|| वेदवती चिपळूणकर

मॉडेलिंग म्हणजे ठरावीकच उंची, ठरावीक चेहरा, रंग अशा समजांना आता जरा दूर ठेवलं पाहिजे. दोन गोष्टी महत्त्वाच्या, एक तर आता या ठरावीक अटींचं प्रमाण कमी झालं आहे आणि दुसरं म्हणजे तुमची पर्सनॅलिटी, चेहरा, हास्य या सगळ्या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात. रॅम्पवॉक सोडला तर बाकी सर्व ठिकाणी सर्व वयाच्या, सर्व रंगांच्या, सर्व उंचीच्या व्यक्तींची गरज पडते. त्यामुळे मॉडेलिंग करण्यासाठीचे ठरावीक समज आपण मनातून काढून टाकले पाहिजेत.

पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये शालेय शिक्षण घेऊन त्याने ‘डी. वाय. पाटील कॉलेज’मधून मेकॅनिकल इंजिनींरिंग केलं. कॉलेजमध्येच फॅशन शो, रॅम्प वॉक, आंतरमहाविद्यालयीन पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट अशा माध्यमांतून त्याला त्याचा कल समजला आणि डिग्रीनंतर ‘प्रणव जोशी’ हे नाव मॉडेलिंग क्षेत्राला माहिती झालं. स्वत:ची आवड आणि पॅशन जपताना प्रॅक्टिकल विचार करून मॉडेलिंगसोबतच प्रणव नोकरीही करतो आणि वडिलांचा व्यवसायही सांभाळतो. अ‍ॅमेझॉन फॅशन, रेमंड्स, कोकाकोला अशा अनेक प्रसिद्ध ब्रॅण्ड्सच्या फोटोशूट्स आणि जाहिरातींमधून प्रणव मॉडेलिंगमध्ये पाय रोवून उभा आहे.

इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर सामान्यत: नोकरीचा शोध घेतला जातो किंवा पदव्युत्तर शिक्षणाचा विचार केला जातो. मात्र तसं काही न करता प्रणवने मॉडेलिंगचं क्षेत्र निवडलं आणि तिथे धडपड सुरू केली. मात्र या मॉडेलिंगची अगदी प्राथमिक सुरुवात कॉलेजमधूनच झाली होती, असं तो म्हणतो. ‘कॉलेजमध्ये असताना मला वाटायचं की मी छान दिसतो, माझा चेहरा छान आहे, उंची छान आहे, म्हणजे मलाही मॉडेलिंग, रॅम्पवॉक हे सगळं सहज करता येईल. कॉलेजमध्ये इव्हेंट होता आणि त्यातच फॅशन शो पण असणार होता. त्या वेळी सहज म्हणून मी ऑडिशनला गेलो. माझी तेव्हाही कल्पना हीच होती की आपल्याला तर सिलेक्ट करणारच! पण तिथे माझा वॉक बरोबर नाही म्हणून मी रिजेक्ट झालो’, असा अनुभव त्याने सांगितला. मात्र योगायोगाने आयत्या वेळी शोमधल्या एकाने नाही म्हटलं म्हणून त्याला तात्पुरती संधी मिळाली. त्यानंतर मात्र मी माझ्या वॉकवर काम करायला सुरुवात केली. व्हिडीओज बघून तसा सराव मी आरशात बघून करायचो. हळूहळू माझा वॉक सुधारत गेला. नंतर मी कॉलेजमधून सोलो स्पर्धाना जायला लागलो. तेव्हाही सुरुवातीला काही फार यश मिळालं नाही. मग मी माझ्या फोटोच्या अँगल्सवरसुद्धा लक्ष द्यायला लागलो. स्वत:वर मेहनत घ्यायला लागल्यावर हळूहळू स्पर्धा, फॅशन शो यात टायटल्स मिळायला लागली. कॉलेज संपेपर्यंत माझ्यात व्यवस्थित आत्मविश्वास आला होता आणि मला माझा कलही समजला होता, असं प्रणवने सांगितलं.

मॉडेलिंगच्या क्षेत्रात यायचं असं प्रणवने ठरवलंच होतं. त्याच्या निर्णयाला कोणीही विरोध केला नाही. मात्र ओळखीच्या किंवा नात्यातल्या कोणाचा या क्षेत्राशी संबंध नसल्याने आणि परिचयही नसल्याने त्याला त्याचं करिअर अगदी मुळापासून सुरुवात करून स्वत:च उभं करायचं होतं. त्यानुसार त्याने धडपड करून हळूहळू कामं मिळवायला सुरुवात केली. मात्र या क्षेत्रात एखाद्याने ठरवलं म्हणजे लगेच काम मिळतंच अशी खात्री नाही. हे क्षेत्र अतिशय अशाश्वत आहे. याबद्दलचा अनुभव सांगताना प्रणव म्हणतो, ‘एक वर्ष असं झालं की सुरुवातीचे सहा महिने माझ्याकडे काहीच काम नव्हतं. काम मिळेल अशी वाट बघत मी आरामात बसून राहिलो. फिटनेसकडेही काही फारसं लक्ष दिलं नाही. काम मिळेल तेव्हा बघू असं म्हणत मी आराम करत होतो. एक दिवस मला जाणवलं की, हेच करण्यासाठी आपण या क्षेत्रात आलो का? काम नसेल तर काम मिळवणं हे आपलं कर्तव्य आहे. नुसतं बसून राहून काम मिळणार नाही आणि फिटनेसची काळजी घेतली नाही तर असाइनमेंट आल्यावर आयत्या वेळी फिटनेसवर मेहनत घ्यावी लागेल’. आयत्या वेळी फिटनेसवर मेहनत घेण्यासारखी दुसरी रिस्क नाही. कारण एकदा गेलेला फिटनेस असा अचानक परत मिळवता येत नाही, याची जाणीव झालेल्या प्रणवने पुन्हा स्वत:वर मेहनत घ्यायला सुरुवात केली. त्याच काळात मला हेही लक्षात आलं की, पूर्ण वेळ आणि लक्ष मॉडेलिंगवर दिलं तरी कामं मिळतीलच असं नाही. अशा वेळी माझ्याकडे दोन पर्याय होते. एक तर जास्त संधी मिळवण्यासाठी मुंबईत यायचं किंवा दुसरंही काही तरी काम करायचं. आपली इच्छा आणि वास्तव या दोहोंची सांगड त्याने घातली. ‘पुण्यातलं सगळं सोडून मला मुंबईला येणं शक्य नव्हतं. त्यामुळे मला काही तरी अशीच गोष्ट करायला हवी, ज्याने आर्थिक बाजू भक्कम राहील. मग मी इंजिनीअरिंगच्या पदवीच्या आधारावर नोकरी शोधली. वडिलांचा व्यवसायही सांभाळायचा होता. त्यामुळे नोकरी, व्यवसाय आणि मॉडेलिंग हे तिन्ही एकाच वेळी करायचा निर्णय मी घेतला’, असं त्याने सांगितलं.

सध्या प्रणव आठवडाभर नोकरी करतो आणि व्यवसायाकडेही बघतो. वीकएन्ड, अर्थात शनिवार-रविवारी, मॉडेलिंगच्या असाइनमेंट्सवर काम करतो. मॉडेलिंग ही आवड असतानाही नोकरी करण्याचा निर्णय त्याने घेतला आणि तो सर्व गोष्टी एकाच वेळी समर्थपणे सांभाळतो आहे. हा निर्णय त्याच्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. नोकरीचा आपल्या मॉडेलिंगच्या आवडीवर परिणाम होऊ  द्यायचा नाही आणि मॉडेलिंगचा नोकरीवर, हे त्याने ठरवलं होतं. या महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलताना प्रणव म्हणतो, ‘झेप घेतानाही पूर्ण जाणीव ठेवून आणि मोजूनमापून घ्यावी. जेणेकरून अनाठायी संकटं, आव्हानं, अपयश आपण ओढवून घेणार नाही. मॉडेलिंगमध्ये पैसे चांगले मिळतात, पण कायमच मिळतील असं नाही. त्यामुळे प्रॅक्टिकल विचार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. दोन्ही गोष्टी मिक्स होऊ  द्यायच्या नाहीत आणि एकमेकांवर परिणामही होऊ  द्यायचा नाही याची मी मनापासून काळजी घेत असतो. सकाळी ऑफिसला जाण्याआधी मी मेडिटेशन करतो, संध्याकाळी आल्यावर जिमला जातो आणि वीकएण्ड्सना मॉडेलिंगमधून वेळ काढूनही मी वर्कआऊ ट करतो. जितक्या गोष्टी करायच्या ठरवू तितक्या सगळ्या एका वेळी मॅनेज करता येतात, फक्त इच्छा असली पाहिजे’, असं प्रणव ठामपणे सांगतो.

मॉडेलिंग हे क्षेत्र अनिश्चित मानलं जात असताना आणि हातात निश्चित पदवी असतानाही, लोकांच्या दृष्टीने ‘टफ’ मानला जाणारा पर्याय प्रणवने निवडला. त्याने तो केवळ निवडलाच नाही, तर स्वत:चा निर्णय प्रयत्नपूर्वक निभावलासुद्धा!

  • ‘दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोणत्याही क्षेत्रात ‘शो मस्ट गो ऑन’ हे लागू पडतंच. मात्र जिथे तुमचा प्रत्यक्ष चेहरा दिसतो तिथे ते काहीसं जास्त प्रयत्नपूर्वक करावं लागतं. पण ते करण्याशिवाय पर्याय नसतो. अशा वेळी जे आपल्या हातात आहे, जे आपण करू शकतो ते आपण प्राधान्याने करायचं आणि जे आपल्या हातात नाही त्याची काळजी करत बसायचं नाही.’
  • ‘झेप घेतानाही पूर्ण जाणीव ठेवून आणि मोजूनमापून घ्यावी. जेणेकरून अनाठायी संकटं, आव्हानं, अपयश आपण ओढवून घेणार नाही. मॉडेलिंगमध्ये पैसे चांगले मिळतात, पण कायमच मिळतील असं नाही. त्यामुळे प्रॅक्टिकल विचार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं’.

viva@expressindia.com