05 March 2021

News Flash

इंजिनीअरिंग ब्लूज

सहज गंमत म्हणून इंजिनीअरिंग कॉलेजमधली धमाल दाखवणारा एक व्हिडीओ बनवला आणि त्याला मिळालेल्या प्रतिसादानंतर शॉर्ट फिल्म बनवायचं वेडच लागलं.

| July 31, 2015 01:25 am

सहज गंमत म्हणून इंजिनीअरिंग कॉलेजमधली धमाल दाखवणारा एक व्हिडीओ बनवला आणि त्याला मिळालेल्या प्रतिसादानंतर शॉर्ट फिल्म बनवायचं वेडच लागलं. त्यानिमित्ताने सगळे शाळेचे दोस्त एकत्र आले आणि त्यांना नवेही येऊन मिळाले. फ्रेंडशिप डेनिमित्त मैत्र जागवण्याचा आयआयटीयन्सचा हा नवा फंडा समोर आला.

गेले ते दिन गेले..! असं म्हणत शाळेच्या वर्गमित्रांच्या आठवणीत हळहळणारे ग्रुप बघणं आपल्यासाठी काही नवीन नाही. दहावी-बारावीच्या सेंडऑफला ‘आपण भेटायचं हं, ही मैत्री तुटू नाही द्यायची’ अशी वचनं देणारे जिवाभावाचे मित्र आपापल्या करिअरच्या व्यापात एकमेकांपासून जुदा होतात. पण आपल्या व्यापातून वेळ काढून जुन्या दोस्तांबरोबर रमणारी मित्रमंडळी ही आहेत बरं का! नुसती रमतातच असं नाही, तर वेगवेगळ्या उलाढाली करतात, उपक्रम करतात, आपसातलं मैत्र जागवतात आणि इतरांनाही त्यात सामील करून घेतात. असाच एक मूळच्या डोंबिवलीकर आयआयटियन्सचा ग्रुप इंजिनीअरिंगच्या अनुभवांवर शॉर्ट फिल्म्स बनवतोय. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने या ग्रुपची धमाल त्यांनी ‘व्हिवा’बरोबर शेअर केली.
सध्या इंजिनीअरिंगसाठी वेगवेगळ्या शहरांतल्या वेगवेगळ्या कॉलेजमध्ये गेलेले शाळेचे मित्र या लघुपट बनवण्यामुळेच पुन्हा एकत्र आले. डोंबिवलीतील विद्या निकेतन शाळेतले गौरव बोंबे, तन्मय कोल्हटकर, आदित्य देव, अक्षय कोयंडे ,अनिरुद्ध कुलकर्णी खूप घट्ट मित्र; पण आपापल्या करिअरसाठी त्यांना डोंबिवली सोडून वेगवेगळ्या शहरांत जावं लागलं. तन्मय हैदराबादच्या आयआयटीमध्ये, अक्षय रुरकी आयआयटीमध्ये तर आदित्य इंदूरला आयआयटीमध्ये गेला. आपापले इंजिनीअरिंगचे अनुभव, धमाल नुसते ग्रुपमध्ये शेअर करून ते थांबले नाहीत, तर त्याची शॉर्ट फिल्म त्यांनी बनवली. पहिल्याच फिल्मला मिळालेला प्रतिसाद बघत आता ‘इंजिनीअरिंग ब्लूज’ नावाने ते शॉर्ट फिल्म्स बनवू लागले आहेत. इंजिनीअरिंग शिकताना घडणाऱ्या गमतीजमती, मुलांची-शिक्षकांची मानसिकता टिपण्याचा प्रयत्न त्यांनी या फिल्ममध्ये केला आहे. याबाबत गौरव म्हणाला, ‘‘दहावीनंतर आमची घट्ट मैत्री अशीच ठेवण्यासाठी काहीतरी करायचं हे पहिल्यापासून मनात होतं. फिल्म मेकिंग ही आमची सगळ्यांची आवड. शाळेत असताना आम्ही टाइमपास म्हणून फेसबुकवर व्हिडीओ अपलोड केले होते आणि त्याला खूप मस्त रिस्पॉन्स मिळाला होता. त्यामुळे फिल्म मेकिंग करायचं हे नक्की केलं. पहिल्या सेमच्या सुट्टीत विषय सुचला. वायवा.’’
मग या चार मित्रांनी मिळून द वायवा ब्लूज नावानं शॉर्ट फिल्म बनवली आणि ती फेसबुक आणि इतर सोशल मीडियामधून शेअर केली. ‘‘त्याला मिळालेल्या प्रतिसादानंतर ‘द सबमिशन ब्लूज’ नावाची अजून एक फिल्म केली. ती बघून आमचे अजून काही मित्र या ग्रुपचे सदस्य बनले’’, गौरव सांगतो.
तन्मय कोल्हटकर म्हणाला, ‘‘पहिल्या वेळी आम्ही आयत्या वेळी जसं सुचलं तसं, जमेल तसं केलं. पण मिळणाऱ्या प्रतिसादामुळे हे फिल्म मेकिंग थोडं सिरियसली घ्यायचं ठरवलं. दुसरी फिल्म ‘द सबमिशन ब्लूज’च्या वेळी स्टोरीपासून गाण्यापर्यंत सगळ्याचं नीट नियोजन केलं आणि त्याही फिल्मला प्रतिसाद मिळतोय.
या चार मुलांना नंतर इतर काही मित्रमंडळीदेखील जॉइन झाली. त्यातलीच एक रुपारेल कॉलेजची ऋतुजा कुलकर्णी. ऋतुजा म्हणते, ‘‘या सगळ्या मुलांच्या ग्रुपमध्ये मी एकटी मुलगी आहे. पण एकटीच मुलगी वगैरे विचार कधी मनातपण येत नाहीत. आमचं कामच इतकं इंटरेस्टिंग आहे की, खूप धमाल येते. इंजिनीअरिंगला नसूनदेखील आयआयटीमधल्या आणि एकूणच इंजिनीअरिंगमधल्या गमती कळल्या आणि महत्त्वाचं म्हणजे मला खूप छान नवे मित्र मिळाले.’’
प्रत्येक सेमिस्टरनंतरच्या सुट्टीत ही मुलं फिल्म मेकिंगचा उद्योग करतात. त्यानिमित्त एकत्र भेटणं होतं. आदित्य देव म्हणतो, ‘‘पहिल्या दोन व्हिडीओजना मिळालेल्या प्रतिसादानंतर सगळ्यांनाच नवं काहीतरी करण्याची इच्छा आहे. प्रत्येक सेमची सुट्टी गाजवायचीच हे आम्ही ठरवलं आहे. या ग्रुपमध्ये नवीन मित्रही सामील झाले आहेत. फिल्मच्या कामासाठी भेटणं म्हणजे आमच्यासाठी एक पर्वणीच असते.’’

vv03‘दहावीनंतर आमची घट्ट मैत्री अशीच ठेवण्यासाठी काहीतरी करायचं हे पहिल्यापासून मनात होतं. शाळेत असताना आम्ही टाइमपास म्हणून फेसबुकवर व्हिडीओ अपलोड केले होते आणि त्याला खूप मस्त रिस्पॉन्स मिळाला होता. त्यामुळे फिल्म मेकिंग करायचं हे नक्की केलं.
    – गौरव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 1:25 am

Web Title: engineering blues
Next Stories
1 अदृश्य मित्राशी चॅटिंग
2 तुम मुझे यूं भूला ना पाओगे
3 आपण यांना पाहिलंत का?
Just Now!
X