विनायक परब – response.lokprabha@expressindia.com
संरक्षण
छुप्या युद्धाचे अनेकविध पर्याय उपलब्ध असताना आण्विक युद्ध करण्याचा विचार कोणताही देश करेल का, या प्रश्नामध्येच त्याचे उत्तरही दडलेले आहे..

अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्बचा हल्ला केला त्या घटनेला आता जवळपास ७४ वर्षांचा काळ लोटत आला. या कालखंडात विज्ञान, युद्धशास्त्र आणि जगही खूप बदलले आहे. आता एखाद्या देशाला उद्ध्वस्त करण्यासाठी अणुबॉम्बचा हल्ला करण्याची गरजच राहिलेली नाही. माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे खेळले जाणारे आणि जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून खेळता येऊ शकणारे छुपे युद्ध हा भविष्यातील महत्त्वाचा भाग असणार आहे. संबंधित देशाच्या थेट अर्थव्यवस्थेवरच हल्ला चढवला की शत्रूचे काम फत्ते होणार आहे. त्यासाठी हाती संहारक शस्त्र घेऊन लढण्याची गरजच भासणार नाही. शिवाय प्रत्यक्ष सैनिकांशिवाय भाडोत्री दहशतवाद्यांकडून लढले जाणारे छुपे युद्ध हा प्रकारही आहेच. असे अनेकविध पर्याय उपलब्ध असताना अणुबॉम्ब हल्ला करण्याचा किंवा आण्विक युद्ध करण्याचा विचार कोणताही देश करेल का, या प्रश्नामध्येच त्याचे उत्तरही दडलेले आहे. पण परिस्थिती अशी असेल तर मग अनेक देश आजही आण्विक युद्धाची चर्चा का करतात? आण्विक युद्धासाठीच्या सज्जतेची चर्चाच सातत्याने सुरू असताना दिसते. किंबहुना भारत-पाकिस्तान किंवा अगदी चीन-रशियासारखे देशदेखील आजही अण्वस्त्र सज्जतेची भाषा करताना दिसतात. असे का आणि नेमकी परिस्थिती काय आहे हे आपण एकदा समजून घ्यायला हवे.

अण्वस्त्रांचा वापर जगात कुणीही म्हणजेच कोणताही देश, केव्हाही करू शकतो अशी स्थिती नाही. कोणताही देश म्हणजे अगदी पाकिस्तानदेखील! तेवढेच कशाला तर अमेरिकेसारखा बलाढय़ देशदेखील अण्वस्त्रांचा वापर करताना शंभर वेळा विचार करेल. कारण ७४ वर्षांपूर्वीची परिस्थिती आणि आताची यामध्ये जमीन अस्मानाचे अंतर आहे. त्यामुळे अमेरिकेलाही सद्य:स्थितीमध्ये विचार करावाच लागेल, ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळेस अण्वस्त्र एकटय़ा अमेरिकेकडेच होती. आता मात्र तशी स्थिती नाही. ती जगातील १३ देशांकडे आहेत आणि जागतिक पातळीवरील प्रमुख देशांमध्ये समावेश नसलेल्या पाकिस्तानकडेदेखील.

या संदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न लक्षात घ्यायला हवा, मुळात अण्वस्त्रे हवीत कोणाला आणि कशा करिता? जगभरातील आढावा घेतला तर असे लक्षात येते की अनेक देश शत्रू राष्ट्राला शह देण्यासाठी किंवा धाक दाखविण्यासाठी ही अण्वस्त्रे हवीत अशी भूमिका घेताना दिसतात. मग ते राष्ट्र चीन असो अथवा उत्तर कोरिया त्यामुळेच अण्वस्त्राचा भार वाहून नेईल अशा क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर संबंधित देश त्याचा पल्ला सांगताना शत्रूराष्ट्राच्या दिशेने दिशादर्शन करतो. म्हणजेच उत्तर कोरियाच्या चाचणीनंतर न्यूयॉर्क आता क्षेपणास्त्राच्या टप्प्यात किंवा चीनने केलेल्या चाचणीनंतर त्या देशाने प्रसृत केलेले वृत्त मुंबई आता चीनच्या टप्प्यात अशा स्वरूपाची असते. पण मग यामुळे संबंधित देश खरंच घाबरतो का? आणि जर संबंधित देश घाबरणार नसेल तर मग धाक दाखविण्यासाठी अण्वस्त्रांचा वापर असे का म्हटले जाते?

कुणाला त्यामुळे धाक वाटणार नसेल तर मग अण्वस्त्रांचा एवढा बाऊ का केला जातो, हे सारे समजून घेण्यासाठी अणुयुद्धाच्या संदर्भातील एक गृहीतक लक्षात घ्यायला हवे. एखाद्या देशाच्या मनात आले म्हणून तो देश अण्वस्त्रांचा वापर करेल, अशी स्थिती सध्या बिलकूल नाही. हिरोशिमा आणि नागासाकीचा नरसंहार जगाने अनुभवला आहे. म्हणून तर त्यानंतर अण्वस्त्रबंदीसाठी अनेक मोहिमा चालविण्यात आल्या. भारत हा शांतताप्रिय देश आहे. आपणही अण्वस्त्रबंदीसाठी कटीबद्धता व्यक्त केली आहे. किंबहुना आपल्या देशाने तर आपण प्रथम अणुहल्ला करणार नाही आणि वापर केलाच तर शत्रूने केलेल्या हल्ल्यानंतरच असेल असे धोरण जगजाहीर केले आहे. पाकिस्तानच्या बाबतीत याच्या अगदी उलट आहे. म्हणजे देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक  वाटले तर पहिला अणुहल्ला करायला कचरणार नाही, असे पाकिस्तानने यापूर्वीच जाहीर केले आहे. पण केवळ मनात आले आणि पाकिस्तानी लष्कराला किंवा लष्करप्रमुखांना वाटते आहे, म्हणून अणुहल्ला होणार नाही. किंबहुना सध्याची जागतिक स्थिती पाहता कोणतेही युद्ध अचानक होणारच नाही. त्याचे पडघम आधी वाजत राहतील. खरोखरच युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर जगभरातील काही प्रबळ देश म्हणजेच अमेरिका, रशिया, चीन आदी देश त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतील. अगदीच काही नाही तर संयुक्त राष्ट्रसंघ त्यात पुढाकार घेईल आणि परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे थेट अणुयुद्धाची शक्यता तशी तुलनेने कमी दिसते आहे.

अणुयुद्धाच्या संदर्भातील वृत्त अथवा लेख व्यवस्थित वाचले तर एक महत्त्वाची गोष्ट सहज लक्षात येईल ती म्हणजे त्यात अण्वस्त्रत्रयींचा उल्लेख असतो. म्हणजेच भूपृष्ठावरून, हवेतून आणि सागरतळातून मारा करता येईल अशी अण्वस्त्रत्रयी. यातील तिसरा टप्पा म्हणजेच सागरतळाखाली असलेला. अर्थात भूपृष्ठ आणि हवेतून मारा करणारी अशा दोन्ही यंत्रणा शोधून काढणे तुलनेने सोपे असते. पाणबुडी सागरतळाखाली कार्यरत असते. शिवाय हल्ली हालचालींची चाहूलही न देणाऱ्या पाणबुडय़ा अस्तित्वात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना हुडकणे इतर दोन्हींपेक्षा तुलनेने कठीण आहे. म्हणून तर गेल्या वर्षअखेरीस ‘आयएनएस अरिहंत’ ही आण्विक पाणबुडी भारतीय नौदलात दाखल झाली त्यावेळेस आपण आपली अण्वस्त्रत्रयी पूर्ण झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले होते. पण प्रत्यक्षात ती त्रयी वापरण्याची वेळ येणारच नाही कदाचित. कारण अणुहल्ला हा विषय आता संपूर्ण जगानेच गांभीर्याने घेतला आहे. मात्र धाकच नसेल तर शत्रूचे फावेल. त्यामुळे दुसऱ्या बाजूला धाकाच्या नावाखाली शस्त्रखरेदी आणि शस्त्रस्पर्धा यांना आपण खतपाणी घालतोय का, या प्रश्नाचे उत्तरही थेट देणे अशक्य आहे. त्यासाठी इतिहासातील बौद्ध धर्माच्या तुफान प्रसारानंतरचा कालखंड समजून घ्यावा लागेल. सम्राट अशोकाने किलगाच्या युद्धानंतर नरसंहार पाहून व्यथित होत भेरीघोष म्हणजे युद्धाचे सैन्य धम्मघोषात परिवर्तित करत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे लढवय्या वर्ग नाराज झाला होता. तत्कालीन भारतावर झालेल्या आक्रमणासाठी धम्मघोषामुळे लढवय्येपणाचा विसर पडला असा दोषारोप करण्यात आला.. शस्त्रच खाली ठेवले तर ते खाली ठेवणाऱ्यावर हल्ला करण्याचा विचार तर कुणीही करेलच, असा युक्तिवाद करण्यात आला होता. मात्र असा युक्तिवाद करणाऱ्यांनी बहुधा सम्राट अशोकाने कोरून ठेवलेली राजाज्ञा व्यवस्थित वाचलेली नव्हती. त्याने म्हटले होते.. ‘मला इतर कोणाच्याही राज्याच्या इंचभर जमिनीचेही स्वारस्य नाही. मात्र माझ्या इंचभर जमिनीवर आक्रमण केले तर..’ यातील ‘तर’ हा त्या धाकासाठीच महत्त्वाचा आहे.