वेदवती चिपळूणकर

इथे भारतात असताना तिने आयटी अर्थात ‘इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’मध्ये इंजिनीअरिंग केलं, पण ते करत असतानाच तिच्या लक्षात आलं की आयुष्यभर हेच काम करायला तिला आवडणार नाही. साध्या मध्यमवर्गीय घरातल्या या मुलीने अमेरिके त जाऊन फिल्मचं ट्रेनिंग घ्यायचं स्वप्न पाहिलं आणि स्वत:च्या बळावर त्याच्या दिशेने झेपही घेतली. काही मोठय़ा इंटरनॅशनल टीव्ही शोजच्या प्रॉडक्शनमध्ये काम करता करता आकांक्षा प्रभुणे हे नाव कॅमेऱ्यामागच्या इंडस्ट्रीला परिचित झालं. हळूहळू कॅमेऱ्यामागचं हे नाव सगळ्या जगासमोर येईल, अशी खात्री आकांक्षा बाळगून आहे.

आयटी इंजिनीअर असलेल्या मुलीने सरळपणे नोकरी करायची किंवा फार फार तर मास्टर्ससाठी प्रयत्न करायचा हे पर्याय सोडून आकांक्षाने तिसराच पर्याय निवडला. तिच्या या निर्णयाला तिच्या घरच्यांचा खंबीर पाठिंबा मिळाला. यूएसला जायचं ठरवताना आकांक्षाला काय वाटत होतं याबद्दल ती सांगते, ‘अमेरिकेत ना माझ्या कोणी ओळखीचं गेलं होतं, ना तिथे राहत असलेल्या कोणाशी माझ्या ओळखी होत्या! सगळं काही तिथे जाऊनच नव्याने बघायचं होतं, अनुभवायचं होतं. माझी इच्छा इतकी स्ट्राँग होती की या सगळ्याचं प्रेशर आलं, पण त्यामुळे मागे फिरायचा विचार करावासा मला वाटलाच नाही. माझ्यासाठी ते संपूर्ण नवीन जग होतं’. लहानपणापासून टीव्ही सिरियल्स आणि चित्रपट यांच्याबद्दल आपल्याला विशेष प्रेम होतं, असं ती सांगते. आणि अमेरिकेत जाऊन ते प्रेम प्रत्यक्षात उतरणार होतं, त्यामुळे माझ्यात प्रचंड उत्साह आला होता. इंजिनीअर म्हणून आयुष्यभर काम करणं मला जमणारच नव्हतं, कारण आयुष्यभर काम करावं यासाठी त्या क्षेत्राबद्दल जी ओढ, प्रेम हवं ते मुळातच माझ्यात नव्हतं, असं ती स्पष्ट करते. त्यामुळे एकतर फिल्ममेकिंग करण्याचा निर्णय आणि तोही अमेरिकेत शिकून त्या क्षेत्रात उतरण्याचा हा निर्णय खूप आव्हानात्मक असला तरी तोच योग्य होता, या विश्वासाने पुढे पाऊल टाकल्याचे आकांक्षा सांगते.

आकांक्षाला लहानपणापासून टीव्ही आणि फिल्म्सचं आकर्षण होतं, मात्र सुरुवातीपासूनच तो मार्ग निवडणं तिला जमलं नाही. त्याबद्दल बोलताना ती म्हणते, ‘आर्ट्सला आपल्याकडे स्टेबल करिअर म्हणून बघितलं जात नाही. त्यामुळे आपल्याकडे फिल्ममेकर्स कमी आणि इंजिनीअर्स, डॉक्टर्स जास्त दिसतात. फिल्ममेकिंग हे एक शास्त्र असतं, त्यात करिअर घडवण्यासाठी काहीतरी शिकावं लागतं, डोकं चालवावं लागतं हे पटकन मान्यच होत नाही. माझ्या लहानपणापासून असलेल्या या आवडीला करिअर म्हणून बघता येईल, घडवता येईल हे आधी कधी कळलंच नाही कारण यात काही शिकण्यासारखं असतं हेच माहिती नव्हतं. सामान्य मध्यमवर्गीय घरात करिअरचे जे पर्याय माहिती असतात तेवढेच आम्हालाही माहिती होते. त्यामुळे यात काही शिकता येऊ  शकतं आणि पुढे स्टेबल करिअर घडवता येऊ  शकतं याची कल्पनाही कोणाला नव्हती.’ मात्र जेव्हा आकांक्षाने या शिक्षणाची माहिती मिळवली, प्रवेश मिळवला तेव्हा तिच्या घरच्यांनी, मित्रपरिवाराने तिला अतिशय सकारात्मक प्रोत्साहन दिलं. ‘मला माझ्या कोणत्याही नवीन कामाची पब्लिसिटी करावीच लागत नाही. आईबाबांना सांगितलं की तेच खूप उत्साहाने सगळ्यांना सांगतात,’ असं आकांक्षा म्हणते.

‘फ्रेण्ड्स’ हा गेल्या दोन पिढीतल्या तरुण तुर्काना भुरळ घालत आला आहे. तसाच तो आकांक्षाचाही आवडता शो आहे. या शोचे बिहाइन्ड द सीन्स, मेकिंग, ब्लूपर्स या व्हिडीओजनी तिला प्रचंड आकर्षित के लं होतं आणि तोच तिची आवड ठरवण्याचा महत्त्वाचा मुद्दा बनला. कॅमेऱ्यामागे अनेक माणसं खूप सारी मेहनत घेतात, अनेक तांत्रिक अडचणींना तोंड देतात, सतत धावपळ करत असतात आणि तरीही त्यांचं काम ते मनापासून खूप एन्जॉय करतात, हे बघून तिला तिच्या आवडीची खात्री पटली आणि तिने हे क्षेत्र निवडलं. टीव्ही आणि फिल्म्स या क्षेत्राबद्दल असणाऱ्या अनेक समज-गैरसमजांबद्दल आकांक्षा म्हणते, ‘अनेकांना या क्षेत्राची डार्क साइडच आधी दिसते. ती डार्क साइड प्रत्येक क्षेत्राला असते. या क्षेत्रात प्रामाणिक आणि खरी माणसं भेटणं खूप अवघड असतं असं सगळेच म्हणतात. मात्र मला आत्तापर्यंत फक्त चांगलीच माणसं भेटली. गेल्या वर्षी मी ‘नॅशनल जिओग्राफिक वाइल्ड’साठी होवी मेंदेलच्या एका शोसाठी आणि ‘ऑक्सिजन’ चॅनेलवरच्या एका क्राइम शोसाठी असोसिएट प्रोडय़ुसर म्हणून काम केलं. त्या टीममध्ये काम करणारी मी एकटीच भारतीय होते. मात्र त्यांनी मला कधीच एकटीला सोडलं नाही, वेगळं वाटू दिलं नाही की वाळीत टाकलं नाही. उलट मला कम्फर्टेबल वाटेल यासाठी संपूर्ण युनिट मनापासून प्रयत्न करायचं.’

प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या पद्धतीने आव्हानांना तोंड द्यावं लागतं. काही वेळा अशा येतात जेव्हा सगळं काम सोडून देण्यात शहाणपणा आहे असंही वाटतं. अशा मन:स्थितीला सामोरं जाताना खंबीर असणं आवश्यक असतं. आकांक्षा म्हणते, ‘प्रत्येक माणसाला कोणत्याही क्षेत्रात अपयशाचा सामना कधी ना कधी करावाच लागतो. काही वेळा ते आर्थिक अपयश असतं, काही वेळा तुमच्याकडे काही कामच नसतं, काही वेळा जे शिकतोय ते प्रत्यक्षात जमत नसतं, इत्यादी अनेक पद्धतींनी अपयश हे तुमच्यासमोर येऊन उभं राहतं. माझ्या बाबतीत जेव्हा असा कोणता प्रसंग आला तेव्हा माझ्या डोक्यात ‘हे केलं ते चुकलं का’ किंवा ‘हे सोडून देऊ या का’ असे विचार कधीच आले नाहीत’. उलट यातून बाहेर कसं पडायचं किंवा यावर उपाय काय असेल, हेच विचार कायम माझ्या डोक्यात येतात. त्यामुळे या अडचणींना सामोरं जाणं मला कठीण गेलं तरी त्यांनी माझं बळ काढून घेतलं नाही, असं ती अगदी सहज विश्वासाने सांगते.

केवळ स्वत:च्या इच्छेवर आणि आवडीवर विश्वास ठेवून सातासमुद्रापार जाऊन काम करणारी आकांक्षा कोणत्याच अडचणींना घाबरून हार मानत नाही. मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषांमध्ये प्रवीण असणाऱ्या आकांक्षाला या तिन्ही भाषांमध्ये काम करण्याची इच्छा आहे. स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवून घेतलेली ‘लीप ऑफ फेथ’ नेहमीच उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाते, हा आकांक्षाचा अनुभव आपल्यालाही बरेच काही शिकवून जाणारा आहे.

‘आवड, इच्छा, क्षमता या सगळ्यांसोबतच प्रॅक्टिकल आणि रिअलिस्टिक विचारही तितकाच गरजेचा आहे. आपण स्वत:हून जे निवडलंय ते पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे, तिथून मागे फिरण्याचा विचार करणं चुकीचं आहे. आपल्याला स्ट्रगल करावा लागणार हे माहीत असतानाही आपण ते क्षेत्र निवडलं की ती आपली जबाबदारी होते. गिव्हअप करून मागे फिरणं हा पर्यायच असू शकत नाही. स्वत:ला पुन्हा उभं करणं हा खरं तर सगळ्यात अवघड, पण सगळ्यात योग्य पर्याय आहे’

– आकांक्षा प्रभुणे