|| सौरभ करंदीकर

करोनाकाळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आपले व्यवहार पार पाडण्यासाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी तंत्रज्ञानाचं साहाय्य घेतलेलं दिसतं. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधांचा वापर करून कार्यालयीन कामं तसंच शिक्षण चालू झालंय. ऑनलाइन बँकिंगमुळे आर्थिक व्यवहार घरबसल्या होत आहेत. खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तू यांची खरेदी शॉपिंग अ‍ॅप्सद्वारा केली जाते आहे, परंतु घराच्या चार भिंतींबाहेरचं जग आपण बसल्या जागी अनुभवू शकू असं काही तंत्रज्ञान असलं तर? आणि ते सामान्यांच्या आवाक्यात आलं तर?

आपल्या पौराणिक कथांमध्ये तिन्ही लोकी संचार करणाऱ्या नारदमुनींच्या लीला आपण ऐकल्या आहेत. क्षणार्धात प्रकट आणि अंतर्धान पावणाऱ्या, इच्छेनुसार या ब्रह्मांडात हवा तसा संचार करू शकणाऱ्या देव-देवतांच्या आख्यायिका आपण ऐकल्या आहेत. विज्ञानकथांमधील प्रकाशाच्या वेगाहून अधिक गतिमान असणारी अवकाश यानं असोत किंवा ‘स्टार ट्रेक’सारख्या मालिकांमधला ‘ट्रान्सपोर्टर बीम’ असो, मनुष्याला क्षणार्धात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा चमत्कार आपलं नेहमीच मनोरंजन करत आला आहे. विज्ञानकथा आणि विज्ञान यातील दरी भविष्यात कमी होत जाईल यात शंका नाही. परंतु आजच्या घडीला तरी आपल्याला वाटेल तिथे क्षणार्धात ‘ट्रान्सपोर्ट’ करण्याचं तंत्रज्ञान उपलब्ध नाहीये.

आजच्या करोनाकाळात पर्यटन, मनोरंजन इत्यादी क्षेत्रांवर नाइलाजाने अंकुश आणला गेला आहे. घराबाहेर पडणं मुश्कील झालं आहे. अशा परिस्थितीत आपले व्यवहार पार पाडण्यासाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी तंत्रज्ञानाचं साहाय्य घेतलेलं दिसतं. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधांचा वापर करून कार्यालयीन कामं तसंच शिक्षण चालू झालंय. ऑनलाइन बँकिंगमुळे आर्थिक व्यवहार घरबसल्या होत आहेत. खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तू यांची खरेदी शॉपिंग अ‍ॅप्सद्वारा केली जाते आहे, परंतु घराच्या चार भिंतींबाहेरचं जग आपण बसल्या जागी अनुभवू शकू असं काही तंत्रज्ञान असलं तर? आणि ते सामान्यांच्या आवाक्यात आलं तर?

‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’ म्हणजेच ‘आभासी वास्तव’ या तंत्रज्ञानाचा इतिहास जवळपास ६० वर्षांचा असला तरी आताच्या परिस्थितीमुळे ते अधिक लोकाभिमुख होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. फेसबुक आणि शाओमी यांच्या एकत्रित प्रयत्नाने आज ‘ऑक्युलस’ या ब्रॅण्डचे व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी (व्हीआर) हेडसेट उपलब्ध आहेत. या हेडसेटमध्ये आपल्या डोळ्यांसमोर मोठी स्क्रीन असते आणि आपल्या कानांजवळ छोटे स्पीकर्स असतात. दृश्य आणि ध्वनी यांच्या माध्यमातून आपण एखाद्या वेगळ्या ठिकाणी आहोत याचा भास निर्माण केला जातो. कल्पना करा, की आज आपल्याला एका निर्मनुष्य समुद्रकिनाऱ्यावर लाटांचा आवाज ऐकत बसायचं आहे अथवा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या अंतर्भागात तरंगायचं आहे. ताजमहाल अथवा आयफेल टॉवर न्याहाळायचा आहे. आणि या साऱ्याचा कंटाळा आला तर प्रत्यक्षात स्टेडियममध्ये बसून फुटबॉल वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहायचा आहे किंवा एखादा रॉक शो अनुभवायचा आहे. हे सारं तुम्ही घरबसल्या करू शकता!

ऑक्युलसच्या सर्वात स्वस्त (?) हेडसेटची किंमत जवळपास ३० हजारांच्या आसपास आहे. मात्र याहून स्वस्त हेडसेट म्हणजे गूगलने लोकप्रिय केलेला ‘कार्डबोर्ड’ – कोणत्याही पुठ्ठय़ाच्या साहाय्याने, पण गूगलने दिलेली मापं आणि आकृती वापरून आपला स्मार्टफोन आपल्या डोळ्यासमोर आणू शकेल असा तात्पुरता हेडसेट केला तरीही वर उल्लेखिलेले अनुभव काही अ‍ॅप्सच्या साहाय्याने आपण घेऊ शकता.

अनेक लोकप्रिय तंत्रज्ञानाची पहिली चाहूल साहित्य आणि मनोरंजनक्षेत्रात आढळते, त्याच परंपरेत ‘व्हीआर’देखील समाविष्ट आहे. आपल्या महाभारतातील पांडवांनी रचलेली ‘मयसभा’ असो किंवा रेनेसाँ काळातील ‘पस्र्पेक्टिव्ह’ तंत्राचा वापर केलेली युरोपियन तैलचित्रं असोत, समोर नसलेल्या परिसराचा आभास निर्माण करणाऱ्या ‘व्हीआर’ची ती नांदीच होती. १९३३ मध्ये लिहिलेल्या लॉरेन्स मॅनिंग यांच्या ‘मॅन हू वोक अप’ या कथेतील पात्रं स्वत:ला मशीनबरोबर जोडून सर्व संवेदना त्यातूनच घेण्याचं ठरवतात, तर १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मॅट्रिक्स’ चित्रपटात मनुष्यजातीला मशीनने गुलाम बनवलं आहे, प्रत्येकाला त्याच्या नकळत  ‘व्हीआर’ला जोडलेलं आहे, प्रत्येक मानव आभासी जीवन जगत आहे, अशी भयावह कल्पना केली गेली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ‘आपण खरंच जगतोय, की हे जीवन म्हणजे आपल्याला पडलेलं ‘व्हीआर’ स्वप्न आहे?’, अशा स्वरूपाच्या तत्त्वज्ञानिक चर्चाना उधाण आलं होतं.

१९६२ मध्ये मोर्टन हीलिग याने ‘सेन्सोरामा’ नावाचा ‘भविष्याचा सिनेमा’ लोकांसमोर आणला होता. या सेन्सोरामामध्ये प्रेक्षकाच्या भोवती स्क्रीन, पंखे, थरथरणारी खुर्ची, वेगवेगळे वास फेकणारे यंत्र, दिवे इत्यादी जामानिमा असायचा. प्रेक्षकाला दृश्य, ध्वनी, स्पर्श, वास या साऱ्यांच्या मदतीने एका आभासी दृश्याचा अनुभव दिला जात असे. आज अनेक मॉल्समध्ये असणाऱ्या ५-डी राईड्स, ‘हॉण्टेड हाऊस’ इत्यादींचा तो आद्य अवतार होता. हीलिगच्या सेन्सोरामामधील एका चित्र-अनुभवात प्रेक्षकाला आपण न्यूयॉर्क शहरात एका बाईकवरून प्रवास करतोय असा आभास होत असे. आज ऑक्युलस हेडसेट परिधान केला तर आपण एका रोलर-कोस्टरवर वेगात वर-खाली होतोय असा आभास होतो.

१९६८ साली आयव्हन सदरलॅण्ड यांनी पहिला हेड माऊंटेड डिस्प्ले तयार केला. एखाद्या प्रचंड हेल्मेटसारखा भासणारा हा हेडसेट प्रयोगशाळेच्या छतावरून लटकवावा लागत असे. हा हेडसेट परिधान केला की प्रेक्षकाला भौमितिक आकारांनी तयार केलेल्या प्रतिसृष्टीचं दर्शन होत असे. हे त्रिमितीय जग वास्तवापेक्षा खूपच वेगळं होतं, त्या तुलनेत ऑक्युलसमधून दिसणारी दृश्यं अधिक जिवंत, खरीखुरी वाटतात.

केवळ घटकाभर करमणूक व्हावी इतकाच या तंत्रज्ञानाचा उद्देश नाही. औद्योगिक, व्यावसायिक, वैद्यकीय तसंच संरक्षणक्षेत्रांमध्ये ‘व्हीआर’ मोलाचा वाटा उचलत आहे. या तंत्रज्ञानाच्या अशा उपयोगांची आणि काही मनोरंजक बारकाव्यांची  माहिती पुढच्या लेखात करून घेऊ. (क्रमश:)