सुनिता कुलकर्णी

तिचं नाव आहे, विद्या वीरप्पन. वीरप्पन हे नाव ऐकलं की आपल्याला वेगळंच काहीतरी आठवायला लागतं. दक्षिणेतील घनदाट जंगलात वावरणारा, पोलीस तसंच वनाधिकारी मिळून १५० माणसांचा तसंच शंभरेक हत्तींच्या मृत्यूला कारणीभूत असणारा, चंदनतस्कर वीरप्पन. २००४ मध्ये पोलिसी कारवाईत तो मारला गेला. विद्या वीरप्पन ही त्याचीच मुलगी. २९ वर्षांची, कायद्याची विद्यार्थिनी असलेली विद्या तामिळनाडूनमध्ये कृष्णगिरी इथं लहान मुलांसाठी एक शाळा चालवते. आता तिची नवीन ओळख म्हणजे ती भाजपाच्या युवा मोर्चाची उपाध्यक्ष झाली आहे.

तमिळनाडूसारख्या राज्यात भाजपाही आपले पाय रोवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. विद्याला तिची निवड झाली आहे, हे राज्यामधल्या नेत्यांनी फेसबुकवरून जाहीर केलं तेव्हा कळलं. विद्या सांगते की, मी कोणत्याही विशिष्ट समाजाची वगैरे नाही, तर माणूस ही माझी खरी ओळख आहे. तिला अर्थातच तिच्या वडिलांबद्दल विचारलं गेलंच. ती सांगते, मी त्यांना माझ्या संपूर्ण आयुष्यात फक्त एकदाच भेटले. कर्नाटकात होन्नूर जवळ असलेल्या माझ्या आजोळी मी गेले होते. तिथून जवळच जंगल होतं. मी तेव्हा सहासात वर्षांची असेन. आम्ही काही मुलं खेळत होतो. तिथे ते आले, माझ्याशी थोडं बोलले आणि निघून गेले. त्यांनी मला सांगितलं, चांगला अभ्यास कर, डॉक्टर हो आणि लोकांची सेवा कर. मला सगळ्या गोष्टी कळायला लागल्या तोपर्यंत ते गेलेले होते. मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या भोवती असलेल्या परिस्थितीमुळे जगण्याचा विशिष्ट मार्ग निवडला. पण त्यांच्याबद्दल मी ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी लोकांकडून ऐकल्या, त्यामुळे मी समाजसेवेचा मार्ग निवडला.

सन २००० साली कन्नड अभिनेता राजकुमार यांचं अपहरण करून काही आठवड्यांनी त्यांची सुटका केल्यानंतर वीरप्पनकडे सगळ्या देशाचं लक्ष वेधलं गेलं. त्यानंतर चारच वर्षांनी तो तामिळनाडूचे स्पेशल टास्कचे अधिकारी के. विजयकुमार यांच्याकडून मारला गेला. त्यानंतर लिहिलेल्या वीरप्पन ‘चेजिंग द ब्रिजंड’ या पुस्तकात विजयकुमार यांनी वीरप्पनच्या गरोदर पत्नीनं शरण येणं, विद्याचा जन्म, तिचं स्पेशल टास्कच्या लोकांनी विद्याराणी हे केलेलं नामकरण याविषयी लिहिलं आहे. वन्नियार या स्थानिक ओबीसी समाजामध्ये वीरप्पनची प्रतिमा रॉबिनहूड अशी आहे.

‘माझे वडील राजकारणात नव्हते, राजकारणी नव्हते. पण त्यांच्या भोवती असलेल्या वातावरणानुसार, परिस्थितीनुसार त्यांचं समाजाविषयीचं, जगाविषयीचं आकलन घडत गेलं होतं. त्यांनी वन्नियार समाजाविषयी जे काही केलं आहे, त्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात,’ विद्या सांगते. विद्याची आई मुथुलक्ष्मी आजही एनडीएमध्ये सहभागी असलेल्या टीव्हीके या पक्षाशी संबंधित आहे.

दोनेक वर्षांपूर्वी एका स्थानिक नेत्याने विद्याची केंद्रीय मंत्री राधाकृष्णन यांच्याशी ओळख करून दिली होती. ‘मला समाजकार्य करण्यात रस होता. राधाकृष्णन यांनी मला पक्षासाठी काम कर’ असं सुचवलं, विद्या सांगते. नुकताच फेब्रुवारीमध्ये तिनं भाजपामध्ये प्रवेश केला होता आणि आता ती भाजपाच्या तामिळनाडूमधल्या युवा शाखेची उपाध्यक्ष झाली आहे. इंडियन एक्स्पेसच्या अरूण जनार्दन यांनी ही बातमी दिली आहे.