|| अनिकेत काळकर

बेसिक नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सटिी, बोस्टन, यू.एस.ए.

बारावीनंतर इंजिनीअिरगला जायचं हे ठरवलं होतं. ‘डी. जे. संघवी महाविद्यालया’त ‘इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन्स’च्या पदवीसाठी प्रवेश घेतला. शिकताना लक्षात आलं की, टेक्निकल माहितीसारखीच नॉनटेक्निकल माहितीही आपल्याला मिळवायला हवी. म्हणून उच्चशिक्षण घेण्याच्या दृष्टीने महाविद्यालयाच्या तिसऱ्या वर्षांपासून इंटरनेटवर परदेशातील विद्यापीठांमधल्या अभ्यासक्रमांची माहिती काढू लागलो. त्यापकी काही विद्यापीठांची निवड करून तिथल्या सीनिअर्सशी संपर्क साधला. जीआरई आणि टोफेल परीक्षांचे गुण पाच वर्षांसाठी ग्राह्य़ धरले जातात. त्यामुळे परीक्षा देऊ, भारतात नोकरीचा अनुभव घेऊ आणि मग अमेरिकेला जाऊ, असा आधी विचार केला होता.

आपल्याकडच्या अभ्यासक्रमाचं चौथं वर्ष साधारण जुलमध्ये सुरू होतं ते मार्चमध्ये संपतं. त्या दरम्यान परदेशी विद्यापीठांतील प्रवेशप्रक्रिया सुरू होते. त्यामुळे आपल्या विद्यापीठात जाऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. प्रवेश घ्यायचा त्या विद्यापीठाला ‘स्टेटमेंट ऑफ परपझ’ द्यावं लागतं. त्यात त्या विद्यापीठात प्रवेश घ्यायचं कारण वगरे मुद्दे नीट मांडायचे असतात. प्रवेश घेत असलेल्या विद्यापीठाला सादर करत असलेली विविध प्रकारची कागदपत्रंही तितकीच महत्त्वाची असतात. या सगळ्या बाबींचा विचार करून परदेशी विद्यापीठात प्रवेशअर्ज मंजूर होतो. मला ही प्रक्रिया पार पाडायला कमी वेळ मिळाला, पण ते निभावलं. त्यासाठी चर्चगेटच्या ‘युनाईटेड स्टेटस् इंडिया एज्युकेशनल फाऊंडेशन’ (यूएसआयईएफ) या संस्थेतील मार्गदर्शकांची मोलाची मदत झाली.

मी चार ठिकाणी प्रवेशअर्ज केले होते. दोन ठिकाणी ते मंजूर झाले. त्यापकी ‘स्टिव्हन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेतील शुल्क अधिक होतं. संधी दोन्हीकडे सारख्याच होत्या. दोन्ही शहरं चांगली होती. मग बोस्टनची‘नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सटिी’ निवडली. इथला एन्ट्रन्सशिप प्रोग्रॅम नावाजलेला आहे. गेल्या ऑगस्टमध्ये इथे आलो. माझा ‘मास्टर्स इन इंजिनीअिरग मॅनेजमेंट’ या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाचं वैशिष्टय़ म्हणजे इथे विषय निवडीला चांगला वाव मिळतो. पदव्युत्तर शिक्षण ही एक प्रकारची गुंतवणूक असते. पुढे सहसा त्याच क्षेत्रात नोकरी मिळत असल्याने हे शिक्षण घेताना सखोल विचार करावा. याआधी परदेशात कुटुंबासोबत फिरायला गेलो होतो. पण ते वेगळं आणि आता शिक्षणासाठी परदेशी येणं वेगळं. आता सगळी जबाबदारी आणि निर्णय स्वतचे स्वत घ्यायचे होते. ती मानसिक तयारी भारतातून निघतानाच केली होती. अभ्यासक्रम सुरू व्हायच्या दोन आठवडे आधी इथे आलो. आमच्या अपार्टमेंटचा ताबा नंतर मिळणार असल्याने पहिल्या दिवशी सीनिअरकडे राहिलो होतो. आल्यावर पहिला सामना झाला इथल्या चलनाशी. लगेच डोक्यात गणितं सुरू व्हायची नि थोडासा खिन्नपणा जाणवायचा. पण त्याच वेळी आयुष्यातल्या या नवीन वळणाविषयी उत्सुकता आणि उत्साहही वाटायचा.. मध्येच जरासं सेंटी व्हायला व्हायचं. घरची आठवण यायची.. एका प्रगत देशातल्या जीवनमानाशी जुळवून घ्यायचं होतं. रोज नवीन गोष्टींना आणि आव्हानांना सामोरं जायची मनाची तयारी झाली होती..

महाविद्यालय सुरू व्हायच्या आधी कॅम्पसवर सीनिअर्ससोबत फेरफटका मारला. त्यामुळे ग्रंथालयासह बाकीच्या सोयीसुविधांची माहिती झाली. ओरिएंटेशनच्या वेळी ही माहिती पुन्हा मिळाली. बोस्टन शहर, तिथल्या सोयीसुविधा, रोज लागणाऱ्या चीजवस्तूंची दुकानं इत्यादींची माहिती करून घेतली. एकदा अभ्यासक्रम सुरू झाल्यावर या गोष्टींसाठी वेळ मिळणं कठीण होतं. इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली आहे. मुंबईतल्या ओरिएंटेशनच्या वेळी आमच्या ग्रुपची ओळख होऊन आम्ही चौघंजण इथे घर शेअर करतो आहोत. हे अपार्टमेंट भारतातूनच ऑनलाइन बुक केलं. स्वयंपाकाचा छंद होता, पण प्रत्यक्ष करायची वेळ इथे आली. त्यात काही प्रयोगही करता आले. इथे यायचं ठरल्यावर परीक्षेनंतरच्या सुट्टीचा सदुपयोग करून काही पदार्थ बघूनबघून शिकून घेतले. युट्यूबचीही मदत घेतली इथे आल्यावर. आता बाहेरचं खाण्यापेक्षा चारीठाव स्वयंपाक सुट्टीच्या वारी करतो. आपल्याकडच्या चाटचे पदार्थ खूप मिस करतो.

भारतातल्या मार्गदर्शन वर्गात इथे काय मिळेल आणि काय नाही, याची एक यादी करून देतात. त्यामुळे गोष्टी सोप्या होतात. घरकाम आळीपाळीने करतो. क्वचित कधी चहाच्या पेल्यातली वादळं होतात नि ती लगेच शमतातही.. याआधी मी कधीच एकटा राहिलेलो नाही. त्यामुळे कसं काय निभावेल असं वाटत होतं. पण सगळ्यांशी मिळून-मिसळून राहतो आहे. माझा अभ्यासक्रम रुममेटसपेक्षा वेगळा आहे. मात्र काही विषय सारखे आहेत. मग परीक्षेच्या वेळी कधीकधी ग्रुपस्टडीचा योग आला होता. प्रोजेक्ट, असाइन्मेंट, केसस्टडी, परीक्षा यांना वेगवेगळे गुण असतात. ग्रेडपेक्षा रिझल्ट ओरिएंटेड शिक्षण देण्यावर अधिक भर दिला जातो. गुण हे केवळ प्रगतीदर्शक मानले जातात. अनेक वेगळी प्रोजेक्टस् करायला मिळाली. नवीन सॉफ्टवेअर शिकायला मिळाली. एका अर्थी बौद्धिक विकास होतो आहे. पुढे नोकरीसाठी मुलाखत देताना घोकंपट्टी उपयोगी न पडता स्वअभ्यास केल्याने व्यावसायिक स्तरावर आवश्यक ठरणारे गुण आणि कौशल्य अशा प्रकारच्या अभ्यासक्रमात आत्मसात करता येतात. चांगला रेझ्युमे, कव्हर लेटर तयार करून कंपन्यांना ऑनलाइन अप्लाय करायचं, यासाठीचा कोर्स उपलब्ध आहे. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ प्राध्यापक म्हणून शिकवतात. त्यांची शिकवण्याची हातोटी लक्षणीय आहे. प्रसंगी विद्यार्थ्यांकडून शिकायची त्यांची तयारी असते. विद्यार्थ्यांना त्यांच्याविषयीचा रिव्हू लिहावाच लागतो. प्राध्यापकांविषयीच्या चांगल्या-वाईट बाबींचा निर्देश त्यात करावा लागतोच. विद्यार्थ्यांचा हा फीडबॅक गांभीर्याने घेऊन प्राध्यापक स्वतमध्ये बदल करतात.

मी विद्यापीठाच्या ‘रिप्रोग्राफिक्स डिपार्टमेंट’मध्ये ‘अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट’ आहे. माझा एक अभ्यासविषय नोकरीच्या ठिकाणीही चांगला अभ्यासता येणार होता. तिथे माझ्या प्रोजेक्टच्या विषयाचं प्रपोजल मांडलं. ‘बिझनेस इम्प्रुव्हमेंट’ या विषयासाठी तीनजणांच्या ग्रुपची निवड झाली. आम्ही अभ्यास करून आधी आणि नंतर अशा दोन्ही बाजूंचा विचार करून ते प्रोजेक्ट सादर केलं. ते प्राध्यापकांना खूपच आवडलं. त्यांनी आमचं कौतुक केलं. त्यावेळी अभ्यासातल्या या थेट व्यवहारोपयोगी माहितीची किमया कळली. हे प्रोजेक्ट केल्याने मनाला खूप समाधान वाटलं. शिवाय डिपार्टमेंटच्या कामालाही चांगली चालना मिळाली. शिवाय विद्यापीठाच्या. ‘मरिनो रिक्रिएशन सेंटर’मध्ये एण्ट्रीडेस्कवर काम करतो. विद्यार्थ्यांना ठरावीक तास काम करता येतं. विद्यापीठ वीकएण्डला बंद असतं, तेव्हा ते करता येतं. या दोन्ही कामांमुळे थोडासा खर्च भागतो. इथे कुठलंही काम करताना कुणालाही कमीपणा वाटत नाही. उलट इतरांशी संवाद वाढतो. आपले सॉफ्टस्किल आपसूकच वाढतात. व्यक्तिमत्त्व विकास होतो. कार्यसंस्कृतीची ओळख होते. कामाचा थोडा अनुभव गाठीशी बांधता येतो.

आमच्या वर्गात भारतीय आणि चिनी, कोरियन, अमेरिकन विद्यार्थ्यांचं प्रमाण अधिक आहे. पण त्यांच्याशी फार संवाद होतोच असं नाही. शिवाय विद्यार्थ्यांच्या विविध संघटना, अनेक इव्हेंट आणि नोकरीच्या निमित्ताने अनेकांशी संवाद साधता येतो. भारतीय विद्यार्थ्यांच्या संघटनेतर्फेअनेक सणवार साजरे होतात. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी आदी सण मोठय़ा प्रमाणात साजरे झाले. त्यात भारतीयांखेरीज अन्य देशांतील विद्यार्थीही सहभागी झाले. त्यात भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारे कार्यक्रम आणि खाद्यपदार्थ होते. त्यांना आपल्या संस्कृतीविषयी खूप उत्सुकता वाटते. या उपक्रमांमधल्या सहभागामुळे घरापासून दूर आहे, हे फार जाणवलं नाही. एक प्रकारच्या या स्नेहसंमेलनात एकमेकांशी संवाद साधता आला, आपापले अनुभव शेअर करता आले आणि त्याच ओघात आपली संस्कृती जतन करता आली.

नुकताच भारतात येऊन गेलो. परतल्यावर प्रकर्षांने जाणवलं की इथे सगळ्या गोष्टींचं नियमपालन कटाक्षाने केलं जातं. हे शिकण्यासारखं आहे. शिकण्यावरून आठवला गेल्या वर्षीचा प्रसंग. नोव्हेंबरमधल्या ‘थँक्स गिव्हिंग डे’निमित्तच्या चार दिवसांच्या सुट्टीत मी नातेवाईकांकडे शिकागोला गेलो होतो. बोस्टनला परतायच्या वेळी तिथे हिमवादळ सुरू झाल्याने माझं विमान जवळपास ९ तास उशिराने सुटलं. बाहेर हिमवादळ होत असताना माझ्यासारखेच शिकागो एअरपोर्टवर अडकलेले अमेरिकन्स त्यांची दैनंदिन किंवा कार्यालयीन कामं शांतपणं आपापल्या लॅपटॉपवर करत होते. कदाचित इतर कुणी थोडा गोंधळ घातला असता, घाबरलं असतं; पण इथे असं झालं नाही. नसíगक आपत्तीला तोंड देताना त्याबद्दल तक्रारीचा सूर न लावता आपलं काम पार पाडण्याबद्दल विचार करणाऱ्या या लोकांची कृती नकळत बरंच काही शिकवून गेली. आता सप्टेंबरपासून माझी पुढची सेमिस्टर सुरू होईल. दरम्यान मी इंटर्नशिप शोधणार आहे. ती मिळाली तर पुढचा अभ्यासक्रम प्रत्यक्ष शिकणं किंवा ऑनलाइन शिकणं, असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. एमएसनंतर नोकरी करायचा विचार आहे. नोकरी करताना काही ऑनलाइन कोस्रेस करायचा विचार आहे. विश मी लक!

कानमंत्र

  • लिक्डइनसारख्या समाजमाध्यमांचा वापर जरूर करावा. ज्या विद्यापीठात जायचं ठरवत आहात, तिथल्या सीनिअर्सचा सल्ला आवश्य घ्यावा.
  • ज्या देशात जाणार आहात त्या देशाबद्दल विविध माध्यमांतून यथायोग्य प्रकारची माहिती मिळवलीत तर तिथं मिळून-मिसळून जाणं सुकर होऊ शकेल.

 

शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com