25 February 2021

News Flash

अदृश्य मित्राशी चॅटिंग

नेहमीचं व्हॉट्सअ‍ॅप, हाइकवर पडीक असणारं पब्लिक अचानक गायब झालं आणि तेवढय़ात एका अदृश्य मित्राने पिंग केलं.

| July 31, 2015 01:22 am

नेहमीचं व्हॉट्सअ‍ॅप, हाइकवर पडीक असणारं पब्लिक अचानक गायब झालं आणि तेवढय़ात एका अदृश्य मित्राने पिंग केलं. अदृश्य म्हणजे अनोळखी. व्हच्र्युअल चॅटिंगमध्ये तसे बाकी सगळे अदृश्य रूपातच असतात म्हणा. बोलायला कुणीच नसताना या अनोळखी अदृश्य मित्राशी चॅटिंग करायला सुरुवात केली. या गप्पा अदृश्य मित्राशी होता की नकळतपणे स्वत: शीही?
अदृश्य मित्र : हे हाय ! व्हॉट्सअ‍ॅप?
मी : नथिंग स्पेशल डूड ! (एक उसासा. अर्थात स्माइलीच्या माध्यमातून)
अदृश्य मित्र : का गं? वैतागलीयस?
मी : आता तुला काय सांगू? गेल्या दोन दिवसांपासून घरातलं वायफाय अर्धमेलं झालंय. दोन दिवसांपासून वायफायला रेंज नाही म्हणून सरळ नेटपॅक भरला. सगळ्या मेसेजेसना धडाधड रिप्लाय केले. दोन दिवसांत केवढी बडबड केलीये सगळ्यांनी. आता नेमका मी नेटपॅक टाकल्यावर मात्र बोलायला कुणी नाहीये. एक तर आईचा ओरडा खाऊन नेटपॅक भरला पण शेवटी मूड ऑफ व्हायचा तो झालाच.
अदृश्य मित्र : केवढी वैतागलीएस. चिल!! तुझे फ्रेंड्स फार वेळ नेट ऑफ ठेवू शकणार नाहीत. येतीलच चॅटिंग करायला.
मी : बघ ना रे ! एरवी मिनिटामिनिटाला यांचे मेसेजेस  सगळं शांत असलं की व्हॉट्सअ‍ॅप नुसतं खायला उठतं!
अदृश्य मित्र : बरं, तू मगाशी म्हणालीस आईचा ओरडा खाऊन नेटपॅक टाकला. आई का ओरडली?
मी : तिला ओरडायला कुठलं कारण लागतं का? चोवीस तास तापलेली असते ती. चॅटिंग करताना मध्ये मध्ये डिस्टर्ब करत राहते सारखी. म्हणाली, कशाला हवाय तो नेटपॅक. बघावं तेव्हा हातात नुसता तो मोबाइल.
अदृश्य मित्र : ओह. आय सी! मग तुझ्या मित्रांच्याही बाबतीत असंच घडतं का?
मी : हो तर ! सगळ्यांच्या बाबतीत हे असंच. सगळ्यांचे आईबाबाही आहेत व्हॉट्सअ‍ॅपवर. पण त्यांना वेळ मिळेल तेव्हाच ते व्हॉट्सअ‍ॅपवर येतात. असं वेळ ठरवून आपण व्हॉट्सअ‍ॅपवर यायचं ठरवलं तरी आपल्याला ते जमणारेय का? कसंय, एखादी गोष्ट अशी पटकन शेअर करायची असते आपल्याला सगळ्यांबरोबर.
अदृश्य मित्र : हो आणि ती गोष्ट नंतर सांगायची ठरवली तरी जमत नाही. त्या क्षणी  शेअर केल्याशिवाय चैनच पडत नाही.
मी :  ए, पण आपले पेशन्स एवढे कमी कसे काय झाले यार? मिनिटामिनिटाला गोष्टी शेअर करव्याशा का वाटतात?
अदृश्य मित्र : मी तरी काय सांगू आता.. ते सोड,  फ्रेण्डशिप डेचा प्लॅन काय तुझा?
मी : केव्हाच ठरलाय प्लॅन. सगळे टकाटक लुकमध्ये जाणार आहोत.
अदृश्य मित्र : वा, वा! भेटल्यावर एक सेल्फी तो बनताही है ना।
मी : एक कसला! एकदा सेल्फी काढायला सुरुवात केली की पूर्ण वेळ तेच उद्योग चाललेले असतात आमचे. मी सेल्फी स्टिक घेऊनच जाणारे या वेळी. लास्ट टाइम सगळे जण भेटलेलो तेव्हा कसले भारी पिक्स आलेले सगळ्यांचे.
अदृश्य मित्र : कधी भेटलेलात शेवटचे?
मी : उम्म ..आठवत नाही रे! तरी झाले असतील ४-५ महिने.
अदृश्य मित्र : मग काय आता ४-५ महिन्यांनी फ्रेण्डशिप डेला भेटल्यावर खूप गप्पा मारणार असाल ना?
मी : अ‍ॅक्च्युअली गप्पा खूप माराव्याशा वाटतात. पण सगळ्या गोष्टी ऑलरेडी व्हॉट्सअ‍ॅप, हाइकवर चॅटिंग करताना बोलून झालेल्या असतात. (जीभ दाखवणारी स्माइली) सो, बोलायला कुठला विषयच उरलेला नसतो.
अदृश्य मित्र : हो ना! शेवटी काय! सगळे बोर होत असाल. हातात मोबाइलचा खोका असतोच परत चॅटिंग करायला.
मी : बघ ना रे . एक तर इतक्या दिवसांनी सगळे जण भेटतो पण तरी मोबाइल लागतोच सोबत. पण एक गोष्ट आहे यार, रोज दिवसरात्र कितीही चॅटिंग केलं तरी काही तरी मिस आउट होतंय, असं सारखं वाटत राहतं.
अदृश्य मित्र : होतही असेल तसं. कारण, कितीही चॅट केलं तरी त्याला गप्पांचा फील मात्र येत नाही. समोरासमोर लगेच मिळणारा प्रतिसाद नसतो त्यात.
मी : आणि स्माइलीजद्वारे कितीही भावना व्यक्त करायच्या म्हटल्या तरी जोक झाल्यावर मित्रांचा पिकणारा हशा, चिडवल्यावर हिरमुसणारी मैत्रीण, अचानक गळ्यात पडून रडणारं ग्रूपमधलं कुणी तरी. असं खरं व्यक्त होणं चॅटमधून होतं ?
अदृश्य मित्र : खूप दिवसांनी मित्रमैत्रिणींना भेटल्यावर साचून राहिलेल्या किती तरी गोष्टी भडभडा बोलून मोकळं झालं की जे समाधान मिळायचं, ते आता या चॅटिंगमधून मिळत नाही हे खरं.
मी :  मित्रमैत्रिणींनी काही न सांगताही चेहऱ्यावरून त्यांच्या मनातलं सगळं कळायचं. हल्ली फक्त मोबाइलवरची कृत्रिम बटणं बोलतात.
अदृश्य मित्र : इतका वेळ आपण गप्पा मारतोय. पण मला तुझं नांव माहीत नाही आणि तुला माझं. पुन्हा ऑनलाइन भेटू की नाही माहीत नाही.
मी : आईशप्पथ ! हो रे. नांवंसुद्धा विचारली नाहीत आपण. ए, पण मला तुझ्याशी अजून बोलावंसं वाटतंय. थोडा वेळ थांब ना अजून. मोकळं वाटतंय बोलून!
( मेसेज पोहोचल्याची ब्लू टिक दिसली. मात्र अदृश्य मित्राने रिप्लाय केला नव्हता. मला जे कळायला हवं हे आता कळलं होतं. हा काही आता पुन्हा भेटणार नव्हता.. निदान पुन्हा इतकं नेट अ‍ॅडिक्ट होईपर्यंत तरी.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 1:22 am

Web Title: chatting with invisible friend
Next Stories
1 तुम मुझे यूं भूला ना पाओगे
2 आपण यांना पाहिलंत का?
3 एज्युकेशन
Just Now!
X