News Flash

नवं दशक नव्या दिशा :  कचऱ्याची उठाठेव – १

नैसर्गिक तसेच मानवनिर्मित किरणोत्सर्गी पदार्थ वापरून ऊर्जेची निर्मिती करण्यामध्ये भारत आज तेराव्या स्थानावर आहे.

सौरभ करंदीकर viva@expressindia.com

प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक आयझॅक अ‍ॅसिमोव्ह यांच्या ‘द लास्ट क्वेश्चन’ (शेवटचा प्रश्न) या लघुकथेमध्ये एक मनोरंजक प्रसंग आहे. एक लहान मुलगा आपल्या बॅटरीवर चालणाऱ्या खेळ्ण्याशी खेळत असतो. अचानक बॅटरी संपते आणि ते खेळणं बंद पडतं. मुलगा रडू लागतो. त्याचे वडील त्याची समजूत काढतात. ‘आपण नवीन बॅटरी आणू, मग ते पुन्हा सुरू होईल’. पण मुलगा काही ऐकत नाही. ‘मला हीच बॅटरी पुन्हा चालू करून हवी आहे’. ‘बाळा, असं होत नसतं’, बिचारा बाप उत्तरतो. ‘पण का?’ ‘हा निसर्गाचा नियम आहे. एखादी गोष्ट बिघडली, नष्ट पावली की ती पूर्ववत होत नाही’. ‘का म्हणून?’, मुलाचा प्रश्न अनुत्तरित राहतो. प्रसंगाच्या शेवटी हाच प्रश्न तो माणूस जगातल्या सर्वशक्तिशाली कॉम्प्युटर ‘युनिव्हॅक’ ला विचारतो. (आपल्या इंटरनेटसारखं, परंतु स्वत: विचार करू शकणारं हे कॉम्प्युटर – पात्र आयझॅक अ‍ॅसिमोव्ह यांच्या अनेक कथांमध्ये आढळतं). युनिव्हॅक देखील या प्रश्नाचं चटकन उत्तर देऊ शकत नाही. निसर्गातल्या प्रत्येक जन्माला येणाऱ्या वस्तूचा अंत होतोच. रचलेली प्रत्येक वस्तू कधी ना कधी उद्ध्वस्त होते (अ‍ॅट्रोफी). प्रत्येक गोष्टीची एक्स्पायरी डेट असतेच. या नियमाला अपवाद नाही. शतकानुशतकं निश्चल वाटणारे डोंगर देखील झिजतात, मग बॅटरीची काय कथा? कोटय़वधी वर्ष उलटतात, तरी युनिव्हॅक या प्रश्नाचं उत्तर शोधतच राहतो.

कथेचा शेवट सांगत नाही, परंतु इतकंच सांगतो की प्रत्यक्षात तरी कुठल्याही वस्तूला ‘आधी होतं तसं’ बनवणं शक्य नाही. वापरलेल्या बहुतांश गोष्टी (संपलेल्या बॅटरी सेलसारख्या) फेकूनच द्याव्या लागतात. दसऱ्याला आपटय़ाची पानं  ‘सोनं’ मानली जातात, पण त्यांचा हा मान केवळ एका दिवसापुरताच असतो, तशी काहीशी गत. आजचा भाजीपाला उद्याचा कचरा होतो. आजची पुस्तकं उद्याची रद्दी होतात. आजची गॅजेट्स उद्याचा इलेक्ट्रॉनिक कचरा होतात. आपल्या घरातला कचरा बाहेर जातो आणि दृष्टीआड असल्याने तो आपला ‘प्रॉब्लेम’ नाही अशी आपली धारणा होते. कचऱ्याची गाडी एक-दोन दिवस आली नाही तर आपली कशी तारांबळ उडते (निदान शहरी भागात) ते आपण अनुभवलेलं असेलच.

कचऱ्याचं विलगीकरण, त्याचं वैयक्तिक पातळीवर व्यवस्थापन, कंपोस्टिंग, स्वच्छता झालंच तर वस्तूंचा पुनर्वापर इत्यादी महत्त्वाच्या विषयात डोकावणे हा या लेखमालेचा  अजिबात उद्देश नाही, त्यावर अनेक समाजसुधारकांनी वेळोवेळी लिखाण केलेलंच आहे. आपण गेल्या शतकात आपल्या स्वत:च्या हाताने पृथ्वीची आणि सभोवतालची कशी कचराकुंडी केली आहे, त्याचा आढावा घेणं हा या मालिकेचा उद्देश आहे. जेम्स मार्टिन यांनी त्यांच्या ‘मीनिंग ऑफ ट्वेन्टीफर्स्ट सेंच्युरी’ (एकविसाव्या शतकाचा अर्थ) या पुस्तकात आपण आतापर्यंत केलेल्या चुका निस्तरायची जबाबदारी युवा पिढीच्या खांद्यावर जबरदस्तीने टाकल्याचं कबूल केलेलं आहे. त्यांनी या पिढीचं ‘ट्रान्झिशन जनरेशन’ (संक्रमणकर्ती पिढी) असं नामकरण केलेलं आहे. हे संक्रमण आणि जीवनातील सुधारणा घडल्या नाहीत तर हे मानवजातीचं शेवटचं शतक ठरेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

या ट्रान्झिशन जनरेशनला आपण तीन प्रकारच्या कचऱ्याची देणगी दिलेली आहे. किरणोत्सर्गी पदार्थाचा कचरा, पर्यावरणातील कार्बन डाय ऑक्साईड आणि इतर वायुरूप कचरा आणि दृष्टीआड असलेला पण धोकादायक असा पृथ्वीभोवती भ्रमण करणाऱ्या कोटय़वधी धातूच्या तुकडय़ांचा (स्पेस जंक) कचरा.

या ट्रान्झिशन जनरेशनला आपण तीन प्रकारच्या कचऱ्याची देणगी दिलेली आहे. किरणोत्सर्गी पदार्थाचा कचरा, पर्यावरणातील कार्बन डाय ऑक्साईड आणि इतर वायुरूप कचरा आणि दृष्टीआड असलेला पण धोकादायक असा पृथ्वीभोवती भ्रमण करणाऱ्या कोटय़वधी धातूच्या तुकडय़ांचा (स्पेस जंक) कचरा. (प्लॅस्टिक कचऱ्याचा उल्लेख मागील एका लेखात केल्यामुळे त्याला वगळले आहे).

खनिज तेल आणि कोळसा यासारख्या ऊर्जेच्या नाशिवंत स्रोतांना पर्याय म्हणून आज अणुऊर्जेकडे मोठय़ा अपेक्षेने पाहिलं जातं. नैसर्गिक तसेच मानवनिर्मित किरणोत्सर्गी पदार्थ वापरून ऊर्जेची निर्मिती करण्यामध्ये भारत आज तेराव्या स्थानावर आहे. परंतु आपल्या देशाच्या एकंदर ऊर्जानिर्मितीत अणुउर्जेचं प्रमाण फारच कमी असल्याने त्या जागतिक क्रमवारीत आपला क्रमांक खूपच खालचा लागतो. अणुभट्टीमध्ये किरणोत्सर्गी पदार्थामधून उत्पन्न होणाऱ्या कमालीच्या तापमानाचा वापर करून वाफेमधून ऊर्जानिर्मिती केली जाते. या प्रक्रियेत, इतर इंधनांप्रमाणे कार्बन डाय ऑक्साईड निर्माण होत नसल्याने या पर्यायाकडे क्लीन एनर्जी – पर्यावरणास अनुकूल ऊर्जानिर्मिती – म्हणून पाहिलं जातं. परंतु अणुभट्टीमध्ये वापरण्यात येणारे किरणोत्सर्गी पदार्थ २ – ३ वर्षांनी म्हणावी तशी ऊर्जानिर्मिती करू शकत नाहीत. तरीही त्या पदार्थाचं तापमान क्षीण होईपर्यंत त्यांना पाण्यात बुडवून ठेवावं लागतं. या प्रक्रियेला काही वर्ष जावी लागतात. त्यानंतर देखील त्या पदार्थामधून बाहेर पडणारा किरणोत्सर्ग मानवासाठी अनेक वर्ष धोकादायक ठरू शकतो, काही पदार्थाच्या बाबतीत  हा काळ २४,००० वर्ष इतका मोठा असू शकतो. त्यामुळे अशा पदार्थाना सुरक्षित आवरणात घालून पुरून ठेवावं लागतं. (या कालखंडाची तुलना करायची तर मानवाचा ज्ञात इतिहास केवळ ५,००० वर्षांचाच आहे याची कृपया नोंद घ्यावी!) यापैकी काही पदार्थाचा पुनर्वापर केला जातो हे जरी खरं असलं तरी ते प्रमाण नवीन अण्विक इंधनाच्या वापराच्या तुलनेत खूपच कमी आहे. आणि काही देशांनी त्यावरदेखील इतर दुष्परिणामांचं कारण पुढे करून बंधनं आणली आहेत.

मानव जवळपास गेली ६० – ७० वर्ष किरणोत्सर्गी पदार्थाचा वापर करत आलेला आहे. आतापर्यंत निर्माण झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, याचं उत्तर आजही आपण शोधत आहोत. फिनलंड या देशाने मात्र या प्रकरणात विशेष लक्ष घातलेलं आहे. त्यांनी अवलंबलेली पद्धत काय आहे? त्याचबरोबर किरणोत्सर्गी कचरा नष्ट करण्याचे काही समंजस, तर काही भंपक उपाय कोणते? याबद्दल पुढील लेखात जाणून घेऊ.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 12:10 am

Web Title: article about space junk facts and information zws 70
Next Stories
1 संशोधनमात्रे : विचारी मना तूचि शोधूनि पाहे
2 चमचमता तारा
3 प्रयोगशील पर्यावरणस्नेही
Just Now!
X