रिलेशनशिप स्टेटस हा सतत ट्विप्पणी करण्याचा, वॉलवर चितारायचा आणि  लाईक- कमेंट करायचा ‘शेअर’ बिझनेस झालाय. सतत ‘अपडेट’ होणाऱ्या रिलेशनशिप स्टेटसमागचं ‘लॉजिक’ समजून घ्यायचा हा प्रयत्न.
परवाच एक मत्रीण माझ्याशी बऱ्याच दिवसांनी गप्पा मारत होती. छान मूडमध्ये आली होती ती.. तिचा चेहराही जरासा खुललेला दिसत होता नेहमीपेक्षा.. आणि दर दोन मिनिटाला मोबाइलमध्ये काहीतरी टाइप करणं चालू होतं मॅडमचं. दर दोन मिनिटाला तिचा मोबाइलसुद्धा वाजत होता. मी पटकन विचारलं ‘काय गं ? नक्की काय चालूये?’ तर ती म्हणाली, ‘काही नाही गं. मित्राशी बोलतेय.’ मी सहज विचारलं की, ‘नक्की काय बोलतेयस एवढं?’ तर तिने सांगायला सुरुवात केली की, ‘अगं.त्यानं मला खरं तर प्रपोज के लं होतं. मी सुरुवातीला नाही म्हणालेय आणि आता अचानक मला त्याला ‘हो’ म्हणावंसं वाटतंय.’
मी ऐकतच राहिले. हे सगळं फारसं काही नवीन नव्हतं म्हणा. पण बोलता बोलता तिने मला सांगितलं, ‘अगं मी आईला हे सगळं सांगितलं, तर तिने मला विचारलं की तू त्याच्या प्रेमात पडलीयेस का ?..  ओ गॉड !! प्लीजच.. हे काय विचारणं झालं का गं? प्रेमबीम काय? मला एकदम ना. करण जोहरच्या सिनेमातली हिरोईन झाल्यासारखं वाटलं. आई पण ना..’ मैत्रीण बरंच बोलत राहिली पुढे. नंतर काही दिवसांनी मैत्रीण भेटली तेव्हा म्हणाली, ‘मी त्याला ‘हो’ म्हणाले.. मला ना खरं तर आता कुणाबरोबर तरी रिलेशनमध्ये राहायचंच होतं अगं. हो.. म्हणजे बघ ना, एक वर्ष झालं मी अशीच सिंगल आहे. माझे सगळे मित्र-मत्रिणी कमिटेड आहेत आणि मीच अशी राहिलीये. आणि बऱ्याच दिवसांत कुणाकडून हक्काने लाड करून घेता नाही आलेत. सगळे कमिटेड असल्यामुळे मला माझं असं हक्काचं माणूस मिळतच नव्हतं. सगळे मित्र-मत्रिणी त्यांच्या त्यांच्या गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडसोबत बिझी असतात. मग मला कुणाशीच बोलायला मिळत नाही. म्हणून मग आता मी त्याला ‘हो’ म्हणाले..’
हा सीन सध्या आजूबाजूच्या जगात घडणारा एक खूप नॉर्मल- कॉमन झालाय. कित्येक मुलींना फक्त एक ‘इमोशनल नीड’ पूर्ण करणारं कुणीतरी हवं असतं. म्हणून मग ते रिलेशनशिपमध्ये राहणं येतं. बरं.. अशा रिलेशनमध्ये असणाऱ्या मुलींना ‘तू त्याच्याशी लग्न करणार का?’ असा (त्यांच्या भाषेत- पाणचट) प्रश्न विचारलेला मुळीच चालत नाही. अहो दोन-तीन मुलांसोबत राहिल्याशिवाय किंवा दोन-तीन मुलांना पाहिल्याशिवाय कळणार कसं ना फायनल चॉइस काय हवा? म्हणजे शॉिपगला गेल्यावर नाही का दोन-तीन ड्रेसची ट्रायल झाल्यानंतर फायनली खरेदी करून परिधान केला जाणारा ड्रेस वेगळाच असतो.. तसंच आहे का हे, आजच्या मुलींचं म्हणणं?
‘अगं तो माझा ‘फक्त’ बॉयफ्रेंड आहे, बाकी काही नाही. यातल्या ‘फक्त’ शब्दांचा विचार मग मात्र त्यांच्या ताईंपासून ते आजीपर्यंत सगळ्यांनाच करावा लागतो. कारण ‘फक्त’ शब्दात पुढे जाऊन लग्न वगरे करण्याचं इंटेन्शन नसतंच आणि इव्हन काही मुलींना तर मुलासोबतची फिजिकल अटॅचमेंटसुद्धा नको असते. शारीरिक ओढ वाटत नसते. तो माझा ‘फक्त’ बॉयफ्रेंड आहे म्हणजे काय? तर तो माझा खूप चांगला मित्र आहे. आम्ही एकमेकांची कंपनी एन्जॉय करतो. एकमेकांना खूप छान समजून घेतो. आणि मग आता आजूबाजूला प्रत्येक जण कमिटेड असल्यानं आणि आम्ही दोघं सिंगलच असल्यानं आता ‘िमगल’ झालो हीच त्या साऱ्याची व्याख्या असते. त्यात मग आपण ‘आऊटडेटेड’ वाटू या प्रकाराला पूर्णविरामच मिळतो. एक हक्काची कंपनी मिळते. (अर्थात काही महिन्यांसाठी) घरीही बिनधास्तपणे सांगू शकतो की, मी माझ्या अमुक अमुक मित्र कम बॉयफ्रेंडसोबत आहे, हल्ली घरचेही काही म्हणत नाहीत.
काही महिने झाल्यानंतर मग येतो तो पॉइंट ऑफ सॅटिएटी- समाधानाचा अंतिम क्षण. त्यात मग सरळसरळ स्पष्ट शब्दांत एकमेकांना सांगितलं जातं की, ‘आता आपण बरेच ‘महिने’ एकमेकांसोबत घालवलेत. आय डोन्ट िथक सो दिस विल वर्क मोअर. त्यामुळे आपण थांबू या इथेच. मलाही थोडा ब्रेक हवाय आणि मला वाटतं तुलाही. आपल्या दोघांनाही थोडय़ा चेंजची गरज आहे. सो..आपण थांबू या आता इथे.’ तोपर्यंत समोरच्यालाही ते पटलेलं असतं. आणि मग दोघेही ठीक आहे, बिग डील. त्यात काय एवढं? (!) असं म्हणून कुठल्याही प्रकारची फारशी रडारड न करता एकमेकांना अगदी सहजपणे ‘बाय’ म्हणतात आणि आपल्या ‘सो कॉल्ड’ रिलेशनशिपला पूर्णविराम देतात. त्याचा फारसा त्रास करून घ्यायचा नाहीच हे तर सुरुवातीलाच एकत्र येताना ठरलेलं असतं. बरं रिलेशन थांबवलं मग मत्री थांबली का? तर मुळीच नाही. मग ‘बॉयफ्रेंड’वरून ‘फक्त फ्रेंड’ एवढाच काय तो बदल होतो.
काही वर्षांपूर्वी लग्न योग्य टिकेल की नाही या धास्तीपोटी ‘लिव्ह इन रिलेशनशिपचा’ मार्ग काहींनी अवलंबायला सुरुवात केली. पण आता रिलेशन व्यवस्थित टिकेल की नाही हे ठरवण्यासाठीच्या या कॉन्ट्रॅक्ट ट्रायल्स आहेत. हे किस्से ऐकून आपण फारसं चकित न होणंच श्रेयस्कर, नाही का?
चित्र : समृद्धी देसाई
छाया : ऋषिकेश पवार / फोटो  प्रातिनिधिक