|| नेहा बेलवलकर

 

आज सकाळी कामावरून घरी जाताना गेल्या काही महिन्यांतील घडामोडी डोळ्यांसमोर लख्ख उभ्या राहिल्या. मला उच्च शिक्षणासाठी न्यूझीलंडमध्ये येऊन नऊ  महिने झाले आहेत. माझं शालेय शिक्षण ‘पार्ले टिळक विद्यालया’त इंग्रजी माध्यमातून झालं. मी ‘रामनारायण रुईया महाविद्यालया’मधून बी.एस्सी. (बायोकेमिस्ट्री) केलं. शिवाय ‘अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन फूड सायन्स अ‍ॅन्ड क्वॉलिटी कंट्रोल (एफएसक्यूसी) हा अभ्यासक्रमही शिकले. दरम्यान, ‘हॉलिडे इन’ आणि ‘फरटिन फार्मा प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये कामाचा अनुभवदेखील मी घेतला. रुईयामध्ये असताना माझा कल बायोकेमिस्ट्रीपेक्षा ‘एफएसक्यूसी’कडे जास्त होता. त्याची आवडही होती. ‘हॉलिडे इन’मधील इंटर्नशिप ही एफएसक्यूसीच्या अभ्यासक्रमाचा एक भाग होता. तिथे अन्न हाताळणं, खाद्यपदार्थावर विविध प्रकारच्या चाचण्या करणं आदी गोष्टी करायला मिळाल्या. ते करत असताना एक वेगळंच समाधान मिळालं. त्यामुळे त्यातच करिअर करायचं असं पक्कं ठरवलं. ‘फूड सायन्स’ म्हणजे अन्नातील सर्व प्रकारच्या तांत्रिक बाबींचा अभ्यास करणं. ‘फूड सायन्स’ हे मायक्रोबायॉलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि रसायनशास्त्र यांसारख्या विषयांमधील तत्त्वांचा अभ्यास करून त्याआधारे काम करतं. अन्नाचं शास्त्रीय विश्लेषण करणं हाही त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा असतो. अन्नपदार्थ आणि गुणवत्ता नियंत्रण, अन्नपदार्थ टिकवणं आणि त्यांचं पॅकेजिंग आदी घटकांचा अभ्यास यात केला जातो. शासकीय संस्था, संशोधन संस्था, अन्नप्रक्रिया करणाऱ्या कंपन्या, गुणवत्ता नियंत्रक संस्था, अन्न तपासणी इत्यादी ठिकाणी पुढे चांगल्या संधी उपलब्ध होतात.

न्यूझीलंडमध्ये यायच्या निर्णयाविषयी नातेवाईकांना कळल्यावर सगळ्यांनीच एक प्रश्न हमखास विचारला की न्यूझीलंडच का? न्यूझीलंडपेक्षाही माझा अधिक भर ‘लिंकन युनिव्हर्सिटी’त प्रवेश घेण्यावर होता, कारण या विद्यापीठातला ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अप्लाईड सायन्स’ (फूड इनोव्हेशन) हा अभ्यासक्रम इतर कोणत्याही विद्यापीठात उपलब्ध नव्हता. न्यूझीलंडमध्ये वर्क व्हिसाचा कालावधी तीन वर्षांचा असून तो इतर देशात नाही. हे सर्व मुद्दे विचारात घेऊन मी इथे येऊन हाच अभ्यासक्रम शिकायचा निर्णय घेतला. मात्र त्याआधी परदेशी शिक्षणाचा विचारही कधी मनात आला नव्हता. तो विचार मनात आल्यापासून ते परदेशात शिक्षणासाठी येऊन आज नऊ  महिने पूर्ण होणं, हा सगळा म्हटलं तर योगायोगच! नोव्हेंबर २०१७ मध्ये एका ‘एज्युकेशन फेअर’ची जाहिरात मी पाहिली अन् फक्त बघून तरी येऊ  काय आहे ते, असं वाटल्याने मी तिथे गेले. साधारण दोन-तीन दिवसांनंतर मला एका एजन्सीमधून फोन आला आणि पुढच्या घटना आपोआप घडत गेल्या. पुढील कार्यपद्धतीविषयी जाणून घेण्यासाठी आईबरोबर मी ‘क्राफ्ट एज्युकेशनल सव्‍‌र्हिस’ला गेले. कुठल्या देशात, कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये, कोणत्या कोर्सकरता अर्ज करायचा विचारपूर्वक हे ठरवून, त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करेपर्यंत साधारण सहा महिने उलटले. या प्रक्रियेत एजन्सीची चांगली मदत झाली. ‘लिंकन विद्यापीठा’सह मी आर्यलड आणि यूकेमधील इतर काही विद्यपीठांतही अर्ज केला होता. मात्र प्रवेश याच विद्यापीठात घेतला. या सगळ्या काळात आणि आताही आईवडिलांचा खूपच आधार होता आणि मिळतो आहे. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. त्यांनी आत्तापर्यंत मला माझे निर्णय स्वत: घेण्याची मुभा दिली आहे. कधी काही चुकलंच तर सावरलंदेखील आहे. मी अभ्यासासाठी परदेशात जाण्याची इच्छा व्यक्त केल्यावर ते नेहमीप्रमाणे माझ्या बाजूने ठाम उभे राहिले. त्यातही सिंहाचा वाटा मात्र माझ्या आईचा होता. तिने माझ्याबरोबर सगळीकडे येण्यापासून ते मानसिक आधार देण्यापर्यंत सगळ्या गोष्टी केल्या.

म्हणता म्हणता जानेवारी माहिना उजाडला आणि माझा ऑर्किडमधला कार्यकाळ संपून माझी इथं यायची वेळ जवळ आली. मला अजूनही तो क्षण आठवतो.. मी विमानतळावर माझ्या कुटुंबीय आणि मित्रांच्या गराडय़ातून वाट काढत माझ्या स्वप्नांच्या दिशेने जायला निघाले होते. व्हिसाच्या रांगेत असताना, खरोखरच मी परदेशात जात आहे, याची खात्री पटली आणि डोळ्यात पाणी आलं! पण मी स्वत:ला रडू देण्याची ही पहिली आणि शेवटची वेळ होती. विमानतळाच्या प्रतीक्षालयामध्ये माझी भेट प्रज्ञाशी झाली. तिनेही माझ्याच विद्यापीठात माझ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. त्या वेळी मला माहिती नव्हतं की ती माझी सर्वोत्तम मैत्रिण होईल. एकूणात मी नशीबवानच. कारण माझ्या बाबांचे मित्रसुद्धा ख्राईस्ट चर्चमध्ये होते आणि मी त्यांच्याकडे उतरले होते. त्यानंतर मी पेइंग गेस्ट म्हणून राहते आहे ते लोकही अगदी घरच्यासारखे वागणारे आणि काळजी घेणारे आहेत. आपण घरातले एकत्र टीव्ही बघतो. तसाच आम्ही इथे एकत्र टीव्ही बघतो. माझ्याशिवाय ते टीव्ही शो पाहत नाहीत. अलीकडेच मी आजारी पडले होते. तेव्हा अभिषेक आणि सेलिना या माझ्या इथल्या कु टुंब सदस्यांनी (माझे घरमालक) माझी खूप काळजी घेतली होती. मला धीर दिला होता. आता त्यांच्या मित्रमैत्रिणींशीही माझी गट्टी जमली आहे.

तीन दिवसांच्या इंडक्शनच्या काळात आम्हाला केवळ अभ्यासक्रम किंवा विद्यापीठाबद्दलच नव्हे तर प्रथमोपचार, सीपीआर, अग्निशमन आणि एकूणच सगळ्या नियमांबद्दलची माहिती देण्यात आली. त्यानंतरच्या आठवडय़ात वर्ग सुरू झाले. इथल्या हवामानापासून ते वेळेतील फरक, दीर्घ दिवस, इंग्रजीचे उच्चारण इत्यादी अनेक गोष्टींची माहिती घेत, त्यांचा अंगीकार करत  मी हळूहळू स्थिरावले. फूड मायक्रोबायॉलॉजी, फूड प्रोसेसिंग, फूड सायन्स अ‍ॅण्ड न्यूट्रिशन आणि अन्नासंबंधित इतर विषय माझ्या अभ्यासक्रमाचा भाग होते. हा नऊ  महिन्यांचा कोर्स नुकताच संपला असून अजून निकाल लागायचा आहे. त्यानंतर वर्क व्हिसासाठी अर्ज करता येईल. त्यानंतर नोकरी शोधायची आहे. इथे गूगलवरून कॉपी-पेस्ट केलेलं चालत नाही. प्रत्येक असाईनमेंट गांभीर्यपूर्वक आणि जबाबदारीने करावी लागते. रिसर्च पेपर वाचून ते समजून घेऊन ते स्वत:च्या शब्दात मांडवावे लागतात. शब्दमर्यादाही पाळावी लागते. इथले प्राध्यापक खूप सहकार्य करणारे आणि सुस्वभावी आहेत. आमच्या शंकांचं निराकरण ते चटकन करतात.

सातासमुद्रापार आपली भाषा बोलणारं कुणी भेटलं तर जो आनंद होतो, तोच मलाही झाला. कारण एकदा मुंबईतले काही लोक मला इथे भेटले. मी दोन मैत्रिणींसोबत कॅफेटेरियामध्ये गप्पा मारत बसले होते. तेव्हा भेटलेली ही पाच मुलं आमच्यात सामील झाली आणि आमचा ग्रुप मोठा झाला. इथल्या वास्तव्यात बऱ्याच नवीन गोष्टी आणि प्रसंग अनुभवायला मिळाले. मग ते बदलते ऋतू असोत किंवा भूकंपाचे धक्के, चक्रीवादळ असो अथवा गारपीट!  त्यातील एक घटना आठवली की आजही अंगावर शहारे उभे येतात. ती म्हणजे इथल्या दोन मशिदींवर मोठय़ा प्रमाणात झालेला गोळीबार. त्यातील एक मशीद माझ्या घरापासून फक्त ३०० मीटर दूर आहे. त्या वेळेस मी जाम घाबरले होते. केवळ मित्रमंडळींमुळे त्यातून सावरू शकले. त्यांनी ज्या पद्धतीने मला सांभाळून घेतलं, ते मी कधीही विसरणार नाही. मला माझ्या मित्रांनी ‘मदर हेन’ असा टॅग दिला होता. कारण मी त्यांची आईप्रमाणे काळजी घेतली. त्यांना घरच्यांची कधी आठवण येऊ दिली नाही. मी बऱ्याच लोकांकडून ऐकलं होतं की, न्यूझीलंड हा एक सुंदर देश आहे, तथापि मी इथे येताना ते सौंदर्य अक्षरश: अनुभवलं! इकडचे समुद्रकिनारे असो अथवा बोटॅनिकल गार्डन्स, अ‍ॅनिमल फाम्र्स असो किंवा आणखी काही.. प्रत्येक ठिकाणची खुबी आगळीवेगळी आहे. येथील प्रेक्षणीय स्थळं नुसती निसर्गरम्य नसून विस्मयकारकही आहेत.

अभ्यासाबरोबर मी पार्टटाईम जॉबही करते आहे. माझ्या काही मित्रांप्रमाणे मला पार्टटाईम जॉब शोधायला फारसा वेळ नाही लागला. माझ्या घराजवळच्या मॉलमध्ये मी ‘बेकर अ‍ॅण्ड कॅफे असिस्टंट’ म्हणून काम करते. शनिवार- रविवार माझे कामाचे दिवस असतात. मी काही बेकिंगचा कोर्स केलेला नाही किंवा खूप अनुभव माझ्या गाठीशी नाहीत. तरीही इथल्या खवय्यांना मी केलेलं बेकिंग खूप आवडतं आहे. काम, अभ्यास आणि घरची कामं यातील समतोलपणा राखणं कधी-कधी अवघड जातं, खासकरून सलग सतत बऱ्याच असाईनमेंट असतात, त्यावेळी तारांबळ उडते. अशा वेळेस वेळेचं व्यवस्थापन आणि कामाचं प्रभावी नियोजन हे उपयोगी पडतं. बघा, विचार करता करता घरी पोहोचले. आता पुढचं वेळापत्रक गाठायला हवं. बाय बाय!

कानमंत्र

तुम्हाला रसायनशास्त्र आणि मायक्रोबायॉलॉजीची आवड असेल तर या अभ्यासक्रमासारखा खरंच दुसरा अभ्यासक्रम नाही.

परदेशी शिक्षणाचा विचार करत असाल तर प्रत्येक विद्यापीठाच्या वेबसाइट्सवरची  अभ्यासक्रमांची माहिती व्यवस्थित वाचून मगच योग्य निर्णय घ्या.

संकलन : राधिका कुंटे  – viva@expressindia.com