स्वप्निल घंगाळे

आज सगळीकडे व्हॅलेंटाइन्स डे मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो आहे. आठवडय़ाभरापासून सुरू झालेल्या व्हॅलेंटाइन्स वीकची आज सांगता होणार. मात्र एकीकडे प्रेमात पडलेली जोडपी हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून मोठय़ा आनंदात साजरा करत असतानाच दुसरीकडे अद्याप जोडीदार न सापडलेले सिंगल लोकही या काळात बरेच चर्चेत असतात.

आज सगळीकडे व्हॅलेंटाइन्स डे मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो आहे. आठवडय़ाभरापासून सुरू झालेल्या व्हॅलेंटाइन्स वीकची आज सांगता होणार. मात्र एकीकडे प्रेमात पडलेली जोडपी हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून मोठय़ा आनंदात साजरा करत असतानाच दुसरीकडे अद्याप जोडीदार न सापडलेले सिंगल लोकही या काळात बरेच चर्चेत असतात. तसं या सिंगल लोकांना इंटरनेटवर ‘फॉरएव्हर अलोन’ नावाने ओळखले जाते. आपल्यापैकी अनेकांनी या एकटय़ांवर होणारे व्हायरल विनोद पाहिले असतील.

प्रत्येक ग्रुपमध्ये एखादी तरी अशी व्यक्ती असतेच जी एकटीच असते आणि बाकी संपूर्ण ग्रुपमधील व्यक्तींचा कोणी ना कोणी जोडीदार असतो. ही एकटी व्यक्ती अनेकदा स्वत: रिलेशनशिपमध्ये नसतानाही ग्रुपमधील आपल्या मित्रमैत्रिणींसाठी ‘रिलेशनशिप मॅनेजर’चे काम करते. म्हणजे कोण कसं बोलल्यावर आपण काय करावं?, त्याला तिला काय वाटत असेल?, तुमच्यात गैरसमज कसा झाला आहे?, अशा अनेक गोष्टी ही व्यक्ती अगदी हातखंडा असल्यासारखी ग्रुपमधील लोकांना समजावत असते. कधीतरी निवांत विचार करताना प्रश्न पडतो की अरे या व्यक्तीला इतकं सारं ठाऊक आहे तर ही व्यक्ती सिंगल कशी? अशा वेळेस मनात पालही चुकचुकते की ही व्यक्ती सिंगल नसावीच. कारण एवढा दांडगा अनुभव एकटं राहून येणारच नाही. मग या व्यक्तीचा जोडीदार शोधण्याचा खेळ सुरू होतो.

तसा या व्यक्तीसाठी जोडीदार शोधण्याचा प्रयत्न कायमच सुरू असतो. एखादा कार्यक्रम असो किंवा एखादी अचानक ठरलेली पिकनिक असो या व्यक्तीचे दोनाचे चार करणे हे ग्रुपमधील अनेकांचे लक्ष्य असते. अगदी मग भटकंतीला एखादी व्यक्ती कमी पडतेय म्हणून कोणत्या कॉमन फ्रेण्डला आमंत्रण देण्यापासून ते मुद्दाम एखाद्याची या ‘अलोन’बरोबर भेट करून देण्यापर्यंत अनेक फंडे वापरले जातात. मात्र असे टुकार फंडे यशस्वी करण्याऐवजी त्यामधून मज्जा घेण्याचाच ग्रुपचा हेतू असतो. अर्थात प्रत्येक वेळेस या एकटय़ा माणसाला ट्रोल करण्याचा हेतू नसतो, पण बहुतांश वेळा लागला तर तुक्का पद्धतीने ग्रुपमधील या एकटय़ा व्यक्तीसाठी जोडीदार शोधण्याचं काम सतत सुरू असतं. बरं यामध्ये त्या संबंधित व्यक्तीला किती रस आहे हा गौण विषय असतो, कारण विश्वकल्याणाची जबाबदारी स्वीकारल्याप्रमाणे या व्यक्तीच्या कल्याणाची जबाबदारी ग्रुपने स्वत:हून आपल्या खांद्यावर घेतलेली असते.

त्यातही या एकटय़ादुकटय़ाबरोबर अगदी घरोब्याचे संबंध असतील तर विचारायलाच नको. मग अगदी या व्यक्तीची आईच असा काही जोडीदाराचा विषय निघाला की ‘याची आहे का रे कोणी?’ किंवा ‘तो हिच्याबरोबर अनेक फोटोंमध्ये दिसतो तो कोण आहे रे?’, अशी चौकशी थेट ग्रुपसमोरच करते. आता अगदी कूल आई – बाबा प्रकारातील पालकच अशा पद्धतीने आपल्या लेकराची मस्करी करण्याच्या मूडमध्ये असल्यावर ग्रुपमधील संधीसाधूंना आयतं कोलितच मिळतं हातात. मग अशा भेटींमध्ये त्याची ती किंवा तिचा तो सोडून इतर कोणता विषयच नसतो. मात्र खरोखरच ही अशी अलोन व्यक्ती वयात आली असेल तर अशा चर्चाकडे पालक लिटमस टेस्ट म्हणजेच चाचपणी म्हणून पाहतात याचा ग्रुपमधील अनेकांना अंदाजही नसतो.

‘दुचाकीची मळलेली मागची सीट म्हणजे स्वच्छ चारित्र्याचं लक्षण’, इथपासून ते अगदी वेगवेगळ्या सिंगल लोकांच्या मिम्समध्ये टॅग करण्यापपर्यंत अनेक प्रकारे अशा एकटय़ांना त्यांच्या एकटेपणाची जाणीव करून देण्यातील ग्रुपमधील मस्तीखोर ट्रोलर्स मागे नसतात. ‘फॉरएव्हर अलोन’ या थीमवर आधारित ढिगाने फेसुबक पेजेस आहेत. बरं पालकांपर्यंतच आणि मिम्सपर्यंतच हा विषय मर्यादित न राहता ग्रुपमध्येही सतत या विषयावर खलबतं सुरू असतात. त्यात लग्नाचं वय असेल आणि ग्रुपमधील इतर सांसारिक झाले असतील आणि हा किंवा हीच उरले असतील तर विचारायलाच नको. मग अगदी किती व्हॅलेंटाइन वेस्ट घालणारपासून तर आम्ही सुरू करतो तुझ्या नावाने मॅट्रीमोनियल साइटवर अकाउंट इथपर्यंत अशा अनेक गोष्टींच्या नावाने या लग्नाळू व्यक्तीला पिडण्याचा जणू उद्योगच ग्रुपमधील मित्रमंडळी करतात. एकीकडे अशा पद्धतीने मस्करी सुरू असताना दुसरीकडे या एकटय़ा व्यक्तीला कधीच एकटं वाटू नये याचीही काळजी मित्रमंडळी घेताना दिसतात. मस्करीची कु स्करी होणार नाही याकडे अनेकदा ग्रुपमधील एखाद्या खऱ्या अर्थाने प्रगल्भ असणाऱ्या व्यक्तीचे लक्ष असतं. याच अशा समतोल साधणाऱ्या जोडीदार शोधाचा आणि एकटा असूनही ग्रुपमुळे एकटा नसल्याचा आनंद खरं तर ही व्यक्तीही घेत असते असंच म्हणता येईल.

viva@expressindia.com