फिटनेस फ्रिक तरुणाईला आपल्या व्यायामामुळे, डाएटमुळे होणारे फायदे कळावेत, परिणाम लक्षात यावा यासाठी.. थोडक्यात आपल्या फिटनेसचा रेकॉर्ड ठेवता यावा यासाठी काही डिजिटल गॅजेट्स आहेत. यातली काही फिटनेस गॅजेट्स मिरवायलाही स्मार्ट असतात. एकूण फिटनेस आऊटफिटला आणखी स्मार्ट बनवण्याचं काम करतात. अशाच काही स्मार्ट फिटनेस वेअरेबल्सबद्दल..

आजकाल बरीच मंडळी आरोग्याबाबत जागरूक झाली आहेत. सकाळी सकाळी जॉिगगला जाणं, जििमग करणं या गोष्टींची आताच्या तरुणाईमध्ये क्रेझ आहे. जिमला जाणं हा एका अर्थानं स्टेटस सिम्बॉल बनतोय. तरुण मंडळी जिमला जातानाही अप टू डेट असतात. जिमवेअर हे फॅशन किंवा स्टाइल स्टेटमेंट ठरतं. त्यामुळे अशा स्मार्ट जिमवेअरला सूट होणारी स्मार्ट गॅजेट्स ओघाने आलीच. कानात इअरफोन्स घालून जॉिगगला जाणं किंवा ट्रेडमिल करणं हे जितकं स्टायलिश दिसतं, त्याहून जास्त स्टायलिश फिटनेस वेअरेबल्स असतात. आपल्या फिटनेस रुटीनचे लगोलग परिणाम दाखवणारी ही साधनं बहुपयोगी ठरतात. फिटनेस वेअरेबल्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. भारतीय बाजारपेठेत फिटनेस वेअरेबल्सचा आलेख दरदिवशी चढताच आहे.
सगळ्यात बेसिक फिटनेस वेअरेबल आहे फिटनेस बँड. आता साधा पेडोमीटर असणाऱ्या बॅण्डपासून याची सुरुवात होते. अत्याधुनिक सुविधा असणारे बँड केवळ किती चाललात हेच सांगत नाहीत, तर त्याबरोबर तुमच्या चालण्याचा वेग, त्यामुळे जळलेल्या कॅलरीज आणि तुमचं वजन- उंची हे बघून याचा किती उपयोग होईल हेदेखील सांगतात. व्यायाम करताना, चालताना, धावताना आपल्या हार्टबीट्स आणि ब्लडप्रेशर मोजणारे रिस्टबँड्सही उपलब्ध आहेत. असे रिस्ट बँड वेगवेगळ्या आकर्षक रंगांत उपलब्ध आहेत. हे बँड आपल्या मनगटाच्या शिरेतून सतत पल्स काऊंट घेत राहतात. तसंच हाताला किती घाम येतो यावरून साधारण किती कॅलरीज बर्न झाल्या तेसुद्धा हे दाखवतात. या बँड्समध्ये सध्या फिटबिट ब्लेझ, झियोमी एम.आय., नायके प्लस फ्युएल बँड असे ब्रॅण्ड्स प्रसिद्ध आहेत.
अ‍ॅपलच्या आयवॉच आणि सॅमसंगच्या ‘गिअर’मध्येसुद्धा काहीशी अशाच प्रकारची फिटनेस फीचर्स आहेत. त्यामध्ये हार्टबीट, पल्सरेट, किती पावलं चालली गेली अशा सर्व गोष्टींची माहिती मोजली जाते आणि सेव्ह करता येते. त्यांच्याच थोडय़ा पुढच्या प्रगत एडिशनमध्ये बॉडी मास इंडेक्स अर्थात बी.एम.आय. मोजण्याचीदेखील सुविधा आहे.
या वेअरेबल्सच्या पंगतीतलं सगळ्यात आकर्षक आणि टेक्नोसॅव्ही गॅजेट म्हणजे ‘नायके प्लस’चे शूज. शूज हे स्वत: कोणतंही गॅजेट नसले तरी या शूजमध्ये सेन्सर बसवलेला असतो. जो अ‍ॅपलच्या अनेक उत्पादनांशी जोडता येतो. आयफोन अथवा आयपॉड नॅनोशी हा सेन्सर कनेक्ट करता येतो. हे शूज घालून आपण किती चाललो ते अंतर आणि पावलं या दोन्ही प्रमाणात मोजलं जातं आणि थेट नायकेच्या वेबसाइटवर अपलोड केलं जातं. त्यावरून आपलं त्या त्या दिवशीचं फिटनेस रेटिंग काढता येतं. हा डेटा तुम्हाला असा जाहीर करण्याची इच्छा नसेल, तर आपल्याबद्दल अपलोड केलेला डेटा फक्त आपल्यापुरताच मर्यादित राहील आणि आपल्याला हवा तेव्हा बघता येईल अशीही सोय यात आहे.
याव्यतिरिक्त अनेक मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्स आपल्याला फिटनेसविषयी जागरूक राहायला मदत करतात. गुगल फिटनेस ट्रॅकिंगसारखं अ‍ॅप आपल्या गुगल अकाऊंटमध्ये आपलं फिटनेस रेकॉर्ड आपोआप जमा करत जातं. स्ट्राव्हा, रनकीपर, माय फिटनेस पाल ही इतर काही अ‍ॅप्लिकेशन्स प्रसिद्ध आहेत. पेडोमीटर म्हणून आणि हार्टरेट काऊंटर म्हणून उपयोगी पडतात. बदलत्या काळासोबत आपण नुसतं फिट नव्हे तर स्मार्ट अ‍ॅण्ड फिट व्हायला हवं. यासाठीच ही स्मार्ट गॅजेट्स आणि वेअरेबल्स आपल्याला मदत करतात.

जादूचा काटा
9एक घास ३२ वेळा चावून खा, असं आपल्याला नेहमी सांगितलं जातं. आहार तज्ज्ञदेखील अन्न सावकाश चावून खाण्याविषयी सांगतात. सावकाश जेवल्याने अन्नपचन चांगलं होतं आणि अतिरिक्त खाणं होत नाही. त्यामुळे वजन कमी व्हायलाही मदत होते. पण काही जणांची सवय आड येते. आपोआप भरभर खाल्लं जातं. अशा लोकांसाठी एक जादूचा चमचा अर्थात एक फिटनेस गॅजेट आलं आहे. हॅपी फोर्क (ऌंस्र््र ऋ१‘) नावाच्या गॅजेटमध्ये चमचा अथवा काटय़ामध्ये सेन्सर बसवलेले असतात. अपेक्षित वेगापेक्षा जास्त वेगाने खायला लागलात तर हा काटा थरथरायला लागतो. आपल्याला खाण्याचा वेग कमी करण्याचा इशारा आपोआप मिळतो. ऑनलाइन बाजारात हा उपलब्ध आहे.

स्मार्ट सॉक्स
धावताना किंवा जॉगिंग करताना योग्य पद्धतीने पाऊल पडलं नाही, तर पाय दुखू शकतात. अयोग्य पोश्चरचा किंवा अयोग्य धावण्याचा हाडांवर 10दूरगामी परिणाम होऊ शकतो. हे टाळायचं असेल तर त्यासाठीही स्मार्ट सॉक्स आले आहेत. ते आपलं धावणं मॉनिटर करतात आणि ते योग्य की अयोग्य याचा निर्वाळा देतात. सेन्सोरिया स्मार्ट सॉक्स हे या गॅजेटचं नाव आहे. पायमोजात लावलेल्या एका बेल्टमध्ये सेन्सर्स असतात. घोटय़ापाशी मोजा घट्ट बसत असल्याने पळताना किती प्रमाणात प्रेशर येतं, कुठल्या भागात येतं आणि किती वेगाने धावताना येतं याचा सगळा डेटा या गॅजेटमध्ये गोळा होऊन त्याचं विश्लेषण केलं जातं आणि त्यानुसार आपलं धावणं योग्य आहे की नाही याचा अंदाज येतो.

पाण्यातलं म्यूझिक
12व्यायाम करताना साथीला संगीत हवंच, असं अनेकांचं म्हणणं असतं. पण स्विमिंग करणाऱ्यांची याबाबत अडचण होते. अ‍ॅक्वा योगा, अ‍ॅक्वा झुंबा, अ‍ॅक्वा अ‍ॅरोबिक्स आदी पाण्यातल्या व्यायाम प्रकारांच्या वेळीही महागडे वॉटर रेझिस्टंट म्यूझिक प्लेअरदेखील खराब व्हायची शक्यता असते. बोन कंडक्टिंग हेडफोन हे अशा वेळी बेस्ट. फिनिस अंडरवॉटर एमपी३ प्लेअर हेच तंत्रज्ञान वापरतो. या तंत्रज्ञानात कानातून नाही तर हाडांमधून ऐकू येतं. कानात हेडफोन घालायची गरज नाही. हा एमपी३ प्लेअर स्विमिंग गॉगलला अडकवला की काम झालं. पाण्यात खोलवर बुडी मारताना जास्त जोरात आवाज ऐकू यायची सुविधादेखील यात आहे.

(संकलन : सौरभ नाईक, वेदवती चिपळूणकर,  सायली पाटील)