16 October 2019

News Flash

फिट-नट : ऋषी सक्सेना

फिटनेसच्या बाबतीत रुपेरी पडद्यावरचे कलाकार हे आपल्यासाठी पहिला आरसा ठरतात.

ऋषी सक्सेना

प्रियांका वाघुले

फिटनेसच्या बाबतीत रुपेरी पडद्यावरचे कलाकार हे आपल्यासाठी पहिला आरसा ठरतात. त्यांचा फिटनेस, त्यांची शरीरयष्टी आपल्याला भावली की ते नेमके कोणता व्यायाम करतात, काय डाएट घेतात, याचा शोध आपण घेतो. ‘फिट-नट’ या सदरातून तरुण कलाकारांची फिटनेस स्टोरी आपण जाणून घेणार आहोत.

‘काहे दिया परदेस’ या झी मराठी वाहिनीवर लोकप्रिय ठरलेल्या मालिकेत गौरीजी गौरीजी म्हणत मराठी घराघरांत शिरलेला ऋषी सक्सेना. या मालिकेतील शिव आणि गौरीची जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करून होती. त्यामुळे मालिका संपली तरी शिव काही अजून प्रेक्षकांच्या डोक्यातून जात नाहीये. शिवची भूमिका गाजल्यानंतर ऋषी सक्सेना ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरच्या ‘घाडगे अ‍ॅण्ड सून’ मालिकेतही अगदी छोटेखानी भूमिकेत दिसला होता. मात्र त्याने साकारलेला शिव काही लोक विसरायला तयार नाहीत. हिंदी असला तरी मराठी टेलीविश्वात शिरलेल्या ऋषीसाठीही फिटनेसचे गणित फार महत्त्वाचे आहे.

मराठी प्रेक्षकांच्या पसंतीस पडणारा शिव म्हणजेच ऋषी सक्सेना त्याच्या फिटनेसमुळे विशेषकरून तरुण-तरुणींच्या चर्चेत असतो. ‘फिटनेस फ्रीक’ म्हणून चर्चेत असणारा ऋषी अगदी नियमित व्यायाम करत असल्याचे सांगतो. नियमित व्यायाम करणे ही शरीराची गरज असते. त्यामुळे आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढते, असं तो म्हणतो.

नियमित व्यायाम करत असताना अनेकदा वेळेअभावी हवा तसा आणि गरजेइतका व्यायाम करता येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा व्यायाम आटोपता घ्यावा लागतो. पण असे असले तरी व्यायाम करण्याचे तो टाळत नाही. जेव्हा आणि जसा वेळ मिळेल तसा वेळ व्यायामासाठी देत असल्याचे तो सांगतो.

अनेकदा व्यायामासाठी पुरेसा वेळ देता येत नसला तरीही जिममध्ये स्कॉट्स आणि डेडलिफ्ट या दोन गोष्टींना त्याच्या लेखी अतिशय महत्त्व असल्याचे तो सांगतो. वेळ कमी असताना स्कॉट्स आणि डेडलिफ्टसाठी आवश्यक तेवढा वेळ देऊ न मग इतर प्रकार पूर्ण करण्यावर त्याचा भर असतो.

स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये स्कॉट्स आणि डेडलिफ्ट हे शरीरातील मोठय़ा भागांवर काम करणारे ठरतात. शरीरातील महत्त्वाच्या मोठय़ा भागांना जसे की पाय, पाठ हे या व्यायाम प्रकारात सामावून घेतले जातात. ज्यामुळे शरीरातील महत्त्वाचे अवयव कार्यरत होतात. आणि त्यामुळे शारीरिक क्षमता वाढली जाते. त्यामुळे जिम करताना स्कॉट्स आणि डेडलिफ्ट हे माझ्या प्रायॉरिटी लिस्टमध्ये असल्याचे ऋषी सांगतो.

First Published on January 11, 2019 1:14 am

Web Title: article about fitness stories of young artists