सौरभ करंदीकर

एकविसाव्या शतकातलं एकविसावं वर्ष नवीन आव्हानं घेऊन आलं आहे. मागील पानावरून पुढे जाणाऱ्या बेफिकीर मानवजातीला करोनाने खडबडून जागं के लं आहे. शिक्षण, उद्योग, समाजकारण सारं बदलून गेलंय. आजचे ‘डिजिटल नेटिव्ह्ज’ या आव्हानांकडे कसे पाहतात? त्यांच्यावर मात करण्यासाठी  ‘तंत्रज्ञान’ नावाचं शस्त्र कसं वापरतात?, यावर मानवजातीचं अस्तित्व अवलंबून आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडींचा धावता आढावा घेणारं सौरभ करंदीकर यांचं नवीन सदर – ‘नवं दशक नव्या दिशा’

डग्लस अ‍ॅडम्स या प्रख्यात लेखकाने ‘हिचहायकर्स गाईड टु द गॅलेक्सी‘ नावाची विनोदी कादंबऱ्यांची मालिका लिहिली. आपल्या आकाशगंगेत प्रवास करणाऱ्या काही मुशाफिरांना या मालिकेमध्ये अनेक अतक्र्य, चित्तचक्षु चमत्कारिक गोष्टींना सामोरं जावं लागतं. प्रसंगी हसून हसून लोळवणारी, तर कधी विचारमग्न करणारी ही काल्पनिक अनुभवगाथा कमालीची लोकप्रिय झाली. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जगासमोरचे तात्कालिक प्रश्न — काही क्षुल्लक तर काही गहन — यात मांडले गेले आणि त्यांची वाट्टेल ती उत्तरं देण्याचा मनोरंजक प्रयत्न केला गेला.

यातील एका प्रसंगात कथेचा नायक एका परग्रहावरील उपाहारगृहात वेटरची वाट पाहत असतो. अचानक मानवी वेटरऐवजी एक गलेलठ्ठ प्राणीच हातात वही—पेन्सिल घेऊन येतो. आणि ‘तुम्हाला माझ्या शरीराचा कुठचा भाग खायचा आहे?’, असं विचारू लागतो! भांबावलेल्या आणि काहीशा घाबरलेल्या नायकाला तो प्राणी शांत करतो. ‘तुम्हा पृथ्वीवासीयांना कल्पना नाही, पण नॉनव्हेज खाणाऱ्यांमुळे प्राण्यांना जी क्रू र वागणूक मिळते ती टाळण्यासाठी आमच्या शास्त्रज्ञांनी आपणहून बळी जाणाऱ्या प्राण्यांची निर्मिती केली आहे’, हे ऐकून बिथरलेला नायक म्हणतो, ‘जाऊ दे मी व्हेज सुपच घेतो!’ यावर तो प्राणी अचानक गंभीर होतो. ‘साहेब, हळू बोला. भाज्यांनी हे ऐकलं तर त्यांना राग येईल!’ थोडक्यात, ‘मांसाहार’ आणि त्याबद्दल शाकाहारी लोकांकडून दर्शवला जाणाऱ्या तिरस्काराची ही खिल्ली होती.

शाकाहारी विरुद्ध मांसाहारी, या वादामध्ये न पडता आपण तटस्थपणे या दशकात आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या अन्नसंकटाबद्दल जाणून घेऊ. विकसनशील देशातील अन्नाचा तुटवडा, भूकबळी, तसंच विकसित देशातील अतिउत्पादन आणि अन्नपदार्थांची नासाडी या विरोधाभासाबद्दल आपण जाणतोच. त्यातील पशुजन्य पदार्थांच्या अन्नप्रक्रियेमुळे निर्माण होणारे प्रदूषण हा देखील चर्चेचा विषय झाला आहे. पर्यावरण प्रदूषित करणाऱ्या गोष्टींमध्ये रस्त्यावरील वाहनांचा वाटा १४ टक्के  आहे, तर मांसाहार—प्रक्रियांचा वाटा २१ टक्के  आहे. ‘शेळी जाते जिवानिशी’ परंतु काही प्रमाणात वाया जाते, हेही समोर येते आहे. जगभरातील मांस उत्पादनापैकी २० टक्के  मांस नष्ट होतं हे सत्य पचायला कठीण आहे. आज अन्नधान्याचा मोठा भाग थेट आपल्यापर्यंत न येता पशुखाद्य म्हणून वापरला जातो. त्या खाद्यातील कॅलरी मोजल्या आणि त्यांच्यामुळे वाढीस लागणाऱ्या पशूंच्या मांसातून मिळणाऱ्या कॅलरी मोजल्या, तर ते प्रमाण ९/१ असं आहे. म्हणजेच पशूने ९ कॅलरी खाल्लय़ा की त्याच्या मांसातून आपल्याला १ कॅलरी मिळते! याशिवाय पिण्याच्या पाण्यावर जो भार पडतो तो वेगळाच. विकसित देशांमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार एक किलो चिकन उत्पादनामागे ४,३०० लिटर पाण्याचा पुरवठा वापरला जातो. एक किलो मटण, हॅम, बीफ निर्मितीसाठी अनुक्रमे ५,५०० लिटर, ६,००० लिटर आणि १५,४०० लिटर एवढय़ा पाण्याचा वापर होतो.

थोडक्यात, पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याच्या पापामध्ये मांसाहार हा मोठा वाटेकरी आहे. याशिवाय प्राण्यांमधून मानवी शरीरात येणारे विषाणू कसे थैमान घालतात हे आताच्या करोनाकाळाने दाखवून दिलंय. हे सगळं माहिती असूनसुद्धा, प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराची पुरेशी जाणीव असतानादेखील आपल्या मांसनिर्मितीमध्ये कुठेही घट होताना दिसत नाही. उलट दरवर्षी जगभरात निर्माण केल्या जाणाऱ्या  विविध प्रकारच्या मांसाहारी पदार्थांचं प्रमाण वाढतंच आहे. १९६० साली ७ कोटी टनावर असलेलं उत्पादन आता ३० कोटी टनावर पोहोचलेलं आहे आणि लोकसंख्या जशी वाढेल तसं मांसाहार प्रेम वाढतच राहणार.

या परिस्थितीत बदल घडवायचा चंग काही शास्त्रज्ञांनी आणि उद्योजकांनी बांधलेला आहे. आजच्या तंत्रज्ञानाने त्यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले आहेत. एक म्हणजे प्रयोगशाळेत तयार केलेले मांस किंवा भाज्यांपासून तयार केलेले मांस. गेली कित्येक शतके आपण अनेक पदार्थ ‘प्रयोगशाळेत निर्माण करत आलेलो आहोत. यीस्टची प्रक्रिया करून आपण बिअर, चीज ब्रेड इत्यादी वस्तू बनवतोच की! तसंच प्रक्रियेने निर्माण केलेलं मांस हे पशुजन्यच असतं. पशुच्या शरीरातील काही पेशी प्रयोगशाळेमध्ये इतर कच्च्या मालाबरोबर वाढवल्या जाऊ शकतात. अशी वाढ खऱ्याखुऱ्या प्राण्याच्या वाढीपेक्षा खूपच लवकर होते. एका कोंबडीची पूर्ण वाढ व्हायला ६ आठवडे जात असतील तर त्याच आकाराचं चिकन प्रयोगशाळेत तयार व्हायला फक्त ६ दिवस लागतात! शिवाय आपल्या काही पेशींचं दान केलेली ती कोंबडी सुखरूप राहते! २०१३ सालच्या आकडेवारीनुसार प्रयोगशाळेत तयार केलेल्या एका बीफ बर्गरची किंमत २ कोटी रुपये होती, आज तशाच बर्गरची किंमत ८५० रुपयांवर आलेली आहे. तरीही ती खऱ्या बीफ बर्गरपेक्षा महागच आहे. पण भविष्यात हे चित्र बदलेल असा काही उद्योगपतींचा दावा आहे.

दुसरा पर्याय हा भाज्यांपासून तयार होणाऱ्या मांस—सदृश पदार्थांचा.  ‘इम्पॉसिबल फूड्स’ नावाच्या एका कंपनीने ‘इम्पॉसिबल बर्गर’ची निर्मिती केली आहे. त्यासाठी त्यांनी पदार्थविज्ञान जाणणाऱ्या शास्त्रज्ञांखेरीज मानसशास्त्रज्ञांनादेखील हाताशी धरलं आहे. मांसाहारी व्यक्तींना मांसाहार का आवडतो?, याचा त्यांनी खोलवर अभ्यास केला आहे. चव, रंग, रूप याबरोबरच स्पर्श आणि ध्वनी (मांसाहारी पदार्थ बनवताना आणि खाताना होणारी अनुभूती तसेच येणारे आवाज) हे मांसाहारी व्यक्तींच्या मेंदूमध्ये प्रसन्नतेच्या भावना निर्माण करतात. त्या भावना निर्माण करण्यासाठी कडधान्यांमधले आणि भाज्यांमधले कोणते पदार्थ, कोणते रेणू, कोणती मिश्रणं कारणीभूत ठरतील याचं संशोधन केलं गेलं. त्यांचा इंम्पॉसिबल बर्गर हा सोयाबीन, गहू, बटाटा, साखर, काही कंदमुळं, इतकंच नाही तर नारळाचे तुकडे, खोबरेल तेल आणि काही अ‍ॅसिड्स यांच्या विशिष्ट मिश्रणातून तयार केला जातो. अनेक खवय्यांनी आणि जागतिक कीर्तीच्या खानसाम्यांनी या बर्गरला आपलंसं केलं आहे. कदाचित उद्या व्हेज आणि ‘अशक्य’ अशा दोनच प्रकारचे पदार्थ आपण निवडू, पर्यावरणाचा समतोल साधला जाईल आणि आपले पाळीव प्राणिमात्र देखील आपल्याला दुवा देतील.

(लेखक युजर एक्सपीरियन्स डिझाइन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत.)