‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’ या संत तुकाराम यांच्या अभंगातील ओळी ‘तिच्या’बाबतीत सार्थ ठरतात. सहा भाषांवर प्रभुत्व, त्या समरसून शिकण्याची वृत्ती, दोन परदेशी भाषा शिकवण्याची हातोटी, लिहिता हात नि विविध कलागुणांची जोपासना करणारी ही आहे धनश्री ओजाळे !
धनश्री ‘डी. एस. हायस्कूल’मधून दहावी झाली. तिनं ‘डी.जी. रूपारेल कॉलेज’मध्ये आर्ट्सला अ‍ॅडमिशन घेतली. सेकंड लँग्वेज जपानी भाषा घेणारी त्यांची चौदा जणांची पहिलीच बॅच होती. त्याच वेळी ‘मुंबई विद्यापीठा’चा जपानी भाषेचा डिप्लोमाही तिनं केला. पुढं अ‍ॅडव्हान्स डिप्लोमाही पूर्ण केला. ‘जपान फाऊंडेशन’ची परीक्षाही ती देत होती. तिला टिपिकल बी.ए. करायचं नव्हतं. तिनं रशियन भाषा शिकायचं ठरवून मुंबई विद्यापीठात बी.ए(रशियन)साठी अ‍ॅडमिशन घेतली. तिला त्यात डििस्टगशन मिळालं असून सध्या ती एम.ए च्या शेवटच्या वर्षांला आहे.
शालेय जीवनात मराठीची आवड तिनं विविध स्पर्धात सहभागी होऊन जोपासली. सातवीत विद्या पटवर्धनांच्या नाटय़शिबिरात सहभागी झाली होती. दहावीत व्हॉइस कल्चरचा कोर्स केला होता. धनश्री सांगते की, ‘नर्सरीत अ‍ॅडमिशनच्या वेळच्या मुलाखतीत मी काहीच बोलले नव्हते प्रिन्सिपलसमोर. सातवीत मी भाषणाच्या स्पध्रेत भाग घेतला असताना त्याच प्रिन्सिपल प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. त्या वेळी मला प्रथम नि सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून पुरस्कार मिळाला. त्यावेळी मुलाखतीचा प्रसंग आठवून त्यांनी कौतुक करत त्यामागचं कारण सांगितलं. माझी भाषिक आवड जोपासण्यासाठी आईनं खूप सपोर्ट केला. शिक्षकांनी मला कायम सपोर्ट केला. सकाळची शाळा, शाळेतून आल्यावर गणित-विज्ञान  नि मग संस्कृत आणि नंतर हार्मोनियमचा क्लास अशी मी बिझी असायचे. मी गांधर्व महाविद्यालयाच्या हार्मोनियम नि गाण्याच्या दोन परीक्षा दिल्यात. मला क्रिएटिव्ह क्रािफ्टग आणि कुकिंगची आवड आहे.‘
 अकरावीत परदेशी भाषा शिकायचं तिच्या मनातही नव्हतं. जर्मन, फ्रेंच वगरे भाषा शिकणं कॉमन असून जपानी मात्र फार कमीजण शिकतात. रूपारेलमध्ये त्यावेळी जपानी बारावीपर्यंत शिकवत असूनही जपानीच शिकायचं तिनं ठरवलं. बोर्डाच्या परीक्षेच्या आठवडाभर आधी विज्ञान शाखेच्या काही विद्यार्थ्यांना इतर अभ्यासामुळं जपानीकडं लक्ष द्यायला न जमल्यानं त्यांनी धनश्रीला ती शिकवण्याची विनंती केली. त्यांच्या शंकांना उत्तरं शोधायच्या निमित्तानं सखोल अभ्यास होऊन तिचं जपानी परफेक्ट व्हायला लागलं. ‘मी भाषा शिकवू शकते,’ असा आत्मविश्वास तिला वाटू लागला. आता तिचं मराठी, िहदी, इंग्रजी, संस्कृत, रशियन नि जपानी या भाषांवर प्रभुत्व आहे.
तिच्या मित्राच्या मित्राला जपानी शिकायचं होतं. त्यासंदर्भातली चौकशी करता करता धनश्रीनंच शिकवायचं ठरलं. मित्राला येणारं स्पॅनिश त्यानं तिला शिकवलं नि ती त्याला जपानी शिकवू लागली. त्यावेळी जपानीचा बेसिक डिप्लोमा होऊन ती रशियनच्या पहिल्या वर्षांला होती. जपानीच्या अ‍ॅडव्हान्स डिप्लोमाला असताना २६-११ च्या अतिरेकी हल्ल्यानंतर जपानचे तत्कालीन पंतप्रधान युकियो हातोयामा भारतभेटीवर आले होते. तेव्हा त्यांची भेट घ्यायची संधी तिला मिळाली. जपानी पंतप्रधानांशी प्रश्नोत्तरांची संधी तिला इतर विद्यार्थ्यांसमवेत मिळाली. त्यांच्या जपानी बोलणं नि गाण्याचं त्यांनी कौतुक केलं. नंतर आठवणीनं जपानहून एक भेटही पाठवली.
 एस.वाय.बी.ए.ला असताना रशियन गाणी शिकण्यासाठी ‘रशियन सेंटर’मध्ये जात होती. तिथल्या कार्यक्रमांत त्यांना आवर्जून बोलावलं जायचं. त्यांच्या गाण्यांचं तेथील अधिकारी वर्गानं खूपच कोडकौतुक केलं होतं. तिथल्या निबंध स्पर्धा, कवितावाचन वगरेंत ती सहभागी होते. जपानच्या वार्षकिोत्सवातही ती सहभागी व्हायची. क्लासमध्ये ती सगळ्यात लहान असल्यानं तेव्हा सादर होणाऱ्या नाटकातल्या विअर्ड रोलकडंही ती सकारात्मक दृष्टीनं बघायची. या दिवाळीच्या सुट्टीत तिनं भोवतालच्या लहान मुलांना जपानी भाषा शिकवली.  
 ती सांगते की, ‘मासिकांत लेखन करावं असं कधी डोक्यात आलं नव्हतं. माझा फियोन्सीच्या आजी- ज्येष्ठ आहारशास्त्रज्ञ नि लेखिका वसुमती धुरू यांनी मला खूप सपोर्ट केला. त्या म्हणाल्या की, ‘तुझ्यात टायलेंट आहे, तू लिहिती राहा. तुला दोन भाषा येतात, तू भाषांतर का नाहीस करत?’ त्यांच्या पुढाकारानं ‘गृहस्वामिनी’ मासिकासाठी परदेशी भाषेसंबंधीचा लेख द्यायचं ठरलं. तो प्रसिद्ध होऊन त्याचं मानधन मिळणं हा माझ्यासाठी सुखदाश्चर्याचा धक्का होता. त्यानंतर त्या संपादकांनी लहान मुलांसाठी गोष्टी लिहिण्याबद्दल विचारलं असून ते काम सुरू आहे. मी लिओ टॉलस्टॉयच्या कथा मराठीत भाषांतरित करत असून त्याचं पुस्तक काढायचंय.’
 ती जपानी नि रशियन भाषेची शिकवणी घेते. लìनग करताच अìनग हे तिच्यासाठी दर टप्प्यावर वेगवेगळं होत होतं. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना शिकवताना तिची भाषा समृद्ध होत होती. मित्राला जपानी शिकवताना ती स्पॅनिश शिकली. आता रशियन शिकताना ते शिकवताही येतंय. विद्यापीठाच्या रशियन विभागात इतर शाखेच्या विद्यार्थी किंवा नोकरदारांना दोन महिन्यांत रशियाला जायचं असल्यास अनुषंगिक शिक्षण देणारा शॉर्टटर्म कोर्स नाहीये. त्यांना त्या दृष्टीनं रशियन भाषा शिकवण्याची संधी धनश्रीला मिळत्येय. सुट्टीत ती दोन्ही भाषांचे क्लास घेते. खाजगी क्लासेसच्या ‘झटपट भाषा शिका’ तंत्रावर तिचा विश् वास नाहीये. कारण तिच्या मते भाषा ही आयुष्यभर शिकत राहण्याजोगी गोष्ट आहे.

धनश्री म्हणते की, ‘दिवसभर सतत बिझी राहायची पहिल्यापासून सवय असल्यानं आता ते हेक्टिक वाटत नाही. आपल्या शेड्युलची व्यवस्थित आखणी केल्यावर सगळं नीट मॅनेज होतंच. इतरांना शिकवायच्या नादात आपला अभ्यास कधी राहून जातो. त्यामुळं आधी आपला अभ्यास करून घेऊन मग दुसऱ्यांना शिकवायचं. त्यांना शिकवताना आपलाही अभ्यास होतो. मोठय़ा माणसांपेक्षा लहान मुलांची आकलनक्षमता जास्त असते. ते भाषा पटकन शिकतात. मोठय़ा माणसांना भाषेबद्दल सतत काही ना काही प्रश्न पडतात. त्यावेळी त्यांना तूर्तास हा अभ्यास करा, पुढं सखोल अभ्यास करताना तुम्हाला त्याविषयी अधिक कळेलच, असं समजवावं लागतं. एम.ए.च्या शेवटच्या वर्षांला असल्यानं जपान फाऊंडेशच्या एन ३चा अभ्यास अभ्यास थांबवलाय. पुढं मी नेटसेट देऊन रशियन भाषा शिकवणारेय.’
तिला आपली भारतीय संस्कृती रशियात न्यायला खूप आवडेल. त्यांना आपल्याकडच्या अनेक गोष्टींचं आकर्षण वाटतं. उदा. मेंदी काढणं, साडी नेसणं किंवा भारतीय पदार्थाच्या कृती वगरे. त्याची माहिती इंग्रजीपेक्षा रशियनमध्ये मिळाल्यास त्यांना ते वाचणं सोपं होईल. त्यासंदर्भात काहीतरी करण्याचा विचार चालू आहे. ‘एकदा एक जपानी बाई मेंदी नि िबदीतला गोंधळ टाळण्यासाठी कपाळाला हात लावून िबदी नि हाताची मेंदी असं जणू पाठ करत होती. भारतीय संस्कृतीचं प्रतीक ठरणाऱ्या गोष्टी भेट म्हणून मिळणं जपानी लोकांना आवडतं,’ असा किस्सा तिला आठवतो.
ती सांगते की, ‘विद्यापीठातल्या तिच्या प्राध्यापिकांच्या रशियन मत्रीण िहदी शिकवायच्या. त्यांना भारतीय संस्कृतीतल्या विविध गोष्टींचं आकर्षण वाटे. त्यांनी मला मेंदी काढून द्यायला सांगितलं. मला स्वत:ला मेंदी काढायला किंवा इतर कुणाला काढायला आवडत नाही. पण त्यांना नाही कसं म्हणणार, असा प्रश्न मला पडला. मेंदी काढल्यावर मी त्यांना तसं सांगितलंही. त्यावर ‘आयुष्यात येणाऱ्या संधीला होकार दे. जमेल न जमेल ही पुढची गोष्ट आहे. तू ‘हो’ म्हणून तुझ्या परीनं बेस्ट दे,’ असं त्यांनी सांगितलं. हा कानमंत्र धनश्रीनं कायमच जपलाय. कारण सकारात्मकता नि भाषेचं माहात्म्य तिला पुरेपूर कळलंय.