News Flash

चक चक चकली

ब्लॉगिंगच्या माध्यमातून एक नवी संधी, नवी ओळख कशी मिळू शकते याचं एक मराठमोळं उदाहरण, एका फूड ब्लॉगरच. चकली.ब्लॉगस्पॉट.कॉमच्या कर्तीची गोष्ट.. तिच्याच शब्दांत.

| January 2, 2015 01:11 am

ब्लॉगिंगच्या माध्यमातून एक नवी संधी, नवी ओळख कशी मिळू शकते याचं एक मराठमोळं उदाहरण, एका फूड ब्लॉगरच. चकली.ब्लॉगस्पॉट.कॉमच्या कर्तीची गोष्ट.. तिच्याच शब्दांत.
दहा-बारा वर्षांपूर्वी कुणी मला, ‘तू लोकांना स्वयंपाकाचे धडे देणार’, असं भविष्य सांगितलं असतं तर मी त्याला वेडय़ातच काढलं असतं. पण सात वर्षांपूर्वी केवळ छंद म्हणून सुरू केलेला फूड रेसिपी ब्लॉग http://chakali.blogspot.in/  आज माझ्या आयुष्याला वेगळी दिशा देतो आहे. सर्वसामान्य मराठमोळ्या घरात वाढलेली असल्यानं शिक्षण, नोकरी, लग्न अशीच काही सर्वमान्य ध्येयं होती. ती पार पडलीही.  लग्नानंतर नवऱ्याबरोबर अमेरिकेला गेले. सुरुवातीला अमेरिकेतल्या अशा काही शहरांमध्ये राहत होतो, की तिथून इंडियन स्टोअर्स किंवा रेस्टॉरंट्सही किमान ७०-८० मैलांच्या अंतरावर होती आणि दररोजच्या वापराला लागणाऱ्या भाज्या आणि आपले टिपिकल मसालेदेखील मिळणं अवघड होतं. मग स्वयंपाकघरात माझे वेगवेगळे प्रयोग झाले. तिकडच्या भारतीय vv07रेस्टॉरंट्समध्ये मिळणारे पदार्थही आपल्या रुळलेल्या चवीपेक्षा खूप वेगळे होते. सर्वसामान्य मुलीसारखं मलादेखील स्वयंपाकातलं बेसिक (वरण-भात, भाजी-पोळी) येत होतं. पण पंजाबी, चायनीज, चाट (आपल्या पुण्या-मुंबईत मिळणाऱ्या हॉटेलच्या चवीचं बरं का) कुठे मिळायला? ते बनवण्यासाठी मग प्रयोग सुरू झाले. अगदी मराठमोळे असे उत्सवी पदार्थ म्हणजे पुरणपोळी किंवा दिवाळीचा फराळसुद्धा मी कधी केलेला नव्हता. माझी आई आणि सासूबाई यांच्या फोनवर मिळणाऱ्या सूचना आणि टिप्सच्या मदतीनं मी वेगवेगळे पदार्थ बनवू लागले.
मी नवऱ्याबरोबर डिपेंडंट व्हिसावर अमेरिकेला गेले होते. नोकरीसाठी लागणारा वर्क व्हिसा माझ्याकडे नव्हता. त्यामुळे कधी नव्हे ते किचनमध्ये बराच वेळ घालवू लागले. हळूहळू या किचन कारनाम्यांची मला आवड लागली. मी अमेरिकन टेलिव्हिजनवरचे फूड शो पाहिले. त्यांचं तंत्र लक्षात घेतलं. मेन्यू डिझाइनिंग, फूड पेअरिंग असं कुकिंग सायन्सचं बेसिक ज्ञान मला वेगवेगळ्या माध्यमांमधून प्राप्त झालं. हळूहळू मेक्सिकन, थाई अशा वेगळ्या फूड डिश बनवण्यासही सुरुवात केली. बेकिंग करायला सुरुवात केली. हळूहळू मी छान बनवू शकते, अशा डिशची संख्या वाढत गेली आणि मी माझ्या मित्र-मैत्रिणींना त्याच्या रेसिपी सांगत गेले. माझ्या रेसिपीजची संख्या जशी वाढायला लागली तशी मित्रांकडून रेसिपीजची मागणीही वाढत गेली. मग या सगळ्या पाककृतींचं एक संकलन करावं असं वाटायला लागलं. ब्लॉगशिवाय वेगळं कुठलं चांगलं माध्यम असणार यासाठी? त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी माझ्या हातात होत्या. एक चांगलासा डिजिटल कॅमेरा.. मी बनवलेल्या पदार्थाचे फोटो काढण्यासाठी, ब्लॉगिंगबाबतचं जुजबी ज्ञान आणि माझं किचन!

मी बनवलेल्या या सगळ्या पदार्थाच्या रेसिपीज मी मराठीमध्ये लिहून ब्लॉगवर पोस्ट करू लागले. सुरुवातीला फार काही चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही. मला आठवतंय, ब्लॉगवर दिवसाला १०० व्हिजिट्स झाल्या तेव्हा चक्क आम्ही सेलिब्रेट केलं होतं.. तेही ब्लॉग सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांनी. त्या वेळी मला वाटायचं की, मराठीमध्ये दिलेल्या रेसिपीजच्या ब्लॉगमध्ये काही कोणाला इंटरेस्ट दिसत नाही. पण माझ्या मित्र-मैत्रिणींनी घरच्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि मी काम सुरू ठेवलं. आता ‘चकली’ला जगभरातून व्हिजिटर्स मिळताहेत. त्यामध्ये १५० देशांपेक्षा जास्त देशांतल्या लोकांचा समावेश आहे. दररोज सहा हजारांवर लोक ब्लॉगला भेट देतात आणि प्रत्येक वेळी तीन-चार रेसिपीजवर क्लिक होतं. साडेतीन हजारांवर सबस्क्रायबर्स आहेत. या ब्लॉगच्या माध्यमातून कमाईदेखील होते.
फूड ब्लॉग्ज जगभरात सगळ्यात जास्त सर्च केलेला विषय आहे. त्याचे व्हिजिटर्स जास्त, पण ब्लॉगर्सही बरेच आहेत. त्यामध्ये आपल्या ब्लॉगचं वैशिष्टय़ जपायचा प्रयत्न मी पहिल्यापासून केला. पाककृती साध्या शब्दांत दिल्या. सहज करता येतील असं त्याचं स्वरूप ठेवलं. भाषा इनफॉर्मल असली तरीही पाककृती प्रमाण असली पाहिजे याकडे लक्ष दिलं. अनेक व्हिजिटर्सनी मला फीडबॅक दिलाय की, या ब्लॉगवरच्या रेसिपी वाचताना आईच काही पाककृती सांगतेय, असा भास होतो. मराठीमध्ये रेसिपी देणारा ब्लॉग ही याची ओळख कायम आहे. इंग्रजीतही ती रेसिपी वाचायची सोय आहेच. पण जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत चकली पोचायचा प्रयत्न करतेय. परदेशात राहणाऱ्या लोकांना भारतीय पदार्थ वेगळ्या स्वरूपात किंवा वेगळ्या पद्धतीचे मिळतात, त्यांच्या सोयीसाठी काही प्रमाण वेगळ्या पद्धतीनंही मी दिलं आहे. त्यामुळे देशा-विदेशातला मराठी वाचक जोडला गेलाय.
ट्विटर, फेसबुकसारख्या सोशल मीडिया साइट्समुळे बराच फरक पडला. माझ्या ब्लॉगवरच्या रेसिपीज शेअर होऊ लागल्या. चकलीच्या फेसबुक पेजला १० हजारांच्या आसपास लाइक्स आहेत. आता स्मार्टफोनच्या माध्यमातून या सोशल साइट्सचा रीच वाढलाय आणि त्याचा ब्लॉगर्सनाही फायदा होतोय. सुरुवातीला छंद म्हणून सुरू केलेला हा उद्योग आता कमाईचं साधनंही झालाय. गुगल अ‍ॅड्सच्या माध्यमातून ब्लॉगर्सना जाहिरातींच्या उत्पन्नातील अंशदेखील मिळतो. आता रेसिपी शेअरिंग प्लॅटफॉर्म तयार करण्याचा विचार आहे. त्याद्वारे लोकांना त्यांच्या रेसिपीज शेअर करता येतील. ‘चकली’च्या वाचकांनी पाठवलेल्या काही रेसिपीजदेखील त्यावर टाकता येतील. या माध्यमात नवीन करण्यासारखं खूप काही आहे. केवळ आपली दृष्टी नवी असली पाहिजे.
(शब्दांकन – अरुंधती जोशी)
  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 1:11 am

Web Title: food bloger kirti
Next Stories
1 प्ले लिस्ट – नॉस्टॅल्जिया
2 नवीन वर्षांचं स्वागत आणि सिनेमांचं ट्रेण्डिंग
3 व्हाय वॉक व्हेन यू कॅन डान्स
Just Now!
X