News Flash

ट्रम्प यांचे ट्वीट ‘हुकुमशाही..’

अमेरिकेत १८६४ मध्ये यादवी युद्धाचा भडका उडाला तेव्हा निवडणूक पुढे ढकलण्याच्या सूचना येऊ  लागल्या.

‘‘अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खरोखरच लोकशाही आवडत नाही!’’ – अशा प्रकारच्या टोकाच्या प्रतिक्रिया गेल्या चार वर्षांत शेकडो वेळा व्यक्त झाल्या. ट्रम्प यांची अनेक वक्तव्ये आणि विधाने वादग्रस्त ठरली. त्यांचे ताजे ट्वीट आहे, येत्या नोव्हेंबरमधील अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्याबाबतचे. करोनाच्या भीतीने नागरिक मतदानासाठी बाहेर पडण्याऐवजी टपाली मतदानाचा वापर करतील आणि तसे झाले तर २०२०ची निवडणूक अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक गैरप्रकार आणि गैरव्यवहाराची ठरेल, अशी भीती ट्रम्प यांनी व्यक्त केली. त्यांच्या रिपब्लिकन पक्षानेही त्यांना या बाबतीत साथ दिली नाही. ट्रम्प यांनी सवयीप्रमाणे लगोलग घूमजाव केले. परंतु, माध्यमांमध्ये मात्र त्यांच्या ट्वीटचे प्रतिध्वनी आणि प्रतिक्रिया उमटत आहेत.

ट्रम्प यांना लोकशाही आवडत नाही, हा निष्कर्ष आहे, ‘सीएनएन’ या वृत्तसंकेतस्थळाचे राजकीय विश्लेषक जॉन अ‍ॅव्हलॉन यांचा. ते म्हणतात, ‘‘अमेरिकेने भर यादवी युद्धातही न केलेली गोष्ट ट्रम्प करू इच्छितात. परंतु त्यांचे हे ट्वीट म्हणजे त्यांच्या चमूच्या नमुनेदार वक्तव्यांपैकीच एक आहे. आपला पराभव झाला तर निवडणूक प्रक्रियेविषयी संशयाचे बीज पेरून ठेवण्याच्या अध्यक्षांच्या घातक खेळाचा हा एक भाग आहे. पराभवाच्या भीतीने एक आत्मकेंद्रीव्यक्ती स्वार्थासाठी लोकशाहीवरील लोकांच्या विश्वासाला डळमळीत करीत आहे.’’ अमेरिकेत १८६४ मध्ये यादवी युद्धाचा भडका उडाला तेव्हा निवडणूक पुढे ढकलण्याच्या सूचना येऊ  लागल्या. मात्र तत्कालीन अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी, पराभवाची भीती असतानाही त्या फेटाळल्या आणि ‘निवडणुकांशिवाय स्वतंत्र सरकार स्थापन केले जाऊ  शकत नाही.. आणि फुटीर शक्ती निवडणूक पुढे ढकलण्यास भाग पाडत असतील तर आपण आधीच जिंकलो आहोत किंवा आपला सर्वनाश झाला आहे, असा त्याचा अर्थ होईल,’ असे लिंकन यांनी स्पष्ट केले होते, हा ऐतिहासिक संदर्भही अ‍ॅव्हलॉन यांनी लेखात दिला आहे.

ट्रम्प यांच्या ट्वीटचे वृत्त देताना ‘बीबीसी’ने आनुषंगिक बाबींवर प्रकाश टाकण्याबरोबरच विश्लेषणही केले आहे. ‘‘पराभवाच्या भीतीने ट्रम्प निवडणुकीला बळीचा बकरा बनवून विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. टपाली मतदानाविषयी खोटे आणि दिशाभूल करणारे दावे करत आहेत,’’ अशी टीका ‘बीबीसी’चे उत्तर अमेरिकेतील प्रतिनिधी अँथनी झर्कर यांनी केली आहे. ट्रम्प यांच्या ट्वीटचा समाचार घेताना झर्कर म्हणतात, ‘‘डेमॉक्रॅट्सचा अंशत: प्रभाव असलेल्या काँग्रेसच्या मान्यतेशिवाय निवडणूक पुढे ढकलता येत नाही, हे ट्रम्प यांना माहीत नसेल तर ते त्यांना कोणीतरी समजावून सांगण्याची गरज आहे. आपल्या ट्वीटमुळे राजकीय वादळ उठू शकते हे त्यांना माहीत असले पाहिजे.’’ दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक विकासाच्या आकडय़ांवरून लक्ष भलतीकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशी टिप्पणीही या विश्लेषणात करण्यात आली आहे.

निवडणूक पुढे ढकलण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न असावा, परंतु ते घटनाबाह्य असल्याचे भाष्य ‘ द न्यू यॉर्क टाइम्स’मधील लेखात नॉर्थ-वेस्टर्न युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक स्टीव्हन जी. कॅलाब्रेसी यांनी केले आहे. ‘‘मी  १९८०पासून रिपब्लिकन पक्षाला मतदान करीत आहे. अगदी ट्रम्प यांनाही मी मतदान केले. ट्रम्प यांच्यावरील महाभियोग खटल्याच्या विरोधात लिहिलेही. परंतु आता ट्रम्प यांच्या निवडणूक ट्वीटबद्दल खेद व्यक्त करतो. ते हुकूमशाही प्रवृत्तीचे आहेत या डेमोक्रॅट्सच्या आरोपाला मी आजपर्यंत ‘राजकीय अतिशयोक्ती’ समजत होतो. परंतु हे ट्वीट हुकूमशाही प्रवृत्तीचे आहे. त्यांच्यावर तात्काळ महाभियोग चालवण्यासाठी आणि पदावरून हटवण्यासाठी हे ट्वीट पुरेसे आहे,’’ असे प्रा. कॅलाब्रेसी यांनी म्हटले आहे. करोनापेक्षाही तीव्र संकटांना अमेरिकेने तोंड दिले :  १८६४ची यादवी, १९३२ची महामंदी आणि १९४४चे दुसरे महायुद्ध. परंतु या काळातही निवडणुकीची तारीख चुकली नव्हती, याचे स्मरणही हा लेख देतो.

‘वॉशिंग्टन पोस्ट’मधील लेखात येल विद्यापीठातील राजकीय विश्लेषक प्रा.टिमथी स्नायडर यांनी, ट्रम्प यांच्या निवडणूक ट्वीटला हुकूमशाहीच्या प्रचाराचे आठ नियम लागू केले. प्रा. स्नायडर म्हणतात, ‘‘हुकूमशाही शक्ती आठ मार्गाचा अवलंब करतात. एक- आपल्या अनुयायांचा आपल्यावरील विश्वास तपासण्यासाठी स्वत:बद्दल विरोधाभास निर्माण करणे, दोन- मूलभूत गोष्टींवरून लक्ष विचलित करण्यासाठी खोटे बोलणे, तीन- संकटे निर्माण करणे, चार- इतरांना शत्रू ठरवणे, पाच- गर्व बाळगण्याबरोबरच इतरांना अपमानित करणे, सहा- मतदानाला विरोध करणे, सात- लोकशाहीवर संशय व्यक्त करणे आणि आठ- व्यक्तिस्तोम माजवून स्वसामर्थ्य वाढवणे.’’

संकलन : सिद्धार्थ ताराबाई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 1:40 am

Web Title: donald trump dictatorship tweet trump fascist propaganda zws 70
Next Stories
1 संघर्षांत नवी ठिणगी.. 
2 वारशाचे ‘मशीदीकरण’.. 
3 हाँगकाँगच्या गळचेपीनंतर.. 
Just Now!
X