डान्स म्हणजे स्ट्रेसबस्टर. एखाद्या गाण्यावर ठेका धरला म्हणजे डान्स येतोच असं नाही . तर डान्ससाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. अलीकडे डान्स या छंदाकडे अनेकजण करीअर म्हणूनही पाहू लागले आहेत.. दर वर्षी २९ एप्रिलला साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक नृत्य दिनानिमित्ताने या छंदाचे केलेले  परीक्षण.. परिस्थिती फारच निराशाजनक आहे असे नाही म्हणता येणार ..  काही उणेदुणे झालेही असेल.. मात्र, तरीही चालायचेच.. शो मस्ट गो ऑन. दुसरे काय..!  

‘‘माझा डान्स आवडला असेल तर मला ७७७७ या क्रमांकावर व्होट करा..’’
..
‘‘व्वा.. कमाल का परफॉर्मन्स दिया है आपने. डान्स करते वक्त आपके फूटस्टेप्स और चेहरे के एक्स्प्रेशन्स एकदम ही सही थे. मार ही डाला. इसके लिए तो स्टँडिंग ओव्हेशन होना चाहिये.’’
..
‘‘या गाण्यावर तुम्ही जे आता नृत्य केलं त्यात थोडा ऱ्हिदम कमी होता. तुमच्या चेहऱ्यावरचे भावही कोरडेच होते. गाण्याला साजेशे नव्हते.. तुम्ही डान्स तर छान करत होतात, मात्र त्यात डिव्होशन नव्हतं.’’
..
विशिष्ट टाइम स्लॉटमध्ये टीव्ही सुरू केला, की दहापैकी किमान चार तरी चॅनेल्सवर हे असे संवाद आपल्याला ऐकू येतात. आपण क्षणभर तिथे रेंगाळतो.. टीव्ही स्क्रीनवर परीक्षक म्हणून दिसणारे चेहरे ओळखीचे असतात. त्यात कोणी महागुरू असतो, कोणी मास्टरजी, तर कोणी गुरुजी.. चॅनेल अनेक मात्र कार्यक्रमांची थीम एकच आणि ती म्हणजे डान्स.. ‘नच बलिये’, ‘डान्स महाराष्ट्र डान्स’, ‘डान्स इंडिया डान्स’ वगैरे वगैरे त्यांची नावं.. फक्त ती वेगवेगळ्या चॅनेल्सच्या लोगोखाली सुरू असतात एवढेच..
नृत्य आणि मानवी संस्कृती यांचा फार पुरातन संबंध आहे. पुराणात डोकावले तर देवांचा राजा इंद्र याच्या दरबारातील रंभा-ऊर्वशी या उच्च कोटीच्या नर्तिका होत्या. श्रीकृष्णाने गोपिकांसमवेत केलेल्या रासलीला या नृत्याचाच प्रकार होता. महाभारत रणांगणावर युद्ध करून थकलेल्या योद्धय़ांच्या श्रमपरिहारानिमित्त नाचगाण्याचे कार्यक्रम आयोजिले जात. इतिहासात डोकावले तर राजे-महाराजांकडे खास उत्सवाच्या वेळी नाचगाण्याचे कार्यक्रम होत असत. नृत्य ही एक कला आहे. या कलेत पारंगत असलेल्यांना राजे-राजवाडय़ांत आश्रय दिला जायचा. या कलेचे संगोपन करणे, तिच्या वृद्धीची काळजी घेणे हा राजधर्म समजला जायचा. या कलेचा सन्मान केला जातो हे खरेच, पण आजच्या काळात त्याला राजाश्रय मिळतो का? किती कलाकारांना त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी निवांत आयुष्य जगता येते? हा संशोधनाचा विषय आहे. अनेक नृत्य कलावंत गणंग अवस्थेतच असतात हे कटू सत्य आहे.. म्हणूनच आंतरराष्ट्रीय नृत्य परिषदेचे अध्यक्ष अल्किस रॅफ्टिस म्हणतात ते पटते.. ते म्हणतात, ‘जगभरात एकूण २०० देश आहेत. त्यातील निम्म्याहून अधिक देशांमध्ये अजूनही नृत्याकडे एक कला म्हणून पाहिले तर जाते, परंतु त्याला राजाश्रय दिला जात नाही. नृत्य शिकवण्याचे अनेक खासगी-शासकीय क्लासेस असतात, परंतु त्यातून पुढे हाती काय लागते? तर त्याचे उत्तर फारसे काहीच नाही, असेच द्यावे लागेल..’ रॅफ्टिस यांनी साताठ वर्षांपूर्वी हे वक्तव्य केले होते. तेव्हापासून आजपर्यंत परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही, हे नमूद करावे लागेल.
..
आपल्याकडेही परिस्थिती फारशी उत्साहवर्धक नाही. नाचाच्या स्पर्धा वाढल्या, स्पर्धकांची संख्या वाढली, त्यातून पहिल्या- दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्यांना मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमांमध्येही वाढ झाली. मात्र, स्पर्धा संपली की विजेत्या स्पर्धकांवरचा प्रसिद्धीचा झोतही बाजूला होतो आणि त्यातून पुढे त्या कलाकाराचे काय होते याचा विचार करायला ना स्पर्धा आयोजकांना वेळ असतो, ना परीक्षकांना, ना प्रेक्षकांना..
..
आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाची पाश्र्वभूमी
आंतरराष्ट्रीय थिएटर संस्था (आयटीआय) ही संयुक्त राष्ट्रांच्या शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक संघटनेची (युनेस्को) भागीदार असलेली स्वयंसेवी संस्था. या संस्थेने १९८२ पासून २९ एप्रिल हा दर वर्षी आंतरराष्ट्रीय नृत्य दिन म्हणून साजरा केला जाईल असे जाहीर केले. बॅले नृत्याचे आद्य संस्थापक जीन-जॉर्जेस नोव्हेर (१७२७-१८१०) यांचा हा जन्मदिन. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी संबंधित वर्षांतील सर्वोत्कृष्ट नर्तकाला जागतिक संदेश देण्यासाठी आमंत्रित केले जाते. सर्वोत्कृष्ट नर्तकाची निवड आयटीआयची आंतरराष्ट्रीय नृत्य समिती करते. नृत्यकलेचा अधिकाधिक प्रसार व्हावा, तिला राजाश्रय मिळावा, नृत्य कलावंतांचे समाजातील स्थान उच्च व्हावे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. तेव्हा चला, या सोमवारी, २९ एप्रिलला, डान्स पे चान्स मारूया..