12 July 2020

News Flash

डाएट डायरी : चला, इम्युनिटी वाढवू या..

आपल्या शरीराची इम्युन सिस्टीम ही अनेक बॅक्टेरिया, व्हायरस आणि इतर इन्फेक्शन्सपासून आपलं संरक्षण करत असते.

(संग्रहित छायाचित्र)

गायत्री बर्वे-गोखले

करोना (कोविड -१९) व्हायरसमुळे देशातच नाही तर जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. भारताने गेल्या काही शतकांत अशा असंख्य साथीच्या रोगांचा सामना केलेला आहे आणि भविष्यातही असे रोग उद्भवणे अटळ आहे; पण अशा प्रसंगी आपली रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युन सिस्टीम ताकदवान ठेवणं आपल्या हातात आहे आणि ती तशी राहावी यासाठीचे उपाय आपले पूर्वज कित्येक शतकांपासून आपल्याला सांगत आले आहेत. आता वेळ आहे ती ते उपाय अमलात आणण्याची आणि समजून घेण्याची, की आपल्या शरीराची इम्युन सिस्टीम कशी काम करते.

एखादा आजार आपल्याला होतो तो तीन प्रमुख कारणांमुळे-

१) एजंट : बॅक्टेरिया, व्हायरस यांच्या प्रत्यक्ष हल्लय़ामुळे आजार होणे.

२) होस्ट : ज्यांना बॅक्टेरिया, व्हायरस यांचा प्रादुर्भाव झालेला आहे अशा होस्टच्या संपर्कात आल्यामुळे रोग/आजार होणे.

३) परिसर : एजंट किंवा होस्ट यांच्या परिसरातील वावरामुळे आजार/रोग पसरणे.

असे रोग पसरू नयेत यासाठी कोणत्याही होस्टच्या जवळ न जाणे, वेळोवेळी हातपाय स्वच्छ धुणे, सकस आहार घेणे याव्यतिरिक्त योग्य त्या वयात आवश्यक लसीकरण करून घेणे आणि परिसर स्वच्छ ठेवून आपल्या पर्यावरणाची काळजी घेणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. याशिवाय इन्फेक्शन कंट्रोलच्या अनेक सवयी बाळगल्या पाहिजेत.

आपण पाहात असतो की, ऋतू बदलला की अनेकांना सर्दी-खोकल्यासारखे छोटे आजार त्रास देतात. खाण्यापिण्यात बदल, धूळ, वातावरणात बदल या गोष्टींमुळे अनेक लोक सहज आणि वारंवार आजारी पडत असतात, पण काही व्यक्तींना या कोणत्याही बदलाचा काहीही त्रास होत नाही, कारण त्यांची इम्युन सिस्टीम सशक्त असते.

आपल्या शरीराची इम्युन सिस्टीम ही अनेक बॅक्टेरिया, व्हायरस आणि इतर इन्फेक्शन्सपासून आपलं संरक्षण करत असते.

पचनसंस्था :

आपली पचनसंस्था ही आपली सर्वात पहिली प्रतिकार करणारी संस्था आहे. कोणत्याही बॅक्टेरिया किंवा व्हायरसचा शरीरात प्रवेश झाला तर पचनसंस्था ही त्याला अडथळा निर्माण करून त्यांना शरीराबाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असते. यासाठी शरीरातील काही चांगले बॅक्टेरियाच मदतकार्य करत असतात. जे आपल्याला अन्नपदार्थामधून मिळतात. यांना ‘प्रोबायोटिक्स’ असं म्हटलं जातं. हे प्रोबायोटिक्स दही, आंबवलेले पदार्थ, चीज आणि प्रिझव्‍‌र्ह मांसाहारी पदार्थ उदा. सलामी, सॉसेजेस यातून मिळतात. म्हणून आपली इम्युन सिस्टीम प्रभावशाली बनवण्यासाठी दररोज दही/ताक खाणे, इडली, डोसा, अप्पे असे आंबवलेले पदार्थ आठवडय़ातून एकदा खाणे आवश्यक आहे.

प्रोसेस्ड फुड्स :

बाहेर मिळणारे हवाबंद पॅकेट्समधील खाण्याचे पदार्थ हे शरीरास घातक असतात. यात अनेक प्रकारचे प्रिझव्‍‌र्हेटिव्हज, सिंथेटिक रंग, केमिकल्स यांचा वापर केलेला असतो. हे पदार्थ आपली इम्युन सिस्टीम निकामी करण्याचं काम करतात ज्यामुळे आपल्याला सहज एखादा रोग होण्याची शक्यता उद्भवते. म्हणून असे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

व्हिटॅमिन्स :

आपली इम्युन सिस्टीम कार्यरत रहाण्यासाठी सर्व प्रकारच्या व्हिटॅमिन्सची आवश्यकता असते. ही व्हिटॅमिन्स आपल्याला सर्व रंगीत भाज्या, फळे, सुकामेवा, तेलबिया यांतून मिळत असतात. एखादी मल्टिव्हिटॅमिनची गोळी घेऊनही शरीराची व्हिटॅमिनची गरज पूर्ण करणे सहज शक्य आहे; पण नैसर्गिक पदार्थामधून मिळणारी व्हिटॅमिन्स ही शरीरात अधिक चांगल्या पद्धतीने शोषली जातात, शिवाय यातून अनेक इतर अन्नघटक जसे मिनरल्ससुद्धा शरीराला मिळत असतात.

रोजच्या जेवणात जास्तीत जास्त रंगीत भाज्या, फळे, पालेभाज्या, बदाम, अक्रोड, जर्दाळू, काळ्या मनुका यांसारखे सुक्या मेव्याचे पदार्थ, सूर्यफूल, भोपळा, अळशी, तीळ अशा बिया यांचा रोजच्या आहारात समावेश केल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारेल.

नियमित व्यायाम :

व्यायाम केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि त्यामुळे शरीरातून वाहणाऱ्या लिंफॅटिक फ्लूइडचा फ्लो वाढतो. ही फ्ल्यूइड्स इन्फेक्शन्सशी सामना करून बॅक्टेरिया आणि व्हायरसना शरीराबाहेर फेकण्याचं काम करत असतात म्हणून नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे.

ताण/स्ट्रेस:

कोणत्याही प्रकारचा शारीरिक आणि मानसिक ताण हा आपली रोगप्रतिकारक शक्ती दडपून टाकत असतो. ज्यामुळे स्ट्रेसमध्ये आपल्याला अनेक रोग होण्याची भीती वाढते. स्ट्रेसमध्ये शरीरात कॉर्टिसॉल अधिक प्रमाणात स्रवते. हे कॉर्टिसॉल रोगांशी दोन हात करणाऱ्या ‘कॅअ’ अँटिबॉडीजचं उत्पादन कमी करते ज्यामुळे एखाद्या रोगाची लागण होण्याची शक्यता वाढते. म्हणून शरीरावर आणि मनावर ताण निर्माण होईल अशा कोणत्याही गोष्टी करू नयेत.

मद्यपान आणि सिगरेट स्मोकिंग या गोष्टी अवयवांवर बराच ताण निर्माण करत असतात म्हणून या गोष्टींचा वारंवार अवलंब टाळावा. मनावरचा व शरीरावरचा ताण कमी व्हावा यासाठी योगा, मेडिटेशन यांसारख्या थेरपीजचा वापर करावा. कपालभाती, प्राणायाम यामुळे आपली इम्युन सिस्टीम शक्तिशाली झाल्याची अनेक उदाहरणे आहेत, त्यामुळे प्राणायाम नियमित करणे अतिशय उपयुक्त आहे.

पुरेशी झोप :

अपुरी झोप मिळालेलं शरीरसुद्धा लगेच इन्फेक्शन्सना बळी पडतं. म्हणून पुरेशी म्हणजेच रोज कमीत कमी ७ ते ८ तास झोप घेणं आवश्यक आहे. सायटोकायनिन्स नावाची प्रोटीन्स ही आपल्या इम्युन सिस्टीममध्ये कार्यरत असून ती इन्फेक्शन्स दूर करण्याचं काम करत असतात. आपण जेवढी कमी झोप घेऊ  तेवढी कमी सायटोकायनिन्स शरीर तयार करतं म्हणून आपली इम्युन सिस्टीम कार्यरत ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे.

आपली इम्युन सिस्टीम प्रभावशाली बनवण्यासाठी खालील पदार्थाचा अन्नात समावेश करावा.

* आलं, सुंठ :

यातील गुणधर्मामुळे सर्दी-खोकला बरा होण्यास मदत होते. आल्याचा चहा, सुंठवडा, दुधात सुंठ घालून पिणे, आल्याची वडी खाणे असा वापर केला जाऊ  शकतो.

* दही :

आधी म्हटल्याप्रमाणे दही हे नैसर्गिक प्रोबायोटिक आहे. रोजच्या जेवणात दही, ताक, कढी, दह्य़ातील कोशिंबिरी, रायता यांचा समावेश करावा.

* आंबवलेले पदार्थ :

आंबवलेल्या पदार्थामधून शरीराला डायजेस्टिव्ह एंझाइम्स मिळत असतात. ज्यामुळे इन्फेक्शन्स दूर होऊन शरीर शुद्धीकरण होत असते म्हणून आंबवलेले पदार्थ खाणे गरजेचे आहे.

* लसूण :

कच्ची लसूण ठेचल्यास त्यातून अ‍ॅलिसीन नावाचं द्रव्य बाहेर पडतं जे इन्फेक्शन्स दूर करत असतं म्हणून आहारात लसणीचा वापर आवश्यक आहे. शिजलेल्या लसणापेक्षा कच्ची लसूण अधिक गुणकारी आहे.

* दालचिनी :

दालचिनीमध्ये असलेले अँटिऑक्सिडन्ट्स, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्न हे सर्व घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

* व्हिटॅमिन सी :

आवळा, पेरू, लिंबू, पपई, संत्री, मोसंबी आणि इतर अनेक फळे यांतून व्हिटॅमिन सी मिळत असतं. हे इन्फेक्शन दूर करणारं महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे. लाल, पिवळ्या, केशरी रंगाची सगळी फळे आणि भाज्यांमधून हे व्हिटॅमिन मिळते. यांचा रोजच्या आहारात समावेश केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती नक्कीच सुधारेल.

* हळद :

भारतीय संस्कृतीत हळदीला महत्त्वाचं स्थान आहे. अँटिसेप्टिक, अँटिइन्फल्मेटरी असे अनेक गुणधर्म हळदीमध्ये आहेत. रोजच्या अन्नात हळदीचा वापर असतोच. याव्यतिरिक्त दूध-हळद घेणे, हळदीचे लोणचे खाणे अशा प्रकारे हळदीचा अन्नातील वापर वाढवला जाऊ  शकतो.

* हिरव्या पालेभाज्या:

हिरव्या पालेभाज्यांमध्ये असलेले क्लोरोफिलदेखील इन्फेक्शनशी दोन हात करत असते, त्यामुळे पालेभाज्या तसेच पुदिना, कोथिंबीर, गवती चहा, कढीपत्ता, हिरवी तुळस, ओव्याची पानं यांसारख्या औषधी गुणधर्म असलेल्या हर्ब्सचा वापर आवश्यक आहे.

* अळशी :

ओमेगा ३ सोबतच इतर अनेक गुणधर्म अळशीमध्ये असून ती इन्फेक्शन्सशी लढण्यात उपयुक्त आहे. म्हणून अळशीचा नियमित वापर उपयुक्त ठरेल.

आहारातील बदलांसोबतच जास्तीत जास्त वैयक्तिक स्वच्छता, परिसराची स्वच्छता आणि योग्य सवयी अवलंबल्यास करोनासारख्या जीवघेण्या विषाणूंचा सामना करणं शक्य आहे. गरज आहे ती घाबरून न जाता संयम ठेवून योग्य ती काळजी घेण्याची आणि स्वत:चा बचाव करण्याची..!

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2020 1:04 am

Web Title: article on lets raise the immunity abn 97
Next Stories
1 जाऊ तिथे खाऊ : आम्ही पोहेकर!
2 व्हिवा दिवा : मनाली नागांवकर
3 बदलती वाचनसंस्कृती
Just Now!
X