News Flash

ऑर्किड :

एखाद्या दुर्मीळ गोष्टीबाबत घडणारी खास गोष्ट म्हणजे तिच्याबद्दल निर्माण होणारे समज-गैरसमज.

एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..
एखाद्या दुर्मीळ गोष्टीबाबत घडणारी खास गोष्ट म्हणजे तिच्याबद्दल निर्माण होणारे समज-गैरसमज. कालांतरानं पूर्वी दुर्मीळ असलेली ही गोष्ट आपल्यासाठी सहज उपलब्ध होत जाते, पण त्या गोष्टीबद्दलचे समज-गैरसमज कायम राहातात. ऑर्किडच्या फुलांबद्दल पण हेच म्हणता यावं. अगदी आज आता तुम्ही फुलबाजारात फेरफटका मारला तरी तुम्हाला ऑर्किडची फुलं गणपतीच्या मखरासाठी, हारासाठी बुकेमध्ये कुठे ना कुठे तरी आढळून येतीलच. एकेकाळी दुर्मीळ असणारे हे फूल आपल्या आवाक्यात वापरात आले आहे. त्यामुळे वास्तविक याच्या उच्चाराबाबत गोंधळ असण्याचे कारण नाही, पण तरीही या फुलाचा उच्चार काहींना गोंधळात टाकतो.
स्वानुभवाचे दोन किस्से सांगावेसे वाटतात. दहावीच्या भूगोलाच्या अभ्यासात मुलांना वाक्य आहे की आसाम राज्य ऑर्किडच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. त्यावर काही मुलांना शंका होती की ही प्रिंटिंग मिस्टेक तर नव्हे? ऑर्चिडऐवजी ‘चुकून’ ऑर्किड लिहिलंय का? दुसरा अनुभव म्हणजे अगदी परवा व्हॉट्सअपवर वाचलेला मेसेज.. मंकिफेस ‘ऑर्चिड’बद्दल माहिती सांगणारा. वास्तविक खराखुरा ऑर्किड हा उच्चार बऱ्यापैकी ज्ञात आहे, पण स्पेलिंगमधल्या (orchid ) ch मुळे हा गोंधळ होतो. Orchestra किंवा chorus मधल्या ch मुळे बिलकूल न अडखळता ऑर्केस्ट्रा आणि कोरस म्हणणारे आपण ऑर्किडच्या ch ने का बरं संभ्रमित होतो? याचं कारण ही फुलं अगदी अलीकडे आपल्या वापरात आली आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांनी आपल्या फुलबाजारात जागा पटकावली आहे. जास्त किमतीमुळे हे फूल बुके वा गृहसजावटीत कामी येत असूनही झेंडू वा शेवंती इतकेही सहज झालेले नाही. त्यामुळे नव्यानव्यानेच या फुलाशी गाठ पडणाऱ्यांना ते स्पेलिंगप्रमाणे ऑर्चिड वाटल्यास नवल नाही. पण खरा उच्चार ऑर्किड असाच आहे. मूळ उच्चार ग्रीक भाषेतील orkhis असा असल्याने ch चा क असा उच्चार केला गेला याचे कारण मिळते.
ऑर्किड हे जगात लोकप्रिय आहे. असं म्हटलं जातं की या फुलाच्या जवळपास २५,००० जाती आहेत. युरेशिया अमेरिका कॅनडा हे ऑर्किडचे माहेरघर मानले जाते. निळ्या जांभळ्या रंगाचे हे फूल राजस दिसते. प्रेम आणि रोमान्स याच्याशी हे फूल जोडलं गेलंय. भूतकाळात ते दुर्मीळ होतं त्यामुळे परदेशात प्रियकराची वाट पाहणाऱ्या प्रेयसीची ही फॅन्टसी असायची की आपला प्रिन्स चार्मिग हातात ऑर्किड घेऊन आपल्या भेटीला येतोय. बऱ्याच बाबतीत पाश्चात्यांचं आपण अनुकरण करतो. प्रेमाच्या अभिव्यक्तीबाबत तर खासच. कल्पना करा. आपला आजचा भारतीय प्रिन्स चार्मिग प्रेयसीसाठी ही फुलं घेऊन जातो आणि देताना म्हणतो. ..‘ही ऑर्चिड खास तुझ्यासाठी’. झालं की! चुकीच्या उच्चाराने सारंच.. ओम फट स्वाहा!
या फुलाच्या उच्चाराची ही खातरजमा करण्याचे आणखी एक कारण म्हणजे फार दिवसांपूर्वी आपले वाचक राजेश राणे यांनी या उच्चाराबाबत विचारणा केली होती. सध्या फूलबाजारात ही फुलं तेजीत असल्याने या शब्दाचे स्मरण झाले आणि हा एवढा शब्दफुलोरा मांडावासा वाटला. ऑर्किड निमित्तमात्रे.
viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 1:04 am

Web Title: english pronunciation 4
Next Stories
1 ‘बाहुबली’ फॅशन
2 बस नाम ही काफी है
3 व्हिवा दिवा – तेजश्री मेहेर
Just Now!
X