स्वप्निल घंगाळे

‘नवीन वर्षांत बाकी सारं काही जागेवर आलं तरी परीक्षा मात्र ऑनलाइनच राहू दे देवा’, अशी एक पोस्ट काही दिवसांपूर्वी वाचली आणि खरोखरच तंत्रज्ञानासाठी तसेच ते वापरणाऱ्या तरुणांसाठी येणारं वर्ष कसं असेल असा प्रश्न मनात डोकावून गेला. २०२० एखाद्या टी—२० सामन्याप्रमाणे जाण्याऐवजी कसोटी सामन्याप्रमाणे गेलं तसं २०२१ चं होईल अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. म्हणजेच यंदाचं वर्ष हे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अर्थातच आरोग्य यंत्रणा केंद्रस्थानी ठेवूनच असेल. मात्र तरुणांसाठी काय खास असेल असा विचार करायचा झाल्यास वर्क फ्रॉम होमबरोबरच फाइव्ह जी, मोबाइलमधील वेगळे प्रयोग अन् ऑनलाइनवर वाढलेली निर्भरता असं एकंदरीत हे वर्ष राहण्याची चिन्हं दिसत आहेत.

गेलं वर्ष बरंच काही शिकवून गेलं. म्हणजे तुम्हीच विचार करा ना, मागच्या १ जानेवारीला आपल्यापैकी कोणीही विचार केला नसेल की आपण ओटीटी प्लॅटफॉर्मवर एवढे सारे चित्रपट पाहू किंवा ऑनलाइन घरात बसून परीक्षा देऊ किंवा व्हिडीओ कॉलवर गप्पांच्या मैफिली रंगवू.. पण ते सारं घडलं करोनामुळे. अर्थात यंदाच्या वर्षीही करोना हा मुद्दा तंत्रज्ञानाच्या आणि एकंदरीत जगातील सर्वच कारभाराच्या केंद्रस्थानी राहील यात शंका नाही. कारण लस येईपर्यंत अर्ध वर्ष निघून जाईल असा अंदाज आहे. मात्र त्याच प्रमाणे ज्या वेगाने आता सर्वकाही पूर्ववत होऊ लागलं आहे, त्यानुसार जग थांबून राहणार नाही एवढं नक्की. म्हणजे आता अगदी वर्षांच्या सुरुवातीपासूनच ऑनलाइन सेलचा धडाका सुरू होणार आहे तो अगदी पुन्हा सालाबादप्रमाणे इअर एण्डर सेलपर्यंत कायम असेल.

यंदाचं वर्षही ढोबळमानाने तंत्रज्ञानावर अवलंबून राहण्यासारखं असू शकतं असा अंदाज आहे. म्हणजे मोठय़ा इयत्तेतील मुलांच्या शाळा सुरू झाल्या तरी चिमुकल्यांना कदाचित थेट पुढच्या शैक्षणिक वर्षांतच शाळेचं तोंड पाहायला मिळू शकतं. तरुणांबद्दल आणि कॉलेजला जाणाऱ्यांबद्दल बोलायचं झाल्यास अनऑफिशियली भेटीगाठी होत राहिल्या तरी वर्षांच्या मध्यापर्यंत सर्व काही पूर्ववत होण्याची शक्यता कमी असून करोनामुळे रुळावरून घसरलेली गाडी पुन्हा रुळावर येण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार. त्यामुळे व्हिडीओ कॉल, ऑनलाइन क्लासेस, वेबमालिका, मिम्स, ट्रेण्ड्स हे सारं २०२० च्या दुसऱ्या सहामाहीसारखं २०२१ च्या पहिल्या सहामाहीमध्येही सुरू राहील, हे मनाशी बांधूनच वाटचाल करायची आहे.

दुसरा महत्त्वाचा बदल अपेक्षित आहे तो फाइव्ह जी. भारतामध्ये या वर्षीपासून फाइव्ह जी सेवा उपलब्ध होईल, असा दावा केला जातो आहे. फाइव्ह जीमुळे लगेच मोठा बदल दिसून येणार नसला तरी ज्याप्रमाणे फ्री नेटचा सध्याचा ट्रेण्ड रुळण्यासाठी काही वर्षांंपूर्वी सुरुवात झाली तसेच यंदाचे वर्ष हे फाइव्ह जीचं श्री गणेशा करणारं वर्ष ठरणार आहे. अनेक कंपन्या या शर्यतीमध्ये असल्याने ग्राहकांचा फायदा होण्याची चिन्हं सध्या तरी दिसत आहेत. त्यामुळे ट्रायल म्हणजेच प्रयोग म्हणून फाइव्ह जी वापरून पाहायला यंदा काही हरकत नाही, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. तेवढं फक्त तुमचा मोबाइल फाइव्ह जीला सपोर्ट करणारा आहे की नाही ते पाहून घ्यावं लागेल इतकंच.

‘वर्किं ग क्लास’ म्हणजेच नुकत्याच कामाला लागलेल्या तरुणाईच्या दृष्टीने थोडी दिलासादायक बातमी म्हणजे यंदाच्या वर्षांतील सुरुवातीचे काही महिने वर्क फ्रॉम होमचा आनंद घेता येईल. त्याप्रमाणे काही बहुराष्ट्रीय कंपन्या आणि मोठय़ा कंपन्या पुढील बराच काळ वर्क फ्रॉम होम धोरण सुरू ठेवतील. त्यामुळे यंदा वर्षांची सुरुवात तरी मागून पुढे या पद्धतीने असेल असा अंदाज वर्तवला जातोय. वर्क फ्रॉम होम करताना वेळेचं योग्य नियोजन केलं तर बराच मोकळा वेळ मिळू शकतो अन् त्यात बऱ्याच गोष्टींसाठी वेळ देता येऊ शकतो. या मोकळ्या वेळेचा चांगला वापर हा मुद्दा नवीन वर्षांसाठी न्यू इयर रेझोल्युशन म्हणून विचार करण्यासारखा आहे नाही का?

बरं आणखीन एक मत्त्वाचा मुद्दा म्हणजे यंदा फोल्डेबल फोन्स, फोनबरोबर चार्जर न मिळणे यासारख्या गोष्टींची थोडी सवय लावली पाहिजे. म्हणजे अगदी रोजच्या वापरातील या गोष्टी नसल्या तरी यासंदर्भातील बातम्या आणि मिम्ससाठी तयार राहता येईल. तसेच यंदा सालाबादप्रमाणे पुन्हा सोशल नेटवर्किंग आणि इंटरनेटवर व्हिडीओ क न्टेन्टचे महत्त्व वाढणार आहे. सर्वच सोशल नेटवर्किंग साइट्स थोडय़ा फार फरकाने व्हिडीओंना प्राधान्य देत असल्याने व्हिडीओ बनवणारे आणि पाहणारे यंदाचं वर्ष गाजवतील यात शंका नाही.

मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्सबद्दल सांगायचे झाल्यास यंदा भारतीय अ‍ॅप्लिकेशनला मागणी वाढेल. म्हणजे पब्जी, कॅम स्कॅन आणि इतर अनेक गोष्टींना उपलब्ध असणाऱ्या पर्यायी अ‍ॅप्सची यावर्षी चलती असेल. शिवाय नवीन संकल्पना घेऊन येणाऱ्यांनाही यंदाच्या वर्षी चांगली संधी आहे. यासाठी सरकारकडूनही प्रोत्साहन दिलं जातं आहे. असं एकंदरीत सकारात्मक चित्र असलं तरी जागतिक स्तरावरील अ‍ॅप्सला या वर्षी थेट टक्कर देऊ शकणारं भारतीय बनावटीचं अ‍ॅप पाहायला मिळू शकतं असं म्हणणं जरा अती महत्त्वाकांक्षा बाळगल्यासारखं होईल, मात्र या दिशेने भारताचा प्रवास नक्कीच साकारात्मक असेल. एकू णच तंत्रज्ञानासाठी हे वर्ष बरंच काही घेऊन येणारं आहे. त्यामुळे जस्ट सीट बॅक अ‍ॅण्ड वॉच एवढंच आपण आता करू शकतो.

viva@expressindia.com