आजवर जी पुस्तके वाचली , व्यक्तिमत्व विकासासाठी म्हणून उपयुक्त वाटली त्यात सामान्यपणे एक समान धागा होता आणि तो म्हणजे, ही सगळीच पुस्तके शालेय पातळीवर अभ्यास कसा करावा, वेळापत्रक कसे आखावे, वगरे प्रश्नांची उत्तरे देत नव्हती. अविनाश धर्माधिकारी यांनी लिहिलेले नवा विजयपथ हे पुस्तक मात्र या द्रुष्टीने वेगले आहे.
दैनंदिनी म्हणजे काय, दिवसभराचे वेळापत्रक कसे तयार करावे, त्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असावा- किमान कोणत्या बाबी विचारात घ्यावयास हव्यात, अगदी आपल्या कोणत्या सवयी कुठे आणि कशा उपयुक्त ठरू शकतात अशा मूलभूत मुद्द्यांचा विचार या पुस्तकात मांडला गेला आहे. मूलत स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसाठी स्वानुभवातून लिहिलेले हे पुस्तक आहे. मात्र असे असले तरीही त्यात केवल तशा परीक्षा एव्हढेच सूत्र नाही. त्यापलिकडे व्यक्तिमत्वाचे पुष्प कसे फ़ुलवायचे हे त्यात सुलभपणे सांगितले आहे.
आजवर या स्तंभातून ज्या पुस्तकांची ओळख आपण करून घेतली ती सगळी अंतर्मुख करणारी होती. विजयपथ मात्र एकाचवेळी अंतर्मुख आणि त्याच वेळी समाजाकडे “उघड्या” डोळ्यांनी पहायला लावते. स्वतचे व्यक्तिमत्व आणि राष्ट्राचे व्यक्तित्व यांच्यातीन नाते हे पुस्तक उलगडते. अगदी स्वतच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेवायला लावण्यापासून, आपण दिवसभरातील कोणत्या वेळी सगळ्यात जास्त उत्फ़ुल्ल असतो – कोणत्या विषयाचा अभ्यास आपल्याला अभ्यास वाटतो-कशाचा वाटल नाही, स्थल-कालाचे भान आणि ज्ञान यांचा काही संबंध असतो का, आदी बाबी अगदी लहान मुलालाही सहज समजू शकतील अशा शब्दांत या पुस्तकांत मांडल्या आहेत. कमीत कमी वेळात अधिकाधिक कसे वाचावे, वाचलेले लक्षांत कसे ठेवावे, टाचणे कशी काढावीत, काढलेली टाचणे अत्यंत कमी शब्दांत “की-वर्डस” च्या रूपात कशी लक्षांत ठेवावीत, प्रत्येक शरीराचे अभ्यासाचे काही निश्चित चक्र असते का, रात्री अभ्यास करावा की पहाटे, एका वेळी सलग किती तास अभ्यासाची कोणतीही क्रुती – वाचन, लेखन किंवा स्मरण – करावी, यागासने आणि व्यक्तिमत्त्व यांतील नातेसंबंध अशा अनेक मुद्यांचा उहापोह यात केला गेला आहे.
विशेष्त परीक्षांच्या काळात मुले दिवसभर अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. पण प्रभावी अभ्यासासाठी “आपल्या” “आपल्यासाठी” राखून ठेवलेल्या वेळाचे महत्त्व, तो वेळ आणि आपले छंद यांचे समीकरण विजयपथात मस्त उलगडून दाखवले आहे. एकाच वेळी प्रेरणा आणि कष्ट यांचे महत्त्व सांगणारे आणि त्याच वेळी “स्मार्ट” पण शाश्वत पद्धती दाखविणारे हे अत्यंत सुंदर पुस्तक आहे.
“फाऊंटन हेड” या पुस्तकातील हॉवर्ड रोर्कची गोष्ट सहजपणे प्रेरणा देऊन जाते. पुस्तकाच्या मध्यावर भारतातील सर्व स्पर्धा-परीक्षांचा दिलेला तपशील करीअर निवडीसाठी निश्चितच उपयुक्त ठरतो.
खरं तर, हे पुस्तक केवळ वाचनाचा आनंद देण्यासाठी लिहिलेले नाही. वाचनाबरोबरच त्यातील प्रत्येक गोष्ट – सूत्र अंमलात आणताना आपन्याही नकळत आपल्याला स्वतचीच नव्याने ओळख होत जाते.  आपल्या “स्व”च्या जाणीवा विस्तारत जातात. आणि त्यातून मिळणार्या आत्मविश्वासाने आपले व्यक्तिमत्व फ़ुलत जाते, हेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

पुस्तक – नवा विजयपथ
लेखक – अविनाश धर्माधिकारी
प्रकाशक- चाणक्य मंडल प्रकाशन
मूल्य- रुपये ३५०