स्थळ एक : एका महानगरीतील औद्योगिक वसाहतीत असलेला जनावरांच्या औषधाचा कारखाना

स्थळ दोन : त्याच देशातील दुसऱ्या महानगरीतील एक बंद पडलेली सरकारी फॅक्टरी

दि. ११ फेब्रुवारी २०१७

स्थळ १ :

ती सहा जणांची टीम गेली दोन र्वष त्या प्रयोगांवर काम करत होती. त्यातले तिघे जण त्यांच्या त्यांच्या केमिस्ट्री, बायोइन्फॉर्मेटिक्स आणि एम्ब्रीयॉलॉजी (chemistry, bioinformatics, embryology) या विषयातले डॉक्टरेट होते आणि उरलेले तिघे जण शत्रुदेशातील गुप्तहेर खात्यातील उच्च दर्जाचे अधिकारी होते. या कारखान्यातला त्यांचा विभाग इतर सर्वापासून वेगळा, गुप्त आणि अत्यंत सुरक्षित होता. नाव होतं – ‘संसर्ग रोग संशोधन’ – खाली सूचना होती – ‘योग्य अधिकाराशिवाय आत येण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल. अतिशय धोकादायक वातावरण. कोड- ‘रेड’; प्रोजेक्ट – ‘निरो’.

आत जाणाऱ्या मार्गावर बायोमेट्रिक अ‍ॅक्सेस सिस्टीम बसवलेली होती. त्या सहा जणांपकी कोणीही आत जाताना प्रथम हाताचा पंजा आणि मग डोळा यांचा उपयोग करताना कधीतरी दिसत असे. त्यांच्याविषयी इतर माहिती कोणालाच नव्हती.

आतले कामच तसे होते. साधारणपणे दहा-बारा लाख माणसांचा जीव दोन-तीन दिवसांत घ्यायचा प्रकल्प म्हणजे सोपी गोष्ट नाही. इतिहासात असे पूर्वी कधीच घडले नव्हते! त्यासंबंधीच्या प्रयोगांसाठीच हा विभाग कार्यरत होता. त्यांचे आत्तापर्यंतचे संशोधन प्रसिद्ध करता आले असते तर जगात एकच खळबळ उडाली असती. उंदरांच्या एका विशिष्ट तयार केलेल्या जातीला वाहक बनवून तो जीवघेणा रोग / व्हायरस – ज्याच्यावर अजून उपाय सापडलेला नाही – शहरात पसरावयाचा म्हणजे प्रचंड अभ्यास आणि नियोजनाची गरजच होती! त्या व्हायरसची आणि वाहक उंदरांची पदास करण्याचे काम येथे चालत होते. संशोधनातून सिद्ध झाल्याप्रमाणे त्या व्हायरसची पदास येथेच – या देशातच – करणे आवश्यक होते कारण वाहक उंदीर व्हायरसने दूषित झाल्यानंतर बारा तासांत मरत होते व तो व्हायरसपण त्यानंतर नष्ट होत होता. असे वाहक उंदीर दूषित झाल्यानंतर पाण्याकडे धाव घेतील अशी योजना केलेली होती.

हा घातक व्हायरस पाण्यात रीलीज झाल्यानंतर दिवसाच्या तापमानाने किंवा सामान्य शारीरिक तापमानाने बारा तासांत नष्ट होणार होता. त्यामुळे त्या बारा तासांत जे जिवंत प्राणी तशा दूषित पाण्याने संसíगत झालेले असतील त्यांच्यावरच त्या व्हायरसचे दुष्परिणाम होणार होते.

त्या सर्व टीमचे एकमत होते की आत्तापर्यंत माज करणाऱ्या या देशाला कधीतरी असा धडा शिकवणे आवश्यकच आहे! आणि त्याकरिताचा उत्तम मार्ग म्हणजे हा ‘निरो’ प्रोजेक्ट!

***

दि. ११ फेब्रुवारी २०१७.

स्थळ २ :

साधारणत: एक वर्षांपूर्वी हा विभाग कार्यरत झाला असावा. राष्ट्रीय प्रयोगशाळेत निदर्शनास आलेल्या त्या जीवघेण्या व्हायरसचा मागोवा घेण्याचा या टीमचा प्रयत्न होता. चारजण होते ते. एक जण विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजीमधला अत्यंत ज्येष्ठ प्राध्यापक, दुसरा जलसंशोधनातला तरुण डॉक्टर, तिसरा मेडिसिनमधला उच्चविद्याविभूषित तर चौथा अंतर्गत सुरक्षा विभागातील एका अनाकलनीय खात्यातला. त्यांना देशातल्या सर्व प्रयोगशाळा आणि सुरक्षा खात्यांशी कोणत्याही मदतीसाठी संपर्क साधायचा अधिकार होता. त्यांच्या गुप्ततेची पूर्ण काळजी घेऊनच म्हणा!

अक्षरश: चोवीस तास काम करत ही टीम काळाशी स्पर्धाच करत होती. उद्देश एकच – एका अर्धवट माहिती असलेल्या अत्यंत धोकादायक जीवघेण्या व्हायरसवर जालीम उपाय शोधणे. लाखो लोकांच्या जीवनाचा आणि देशाच्यासुद्धा भवितव्याचा प्रश्न होता ना!

साधारणपणे एक वर्षांपूर्वी एका औषध कंपनीच्या प्रयोगशाळेत एका प्रयोगाकरिता वापरलेल्या उंदरात तो व्हायरस सापडला होता. त्या कंपनीच्या नेहमीच्या दैनंदिन अहवालामधून त्याची माहिती हळूहळू सरकारी खात्यांपर्यंत पोचली होती. सरकारी प्रयोगशाळेतल्या परीक्षणानंतर असं लक्षात आल होतं की हा नवीन व्हायरस आत्तापर्यंत कुठल्याच देशात व संशोधन क्षेत्रात नोंदवलेला नव्हता आणि त्याच्या संसर्गाचा दुष्परिणाम हा माणसाकरिता प्राणघातक आहे. दुसऱ्या बाजूला शत्रुदेशाच्या टीममधील ई-मेलचा मागोवा घेताना ‘निरो’ नावाचा काहीतरी प्रकल्प चालू झाल्याचा अंदाज सायबर सेलला आलेला होता. गेल्या काही दिवसांत याप्रकारचे ई-दळणवळण एकदम वाढलेले जाणवत होते आणि त्याचे एक टोक देशापर्यंत येऊन पोचत होते. गेल्या आठवडय़ातच एका परकीय पुढारलेल्या मित्रदेशानेपण इशारा दिलेला होता की काहीतरी न भूतो न भविष्यती असा अतिरेकी उत्पात होऊ घातलेला आहे म्हणून.

साधारणत: टीमला अंदाज आलेला होता की कोणीतरी कोठेतरी उंदरांच्या मार्फत शहरातील अन्न/पाणीपुरवठा ‘त्या’ व्हायरसने दूषित करून प्रचंड जीवितहानी घडवू पाहात आहे! प्रश्न होता – हे थांबवण्याचा आणि त्यासाठी अत्यावश्यक असलेले औषध / रसायन शोधण्याचा.

***

दि. ११ मार्च २०१७

स्थळ १ :

प्रगती :

  • व्हायरसच्या सर्व चाचण्या यशस्वी! मायदेशातील तीन वेगवेगळ्या तुरुंगांतील कैद्यांवर प्रयोग. सर्व १७ जणांचा प्यायच्या पाण्यातून व्हायरस पोटात गेल्यानंतर तीन तासांत मृत्यू! कोणतेही उपाय लागू पडले नाहीत.
  • या शत्रुदेशातील निवडलेल्या महानगरातील पाणीपुरवठय़ाच्या तीनही जलाशयांची रेकी पूर्ण. तसेच पाणी शुद्धीकरण केंद्रातील प्रक्रियांमधून पार होऊन व्हायरस यशस्वीपणे शहरभर पाण्यातून पसरेल याचे प्रयोगशाळेतील प्रयोग यशस्वी.
  • यासाठी ‘निरो’ टीमला मदत केलेल्या महानगरपालिकेच्या पाणी विभागातील, एका जुन्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू!
  • व्हायरस-वाहक उंदीर मोकळे सोडल्यानंतर जवळच्या जलाशयाचा माग काढत जाऊन त्या पाण्यात बुडण्याची प्रक्रिया व त्यामुळे ते पाणी पूर्ण दूषित होण्याचे प्रयोगशाळेतील प्रयोग यशस्वी!
  • तरुण, माथेफिरू पण विश्वासू – अशा बारा जणांच्या टीमतर्फे २८ मार्चच्या रात्री करावयाच्या कार्यवाहीची तयारी. गेल्या पाच वर्षांत खतपाणी घालून पोसलेल्या निद्रिस्त ग्रुप्समधून या १२ जणांची निवड अत्यंत काळजीपूर्वक केली गेली आहे.
  • त्या बारा जणांना ‘निरो’विषयी काहीही माहिती नाही! ते सर्व जण फक्त वाहकाचे काम करणार आहेत. तीन जलाशयांसाठी तीन तुकडय़ा शिक्षण देऊन तयार. चार जण एका जलाशयाच्या वेगवेगळ्या बाजूंनी व्हायरसने अक्षरश बदबदलेले उंदीर अशा ठिकाणी सोडणार की ते त्या जलाशयातच जाऊन मरतील याची खात्री.
  • अत्यंत सावध व गोपनीयतेने सर्व प्रयोगांची व त्यातील वेगवेगळ्या पलूंचे पुन:पुन्हा टेस्टिंग. निरोचे भयचकित करणारे पुनरुत्थान – एक एप्रिल २०१७ ला होणार.

***

दि. ११ मार्च २०१७

स्थळ दोन :

प्रगती :

  • ‘त्या’ व्हायरसवरचा ‘अँटी-व्हायरस’ तयार. प्रयोगशाळेतील प्रयोग यशस्वी. माणसांवर प्रयोग करायची संधी मिळणे शक्य नाही. कोणाही सजीवाच्या शरीरात या अँटी-व्हायरसची उपस्थिती असेल तर ‘तो’ व्हायरस पूर्णपणे निष्प्रभ व नष्ट होईल याची टीमला (जवळजवळ) खात्री. अँटी-व्हायरसचा मोठय़ा प्रमाणात निर्मितीचा प्रयत्न जारी. संपूर्ण गुप्तता!
  • अतिरेक्यांच्या नेटवर्कमधील एकदम वाढलेल्या ई-दळणवळणात प्रवेश मिळवता आला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गुप्तचर आणि सायबर सुरक्षा विभागांच्या समन्वयातून एक निश्चितता आली होती. निरोचा उद्रेक एक एप्रिलला केला जाणार आणि तो याच महानगरात होणार.
  • व्हायरस कसा पसरवला जाईल याचा अंदाज येत नाही. बहुतेक कुठल्या तरी समारंभाच्या खाद्यपदार्थातून संसर्ग केला जाईल असे दिसत होते. संसíगत उंदरांचा वापर कसा केला जाईल याचे अंदाज बांधणं चालू आहे.
  • जलसंशोधनातील त्या तरुण तज्ज्ञाने एक नामी उपाय सुचवला.
  • २८ मार्चपासून शहराला होणाऱ्या पाणीपुरवठय़ामधून – सर्व जलप्रसारण केंद्रांमार्फत – अँटी-व्हायरसचे योग्य डोस शहरभर पूर्ण गुप्तता बाळगून पुरवायचे. या चार-पाच दिवसांच्या पाणीपुरवठय़ामधून शहरातील सजीवांच्या शरीरात अँटी-व्हायरसचा योग्य त्या प्रमाणात प्रवेश होईल अशी आशा बाळगायाची.

आणि परमेश्वराची प्रार्थना करायची!

दि. १ एप्रिल २०१७

स्थळ : महानगर

घडलेल्या घडामोडी :

  • गेले पाच दिवस रोज सर्व जलप्रसारण केंद्रांमधून सरकारी आरोग्य खात्यातर्फे आलेल्या एका औषधाचा पाण्यामध्ये समावेश. एवढय़ा तातडीने आणि एवढय़ा गुप्ततेत, सुरक्षिततेखाली केलेल्या कारवाईचे महानगर जलविभागाला आश्चर्य वाटले.
  • निरोच्या तीनही तुकडय़ांनी जलाशयांच्या परिसरात काल रात्री उंदीर सोडले व सर्व बारा जण आपापल्या घरी जाऊन झोपले. त्यांना ‘निरो’ आणि त्याच्या कोणत्याही परिणामांची यत्किंचितही कल्पना नव्हती. एक एप्रिलला नेहमीप्रमाणेच त्यांची दिनचर्या असणार होती. रोजच्याप्रमाणेच अन्न व पाणी!
  • स्थळ एकमधील सहाही जणांची टीम विखुरली. सर्व सहा जण ३१ मार्चच्या रात्री विमानांनी वेगवेगळ्या देशांना रवाना. त्या सर्वानाच यशाची पूर्ण खात्री! त्यांचा माग काढणे सायबर सेलला शेवटपर्यंत जमले नाही.
  • स्थळ दोनमधील टीम आणि काही खात्यांमधील उच्च अधिकारी जीव मुठीत धरून बातम्यांचा सातत्याने धांडोळा घेत होते. कोणीही रात्रभर झोपले नव्हते!
  • एक एप्रिल – महानगरातील जनजीवन सामान्यपणे चालू! निरोचे संगीत कोणालाही ऐकू गेले नाही! संध्याकाळी स्थळ दोनमधील टीम परत आपापल्या क्षेत्रांकडे मार्गी! अतीव समाधानाने!!
  • हवालामधील व्यवहारांच्या सुगाव्याने त्या बारा जणांपकी चार जणांना अटक. उरलेल्या आठ जणांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू!
  • संशोधित व्हायरस व अँटी-व्हायरस यावर अनेक देशांत पुढील संशोधन सुरू. मानवतेच्या कल्याणासाठी!
    प्रवीण मुळ्ये – response.lokprabha@expressindia.com