News Flash

बावरा मन : अभ्यासक्रमाआधीची कलचाचणी

व्यवसायपर मार्गदर्शनपर कलचाचणी (AptituteTest) करून घेणे आवश्यक

मी बारावी सायन्सची विद्यार्थिनी आहे. इंजिनीयिरग करायचं ठरवून मी दहावीनंतर सायन्सला प्रवेश घेतला. घरातल्या सगळ्यांची इच्छा मी इंजिनीयर व्हावं अशी आहे, पण अकरावीपासून मला जाणवतंय की, सायन्समधले विषय मला फार काही झेपणारे नाहीत. म्हणजे आवड नाही असं नाही पण दहावीत बरे मार्क्‍स मिळविणारी मी अकरावीत चक्क गणितात फेल झाले. मला अंदाज होताच, पण घरच्यांना धक्का बसलाय. कुठल्याच विषयात हल्ली मन रमत नाही. भीती वाटते.. आपली सायन्सची निवड चुकली तर नाही ना? असं वाटतं. दिशाहीन झाल्यासारखं वाटतं. प्लीज मला गाइड करा.

– ऋचा

प्रिय ऋचा,

तुझ्यासारखी अनेक मुलं मी आजकाल बघतो. दहावीमध्ये खिरापतीसारखे गुणवाटप केल्यामुळे टक्केवारीवरून आपल्या आवडीनिवडी किंवा कुवतीची अजिबात जाणीव होत नाही आणि मग अकरावीमध्ये विज्ञानाच्या अभ्यासक्रमाची गाठ पडली की स्वत:चा आत्मविश्वास गमावून बसतात. अगं आपला मेंदू असतो ना तो बहुरूपी असतो. वेगळ्या वेगळ्या क्षमतांनी तो ठासून भरलेला असतो. पण गंमत अशी की, आपल्या क्षमतेबद्दल कोणीही आपणाला सांगत नाही. सरधोपटपणे मार्कावरून विज्ञान शाखेची निवड करणे हे म्हणूनच चुकीचे आहे. वाढत्या अभ्यासक्रमाबरोबर मेंदूची क्षमता आणि अपेक्षा यांचा समन्वय लागला नाही तर अचानक स्वत:बद्दल आणि स्वत:च्या क्षमतेबद्दल मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि याच परिस्थितीतून तू सध्या जात आहेस.

गणित विषय तुझा काही कारणाने पक्का झालेला नाही आणि आता परीक्षेलाही फारसे दिवस राहिलेले नाहीत. तुझ्या ओळखीच्या गणित विषयाच्या अध्यापकांबरोबर बसून पास होण्यापुरते मार्क्‍स मिळवता येतील का बघ. तुला पुढच्या धडय़ावरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे हे समजून घे, लक्षात घे. तुझ्या परीक्षेत ऑप्शन/ पर्याय भरपूर असतो. त्याचा फायदा घे. जे गणितातले विषय पक्के करणार आहेस, त्याचा सराव कर. एखादा पेपर सोडवायला मिळाला तर त्याहून चांगलं.

काही टय़ुशन क्लासेसमधून सध्या क्रॅश कोर्ससुद्धा घेतले जातात, त्याचादेखील तुला उपयोग होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव की, या परीक्षेनंतर मात्र तुझ्या मनातील सायन्सविषयीचा हा संदेह दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुझी व्यवसायपर मार्गदर्शनपर कलचाचणी (AptituteTest) करून घेणे आवश्यक आहे. त्या मार्गदर्शन चाचणीमध्ये व्यवसाय, जीवनशैली, आवड-निवड चाचणी बुद्धिमत्ता चाचणी व्यक्तिमत्त्वमापन चाचणी तपासणे आवश्यक आहे. या सर्वाच्या मदतीने आपण शास्त्रोक्त पद्धतीने व्यवसाय निवड करू शकतो.

तेव्हा ऋचा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घे. या एका अनुभवावरून स्वत:बद्दल नको ते विचार करू नकोस. ज्या पद्धतीने तुला या अनुभवातल्या अपयशाची सल लागते आहे, त्यावरून असं वाटतंय की तुझ्या यशाचा मार्ग तुला दिसला तर तू उदंड उमेदीने कामाला लागशील आणि मग यश हे तुझंच असेल. त्या यशासाठी तुला ऑल द बेस्ट!

मोकळं व्हा!

आपलं आयुष्य वेगवान झालंय हे खरंय. पण या वेगाशी जुळवून घेताना बऱ्याचदा आजच्या तरुणाईचीही प्रचंड मानसिक ओढाताण होतेय. बदललेल्या लाइफमध्ये ताणही वेगळे आहेत. मनाची घालमेल तीच आहे, पण कारणं वेगळी आहेत. अभ्यास, परीक्षा, रिलेशनशिप, ब्रेक-अप, एकटेपणा, रॅगिंग.. अशा एक ना दोन असंख्य गोष्टीत नैराश्याचे क्षण येतात. निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा काय करावं सुचत नसतं. याचा मानसिक त्रास होतो आणि कुणाकडे तरी सल्ला मागावासा वाटतो. कुणाबरोबर तरी आपला प्रश्न शेअर करावासा वाटतो. असा कुणी तरी त्या वेळी लागतो, जो आपलं म्हणणं ऐकून घेईल, समजून घेईल आणि योग्य तो सल्ला देईल.  द्विधा मन:स्थितीतून, मानसिक गुंत्यातून आपल्याला मोकळं करील. मुंबईतील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ

डॉ. आशीष देशपांडे या सदरातून तुमच्या प्रश्नांना उत्तरं देतील. डॉक्टरांपर्यंत पोचण्यासाठी तुमचे प्रश्न viva@expressindia.com या ई-मेल आयडीवर आम्हाला पाठवा. सब्जेक्टलाइनमध्ये ‘बावरा मन’ असं जरूर लिहा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 1:18 am

Web Title: aptitude test before 12th exam
Next Stories
1 चॅनेल Y : चला गोष्टी सांगू या..
2 नवशब्दकर्ते
3 गाइज अ‍ॅण्ड अदरवाइज : ‘वन साइडेड’ विटनेसेस
Just Now!
X