सुनिता कुलकर्णी

टाळेबंदीच्या काळात माणसांचा वावर कमी झाला, प्रदूषण कमी झालं आणि पर्यावरणाची गुणवत्ता वाढली. वेगवेगळे प्राणी मानवी वस्तीत कसे फिरायला लागले, हरियाणामधून हिमालयाच्या रांगा कशा दिसायला लागल्या याच्या बातम्या आपण गेले तीन महिने वाचत पहात आहोत. असंच एक शुभवर्तमान आहे मधमाशांचं.

सगळं जग घरी बसून नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम बघत रवा केक आणि होममेड जिलब्यांचा फडशा पाडत असताना या मधुसख्या मात्र नेहमीपेक्षा दुपटीने काम करीत होत्या म्हणे. हवा आणि प्रदूषण तसंच घातक खतंविरहित वातावरणामुळे मधमाशांनी जास्त काम केलं आणि त्यामुळे मधाचं उत्पादन वाढलं आहे, अशी बातमी इंडियन एक्स्प्रेसच्या नीती निगम यांनी दिली आहे.

लघु तसंच मध्यम उद्योग मंत्रालयाच्या खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशनच्या मते टाळेबंदीच्या काळात मधमाशांच्या पोळ्यांच्या संख्येमध्ये तसंच मधमाशांच्या आरोग्यात लक्षणीय वाढ झाली आहे. ही परिस्थितिकीच्या (इकॉलॉजी) दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट आहे. या समितीचे अध्यक्ष विनितकुमार सक्सेना सांगतात, “टाळेबंदीच्या काळात हवेची गुणवत्ता सुधारली. वातावरणात शांतता होती. झाडांवर फुलंही टिकून राहिली त्यामुळे मधमाशांनी या काळात भरपूर मध गोळा केला आहे. मधनिर्मिती व्यवसायात एरवी प्रत्येक पोळ्यातून १५ ते २० किलो मध मिळतो. पण मार्च ते मे या काळात यावर्षी प्रत्येक पोळ्यातून जवळजवळ ४० किलो मध मिळाला आहे. आणि हे फक्त कुठल्या एका मधनिर्मिती केंद्रात घडलेलं नाही तर उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि इतरही राज्यांमधून झालं आहे.”

आपल्या देशात एकाच वेळी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळं हवामान असतं. त्यामुळे मधनिर्मितीमध्येही वैविध्य पहायला मिळतं. मोहरीची शेती केली जाते, त्या परिसरातील मध युरोपात निर्यात होतो. केशराची शेती केली जाते त्या परिसरातील मध जगात सगळ्यात जास्त महाग आहे. २०१७-१८ या वर्षात देशांतर्गत मधाचं उत्पादन १.५ लाख मेट्रिक टन होतं. आता यावर्षी मधमाशांच्या कार्यक्षमतेमुळे ते वाढलेलं असेल.

मधमाशापालनाच्या उद्योगातून मधउत्पादन होतं म्हणून तो महत्त्वाचा आहे असं नाही. त्याचे इतरही फायदे आहेत. अन्नसुरक्षा आणि परिस्थितिकी (इकोसिस्टीम) यासाठी मधमाशा हा पर्यावरणामधला महत्त्वाचा घटक आहे. मधमाशातज्ज्ञ मिलिंद वाकोडे यांच्या मते मधमाशांच्या संख्येत वाढ होते याचा अर्थ त्या परिसरात वैविध्यपूर्ण वनस्पती आहेत आणि त्यांचं परागीभवन चांगल्या प्रकारे होतं आहे. आपण मधनिर्मितीसाठी मधमाशांचा वापर करत असलो तरी भाज्या आणि फळांच्या परागीभवनामधलं त्याचं योगदान आपण कमी लेखता कामा नये. इस्रायलसारख्या शेतीच्या बाबतीत प्रगत असलेल्या देशाने या पद्धतीचा पीक उत्पादन वाढवण्यासाठी वापर करून घेतला आहे. आपण यापुढच्या काळात पर्यावरण असंच शुद्ध राखलं तर फक्त मधाचंच उत्पादन वाढणार नाही तर शेतीचीही गुणवत्ता वाढेल, असं ते सांगतात.

एवढ्याशा मधमाशीकडून घ्यायचा धडा तो हाच की टाळेबंदी असली तरी आपलं काम आपण करीत राहिलं पाहिजे.