ह अवर सह्य़ाद्री’ असं ब्रीदवाक्यं घेऊन काही निसर्गप्रेमी सायकलस्वार १२०० किलोमीटरच्या सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांमधून प्रवासाला निघाले आहेत. आपण प्रत्यक्ष जाऊ शकत नसलो तरी ही हाक त्यांना का द्यावीशी वाटली हे तरी समजून घ्यायलाच हवं.

डिसेंबरच्या पहिल्या दिवशी अनेक उत्साही, निसर्गावर प्रेम असणारे सायकलस्वार महाराष्ट्रातील सह्यद्रीच्या पर्वतरांगांमधून १२०० किलोमीटरचा प्रवास करण्यास निघाले आहेत. लोकांना सह्यद्रीच्या जंगलांच्या संवर्धनाचे महत्त्व समजावणे आणि तेथील समस्यांची  जाणीव करून देणे हा त्यांच्या ‘सेव्ह अवर सह्यद्री’ या मोहिमेचा उद्देश  आहे. ‘सेव्ह अवर सह्यद्री’ ह्य शब्दांचे संक्षिप्त रूप आहे ‘एस-ओ -एस’, म्हणजेच आणीबाणीच्या वेळी दिला जाणारा मदतीचा संदेश. ‘आपल्या सह्याद्रीला वाचवा’ असा संदेश देण्यासाठी निघालेल्या त्यांचा उत्साह बघून मलाही हुरूप आला त्या सह्यद्रीच्या जंगलांबद्दल लिहिण्याचा. पण मग वाटलं, सह्याद्री कुणाला नाही माहीत? सह्यद्रीचे ते विस्तीर्ण कडे एकदा पाहिले की कोण  विसरणार? त्यात मुंबई-पुण्याचे अनेक लोक माथेरान-महाबळेश्वर-लोणावळा इत्यादी ठिकाणी जाऊन ‘एको’ पॉइंटवर लहानगे असल्यापासून मनसोक्त आरडाओरड करून आलेले असतात.  महाराष्ट्रातील अनेक लोकांसाठी तर सह्यद्री हे घरंच, तरुण गिर्यारोहकांसाठी सह्यद्री हे एक आव्हान, जीवशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ते एक जिवंत विद्यापीठ! पण अशा ह्या सह्यद्रीच्या पर्वतरांगा काहीजणांसाठी फक्त खनिजांनी भरलेल्या खाणी असतात किंवा लाकूड, वाळू आणि पाणी यांचे मोफत मिळणारे साठे असतात, किंवा अगदी त्यांची कचराकुंडीही होते! तशा आपल्याला ह्य गोष्टी ऐकून माहीतच असतात, भोवतालचं जग बदलतंय, जंगलतोड होतेय, प्रदूषण वाढतंय हे ऐकत, अनुभवत असतो आपण,  पण या बदलांचे गांभीर्य लक्षात येत नाही. एवढय़ा मोठय़ा सह्यद्रीच्या रांगा, आपण काय करणार, त्यांना कसं आणि कशापासून वाचवायचं. असं वाटतं. पण मजेशीर गोष्ट अशी आहे की छोटय़ा छोटय़ा, कुणालाही सहज करता येण्याजोग्या अनेक गोष्टी असतात. सह्यद्री वाचवण्यासाठी त्याच्या वाचनापासूनच सुरुवात करूया का?

28-lp-nature

अरबी समुद्राला लागूनच असणाऱ्या भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर िभतीसारख्या उभ्या राहणाऱ्या, दऱ्या-डोंगरांनी भरलेल्या, पावसाळ्यात असंख्य धबधब्यांनी न्हाऊन निघणाऱ्या सह्यद्रीच्या पर्वतरांगा हिमालयाच्याही कितीतरी आधी जन्माला आल्या. गुजरात-महाराष्ट्र सीमारेषेपासून सुरू होणारे सह्यद्रीचे डोंगर हे महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ ते अगदी तामिळनाडूच्या टोकापर्यंत, म्हणजे भारताच्याच टोकापर्यंत पसरलेले आहेत. त्यांना ह्य सगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी नावं असली तरी त्यांचं सह्यद्री हे नाव बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. इंग्रजीत वापरले जाणारे ‘वेस्टर्न घाट्स’ हे दोन शब्द संपूर्ण सह्यद्रीचं वर्णन करण्यासाठी वापरले जातात.  इथे एवढी प्रचंड जैवविविधता आहे की ह्य पर्वतरांगांना जगातील एक प्रमुख ‘बायोडायव्हर्सटिी हॉट स्पॉट’ म्हणून संबोधले जाते. म्हणजेच वन्य प्राणी आणि वनस्पती यांच्या संवर्धनासाठी आणि म्हणूनच आपल्याही हितासाठी जपायची अशी ही अत्यंत महत्त्वाची जागा. २०१२ मध्ये युनेस्को नावाच्या संस्थेने आपल्या सह्यद्रीच्या रांगांना जागतिक वारसा असे घोषित केले आहे. पण असं खास आहे तरी काय सह्यद्रीमध्ये? थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या सह्यद्रीसारख्या पर्वतरांगा जगात इतर कुठेही नाहीत.

सह्य़ाद्रीच्या विस्तीर्ण डोंगरांची निरनिराळी रूपं आहेत. महाराष्ट्रातला सह्य़ाद्री हा थोडा शुष्क, पानगळीच्या किंवा मिश्रित जंगलांनी भरलेला आहे, पण याचे वैशिष्टय़ म्हणजे इकडे असणारी अतिशय जुनी अशी असंख्य बौद्ध लेणी आणि अभेद्य किल्ले. या डोंगरांच्या राकटपणाचा वापर करून लोकांनी अतिशय चलाखीने आणि कौशल्याने इथे गड-किल्ले बांधले. त्यातले रायगड, राजगड, तोरणा, हरिश्चंद्रगड हे त्यांच्या अवघड जागेसाठी आणि बांधकामाच्या कौशल्यासाठी प्रसिद्धच आहेत.

29-lp-nature

लहानपणी मी आईबरोबर ट्रेकिंगला जायचे, तुम्हीही गेलाच असाल एकदा तरी सह्य़ाद्रीत भटकंतीला. तर अगदी  प्राथमिक  शाळेत असताना मी गोरखगड नावाच्या, सरळसोट दगडी कडय़ांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या गडावर चढले, अगदी निर्भयपणे. आजूबाजूला अत्यंत कमी आधार असतानाही मी  उतरताना त्या खोल दरीकडे तोंड करूनच उतरले. स्तुती झाली खूप. पण जसं वय वाढलं तशी भीतीही वाढली. त्यानंतर काही वर्षांनी शिवेनरी चढतानाही हात-पाय  थरथरू लागले. त्यानंतर मला घरी दिलं गेलेलं नाव मी अजूनही विसरू शकत नाही, ‘गोरखगडचे शेंदाड शिपाई’! आहे ना मजेशीर?  पण या सह्य़ाद्रीच्या गडांवर भटकल्यामुळेच माझा जंगलांमधला रस वाढला.  गोरखगडाच्या गुंफेतून दिसणारं  ते जंगलाचं दृश्य अवर्णनीय!     महाराष्ट्रातील सह्य़ाद्रीच्या सरळ कपारींवर कोरलेल्या गुंफाही अशा ठिकाणी असतात की मन शांत करून ध्यानमग्न होण्यासाठी फक्त त्या निश्चल सह्य़ाद्रीची सोबतच हवी. सह्य़ाद्रीच्या गड-किल्ल्यांविषयी एक ‘सांगाती सह्य़ाद्रीचा’ नावाचे  सुरेख  पुस्तक आहे, त्यातले एक वाक्य -‘सह्य़ाद्रीतील वनविनाश जर त्वरित रोखला नाही तर केवळ सह्य़ाद्रीच्याच नव्हे तर साऱ्या भारतीय द्विकल्पाच्या आणि उपखंडाच्या ऱ्हासास पारावर उरणार नाही. विकासाच्या विचारात वेळीच विरागी विवेकाचा विजयध्वज फडकला तरच सह्य़ाद्री वाचेल. ताठ मानेने उभा राहील.’

ज्या सह्य़ाद्रीच्या रांगांचा वापर शेकडो वर्षांपूर्वी गड आणि गुंफांसाठी झाला, त्यांचाच वापर आता धरणं आणि खाणींसाठी होतो. कोयनेच्या आजूबाजूची आणि चांदोलीची जंगलं सुंदर आहेतच पण ती मुख्यत: ओळखली जातात ती तिकडच्या धरणांमुळे. सह्य़ाद्रीच्या अनेक भागांमधली जंगलं धरणांच्या जलाशयांनी व्यापलेली आहेत, काही जंगलांचे तुकडे त्या जलाशयांच्याच  खाली नाहीसे झाले. या  सह्य़ाद्रीच्या दऱ्यांमधून वाहणाऱ्या पाण्यावरच अनेक गावं, शेतजमिनी, शहरं आणि कारखाने चालतात.  गोदावरी, कावेरी, कृष्ण आणि तुंगभद्रा अशा नद्यांचं उगमस्थान असलेला सह्य़ाद्री हे भारतातील एक अत्यंत महत्त्वाचं पाणलोट क्षेत्र आहे.  सह्य़ाद्रीच्या डोंगरांचं आणि पावसाचंही घनिष्ठ नातं आहे. पाऊस घेऊन येणाऱ्या ढगांना या उंच सह्य़ाद्रीची भिंत अडवून धरते आणि त्यामुळे त्याचा पश्चिमेकडचा भाग पावसाने चिंब होतो आणि पूर्वेकडचा भाग पर्जन्यछायेत राहतो. पावसाळ्यात सह्य़ाद्रीमधून कोसळणारे धबधबे रौद्र रूप धारण करतात. त्यातले कर्नाटकमधले जोग आणि शिवनसमुद्र हे आवर्जून बघण्यासारखे. कर्नाटकमधले कुद्रेमुखचे डोंगरही बघण्यासारखे, विलक्षण धबधबे आणि प्राणी-पक्ष्यांनी भरलेले. पण माझ्या मनात कोरला गेलाय तो तिकडचा लोखंडाच्या खाणींनी उजाड झालेला भाग. सह्य़ाद्रीच्या अनेक भागांत गेल्या काही वर्षांमध्ये, विशेषत गोवा-कर्नाटकमध्ये लोहखनिजासाठी मोठय़ा प्रमाणात जंगलतोड झाली. खनिजांसाठी जो सह्य़ाद्रीचा ऱ्हास झाला आहे आणि होत आहे त्याच्याविरुद्ध स्थानिक लोकच नव्हे तर वैज्ञानिकांनीही विरोध केला आहे. पण राजकीय फायदा आणि उद्योगपतींच्या स्वार्थासाठी विकासाच्या नावाखाली अजूनही दर वर्षी नवीन जंगलांचे भाग खाणींसाठी वापरले जाण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव घातले जातात, त्यातले काही मान्यही होतात.

आपण जसे दक्षिणेला जातो तसे तसे जंगल अजून घनदाट होत जाते. केरळ, तमिळनाडूमध्ये सह्य़ाद्री अजूनच उंच होत जातो. इथे महाराष्ट्र-कर्नाटक सारखं ‘सह्य़ाद्री’ हे नाव वापरात नाही. इथे सह्य़ाद्रीच्या भागांना इतर वेगवेगळी नावं आहेत. उदाहरणार्थ कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये पसरलेल्या, चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध असणारे निलगिरी पर्वत. इथल्या बऱ्याचशा जंगलाचे चहाच्या मळ्यांमध्ये रूपांतर झाले असले तरी उरलेल्या जंगलांमध्ये अनेक प्रकारचे असे प्राणी आणि पक्षी आढळतात जे जगात इतर कुठेही दिसत नाहीत. उदाहरणार्थ निलगिरी थार. हा मेंढीचा जंगलातला नातलग. निलगिरी पर्वतांमध्ये शोला नावाचा गवताळ भागात दिसतो. इकडच्या सह्य़ाद्रीच्या उंच पर्वतांवर झाडं फक्त खोल घळींमध्ये उगवतात, बाकीचा भाग हा उंच गवतांनी भरलेला असतो. ही शोला जंगलं  म्हणजे अगदी हिरवळीच्या गालिच्यासारखी! थार हा प्राणीसुद्धा त्या भागातल्या अतिशय अवघड कडे-कपारींमधून प्रवास करण्यात वस्ताद. सह्य़ाद्रीच्या सर्वात उंच असलेल्या केरळमधील आठ हजार ८४३ फूट उंचीच्या अन्नाईमुडी शिखराजवळसुद्धा निलगिरी थार दिसतात. अगदी रेखीव िशग आणि मोठय़ा पापण्यांनी सजलेले डोळे हे त्यांचं  वैशिष्टय़. अजून एक या पर्वतांचं नाव घेतलेला प्राणी म्हणजे निलगिरी लंगूर. तुम्ही महाराष्ट्रातला काळ्या तोंडाचा वानर पाहिलाच असेल, पण हे वानर अगदी पूर्णपणे काळे असते, फक्त डोक्यावरचा भाग तो काय पांढरा!

दिसते फक्त इथेच.

सह्य़ाद्रीमध्ये इतर अनेक असे प्राणी पक्षी आहेत, फुलं आहेत जी फक्त इथेच दिसतात.  यातल्या ३०० हून जास्त अशा जाती आहेत ज्यांचे अस्तित्व धोक्यात आहे. इकडच्या दाट  जंगलांमध्ये हत्ती, वाघ तर आहेतच पण बेडूक, साप, गोगलगायी अशा छोटय़ा प्राण्यांचेही अनेक खास प्रकार आहेत जे नुकतेच शोधले गेले आहेत किंवा असेही आहेत जे आपल्याला अजून माहितीच नाहीत!

एका दिवशी असे सह्य़ाद्रीचे खास दुर्मिळ प्राणी बघण्यात पूर्ण दिवस कसा गेला हे कळलंच नाही. आम्ही तामिळनाडूच्या अगस्त्यमलाई पर्वतरांगांच्या जवळ काम करत होतो.  इकडच्या सहा हजार फुटांपेक्षाही जास्त उंची असलेल्या शिखरावर अगस्ती मुनींची एक मूर्ती आहे. दर वर्षी अनेक लोक हा डोंगर चढून इकडच्या मंदिराची यात्रा करतात. पण जळवांनी गच्च भरलेल्या त्या जंगलात अगस्ती मुनींनी कसा काय तामिळ भाषेचा अभ्यास केला असेल हे विचार करण्यासारखे आहे. आम्ही काम करत असताना अगदी डोक्यावरही जळवा पडत असत झाडावरून. पण जंगल एवढं  अप्रतिम सुंदर की जळवा चढल्या तरीही पाय निघत नाही.

त्या दिवशी सकाळीच आम्ही कामाला निघालो होतो. दक्षिणेकडच्या सह्य़ाद्रीच्या इतर भागांप्रमाणे इथेही चहाचे मळे आहेत. तिथे अगदी ताजा चहा आणि डोसा अशी न्याहारी करूनच निघालो. चहाच्या मळ्यातून जंगलात पाय टाकला आणि अचानक आमच्यापकी  कुणीतरी आश्चर्यकारक उद्गार काढला. त्या व्यक्तीच्या नजरेचा पाठलाग केल्यावर एक अतिशय सुंदर फुलपाखरू दिसलं. तसं फार रंगीबिरंगी नाही, पण त्याचं उडणं बघितलं की वेड लागतं अगदी. हवेवर तरंगत प्रवास करणाऱ्या, पंखांवर सुंदर काळी-पांढरी नक्षी असणाऱ्या त्या मोठय़ा फुलपाखराचं नाव आहे ‘मलबार ट्री-निम्फ’. हे राहतं फक्त सह्य़ाद्रीमध्ये. त्याच्या अळ्या ज्या झाडा-पानांवर अवलंबून असतात तीही या जंगलांमध्येच सापडतात. आम्ही त्या जंगलात काम करत होतो तेही झाडं आणि कीटक यांच्या परस्पर संबंधाविषयी होतं. आम्ही दर दिवशी जंगलात जाऊन एका ठरावीक जातीच्या झाडाच्या पानांचं निरीक्षण करायचो. असंच त्या दिवशी करत असताना दुर्बणिीच्या िभगात एक माकडाचा चेहरा दिसला. नीट बघितलं तेव्हा कळलं की त्या माकडांची टोळी आमचंच निरीक्षण करत होती! ‘लायन टेल्ड मकाऊ’ या नावाचा हा माकडाचा प्रकार फक्त सह्य़ाद्रीतच दिसतो. त्याच्या शेपटीचा आकार अगदी सिंहाच्या शेपटीसारखा! आणि कधी कधी त्याचा अवतारही! त्याने रागाने तोंड उघडलं की लांबच लांब सुळे दिसतात. या सुळ्यांचाच वापर करून ते फणसासारखी जाड सालीची फळं खातात. यांचीही संख्या तशी कमी आहे आणि त्यांच्या संवर्धनासाठी केलेल्या कामामुळे आता संख्या वाढली असली तरीही अजूनही त्यांची परिस्थिती चिंताजनक समजली जाते.

असा हा सह्य़ाद्री. जगप्रसिद्ध. इतर कुठंही न सापडण्यासारखा. आणि तरीही ज्या वेगाने त्याचा ऱ्हास होत आहे तो थोपवण्यासाठी सध्याची संवर्धनाची कामं पुरेशी नाहीत. जर काही करायचं असेल तर या सह्य़ाद्रीबद्दल माहिती असणं आणि त्याच्याबद्दल काळजी वाटणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी सह्य़ाद्री अनुभवून बघणं आवश्यक आहे.
ओवी थोरात – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 1:04 am

Web Title: save our sahyadri
Next Stories
1 प्रवाह : अम्मांच्या अनुपस्थितीत!
2 दिवाळी अंक : ‘भवताल’ खडक विशेषांक
3 महोत्सव : मिशन फेस्टिव्हल
Just Now!
X