सौरभ करंदीकर

‘मायनॉरिटी रिपोर्ट’ या विज्ञानकथेवर आधारित चित्रपटात टॉम क्रूझ कॉम्प्युटरसमोर हातवारे करून पुरावे न्याहाळतो आणि गुन्ह्य़ाची माहिती घेतो असा प्रसंग आहे. त्या प्रसंगातही टॉम विशिष्ट बनावटीचे हातमोजे घालतो असं दर्शवलं आहे. ‘प्रोजेक्ट सोली’मधून जन्माला आलेली, अवघ्या काही मिलिमीटर आकाराची चिप अशा काल्पनिक प्रसंगांनादेखील मागे टाकेल.

‘एप्रिल फू ल बनाया, तो उनको गुस्सा आया’ ही परंपरा जगभर वर्षांनुवर्ष चालत आलेली. १९६४ साली विश्वजित सायरा बानोभोवती पिंगा घालू लागला तेव्हापासून भारतीयांना देखील या मूर्खपणाची सवय लागली असावी. माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक कंपनी सातत्याने एप्रिल फूल साजरा करते, ती म्हणजे गूगल! २००० सालापासून अगदी २०१९ पर्यंत गूगलने दर १ एप्रिलला काही ना काही उपद्व्याप केलेले आहेत. अतक्र्य उत्पादनांची घोषणा करणं, काल्पनिक तंत्र-आविष्कार जाहीर करणं, हे ठरलेलं.

२००० साली त्यांनी ‘गूगल मेंटल प्लेक्स’ नावाचं वेब पेज बनवलं. जिथे एखाद्या गोष्टीचा आपण नुसता विचार केला की तिचा ‘सर्च’ घडतो, असं त्यांनी जाहीर केलं. अनेक हौशी नेटकरी त्या पेजवर गेले. अर्थात हा पोकळ विनोद होता. विचार करून बटण दाबलं की वेगवेगळी उत्तरं समोर येतात- ‘‘तुमचे विचार पोहोचत नाहीयेत. कृपया चपला आणि चष्मा काढून ठेवा’’, ‘‘एकाग्र व्हा. तीन वेळा टाळ्या वाजवा आणि पुन्हा प्रयत्न करा’’, ‘‘तुमचे विचार परग्रहवासीयांनी मधल्या मध्ये चोरले, पुन्हा ट्राय करा’’, इत्यादी. याशिवाय ‘गूगल गल्प’ नावाचं सॉफ्ट ड्रिंक, ‘गूगल रोमान्स’ नावाची डेटिंग साइट, प्राण्यांशी संवाद साधण्यासाठी ‘गूगल ट्रान्सलेट’ची नवी आवृत्ती अशा भन्नाट कल्पनादेखील सादर केल्या गेल्या.

दरवर्षी नवनवीन विनोद करायचा सपाटा लावणाऱ्या गूगलने २००४ साली मात्र खऱ्याखुऱ्या जी-मेलची घोषणा केली, पण ती केली गेली १ एप्रिलला! त्यामुळे १ जी.बी.चं प्रचंड (?) स्टोरेज देणारी मोफत जी-मेल सेवा कुणालाच खरी वाटली नाही (त्याकाळी प्रचलित हॉटमेल सेवा के वळ २ एम. बी. स्टोरेज देत असे). ‘लांडगा आला रे’ अशी अवस्था झाल्यानंतर देखील गूगलने खरी आणि खोटी उत्पादनं दर १ एप्रिलला प्रसिद्ध के ली.

त्याचाच एक नमुना म्हणजे २०११ साली त्यांनी सादर केलेली ‘जीमेल मोशन’ ही काल्पनिक सेवा. आपल्या कॉम्प्युटरच्या वेबकॅमसमोर उभे राहिलात तर केवळ हातवारे करून जीमेलमध्ये वेगवेगळ्या क्रिया करता येतील, असं त्यांनी जाहीर केलं. इतकंच नाही तर कोणत्या हालचालीने कोणती क्रिया घडेल त्याचं एक गाइडच त्यांनी प्रकाशित केलं. एक हात वर आणि दुसरा हात आडवा केला तर नवीन ईमेल लिहिता येईल, कमरेवर हात ठेवलात तर ती मेल पाठवली जाईल. डावीकडे झुकलात तर इनबॉक्स पाहता येईल आणि उजवीकडे झुकलात तर ‘मेल वाचला नाही’ असं गृहीत धरलं जाईल, इत्यादी आकृत्या पाहून हा निव्वळ विनोद आहे हे कळत होतं. परंतु हा विनोद भविष्याची चाहूल ठरेल असं तेव्हा कुणालाही वाटलं नसेल. २०१५च्या मे महिन्यात गूगलच्या ‘अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड  प्रोजेक्ट्स’ म्हणजेच ‘एटॅप’ या ग्रुपने ‘प्रोजेक्ट सोली’ची घोषणा केली (नशीब एप्रिल महिना निवडला नाही!). प्रोजेक्ट सोलीचा उद्देश, मानवी हालचालींचा अर्थ यांत्रिक प्रणालींना कसा लावता येईल, हे शोधणं हा होता. आपला हात मोबाइल फोन वापरताना, दिव्याची बटणं चालू-बंद करताना, स्क्रूड्रायव्हर फिरवताना किंवा एखाद्या बाटलीचं झाकण उघडताना विशिष्ट हालचाल करतो. माऊस वापरताना बोटाने क्लिक करणं, कॉम्प्युटर वापरताना स्क्रोल करणं अशा हालचालींचा आपल्याला एक ठरावीक परिणाम अपेक्षित असतो. पंजा दाखवला तर समोरच्या व्यक्तीने थांबणं आपल्याला अपेक्षित असतं. एखादी गोष्ट कमी किंवा जास्त हवी असेल तर आपले हातवारे त्या पद्धतीने होतात. वर्गात ‘‘आवाज कमी करा’’ असं म्हणणारे शिक्षक नेहमीच हात वरून खाली आणतात, प्रेक्षकांना ‘आवाज वाढवायला’ सांगणारे खेळाडू याउलट हात खालून वर नेतात.

अशा हातवाऱ्यांची ‘रडार’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नोंद केली जाऊ  शकते. त्या नोंदीचा आलेख कॉम्प्युटर ‘समजू’ शकतो आणि त्यायोगे विशेष क्रिया घडवून आणू शकतो. जोराने टाळी वाजवून घरातले दिवे चालू किंवा बंद करण्याच्या करामती आपण पाहिल्या असतील, परंतु दोन बोटं ‘टिचकी वाजवतात तशी’ हलली तर म्युझिक सिस्टीममध्ये गाणं सुरू व्हायला हवं असेल, किंवा अंगठा आणि पहिलं बोट एकमेकांवर घासलं तर गाण्याचा आवाज वाढावा अशी इच्छा असेल तर मात्र रडार तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही.

‘मायनॉरिटी रिपोर्ट’ या विज्ञानकथेवर आधारित चित्रपटात टॉम क्रूझ कॉम्प्युटरसमोर हातवारे करून पुरावे न्याहाळतो आणि गुन्ह्य़ाची माहिती घेतो असा प्रसंग आहे. त्या प्रसंगातही टॉम विशिष्ट बनावटीचे हातमोजे घालतो असं दर्शवलं आहे. ‘प्रोजेक्ट सोली’मधून जन्माला आलेली, अवघ्या काही मिलिमीटर आकाराची चिप अशा काल्पनिक प्रसंगांनादेखील मागे टाकेल. २००० सालच्या जानेवारी महिन्यात अमेरिकेतील फेडरल कम्युनिकेशन कमिशनने गूगलला हे तंत्रज्ञान (रडार सेन्सरचा असा वापर) मानवासाठी धोकादायक नसल्याचा निर्वाळा दिला आहे. आज काही स्पीकर्स आणि लायटिंग सिस्टीम्स हे तंत्रज्ञान वापरत आहेत. लवकरच आपल्याला मोबाइल फोन हातातसुद्धा घ्यायची गरज उरणार नाही. बसल्या जागी ‘हस्त-निर्देश’ केले की सारी कामं होतील.

मस्क्युलर डिस्ट्रोपी किंवा पार्किन्ससारख्या आजाराने ग्रस्त व्यक्तींना, ज्यांच्या हालचालीवर परिणाम झालेला आहे अशांसाठी, प्रोजेक्ट सोलीसारखं तंत्रज्ञान वरदान ठरू शकेल, परंतु सामान्य माणसाच्या आयुष्यात मात्र साऱ्या गोष्टी बोटांच्या तालावर घडू लागल्या तर केवळ सुखासीनताच येईल.