डॉ. निखिल दातार – response.lokprabha@expressindia.com
स्त्रियांना होणाऱ्या वेगवेगळ्या शारीरिक व्याधींमध्ये पाठदुखी नेहमीच अग्रभागी असते. मात्र स्त्रियांमध्ये पाठदुखीशी संबंधित अनेक गैरसमजदेखील आहेत.

पाठीच्या कण्याचं महत्त्व सगळेच जाणतात. कणा व्यवस्थित असेल तरच एखादी व्यक्ती खऱ्या अर्थाने उभी राहू शकते. अलीकडे एकंदरीत पाठदुखीची तक्रार जास्त ऐकू येते. त्याची कारणंही वेगवेगळी आहेत. स्त्रियांमधलं पाठदुखीचं  प्रमाण त्या मानाने अधिक जाणवतं. पण त्यांच्या पाठदुखीच्या कारणांबद्दल काही गरसमज आजदेखील आहेत. मासिक पाळी, गरोदरपणा आणि प्रसूती याभोवती फिरणारी कारणं आणि त्याविषयीचे गरसमज जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

बऱ्याच स्त्रिया मासिक पाळीत पाठ दुखते ही  तक्रार करतात. विशेषत ओटीपोट आणि कंबर दुखते. पण पाठीच्या कण्याचा मासिक पाळीशी काहीच संबंध नाही. दोन्ही गोष्टी संरचनात्मकदृष्टय़ा एकमेकांपासून पुष्कळ लांब आहेत. साधारणपणे गर्भाशय ओटीपोटात अगदी खाली असतं. ते इतकं खाली आणि लहान असतं की गर्भाशयाची पिशवी पोटावरून हाताला लागतसुद्धा नाही. त्यासाठी योनिमार्गातून तपासणी करावी लागते. गरोदरपणाचे तीन महिने झाल्यांनतर गर्भाशय पोटावरून हाताला लागू शकते. एकंदरीत काय की पाठीच्या दुखण्याशी मासिक पाळीचा संबंध असू शकतो, पण त्याचा थेट पाठीच्या कण्याशी संबंध नाही. दोन्हीतला फरक लक्षात घ्यायला हवा.

काही स्त्रीरोगांमुळे पाठीचा कणा नाही, पण पाठीचं दुखणं उद्भवू शकतं. त्यात एन्डोमेट्रीअ‍ॅसिस हा आजार प्रामुख्याने येतो. हा आजार अलीकडे बराच बोकाळला आहे. या आजारात पाठीचा खालचा भाग किंवा कंबर दुखते. गर्भाशयात फायब्रॉइडच्या गाठींचा आजारही आता बऱ्याच स्त्रियांमध्ये दिसून येतो. गर्भाशयातील फायब्रॉइडच्या गाठींच्या वजनामुळे पाठीचा खालचा भाग दुखण्याची शक्यता असते. गर्भाशयाच्या तोंडावर असलेला व्रण हेही एक कारण असू शकते. स्त्रियांच्या पाठदुखीला कारणीभूत असलेले इतर घटकही लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्या देशातील स्त्रियांमध्ये लोह, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी या तिन्ही गोष्टींची कमतरता असण्याचं प्रमाण ७० ते ८० टक्के आहे. मासिक पाळी आणि कमतरता असलेले घटक हे दोन्ही स्त्रियांशी संबंधित आहेत. पण त्यांचा परस्परांशी थेट संबंध नाही.

गरोदरपणामध्ये कधी कधी स्त्रियांना पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. गरोदरपणात वाढलेल्या वजनामुळे पाठ, पोट आणि कमरेचे स्नायू ताणले जाऊन त्यावर दाब निर्माण होतो. गरोदरपणाच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये पोट पुढे येतं त्या वेळी शरीराचा केंद्रिबदू बदलतो. त्यामुळे गरोदर स्त्रिया पाठीला बाक देऊन चालताना दिसतात. असं केल्याने त्यांचा पाठीचा कणा नेहमीसारखा राहत नाही. तो मोठय़ा प्रमाणावर ताणला जातो. तसंच गरोदरपणात विशिष्ट काळानंतर सरळ झोपता येत नाही. एका कुशीवर झोपावं लागतं. अशा वेळी एका कुशीवर झोपून मान वाकडी होणं, आखडणं, खांदा दुखणं असे त्रास होऊ लागतात. यामध्ये अधिकत: मानेचे त्रास जास्त दिसून येतात. या सर्व कारणांमुळे गरोदरपणात पाठीच्या दुखण्याच्या तक्रारींना सुरुवात होते.

स्त्रिया आणि पाठदुखी या विषयाबाबत असलेली आणखी एक मोठी गरसमजूत दूर करायला हवी. प्रसूतीमध्ये काही स्त्रियांचं सीझेरिअन करण्यासाठी पाठीच्या कण्यात इंजेक्शन देतात, असा समज लोकांमध्ये असतो. पण तो पूर्णत: चुकीचा आहे. हे इंजेक्शन पाठीच्या कण्यात दिलं जात नाही तर दोन्ही मणक्यांच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत दिलं जातं. त्यामुळे ‘पाठीच्या कण्यात इंजेक्शन’ ही चुकीची संकल्पना डोक्यातून काढायला हवी. बऱ्याच लोकांची अशीही गरसमजूत असते की त्या इंजेक्शनमुळे पाठ दुखते. पण तसं होऊ शकत नाही. कारण तीच सुई, तेच इंजेक्शन, तेच औषध इतर अनेक शस्त्रक्रियांसाठी वापरलं जातं. उदाहरणार्थ हातावरील शस्त्रक्रिया करताना पूर्ण हात बधिर करण्यासाठी खांद्यात हेच  इंजेक्शन दिलं जातं. पण आजतागायत कोणी अशी तक्रार केलेली नाही की ऑपरेशन छान झालं, पण खांद्यातील इंजेक्शनची जागा मात्र अजूनही सतत दुखते. मग जर तेच इंजेक्शन पाठीच्या मणक्यांमधील मोकळ्या जागेत दिलं तर पाठ कशी दुखेल? त्यामुळे खांदा दुखत नाही तर पाठसुद्धा दुखणार नाही. त्यामुळे प्रसूतीच्या वेळी सिझेरिअन करताना किंवा कळविरहित प्रसूती (एस्र््र४ि१ं’ ंल्लं’ॠी२्रं) करताना पाठीत दिलेल्या इंजेक्शनमुळे पाठदुखी कायमची मागे लागते हा एक मोठा गरसमज आहे.

प्रसूतीनंतर सुरू झालेल्या पाठदुखीला एक महत्त्वाचं कारण आहे. ते म्हणजे; स्तनपानासाठी चुकीच्या पद्धतीने बसणं. पाठीला कोणताही आधार न घेता बसणं, दोन्ही हातांनी बाळाला धरून त्याला दूध पाजताना त्याचं वजन आईच्या हातावर येणं, त्या हाताला कसलाच आधार नसणं, बाळाच्या तोंडापर्यंत आईची छाती पोहोचावी म्हणून वाकून बसणं अशा चुकीच्या पद्धतींमुळे स्त्रियांना प्रसूतीनंतर पाठीच्या दुखण्याचा त्रास होऊ शकतो.

स्त्रियांमध्ये  हिमोग्लोबिन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी, आर्यन या सगळ्याची कमतरता मुळातच असते. त्यातच प्रसूतीत  रक्तस्राव झालेला असतो. त्यामुळे हिमोग्लोबिन आणि कॅल्शिअमचं प्रमाण अजूनच  कमी झालेलं असतं. आईच्या दुधातून बाळाला कॅल्शिअम जातं आणि आईच्या शरीरातील कॅल्शिअमचं प्रमाण अजूनच कमी होतं. या सगळ्यामुळे पाठीच्या हाडांची आणि विशेषत: मणक्याची  झीज होऊ लागते. त्यामुळे पाठीचं दुखणं वाढू लागतं. थोडक्यात काय तर वरील गोष्टींकडे वेळीच लक्ष दिलं तर पुढील अनेक त्रास वाचू शकतात.

अशा प्रकारची पाठदुखी होऊ नये यासाठी व्यायाम हा मुख्य उपाय आहे. पण अनेक स्त्रिया व्यायाम करत नाहीत. हे चित्र प्रामुख्याने उच्चमध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय स्त्रियांमध्ये दिसून येतं. खरं तर व्यायामामुळे त्या त्या स्नायूंना बळकटी मिळत असते. स्नायूंना बळकटी मिळाली की पाठीचा कणा मजबूत राहतो. प्रसूती झाल्यानंतर हे व्यायाम करणं अतिशय गरजेचं असतं. पण याचं महत्त्व आजही अनेक स्त्रियांना समजलेलं नाही. प्रसूतीनंतर प्रत्येक स्त्रीचं दिवसभराचं वेळापत्रक हे तिच्या बाळाभोवती फिरत असल्यामुळे व्यायामासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याची सबब पुढे केली जाते. पण त्यांनी किमान स्ट्रेचिंगचे व्यायाम करायलाच हवेत. या व्यायामामुळे पाठीच्या कण्याला आधार मिळतो आणि पाठीचं दुखणं कमी होऊ शकतं.

रजोनिवृत्तीच्या काळात अनेकांना हा त्रास जाणवतो. गर्भाशय आपल्या जागेवरून खाली सरकलं असल्यास काही स्त्रियांना कंबर दुखीचा त्रास होतो. अशी एक गरसमजूत आहे की गर्भाशय काढून टाकण्याचे ऑपरेशन केल्याने पाठदुखी बळावते. वास्तविक रजोनिवृत्तीच्या काळात  स्त्रीच्या शरीरातील हार्मोन्स कमी झाल्याने मणक्यांची झीज होते आणि त्यामुळे पाठदुखी बळावते.

स्त्रियांनी पाठदुखी कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी पुरेसा तसंच सकस आहार घेणं, व्यायाम करणं आणि योग्य औषधं घेणं या गोष्टी आवर्जून करायला हव्यात. स्त्रियांमध्ये असलेलं आयर्न, कॅल्शिअमचं अपुरं प्रमाण ही बाब दुर्लक्षित करण्यासारखी नाही. त्यासाठी आवश्यक ती औषधं त्यांनी घ्यायला हवीत. पण आपल्याकडे ही गोष्ट गांभीर्याने घेतली जात नाही. सरकार त्यासाठी आवश्यक त्या गोळ्या मोफत देतं. असं असूनसुद्धा अनेक गरोदर स्त्रिया कॅल्शिअम आणि आयर्नसाठी ओषधं घेत नाहीत. त्याबद्दल विचारही केला जात नाही. सतत औषधं घेऊन पोटात अति रसायनं जायला नकोत, अशी समजूत यामागे असते.

स्त्रियांच्या पाठदुखीबद्दलचे गरसमज सगळ्यात आधी दूर व्हायला हवेत. त्यानंतर पाठदुखी टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी उपाय अमलात आणायला हवेत. आधी काय करायला नको हे जाणून ते प्रत्यक्षात आणून मगच काय करायला हवं याकडे पूर्णत: लक्ष द्यायला हवं !
(लेखक वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञ आहेत.)
शब्दांकन : चैताली जोशी